नेतृत्वाची जबाबदारी

पोखरबेळ, पोखर | पोखर लेणी | मोठेपणा

संघटनात्मक नेतृत्वाची जबाबदारी –

एखाद्या व्यक्तीचा आचार आणि विचार शुद्ध व परोपकारी असला, तर समाज त्या व्यक्तीला नेतृत्व बहाल करतो. अशा व्यक्तीला आदर्श समजून समाज त्याचे अनुकरण करतो. अनुकरण करणारे अनुयायी बनतात आणि अशा अनुयायांचे आपोआप संघटन बनत असते. एकदा या व्यक्तीच्या भोवती आदरयुक्त अनुयायांचे संघटन तयार झाले की त्या व्यक्तीच्या शब्दाला सामाजिक आणि राजकीय महत्व प्राप्त होते.नेतृत्वाची जबाबदारी.

आज राजकीय लोकांना पैसे देऊन कार्यकर्ते गोळा करावे लागतात, परंतु हे भाड्याने आणलेले कार्यकर्ते जीवाभावाचे कधीच नसतात. जमविलेली गर्दी कधीच प्रामाणिक नसते, दोघांची गरज संपली की त्यात कोणी नेता नसतो आणि कोणीही कार्यकर्ता नसतो.

समाजाने बहाल केलेले नेतृत्व आणि त्यांचे अनुयायी हे विचाराने एकत्र आलेले असतात. ही माणसे एकत्र जमविलेली नसतात तर ती एका ध्येयाने एकत्र जमलेले असतात. त्यात कोणी कोणाला पैसे दिलेले नसतात, कोणीही भाड्याने आलेले नसते. विचाराची दिशा त्यांच्या जीवनाचा उत्कर्ष करत असते.

असा नेतृत्व स्थानी असलेला माणूस कधीही निवृत्त होत नाही कारण त्याचे अनुयायी त्याला कधीही निवृत्त होऊ देत नाहीत. असे अनुयायांचे प्रेम लाभलेल्या नेतृत्वाची जबाबदारी, जसे अनुयायी वाढतील तसे, अधिक अधिक वाढत जाते. असा संघटनेचा प्रमुख असलेला नेता जसा आचार आणि विचार यांनी शुद्ध आणि पवित्र असवा, तसाच तो व्यवहार आणि उच्चार याबाबत शुद्ध आणि पवित्र असावाच लागतो अशी समाजाची अपेक्षा असते.

नेता व्यवहाराच्या बाबतीत भ्रष्ट झाला, तर त्याचे अनुयायी त्याला त्याची जागा दाखवतात. निवडून दिलेला नेता भ्रष्टाचारी निघाला, तर समाज त्याला त्याची जागा दाखवतो.

अध्यात्मिक पातळीवर आणि संघटनात्मक पातळीवर गुरुस्थानी असलेली व्यक्ती देणग्या आणि गुरुदक्षिणा गोळा करून आपले साम्राज्य निर्माण करू लागली की खरे अनुयायी दूर जातात आणि बाजारू, लुटारू माणसांची गर्दी त्या गुरु भोवती जमा होते. अशी माणसे त्या व्यक्तीला रसातळाला घेऊन जातात.

उच्चाराच्या बाबतीत मात्र मरेपर्यंत गुरुपदी असलेल्या व्यक्तीने आणि संघटनात्मक प्रमुख असलेल्या व्यक्तीने जबाबदारीने वागणे गरजेचे असते कारण गुरूच्या किंवा संघटनात्मक प्रमुखाच्या तोंडातून निघालेला शब्द शीरवंद्य मानणारे अनेक अनुयायी त्या संघटनेत असतात.

शिवरायांच्या एका शब्दासाठी आपल्या प्राणाची आहुती देणारे अनेक मावळे इतिहासामध्ये अजरामर झालेले आहेत. गुरुगोविंद सिंग यांच्या असीम त्यागाचे अनुकरण करणारे आणि आपले जीवन समर्पित करणारे अनेक अनुयायी आहेत.

अशा संघटनात्मक प्रमुखपदी असलेल्या व्यक्तीचा एक शब्द चुकला, तर त्याचे परिणाम त्याचे अनुकरण करणाऱ्या प्रत्येक अनुयायांना भयानक भोगावे लागतात. अशाने संघटन तुटले जाते आणि *आपण एका मूर्ख माणसाचे अनुयायी झालो, ही अंतःकरणात होणारी जखम कशानेही आणि कधीही भरून निघत नाही.* त्या व्यक्तीची आठवण जशी होईल तशी या जखमेची वेदना होत राहते आणि याला फक्त भोगण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय नसतो.

संघटनेतील अनुयायांच्या संख्येनुसार अशा माणसांना राजकारणामध्ये महत्त्व प्राप्त होते. अशा लोकांच्या वक्तव्याचा राजकारणी लोक आपल्याला हवा तसा वापर करून घेतात आणि त्यांच्या गरजेसाठी त्यांना हवी ती मदत करतात.

राजकारणाची रसद मिळालेल्या अशा व्यक्तीची वृत्ती आणि कृती दोन्ही बेताल होते. आपल्यावर या राज्याचे किंवा देशाचे बरेच काही अवलंबून आहे, अशी घमेंड आणि अहंकार अशा व्यक्तीत निर्माण होतो.

ज्या व्यक्तीला आपण काय बोलतोय ? ही वेळ कोणती आहे ? आणि याचा परिणाम काय होणार आहे ? याचे भान नसते, अशी व्यक्ती कितीही मोठ्या संघटनेचे प्रमुख असली तरी तिला बेभान किंवा मूर्खच म्हटले पाहिजे. सामान्य माणसाला आपण काय बोलावे ? याचे भान असते. असामान्य माणसाला आपल्या बोलण्याचा समाजावर काय परिणाम होणार आहे ? याचे भान असते, मूर्ख माणसाला या दोन्हीचेही भान नसते.

जीवनात मोठेपण मिरवणे, नेतृत्व धारण करणे सामान्य नाही. त्यासाठी जसे कष्ट लागतात, पात्रता लागते तसेच त्याचा सांभाळ करायला वैराग्य असावे लागते. नेतृत्व किंवा संघटनात्मक प्रमुख म्हणजे काय ? याचे उत्तर तुकोबाराय देतात,

चंदनाचा सूळ सोनियाची बेडी l सुखनेदी ऊरफोडी ll
तुका म्हणे नरकी घाली अभिमान l जरी होय ज्ञान गर्व ताठा ll

हे मनापासून स्वीकारण्याची आपली तयारी नसेल तर,

तुका म्हणे जाण l व्हावे लहानाहुनी लहान ll
लहान पण देगा देवा l मुंगी साखरेचा रवा ll

हेच आपल्या हिताचे आणि सुखाचे असते.

डॉ. आसबे ल.म.

Leave a comment