आदर आणि धाक –
आपली मुले आपले ऐकत नाहीत, अशी ओरड बहुतांशी पालकांची आहे. मुले ऐकत का नाहीत ⁉️ या प्रश्नाच्या तळाशी जायला हवे. आपण स्वतःहून विचार करावा की आपण नेमके कोणाचे ऐकत नाही ⁉️ का ऐकत नाही ⁉️ याचे सरळ उत्तर आहे, आपल्याला जे आवडत नाही, ते आपण ऐकत नाही.
आपल्या स्वच्छंदी वृत्तीवर आणि स्वातंत्र्यावर ज्यावेळी बंधने येतात, ती गोष्ट आपल्याला कधीच आवडत नाही. हीच गोष्ट मुलांच्याही बाबतीत आणि सर्वांच्याच बाबतीत लागू होते. आपले हीत कशात आहे ⁉️ हे ज्या वयात समजत नाही, त्या वयात हीताच्या गोष्टी ऐकायला कडवट वाटतात.काही माणसांना तर मरेपर्यंत आपले हीत समजत नाही.
स्वैर वृत्ती ही नेहमी घातकच असते, त्यामुळे प्रत्येक पालकाला आपली मुले स्वैराचार होऊ नयेत असेच वाटत असते आणि यात काही गैरही नसते. स्वैराचारी व्यक्तीला कोणतीच बंधने नको असतात. आपल्या मुलांवर आपला धाक असावा, हा विचार आज मुलांना अन्यायकारक वाटत आहे. काळानुसार आपण आई-वडिलांनीही त्यात बदल करायला हवा.
मुलांना आपला धाक वाटण्याऐवजी आदर वाटायला हवा, असा बदल आपण आई-वडील म्हणून स्वतः करून घ्यायला हवा. कोणताही धाक हा ओझेच वाटतो. त्यामुळे ते कधी ना कधीतरी फेकून द्यावेसे वाटते आणि शेवटी ते फेकून दिले जाते. ही अवस्था झाली की पुढचे वाक्य असते मुले आपले ऐकत नाहीत !
ज्या मुलांच्या मनात आई-वडिलांबद्दल आदर आहे, ती मुले स्वतःहून आई-वडिलांच्या प्रेमबंधनात आपोआप अडकून राहतात आणि त्यांना ते बंधन वाटत नाही, तर आधार वाटतो. मुलांनी आपले ऐकावे, असे वाटत असेल तर त्यांच्या मनात आपल्याबद्दल आदर निर्माण होईल यासाठी आपण सतत प्रयत्नशील असले पाहिजे.
आपणच स्वार्थी, व्यसनी, लंपट, भ्रष्टाचारी, असत्याचारी असेल, तर आपल्या मुलांना आपल्याबद्दल कधीच आदर वाटत नाही. आपले आई-वडील शुद्ध, पवित्र व प्रेमळ असावेत एवढीच मुलांची माफक अपेक्षा असते.
डॉ. आसबे ल.म.
अध्यक्ष कामधेनू सेवा परिवार