अधिकार | Rights | Authority

bhampak-banner

अधिकार | Rights | Authority –

प्रत्येक व्यक्तीला आपला कोणत्या ना कोणत्या क्षेत्रांमध्ये अधिकार हवा असतो. आपले कोणीतरी ऐकावे, आपण कोणालातरी आदेश द्यावा  आणि तो आदेश विनातक्रार त्या व्यक्तीने ऐकून कृतीत आणावा, अशी सुप्त इच्छा प्रत्येक व्यक्तीच्या अंतःकरणात असते, ही अधिकाराची अपेक्षा आहे.

आपल्याला प्रामाणिकपणाने आणि निःस्वार्थी वृत्तीने आपल्या अनुयायांची जबाबदारी घेता येत असेल, तर आपला अधिकार आपोआप प्रस्थापित होतो. दुर्देवाने लोकांना जबाबदारी नको असते, परंतु माझे ऐकले पाहिजे, हा हट्ट प्रत्येकाच्या मनात असतो. अशी जबाबदारी टाळणारी आणि आपला अधिकार अपेक्षित असणारी माणसे, हट्टी आणि हेकेखोर बनतात आणि यांचा त्रास सर्वांना, सर्व ठिकाणी होत असतो.

अधिकार/authority गाजविण्याच्या नादात आपल्यापासून अनेक चांगली माणसे तुटतात, हे आपल्याला समजत नाही, तरीही आपल्यात बदल होत नाही कारण अधिकार गाजवण्याची वृत्ती अतिशय चिवट आणि चिकट असते.

ही अधिकार गाजवण्याची वृत्ती अंतःकरणातून नष्ट होण्यासाठी एक तर _आपल्या अंतःकरणात समतेची भावना दृढ व्हावी लागते किंवा आपण दास्य वृत्तीचा अंगिकार करावा लागतो_.

सर्व संतांनी दास्य वृत्तीचे समर्थन केले आहे, परंतु _आपण कोणाचा दास व्हावे⁉️ हे समजण्यासाठी आपला विवेक जागा असावा लागतो_.

संत तुकाराम महाराज म्हणतात,

मज दास करी त्यांचा l संत दासांच्या दासाचा ll
मग होत कल्पावरी l सुखे गर्भवास हरी ll

संत तुकाराम महाराज संतांचा दास होण्याचा उपदेश करतात कारण या जगामध्ये _संत, सद्गुरू आणि भगवंत हीच फक्त आपल्या जीवनातील शरण जाण्याची ठिकाणे आहेत. यांच्या चरणावर आपले समर्पण असेल, आपण यांना शरण गेलो, तर आपल्या जीवनात कधीही, कोणताही तोटा होत नाही.

म्हणवोनि शरण जावे l सर्व भावे देवासी ll
तो हा उतरील पार l भव दुस्तर नदीचा ll

इतर ठिकाणी आपल्या शरणागतीचा आणि दास्य वृत्तीचा गैरफायदा घेण्याचीच शक्यता जास्त असते, म्हणून जागा पाहून, वेळ पाहून आणि समोरच्या व्यक्तीचा अधिकार पाहून दास्य वृत्तीचा स्वीकार करावा लागतो.

हे तो एक संता ठायी l लाभ पायी उत्तम ll
म्हणविता त्यांचे दास l पुढे आस उरेना ll

मी कोणीही नाही ! हा अंतःकरणातील भाव दास्य वृत्तीचा स्वीकार करतो आणि मी कोणीतरी आहे ! हा भाव अधिकारी वृत्तीचा स्वीकार करतो. दासाची जबाबदारी मालकावर असते आणि अधिकाऱ्याची जबाबदारी मात्र, त्या व्यक्तीच्या स्वतःच्या शीरावर असते, म्हणून संसारात आणि परमार्थात दास सुखी, शांत, स्वस्थ व समाधानी असतो आणि मालक किंवा अधिकारी कायम वैतागलेला, त्रस्त, अस्वस्थ आणि अशांत असतो.

अधिकारी वृत्तीच्या आणि दास्य वृत्तीच्या जागा चुकल्या, तर मात्र दोन्हीकडे तोटाच होतो.

डॉ. आसबे ल.म.

Leave a comment