प्रतिष्ठा भाग ९

प्रतिष्ठा भाग ९ –

सचिन जरी घरी आला होता तरी त्याच्यात झालेला बदल घरच्यांपासून लपून राहिला नाही. तो आल्यापासून अगदीच कमी बोलला असेल. सतत त्याच्या मनात काहीतरी शिजतं आहे असं जाणवत होतं. त्याच्या आईने, वडिलांनी त्याला झालं गेलं विसरून बहिणीला माफ कर म्हणून समजावण्याचा खूप प्रयत्न केला होता. पण त्यांच्या देखत त्याने या विषयावर एक चकार शब्दही काढला नव्हता. त्यामुळे त्यांनाही आपल्या पोराच्या मनात काय चालू आहे याचा अंदाज बांधता येत नव्हता. लहान बहिणीशी तर तो काहीसा फटकूनच वागत होता. त्याने तिच्याशी एवढ्या वेळात फक्त एक दोन वाक्य बोलले असतील, तेही तुसडेपणाने. त्यामुळे तीही त्याच्या समोर थांबत नव्हती.

सकाळी सचिन पाटलाच्या वाड्यावर आला.

“काय पोरा? आठ दिसानंतर रातच्याला नीट झोपं लागली आसन न्हवं ?” पाटलानं प्रश्न केला. वरवर जरी तो साधा असला तरी त्यामागील खोचकपणा सचिनच्या लक्षात आल्यावाचून राहिला नाही. पण त्यावर काहीही उत्तर देण्याचं सचिननं टाळलं.

“बरं… आता काय करायचं ठरीवलं?” पाटलाचा पुढचा प्रश्न…

“पाटील… तुमची मदत पायजेल मला.”

“आरं मंग बोल की… देशमुख माह्या भावासारखा… म्हंजी म्या तुजा काका हाय न्हवं… बोल… काय मदत पायजेल?” आपल्या आवाजात आपुलकी दाखवत पाटलानं विचारलं.

“मी जेल मधी होतो तवा तिथं एक मानुस भेटला मला. त्यो मला मदत करनार हाय… तुमी फक्त त्याला सोडवायचा… आठ दिवसांसाठी…” सचिनने मुद्द्यालाच हात घातला.

“ह्ये बग पोरा… त्यो कोन मला म्हाईत न्हाई… उद्या तुमी काई केलं तर त्यात म्या आडकंल…” पाटलानं आपली नाराजी दाखवली.

“न्हाई पाटील… तुमावर काय बी येनार नाई… मह्यावर विश्वास ठेवा…” सचिनने पाटलाला समजावण्याचा प्रयत्न केला, पण पाटील मानायला लवकर तयार होईना.

“ह्ये बग… जवर मला समदं यवस्थित समजत न्हाई तवर म्या काय बी मदत करू शकनार न्हाई.” पाटलानं फायनल सांगितलं आणि मग सचिनने आपला पूर्ण प्लॅन पाटलाला सांगितला. सचिनचा प्लॅन पाटलाला मनापासून आवडला. कारण जर काही कमीजास्त झालं तर त्यात पाटील नामानिराळा राहू शकणार होता. तरीही त्यावर सगळ्या बाजूंनी विचार करतोय असे दाखवत पाटलानं सुरुवात केली.

“ज्ये काय तू म्हनु ऱ्हायलाय त्यात दम हाय. पन म्या तुला येका अटीवर मदत करीन… त्या पोरीला आनी त्या पोराला आदी माह्या हितं आनायचं… म्हंजी तुमच्या खानदानाला म्या जातीत घ्याया लावतो. हायेस कबूल?” पाटलानं आपला हेतू सांगितला. त्यावर त्याला काय उत्तर द्यावे हे सचिनला लवकर उमगेना. पण जर त्याचे म्हणने मानले नाही तर आपल्या मित्राला बाहेर काढणे सचिनला शक्य होणार नव्हते त्यामुळे त्याने तोंडदेखले होकार दिला. त्याचा मित्र बाहेर आल्यावर मात्र तो त्याच्याकडून त्याला पाहिजे तेच काम करून घेणार होता.

“ठीके पाटील… जशी तुमची मर्जी… आता २/३ दिसात म्या त्यांचा पत्ता काढतो आनी तुमी माह्या मित्राला भायेर काढा… काय?” सचिनने पाटलाला आपला होकार सांगितला.

पुढच्या तीन दिवसात सचिनने प्रज्ञाचा पत्ता मिळवला. पाटलाने सचिनच्या गुन्हेगार मित्राला, दिलीपला पॅरोलवर बाहेर काढले होते. पण या मित्राबद्दल देशमुखांना मात्र काहीही कल्पना नव्हती. या तीन दिवसात सचिन फक्त घरी झोपण्यापुरताच येत होता. बाकी त्याचे जेवण वाड्यावरच झालेले असायचे. सचिनच्या आईने या काळात बऱ्याच वेळेस सचिनला प्रज्ञाला माफ करण्याबद्दल सांगितले होते, पण तो त्यावर काहीच बोलत नसल्यामुळे तिच्या मनातील धाकधूक वाढतच होती.

शेवटी आज तो दिवस उजाडला. सगळेजण पाटलाच्या वाड्यावर जमले. या दिवसाची फक्त पाटीलच नाही तर भिवा सुद्धा अगदी चातकासारखी वाट पहात होता.

“ह्ये पघ पोरा… त्यांना पायल्यावर डोक्यात राग आनायचा न्हाई. त्ये आपल्याला जीत्ये पायजेत. नायतर काय करून बश्शील अन मंग आमाला काय बी करता यायचं नाई… म्या काय म्हनू ऱ्हायलो ह्ये समजू ऱ्हायलं ना तुला?” पाटलाने सचिनला परत एकदा समजून सांगितले.

“हा वो पाटील… मला म्हाईत हाये…” सचिन वैतागाने म्हणाला.

“वो… भाऊ… तुमी सांभाळश्यान ना? का उजूक पोरं देऊ?” दिलीपकडे पाहत पाटलानं विचारलं.

“नाही… गरज नाही त्याची. अशानं जास्त गवगवा होतो. अन त्या पोराच्या डोक्याला घोडा टेकवला की ती पोरगी आपसूक येईल मागं मागं.” दिलीपने नकार दर्शवला. एका अर्थी पाटलासाठी हे चांगलंचं होतं. जर काही कारणाने त्यांची योजना फसली तरी त्यामुळे पाटलावर काही बालंट येणार नव्हतं. चेहऱ्यावर मात्र पाटलाने तसे बिलकुल दिसू दिले नाही.

“न्हाई म्हंजी… आता तुमी दोघचं हायेत म्हनून काळजी वाटू ऱ्हायली…” चेहऱ्यावर खोटी काळजी दाखवत पाटील म्हणाला.

“पाटील… संध्याकाळी ती पोरं तुमच्या समोर असतील.” अगदी बेफिकीरीनं आपल्याकडील गावठी पिस्तुल चेक करत दिलीप म्हणाला आणि मग ते त्याने आपल्या कमरेला खोचले. त्याने शर्ट इन केलेला नसल्यामुळे ते कुणाला दिसण्याचा प्रश्नच नव्हता. इतक्यात पाटलाच्या वाड्यासमोर मारुती व्हॅन येवून उभी राहिली.

“चला… तुमची गाडी बी आली…” पाटलाने म्हटले.

“आमची गाडी?” सचिन गोंधळला.

“पाटील… माह्याकडं गाडी हाय की… मंग ही कायला?”

“आरं पोरा… तुही गाडी चारचाकी हाय व्हंय? अन येताना त्या दोघास्नी आन्नांर कसं? समदा इचार करावा लाग्तो.” पाटलानं सांगितलं. पाटलाच्या म्हणण्यात काहीच अयोग्य नव्हतं त्यामुळे काहीशा नाखुशीनेच सचिनला ते मान्य करावं लागलं. थोड्याच वेळात सचिन आणि दिलीपला घेऊन गाडी निघून गेली. पाटलाचे निम्मे काम झाले होते. आता फक्त ८/१० तासांचा अवकाश होता.

“भिव्या…! मायला, आतापोतूर समंद मनापरमानं हुं ऱ्हायलं. पन जवर त्ये पोरं आपल्या हाती गावत न्हाईत तवर काय चैन पडत नाई बग…” पाटलाच्या चेहऱ्यावर अजूनही पाहिजे तशी चमक आलेली नव्हती.

“काय पाटील.., आवं आता हत्ती ग्येला अन शेपूट ऱ्हायलंय बगा. पुढल्या दिसात आपल्या हाती पैशे असतीन…” अधीर पाटलाला धीर देत भिवा म्हणाला पण पाटलाच्या मनात आलेली शंका काही केल्या जात नव्हती.

“चला… म्या जातू… आज्च्याला पोटाचं पहावं लागन ना… न्हाईतर माही बायकू घरात्न हाकून दयायची…” म्हणत भिवा उठला आणि वाड्याबाहेर पडला.

गाडीत फक्त तिघेच होते. ४५च्या आसपास असलेला गाडीचा ड्रायव्हर, सचिन आणि दिलीप. तशीही सचिन आणि दिलीपची खूप घनिष्ट मैत्रीही नव्हती त्यामुळे सगळे शांत बसले होते. सचिनच्या मनात यावेळेस विचारांचे काहूर माजले होते, पण दिलीपचा चेहरा मात्र अगदी निर्विकार होता. त्याच्या निर्विकार चेहऱ्याचे सचिनला काहीसे कौतुक वाटले. आपण आपला हेतू साध्य करून घेण्यासाठी अगदी योग्य व्यक्तीची निवड केली म्हणून त्याने स्वतःला शाबासकीही दिली. गाडीतील टेप जेव्हा वाजू लागला तेव्हा त्याची तंद्री काहीशी भंगली. गाडीच्या ड्रायव्हरने कव्वालींची कॅसेट लावली होती. पहिली कव्वाली चालू झाली. सचिनची आवडती कव्वाली. “चढता सुरज” ही. जसजशी कव्वाली पुढे पुढे जात होती सचिनच्या चेहऱ्यावरील भाव बदलत होते.

“अरे चाचा… ये कौनसी कॅसेट लगाई आपने?” दिलीपने विचारले.

“अरे साब… ये कव्वाली बजती है ना… तो मेरेको कितना भी लंबा रस्ता हो… कूच फरक नै पडता…” ड्रायव्हरने सांगितले.

“साब… तुमको एक बात बोलू? आज मै सुधर गया तो सिर्फ ये कव्वाली सुनके… पैलेका मै होता ना तो तुम जैसे शरीफ लोग मेरेकू घरमे भी घुस्ने नै देते…” चाचा सांगत होता. खरं तर दिलीपला त्याने म्हटलेल्या “शरीफ लोग” या शब्दाचं हसू आलं. कारण एकतर दिलीप जेलमधून पॅरोलवर सुटलेला कैदी आणि सचिन दिलीपच्याच मार्गावर.

“साब… सच्ची बोलू तो जब्बी ओ दिन याद आते है ना… खुदसे नफरत होती है.” ड्रायव्हर चाचा गाडी चालवत आपली कहाणी सांगत होता. सचिनचे लक्ष मात्र फक्त कव्वाली ऐकण्यात होते. त्याच्या चेहऱ्यावरील भावही सारखे बदलत होते. एका नंतर एक कव्वाली संपत होत्या आणि नवीन चालू होत होत्या पण त्या सगळ्या एकाच टाईपच्या. “चढता सुरज” झाल्यावर “माटी के पुतले तुझे कितना गुमान है”, “उड जायेगा एक दिन पंछी”, त्यानंतर “ए अकेले आने वाले” अशा एकानंतर एक कव्वाली लागत होत्या आणि सचिनच्या डोक्यात वेगवेगळे विचारांचे द्वंद्व माजवून जात होत्या. त्याच्या चेहऱ्यावर हे सगळे भाव एकेक करून दिसत होते. जेव्हा गाडी संगमनेर मधील एका हॉटेल समोर थांबली तेव्हा सचिन काहीसा भानावर आला.

“चल… आधी जेवण करून घेवू. नंतर वेळ मिळतो न मिळतो…” दिलीपने सचिनला खाली उतरायची खुण करत सांगितले. हॉटेल तसे चांगल्यापैकी होते. हॉटेलच्या समोर लॉन बनवून तिथेही टेबल खुर्च्या टाकण्यात आल्या होत्या. त्यावर सावलीसाठी मोठ्या छत्र्या लावण्यात आल्या होत्या. त्यातील एका टेबलसमोर दोघे जाऊन बसले. वेटरला जेवणाची ऑर्डर दिली पण सचिन मात्र वेगळ्याच विचारात होता.

“येक विचारू का?” शेवटी सचिनने बोलायला सुरुवात केली.

“हो… विचार…” सचिन काय विचारणार हे दिलीपला आधीच लक्षात आले होते.

“तिथले लोकं म्हनत होते ते खरंय का?” सचिनने बिचकतच विचारले.

“तिथले लोकं काय म्हणत होते?”

“की तुमी तुमच्या भैनीला मारलं…” सचिन हे विचारात असताना दिलीपच्या चेहऱ्याकडे अगदी लक्षपूर्वक पहात होता.

“अं… हो… मीच मारलं तिला… तिच्या नवऱ्याला आणि तिच्या सासूलाही.” काही वेळ शांत राहून नंतर दिलीपने उत्तर दिले. त्यावेळेस त्याने स्वतःवर नियंत्रण ठेवण्याचा बराच प्रयत्न केला होता.

क्रमशःप्रतिष्ठा भाग ९.

मिलिंद जोशी, नाशिक…

भाग ८ लिंक

Leave a comment