संकल्प | Resolution

bhampak-banner

संकल्प | Resolution –

आपल्या जीवनात आपण करत असलेल्या संकल्पाला अतिशय महत्त्व आहे. जीवनात कोणताच संकल्प नसेल तर आपले जगणे अर्थहीन आणि दिशाहीन होते.

भरतील पोटे श्वनाचियेपरी l
वस्ती दिली घरी यम दूता ll

माणूस म्हणून जन्माला येऊन कुत्र्यासारखी जगणारी अनेक माणसे समाजात आहेत. ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये संकल्प असतो अशी व्यक्ती संकल्पानुसार आपले ध्येय निश्चित करते आणि तीच त्याच्या जगण्याची दिशा ठरते. ध्येय आणि दिशा निश्चित झाली की माणूस आपोआप संयमित जीवन जगतो. त्याला बिघडविण्याच्या अनेक संधी चालून आल्या तरी तो आपल्या मार्गावर स्थिर असतो कारण त्याचा संकल्प त्याला त्या दिशेला एकाग्र व्हायला भाग पाडतो.

मनाची एकाग्रता –

ध्येयाशिवाय आणि संकल्पाशिवाय अशक्य आहे. माणूस कितीही हुशार असला, बलवान असला, चलाख असला, तरी विचलित मानसिक अवस्थेत त्याला मिळालेल्या या सर्व गोष्टी व्यर्थ ठरतात. या सर्वांचा जीवनात योग्य वापर करायचा असेल, तर मन एकाग्र व्हायला हवे, म्हणून जीवनात संकल्पाला महत्त्व आहे. आपल्या जीवनातील संकल्प जेवढा मोठा असतो आणि अनन्यसाधारण असतो, तेवढे आपले जीवन उच्च पातळीवर जात असते.

आपल्या जीवनातील संकल्पही असामान्य असायला हवा. आपण कोण आहोत⁉️ आपली आत्ताची परिस्थिती काय आहे⁉️ याचा विचार आपल्या दृढनिश्चयाने केलेल्या संकल्पापुढे तुच्छ ठरतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळी रायरेश्वराच्या मंदिरामध्ये आपली करंगळी कापून भगवान शिवाच्या साक्षीने स्वराज्यनिर्मीतीचा संकल्प केला, तो या चालू युगातील सर्वोच्च संकल्प ठरला.

बलवान असलेल्या भारतातील पाच शाह्यांना, या महाराष्ट्रातील शूर  जिजाऊ पुत्राने आव्हान दिले. त्यावेळी शिवराय सर्वार्थाने शून्य होते परंतु त्यांच्या संकल्पातील दृढनिश्चय त्यांना युगपुरुष बनविण्यास कारण ठरला. संकल्पातील ताकद, ध्येयवेडी महत्वकांक्षा, चिकाटी, जिद्द, शौर्य, पराक्रम, धाडस या सर्वच गोष्टी केवळ संकल्पाने/resolutionne जीवनात येतात, हे शिवरायांच्या जीवनचरित्रातून सिद्ध होते.

आपल्या जीवनात आपण काही गोष्टी ठरवितो, परंतु तो संकल्प नसतो म्हणून आपण ठरविलेल्या गोष्टीशी प्रामाणिक नसतो कारण आपले मन त्या ध्येयासी एकाग्र होत नाही, म्हणून आपल्या जीवनात ठरविलेले बरेच काही घडत नाही.

सत्य संकल्पाचा दाता नारायण l
सर्व करी पूर्ण मनोरथ ll
येथे अलंकार शोभती सकळ l
भावबळे फळ इच्छेचे ते ll

संकल्पाविषयाची ही संतवचने त्रिकालाबाधित सत्य आहेत, फक्त या वचनांना समजून-उमजून आपण आपल्या जीवनात अंगीकारले पाहिजे.

आज स्वतःला प्रश्न विचारा की, माझ्या जीवनात मी कोणता संकल्प केलेला आहे ? जर तो केलाच नसेल, तर आपले जीवन व्यर्थ आहे. आजच संकल्प करा आणि त्या दिशेने जगा, जीवन कितीही अल्प मिळो, आपल्या त्या छोट्या जीवनाला सार्थकता प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही.

डॉ. आसबे ल.म.
अध्यक्ष कामधेनू सेवा परिवार.

Leave a comment