आदर | Respect

By Bhampak विचार मोती 2 Min Read
bhampak-banner

आदर | Respect –

आपल्या मनात आदर असलेल्या व्यक्तीला आपण आपोआप सन्मानाने वागवतो, मग ती व्यक्ती कोणीही असो , आपले त्याच्यासी वागणे , हे आदरावर अवलंबून असते . आपल्याबद्दल समोरच्या व्यक्तीच्या मनात आदर निर्माण करायचा आणि टिकवायचा असेल तर फक्त त्याचा विश्वासघात करू नका आपल्याकडून अपेक्षा ठेवणाऱ्या व्यक्तीच्या मनात स्वार्थ असतो, त्यामुळे अपेक्षाभंग होताच तो आपल्यापासून दूर जातो , खरेतर तो आपल्या जवळचा नसतोच.

अपेक्षेच्या पोटात स्वार्थ असतो आणि आदराच्या पोटात प्रेम आणि विश्वास असतो. आज बरीच नाती अपेक्षेच्या धाग्याने जोडलेली आहेत, त्यामुळे ती टिकत नाहीत , टिकवणारा संपतो , पण अपेक्षा संपत नाही , असल्या नातेवाईकांचा आयुष्यभर फक्त त्रासच होतो .

आपण खरोखरच कोणाचा आदर करतो⁉️ आणि कोणाला आपल्या विषयी आदर वाटतो⁉️ आणि ⁉️कोणाला आदर्श वाटतो ⁉️ याच्यावर आपले चांगूलपण ठरत असते. जगाचे राहू द्यात किमान आपल्या कुटुंबात तरी आपल्याबद्दल आदर निर्माण करता आला पाहिजे , अन्यथा संसार हे फक्त ओझे बनते आणि आपण बैल बनलेलो असतो .

मुलांच्या मनात आदर निर्माण होण्यासाठी त्यांना वेळ आणि प्रेम द्यायला हवे , त्यांच्यासी संवाद साधता आणि ठेवता आला पाहिजे , यासाठी कधीच पैसे लागत नाहीत . आईवडीलांना शुध्द सेवा अपेक्षीत असते , येथेही पैसे लागत नाहीत . भावंडांचा फक्त विश्वासघात करू नका . पतीपत्नीने एकमेकांना मानसिक आधार देणे, निष्ठा , प्रेम आणि विश्वासाने वागवणे अपेक्षीत असते , आपण एकमेकाशिवाय अपूर्ण आहोत हा भाव दोघांच्या मनात असावा , कोणालाही कमी लेखू नका .

आदर निर्माण करण्यासाठी कोठेही पैसे लागत नाहीत . ज्या दिवसी आपल्या पत्नीला आपल्याला पती म्हणायची लाज वाटते , त्या दिवसी आपल्या संसारातील सुखसमाधानाचा अंत्यविधी झालेला असतो . घरात एकमेकांबद्द्ल आदरअसेल तर झोपडीही राजवाड्यापेक्षा भारी आहे आणि ताटातील चटणी भाकरीही पंचपक्वान्नापेक्षा भारी आहे , कारण येथे त्याविषयी कोणाचीच तक्रार नसते , हाच स्वर्ग आहे .

आदर वजा केला तर स्वर्गही नरक आहे .

डॉ .आसबे ल.म.

Leave a Comment