स्थळ – मुंबईत कुठेतरी रौतांच घर…
रात्री २ वा. १७ मी. दबक्या पावलांनी दार उघडत,काय ग झोपली का पोर ?
रौत वईनी – ( गाऊनला हात पुसत) पोर ?? आहो पूर्ण महाराष्ट्र झोपवून आलाय तुम्ही..
रौत – ( चश्मा काढून वाघाच्या फोटोसमोर ठेवत ) जे गेले ना ते कावळे होते आणि जे उरलेत ते मावळे आणि तुझ्या गळ्यात जे लटकवलय ना ते या निर्भिड मावळ्याच निशाण आहे..
वैनि – ( गालाच पीठ पुसत ) ह्याच..गप्पांनी वाटोळं केलंय..
उधो भावजी ९०० दिवस झालं खुर्चीवर बसलेत पण केली का कधी वचवच?
तुमचं सकाळी उठलं की चार टारगेट दिलेले पत्रकार बोलवायचे आण सोड गप्पा…
तरी माझा मामा बोलायचा नको हे स्थळ पण..माझे बाबा भोळे म्हणून फसले…
रौत – ( कोट उतरवत ) हे बघ माझं सकाळी २ तास बंडखोर पाठ दाखवून पळालेल्या कायर लोकांशी बोलणं झालंय त्यांना मी समजावेन ते येतील परत…राहिला प्रश्न तुझ्या मामाचा तर वेळ आल्यावर पक्षप्रमुख आणि मी स्वतः माननीय निर्णय घेऊ…
वईनी – ( सोफ्यावर झोपलेल्या मांजराला उचलून खाली फेकत ) ४० त्यांनी नेले तुमच्या कड तुम्हाला सोडून उरलेत १६, आणि तुम्ही त्यांना समजावणार ??? काय पाणी कमी टाकलं का आज ?
रौत – ( उजवीकडे ४३ अंश मान वळवुन ) काय म्हणायचंय तुला ? आम्ही त्यांचं ऐकू ??? अरे आदेश देणारे आहोत आम्ही…४० गेले ४०० निवडून आणण्याची धमक ठेवतो आम्ही…जे गेलेत त्यातले एकोंचाळीस आणि जे जाणार आहेत त्यातले पंधरा माझ्या संपर्कात आहेत…सरकार पडलं तर कडेलोट करा माझा
वईनी – ( नवीन सोफ्याची पिशवी फाडत) कडेलोट ??? अजून आत्मा बाकी आहे तुमचा ? मला वाटलं शरमेनं कोमेजला असेल ? जंगल पेटवल तरी माणसाला पेटत्या झाडावरचे पेरू खायचेत..
रौत- तू अजून राजकारणात नवीन आहेस हे डावपेच कळणार नाहीत तुला..मी मघाशी माननीय अधीत्य साहेब यांना मेसेज केलाय दोन ब्लू टिक आल्यात वाचला असेल…करतील रिप्लाय…त्यानंतर सगळं सुरळीत होईल…तू वाढ जेवायला…
वईनी – ( डोळे पुसत ) काय माणूस आहे हा…अहो मघाशी भिशी फोडायला गेलते…तर सगळ्या बायकांचे नवरे मस्त फाईव स्टार हॉटेल मध्ये जेवत आहेत…वेगवेगळ्या राज्यात…आणि ह्या माणसाला गवार आणि चपाती खायचीये…घास जातो तरी कसा ???
रौत – ( स्वतः किचन मध्ये जाऊन मोठ्याने ) अरे…तुटून पडणारे नाही आम्ही…आज इकडे आहे उद्या परत सत्तेत येऊ…लढणार रक्त आहे आमचं…पुन्हा नव्यानं उभा राहू … गवारी सोबत लोणचं आहे का ? चपाती दिडच ठेवलाय का ? भात पण लागलाय खाली…असुदे झोप तू…उद्या हा मावळा एकटा लढणार….
मनोज शिंगुस्ते
( लेखक ३ दिवस झाले लाईव्ह न्युज पाहत आहेत )