शिकार भाग १

शिकार भाग १,२,३,४,५,६,७,८,९,१०,११

शिकार भाग १ –

संध्याकाळचा फेरफटका मारून प्रतापराव घरात आले. ते आरामखुर्चीत बसतात न बसतात तोच १० वर्षांची त्यांची नात त्यांच्या जवळ आली.

“दादुजी… तयार रहा… प्लॅन शिजतोय…” तिने म्हटले. तिच्या चेहऱ्यावर मात्र आनंद दिसत होता.

“कसला गं चिकू???” प्रतापरावांनी काहीसे उत्साहित होत विचारले.

“ट्रीपचा…!” तिने अगदी संक्षिप्त उत्तर दिले.

“यावेळेस कुठे?” प्रतापरावांनी विचारले.

“काय बरं ते नांव??? जाऊ द्या… आहे कोणते तरी गांव… पण तिथे धबधबा आहे असे आई सांगत होती.” चिकूने गावाचे नांव आठवायचा प्रयत्न केला पण तिला काही ते शक्य झाले नाही. तेवढ्यात त्यांची सून, रेखा हातात चहाचा कप घेऊन बाहेर आली.

“बाबा… चहा घ्या…!” तिने चहाचा कप प्रतापरावांच्या हाती देत म्हटले.

“काय गं, ही चिकू काय म्हणतेय? कुठे जायचा बेत ठरतोय?” प्रतापरावांनी कप आपल्या हाती घेत विचारले.

“भावली धरण !!!” रेखाने उत्तर दिले. अनेक वर्षांनी ‘भावली’ हे नांव प्रतापराव ऐकत होते.

“बाबा… तुम्हाला तर माहितीच आहे ना हे गांव?”

“अं… हो तर… मी कसे विसरेन हे गांव? पण यावेळी तर तुम्ही केरळला जायचा बेत ठरवत होतात ना? मग हे भावली मध्येच कसं उद्भवलं?” प्रतापरावांनी विचारले.

“मीच सांगितले विक्रमला, आपण केरळला पुढील वेळी जाऊ… यावेळी भावली धरण पाहून येऊ.”

“अगं पण तुझ्या मनात हा विचार कसा आला?”

“अहो… तुमची ती ‘शिकाऱ्याची डायरी’ परवा घर आवरताना मला सापडली. म्हटलं पाहू तरी तुम्ही काय काय पराक्रम केलेत ते?” काहीसे मिश्किलपणे रेखाने म्हटले. तिच्या त्या वाक्याने प्रतापरावांच्या चेहऱ्यावरही स्मित उमटले.

“बाबा… तुम्ही किती छान वर्णन करतात हो प्रसंगाचे? आपण तुमची ती डायरी पुस्तकरूपाने प्रकाशित करू ना? मी तसे विक्रमला म्हटलेही आहे. पण तो म्हणाला… आधी बाबांना विचार आणि मग निर्णय घे… ती डायरी वाचताना अंगावर अगदी काटा येत होता माझ्या. डायरी वाचून संपली आणि ठरवले की यावेळी तोच परिसर पाहून यायचा.” रेखा अगदी भरभरून बोलत होती.

“अगं पण आता तिथे खूप बदल झाला असेल. आधी तिथे फक्त नदी होती आता धरण बनले आहे. इतर भागही बराच बदलला असणार…” प्रतापरावांनी म्हटले.

“असू द्या ना… निसर्गात जास्त बदल थोडाच होणार आहे? मातीचे रस्ते डांबरी झाले असतील, झोपड्यांच्या ठिकाणी पक्की घरे बनली असतील आणि बैलगाडी ऐवजी लोक चारचाकी वापरत असतील. याशिवाय काय बदल होणार?”

“असं कसं? पूर्वीसारखी जंगल तरी कुठे राहिली आता?”

“असू द्या… पण आपण जाऊच तिथे… मला तो सगळा परिसर पहायचाच आहे…” रेखाने म्हटले.

“ठीक आहे… मला काय? तुम्ही जिथे नेणार, तिथे मी येणार…!!” रिकामा झालेला चहाचा कप रेखाच्या हाती देत प्रतापराव काहीसे मागे रेलले. भावली गावातील त्यांचे वास्तव्य, तेथील गावकरी, सरकारी माणसे, आणि तो सकाळी हवाहवासा वाटणारा, पण सूर्य मावळताच मनात भीतीची चाहूल देणारा जंगलाचा परिसर… एकेक करून त्यांच्या डोळ्यासमोर सगळे प्रसंग येऊ लागले. ३०/३२ वर्षांपूर्वीचे भावली आणि आजचे भावली यात कितपत बदल झाला आहे याबाबत त्यांच्याही मनात उत्सुकता निर्माण झाली.

शांत डोळे मिटून भावली गावातील वास्तव्याचे दिवस ते किती वेळ आठवत होते हे त्यांचे त्यांनाही समजले नाही.

“दादुजी… जेवायला चला…” चिकूने त्यांची तंद्री भंग केली.

“अगं पण अजून विक्रम कुठे आलाय?” आरामखुर्चीतून उठत ते म्हणाले.

“बाबाची गाडी दिसतेय खाली. म्हणजे बाबा जिनाच चढत असेल.” चिकूने म्हटले, तेवढ्यात दार उघडून विक्रम घरात आला.

जेवणे झाल्यावर रेखा आणि विक्रमने मिळून तारीख / वार, कुठे रहायचे? काय पहायचे याचे सगळे नियोजन केले आणि ट्रिपचा दिवस उजाडला.

अनेक वर्षांनी प्रतापराव या भागात येत होते. या आधी जेव्हा ते मुंबई-आग्रा महामार्गाने आले होते त्यावेळी तो एकेरी वाहतुकीचा रस्ता होता. रस्त्याच्या कडेला अनेक झाडांची सावली होती. कुणालाही मोह पडावा असा तो रस्ता आता मात्र पूर्णतः बदलला होता. रस्त्याची रुंदी तिपटीने वाढली होती. रस्त्याच्या कडेला असलेली झाडे पूर्णपणे नाहीशी झाली होती. सगळीकडे रखरखीत ऊन… रस्त्यातील खड्डे मात्र गायब. आणि हा सगळा बदल प्रतापरावांच्या फारसा पचनी पडत नव्हता. खिडकीतून बाहेर पहात ते आजचा परिसर आणि ३०/३२ वर्षांपूर्वीचा परिसर याची तुलना करत होते.

“बाबा… इतके गप्पं का झालात?” गाडीच्या आरशातून मागच्या सीटवर बसलेल्या प्रतापरावांकडे पाहत विक्रमने विचारले.

“काही नाही रे… रस्ता आणि त्याच्या बाजूचा परिसर खूपच बदलला आहे. त्यावेळेसची ओळखीची चिन्हेही बरीचशी पुसट झाली आहेत. तेच पाहतो आहे.” प्रतापरावांनी उत्तर दिले.

“अहो पण वेळेनुसार बदल होणारच ना? त्यातून आधी या रस्त्यावर कितीतरी अपघात होत होते. आता त्याचे प्रमाणही खूप कमी झाले आहे.” विक्रम म्हणाला.

“होय…. खरंय तुझं… पण एक सांगू? त्यावेळी प्रवासात दमल्यावर बसण्यासाठी झाडाची सावली होती, तहान भूक लागली तर कुठेही थांबून ती भागवता येत होती. आता रस्ते मोठे झाले पण झाडेही नाहीशी झाली. याला विकास म्हणायचा का असा मला प्रश्न पडतोय? एसी गाडीत या गोष्टी सहसा लक्षात येत नाहीत, पण जे लोक दुचाकीवर प्रवास करतात त्यांचा विचार केला तर?” काहीसे खिन्नपणे प्रतापराव म्हणाले.

“हं… तेही आहेच…”

थोड्याच वेळात विक्रमने भावली धरणाकडे जाणाऱ्या रस्त्यावर गाडी वळवली. आताचा रस्ताही चांगलाच होता पण बराचसा लहान. रेखा आजूबाजूचे निसर्गसौंदर्य न्याहाळत होती आणि चिकू मात्र पोटपूजा करण्यात मग्न होती. जवळपास १५ ते २० मिनिटात विक्रमची गाडी त्याने बुक केलेल्या रिसोर्टच्या प्रांगणात शिरली.

फक्त नावाला रिसोर्ट होते ते. बाकी त्याची बांधणी तशी अगदीच सामान्य होती.

“बाबा… इथे राहायचे आपण?” काहीसे नापसंतीने चिकूने विचारले.

“हो…!” विक्रमने उत्तर दिले.

“काय हो बाबा… किती बोर होईल मला?” तिची नापसंती अजूनच वाढली. त्यावर विक्रम काही बोलणार इतक्यात रेखा उत्तरली.

“चिकू… तुझे दादुजी तर कितीतरी दिवस इथे रहात होते…”

“दादुजी… तुम्ही इथे रहात होते?” काहीसे आश्चर्याने चिकूने विचारले.

“होय… पण पूर्वीची गोष्ट वेगळी होती. आता इथे छान वाटते आहे, त्यावेळी मात्र भीती वाटायची.” काहीसे स्वगत बोलल्यासारखे प्रतापराव उत्तरले.

“भीती? का?” चिकूने निरागसतेने विचारले.

“पूर्वी इथे जंगल आणि जंगली प्राणी होते…”

“मग आता नाहीयेत का?” चिकूचे प्रश्न चालूच होते. आणि त्याला उत्तर देता देता प्रतापरावांच्या नाकी नऊ आले होते. तेवढ्या वेळात विक्रमने सगळ्या औपचारिकता पूर्ण करून खोल्या ताब्यात घेतल्या.

दुपारच्या वेळी थोडा आराम करून संध्याकाळी सगळे धरणावर पोहोचले. तो सगळा परिसरच खूप रम्य होता. सगळीकडे हिरवाई पसरली होती. समोर विशाल जलाशय. त्याच्या बाजूने जाणारा छोटासाच पण डांबरी रस्ता, आजूबाजूला हिरवेगार डोंगर आणि काहीशी ओलसर माती. सगळेच कसे आल्हाददायक वाटत होते. पण सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होता तो काहीशा दूरवर दिसणारा डोंगरावरून कोसळणारा धबधबा.

प्रतापराव सगळे पहात होते पण त्यांच्या चेहऱ्यावरील भाव मात्र तितकेसे उत्साही दिसत नव्हते.

“बाबा… इतका कसला विचार करताय?” रेखाने विचारले.

“काही नाही… इतक्या वर्षानंतर इथे आलो याचा आनंद मानावा, की त्यावेळी असलेली जंगले नष्ट झाली याचा खेद करावा याच संभ्रमात आहे मी.” काहीशा खिन्नतेने प्रतापराव म्हणाले.

“बाबा… आज रात्री तुमच्या पूर्वीच्या इथल्या वास्तव्याच्या आठवणी सांगाल का तुम्ही? त्यापेक्षा असे करा… तुम्ही केलेल्या शिकारीची कथाच सांगा… तुमच्या तोंडून ती ऐकायला आम्हा सगळ्यांना आवडेल.” रेखाने म्हटले आणि त्याला चिकू तसेच विक्रमनेही अनुमोदन दिले.

“ठीक आहे… रात्री सांगेन..!!!” प्रतापरावांनी होकार दिला आणि मग सगळेजण निसर्गाचे मनोहारी रूप डोळ्यात साठवून घेऊ लागले.

क्रमशः

मिलिंद जोशी, नाशिक.

Leave a comment