कुजकं बोलणं | Sarcasm

bhampak-banner

कुजकं बोलणं | Sarcasm –

कुजके बोलणारी माणसे, ही एक समाजाला लागलेली कीड असते, याचा प्रादुर्भाव सगळीकडे आहे. एक वेळ शत्रूचा वार परवडला परंतु कुचके बोलणाऱ्याचा वार सहन करण्याच्या पलीकडे असतो कारण हा थेट हृदयावर पडत असतो. माझ्याबद्दल कोणीही कुजके बोलत नाही ! असे म्हणणारा माणूस भेटणे अतिशय मुश्कील आहे. याचा अर्थ कुजकं बोलणं (Sarcasm) कुजके बोलून घेणे, आपल्या जीवनात कोणालाही टाळता येत नाही.

जी माणसे भेकड आणि नेभळट असतात, परंतु स्वभावाने खुनशी असतात, अशा माणसांना सत्य व स्पष्ट एखाद्याच्या तोंडावर सरळपणे बोलण्याचे धाडस होत नाही, अशी माणसेच कुजके बोलतात. न बघवणारी, आपला मत्सर करणारी, आपल्यावर जळणारी माणसे आपल्याबद्दल कुजके बोलणाऱ्यांचे खंदे समर्थक असतात. यांची एकमेकांची ओळखही नसली तरी आपल्याबद्दलची खुन्नस यांच्यात एकी घडवून आणते. हा अनुभव कोणालाही चुकविता येत नाही.

जर आपल्या जीवनात कुजके बोलून घेणे, टाळताच येत नसेल, तर त्याचा परिणाम आपल्या मानसिकतेवर होऊ नये म्हणून आपल्यालाच यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मकतेने बदलायला हवा. कोणताही कुजके बोलणारा माणूस, आपल्या यशावर, कर्तृत्वावर, प्रगतीवर, सुखावर आणि समाधानावर जळत असतो, हे निश्चित. त्यामुळे आपले यश हे जळणाऱ्यांच्या प्रतिक्रियेवर मोजायला शिकले पाहिजे. कुजके बोलणाऱ्याची प्रतिक्रिया जेवढी तीव्र असते, तेवढी आपली लोकप्रियता आणि यश मोठे असते.

आपल्यावर जळणाऱ्याला जळवण्याचासुद्धा आपल्याला आनंद लुटता आला पाहिजे. आपल्या यशाचा आनंद ज्यांना होतो, ते आपले समर्थक असतात. त्यांनी केलेल्या कौतुकापेक्षा जळणाऱ्यांच्या कुजक्या बोलण्याची प्रतिक्रिया आपल्याला जास्त आनंद देणारी वाटली पाहिजे, हाच याच्यावरील रामबाण उपाय आहे.

कुजके बोलणे ऐकून, आपण अस्वस्थ आणि अशांत होत असू, तर तो त्यांचा विजय असतो, तेच कुजके बोलणाऱ्याचे सुख असते. आपल्यावर जळणाऱ्याला आनंद होईल, अशी कोणतीही कृती आपल्या हातून घडू नये. आपल्यावर जळणाऱ्याला जाळण्यात आणि कुजके बोलणार्‍याला तोंडावर पाडण्यात जो आनंद आहे, तो आपल्या शत्रूला तलवारीने मारण्यातही नाही.

आपण स्वतः मात्र कोणाबद्दलही कुजके बोलत नाही, कोणावरही जळत नाही, अशी खात्री ज्याला असते त्यालाच माणुसकी कळाली, असे म्हणता येते.

सत्य बोले मुखी l दुखवे आणिकांचे दुःखी ll
हीच विष्णूची महापूजा l अनुभाव नाही दुजा ll
निश्चयाचे बळ l  तुका म्हणे हेचि फळ ll

डॉ. आसबे ल.म.
अध्यक्ष कामधेनू सेवा परिवार.

Leave a comment