सदाशिवगड | Sadashivgad

By Bhampak Travel Sunil Shedage 2 Min Read
सदाशिवगड | Sadashivgad

सदाशिवगड | Sadashivgad –

परवाच्या रविवारी सफर होती ती किल्ले सदाशिवगडची. सदाशिवगड साठी  साताऱ्यातून हायवेनं सरळ कराडची वाट. तिथून उगवतीकडं तोंड केलं, की समोर अर्थातच सदाशिवगड | Sadashivgad. शहरातून बाहेर पडलं, की आधी ओगलेवाडी येते. मग उजव्या हाताचा रस्ता गडाकडं जातो.

पहिल्यांदा प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत दिसते. तिथून थोडं पुढं गेलं, की मग पायऱ्यांची वाट. गडाच्या पायथ्याशी हजारमाची, बाबरमाची, वनवासमाची अन् राजमाची ही गावं. या सर्व ठिकाणांहून येणाऱ्या वाटा गडावर येऊन मिळतात. अर्थात पायऱ्यांची वाट आहे ती हजारमाचीतून.

सदाशिवगड समुद्रसपाटीपासून सुमारे अडीच हजार फूट उंचावर. 1676 च्या सुमारास छत्रपती शिवरायांनी जे दुर्ग बांधले त्यात सदाशिवगडची उभारणी केली असल्याचं सांगितलं जाते. तिथं पोचण्यासाठी जवळपास हजारभर पायऱ्या आहेत. गड चढून वर आलं, की महादेवाचं मंदिर. यावरूनच गडाला सदाशिवगड संबोधलं जातं. हे मंदिर भाविकांसाठी श्रद्धेचा विषय बनलं आहे. मंदिरापुढं पाण्याची विहीर आहे. ती चिंच विहीर या नावानं ओळखली जाते. लगत हनुमानाचा छोटं मंदिरही आहे. काही अंतरावरच उद्यान आहे. गडाचा परिसर जवळपास 25 एकराचा आहे.

गडाच्या संवर्धनासाठी मावळा प्रतिष्ठानचा हातभार लाभला आहे. विशेषतः प्रतिष्ठाननं राबविलेले उपक्रम, वृक्षारोपणाची कामं नजरेत भरणारी आहेत. सीसीटीव्हीसारख्या सुविधाही इथं बसविण्यात आल्या आहेत. गेले एक तप प्रतिष्ठान मेहनतीनं कार्यरत आहे, ही नक्कीच कोैतुकाची बाब ठरावी.

इथून कराड शहरासह कोयना नदी, आगाशिव डोंगर, वसंतगड, मच्छिंद्रगड असा परिसर दृष्टिक्षेपात येतो. सदाशिवगडाची भटकंती आटोपून कराडमधले प्रसिद्ध मनोरे अन् प्रितीसंगम ही स्थळं पाहता येतात. सकाळी लवकर घराबाहेर पडलं, तर आगाशिव लेणीही पाहाणं शक्य होतं.

सुनील शेडगे। नागठाणे जि. सातारा

Leave a comment