शिकार भाग १०

शिकार भाग १,२,३,४,५,६,७,८,९,१०,११

शिकार भाग १० ( अंतिम )

आमचे डोळे पूर्णतः बिबट्यावर केंद्रित झाले होते. पण घाई करून चालणार नव्हते. घाव वर्मी लागला तरच त्याचा उपयोग होणार होता. आम्ही दोघेही अगदी निशब्द बसलो होतो. मला याची सवय होतीच पण वडनेरे साहेब देखील शिकारीच्या तंत्राचे पूर्णतः जाणकार आहेत हे मला त्यावेळी समजले. बिबट्याने पुन्हा एकदा त्या जागेला हुंगले आणि परत एकदा आजूबाजूला नजर टाकली. त्यावर मी गोळी झाडणार तोच बिबट्या वळला. याचाच अर्थ जो पर्यंत बिबट्या शिकारीवर टाकलेला पालापाचोळा बाजूला करण्यात व्यस्त होत नाही तोपर्यंत त्याच्यावर गोळी चालवणे तितकेसे योग्य होणार नव्हते. अजूनही त्याचे आजूबाजूला पहाणी करणे चालूच होते. आम्ही त्याच्यावर लक्ष ठेवून होतो इतक्यात त्याने झेप घेऊन झाडावर चढण्यास सुरुवात केली. ज्या सफाईने तो झाडावर चढत होता ते खरंच वाखाणण्यासारखेच होते. आम्ही आमची नजर त्याच्यावरून जराही हटवली नव्हती. एकेक करून त्याने चार पाच फांद्यावर फेरफटका मारत आजूबाजूची टेहाळणी केली.

हा बिबट्या मी समजत होतो त्यापेक्षा कितीतरी जास्त चाणाक्ष होता. ज्याअर्थी तो शिकारीवरील पालापाचोळा बाजूला करण्याआधी झाडावर चढला होता, त्याअर्थी शिकार बदलली असल्याचे त्याच्या लक्षात आले होते. तसेही माणसाचा वास आणि कुत्र्याचा वास यात फरक होताच की. आता मात्र आम्ही दोघांनीही श्वास रोखून धरला. नरभक्षक वाघ गुहेत असल्यामुळे आमच्या हाती सापडला होता. त्यावेळी त्याला मारणारी माणसेही जास्त होती. इथे मात्र परिस्थिती अगदीच भिन्न होती. इथे आम्ही दोघेच. त्यातून एका ठराविक हालचालीपेक्षा जास्त काहीही करता येऊ न शकणाऱ्या परिस्थितीत. एकच गोष्ट चांगली होती. ती म्हणजे वाऱ्याची दिशा. त्यामुळे त्याला आमचे अस्तित्व अजून तरी जाणवले नव्हते.

जवळपास २० एक मिनिट टेहाळणी केल्यानंतर त्याने झाडावरून खाली उडी मारली आणि तो शिकार लपविलेल्या ठिकाणी जाऊन त्यावरील पालापाचोळा आणि छोट्या फांद्या बाजूला करू लागला. पण हे करताना त्याचा शेपटीचा भागच तेवढा दिसत असल्यामुळे त्याच्यावर गोळी झाडणे शक्य नव्हते. जवळपास ५ ते ७ मिनिटात त्याने शिकार बाहेर काढली आणि तो वळला मात्र, माझ्या आणि वडनेरे साहेबांच्या शस्त्रांनी आग ओकली. दोन्ही गोळ्या जवळपास एकाच वेळी चालवल्या गेल्या. म्हणजेच माझ्या आणि वडनेरे साहेबांच्या मनात सारखेच विचार चालू होते.

एक मोठी डरकाळी वातावरणात घुमली आणि पाठोपाठ आम्ही अजून दोन बार काढले. पण ते दोन्हीही वाया गेले. गोळ्या लागल्याबरोबर अगदी चपळाईने त्याने तिथून पोबारा केला. त्याच्या मागे जाणे तर शक्यच नव्हते. आता जोपर्यंत आमची माणसे तिथे येऊन आम्हाला बाहेर काढत नाही तोपर्यंत आम्ही तिथेच अडकलेले होतो.

तांबडे फुटण्यास अजूनही बराच वेळ होता. मनात फक्त एकच भीती होती. पहाटेच्या वेळी शेताकडे येणाऱ्या माणसांवर बिबट्याने हल्ला केला तर हकनाक अजून एक बळी जाणार होता. अर्थात आता आमच्या हाती काहीच नव्हते. अशा वेळी समजते की आपले शौर्य, आपले प्रयत्न, आपला आत्मविश्वास या सगळ्या गोष्टी नियतीपुढे अगदी कावडीमोल ठरतात.

जवळपास साडेसहाच्या दरम्यान आमची टीम आली. सोबत काही गाववालेही होते. रात्रीच्या वेळी झाडलेल्या गोळ्यांचा आवाजही त्यांनी ऐकला होता. जवळपास १५ मिनिटात आम्ही टवमधून बाहेर पडलो. रात्रभराचे जागरण होऊनही आमच्या डोळ्यावर झापड नव्हती. कारण जोपर्यंत नरभक्षकाचे कलेवर आम्ही आमच्या डोळ्यांनी पहात नाही तोपर्यंत आम्हाला इतर काही सुचणारच नव्हते.

“चला रे… हुडकायला सुरुवात करा…” टवबाहेर आल्याबरोबर वडनेरे साहेबांनी हुकुम सोडला.

जवळपास २० एक मिनिटात कोयते, कुऱ्हाडी, काठ्या घेऊन लोक जमले आणि बिबट्याचा शोध सुरु झाला. सगळेच जण अगदी सावधगिरीने शोध घेत होते. शिकार लपविलेल्या जागेपासून ७००/८०० मीटरवर शेतातून काहीशी क्षीण गुरगुर ऐकू आली तशी तेथील लोकांनी सगळ्यांना बोलावून घेतले. लोकांचा आवाज वाढला तशी गुरगुरही वाढू लागली. आणि तेवढ्यात बिबट्याची डरकाळी वातावरणात घुमली. त्याचा आवाज इतका भयंकर होता की गंमत पहायला आलेले कित्येक लोक मागच्या मागे परत फिरले.

बांधाच्या बाजूला काही लोकांसह मी आणि वडनेरे साहेब सज्जच होतो. तेवढ्यात शेतातून बिबट्याने वडनेरे साहेबांच्या अंगावर झेप घेतली. साहेब सावध असल्यामुळे त्यांच्या हातातील पिस्तूलाने आग ओकली. वडनेरे साहेबांची गोळी बिबट्याच्या मानेत शिरली आणि त्या पाठोपाठ मीही दोन गोळ्या झाडल्या. खूप जवळून गोळ्या झाडल्यामुळे त्या चुकण्याचा प्रश्नच नव्हता. एक मोठी डरकाळी पुन्हा एकदा वातावरणात घुमली आणि बिबट्याचे धूड वडनेरे साहेबांच्या दिशेने झेपावले. साहेब काहीसे मागे सरकले पण बिबट्याच्या पंजाचा निसटता घाव त्यांच्या अंगावर झाल्याने त्यांचा शर्ट फाटला.

माझ्या गोळ्या जरी त्याच्या पोटात शिरल्या होत्या तरीही वडनेरे साहेबांची गोळी त्याच्या मानेत घुसल्यामुळे बिबट्या काहीही करण्याच्या परिस्थितीत नव्हता. पण अजूनही त्याचा प्राण गेलेला नसल्यामुळे कुणाचीच त्याच्या जवळ जाण्याची हिंमत होत नव्हती. आता तो परत उठू शकणार नाही हे लक्षात येताच मी त्याच्या जवळ पोहोचलो. वडनेरे साहेबही तिथे आले. बिबट्याच्या गुरगुरवरून त्याला खूप वेदना होत असणार हे माझ्या लक्षात आले आणि पाठोपाठ गोळीचा आवाज झाला. वडनेरे साहेबांनी अगदी जवळून त्याच्या डोक्यात गोळी मारली.

“साहेब… अहो तो असाही किती वेळ जिवंत राहिला असता?” मी न राहवून म्हटले.

“होय… पण तोपर्यंत त्याला होणाऱ्या प्राणांतिक वेदना चालूच राहिल्या असत्या ना? मी त्याच संपवल्या…” वडनेरे साहेबांनी उत्तर दिले.

बिबट्याची हालचाल थंड पडली आणि गावकऱ्यांनी जल्लोष सुरु केला. माझ्याही चेहऱ्यावर समाधान झळकत होते. वडनेरे साहेब मात्र काहीसे निराश होते. त्याला कारणही तसेच होते… मी जरी मुख्य शिकारी म्हणून इथे आलो होतो, तरीही बिबट्याचा जीव घेणाऱ्या दोन्ही गोळ्या मात्र वडनेरे साहेबांच्या पिस्तुलमधून सुटल्या होत्या. जी व्यक्ती वन्यप्राण्यांच्या रक्षणासाठी झटत होती त्याच व्यक्तीवर एका उमद्या जनावराचा जीव घेण्याची वेळ आली होती.

“साहेब… तुम्ही खूप जबरदस्त कामगिरी केली. या शिकारीचे संपूर्ण श्रेय तुम्हालाच जाते.” मी साहेबांचे अभिनंदन करायचे म्हणून म्हटले पण त्याच्या प्रत्युतरादाखल साहेबांकडून धन्यवाद हा एक शब्दही बाहेर पडला नाही.

“प्रतापराव… अहो अभिनंदन मी तेंव्हा स्वीकारले असते जेंव्हा मी या जनावराचा जीव वाचवला असता. इथे तर मीच त्याला कायमचे संपवले… रात्रीचे त्याचे वागणे तुम्हीही पाहिले. त्याची चतुराई माणसापेक्षा सांगा काय कमी होती? तो त्याच्या जगण्यासाठीच धडपडत होता ना? त्याच्यात आणि आपल्यात फक्त एकच फरक होता. आपल्याकडे आधुनिक शस्त्रे होती जी त्याच्याकडे नव्हती.” त्यांनी म्हटले आणि माझ्या डोक्यातही अनेक प्रश्न उभे राहिले. खरंच का माणसाला मुक्या प्राण्यांचा जीव घेण्याचा अधिकार आहे? जसा मानव निसर्गाचा एक घटक आहे तसेच हे वन्यपशू देखील निसर्गाचेच घटक नाही का?

मी पुन्हा एकदा मेलेल्या बिबट्यावर नजर टाकली. तो अगदी निपचित पडला होता. ज्याच्या बाजूने अनेक जण जल्लोष करत होते. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वहात होता. त्यांचे ते फुललेले चेहरे बघून लगेचच पुढचा विचार आला. या एका जनावराने किती लोकांचे प्राण घेतले होते. समजा तो असाच मोकळा राहिला असता तर अजून किती लोक त्याची शिकार बनले असते. आणि माणसाची जीवनपद्धती लक्षात घेतली तर एक माणूस मरतो पण त्याचा परिणाम संपर्ण परिवारावर होतो. मग कोणती गोष्ट योग्य? वन्यप्राण्यांवरील प्रेम की मानवजातीची सुरक्षा?

पंचनाम्याचे सगळे सोपस्कार पूर्ण झाले. बिबट्याला एकूण सहा गोळ्या लागल्या होत्या. त्याचे वय अंदाजे साडेचार ते पाच वर्षांचे होते. पण वरकरणी त्याला कोणतीही दुखापत झालेली नव्हती. म्हणजेच सोपी शिकार म्हणूनच बिबट्या माणसांवर हल्ले करू लागला होता. आणि त्याला मारणे हाच एक पर्याय उरला होता.

माझे काम पूर्ण झाले आणि मी भावली गावाचा निरोप घेतला. पण त्यावेळी मनात आलेल्या विचारांनी माझी पाठ कधीच सोडली नाही. त्यानंतरही तीन चार वेळेस मला शिकारीसाठी शासनाकडून बोलावणे आले पण मी या ना त्या कारणाने जायचे टाळले.

तो दिवस होता नी आजचा दिवस… अजूनही मला या प्रश्नांचे उत्तर सर्वार्थाने मिळाले नाहीये. एक विचार मनात आला की त्याला छेद देणारा दुसरा विचार लगेच मनात येतो. आपल्याला आपली संख्या वाढविण्याचा अधिकार आहे तर त्यांना त्यांची संख्या वाढविण्याचा अधिकार काही का? हेच कारण आहे की मी आता वन्य प्राण्यांच्या संवर्धनासाठी काम करतो.

——————————————–

प्रतापरावांची गोष्ट सांगून झाली तो पर्यंत चिकू झोपली होती. रेखा आणि विक्रम अगदी भान हरपून प्रतापरावांचे शिकारीचे अनुभव ऐकत होते.

“हेच कारण आहे की मी रात्री खोलीत येण्याचा निर्णय घेतला. वन्यपशूच्या शिकारीच्या वेळी आपण बाहेर बसलो आणि त्यांची शिकार बनलो तर त्यात त्या मुक्या प्राण्यांचा काय दोष? ते त्यांच्या जगण्याची धडपड करत आहेत.” प्रतापराव म्हणाले आणि ते विक्रम आणि रेखाला पूर्णतः पटले.

“चला आता झोपा… उद्या भावली धरणावर जाऊन आजूबाजूचा प्रदेशही पहायचा आहे.” प्रतापरावांनी म्हटले मात्र आणि तेवढ्यात लाईट आली. सगळी रूम दिव्याच्या प्रकाशात उजळून निघाली. पण रेखा आणि विक्रमच्या मनात मात्र परस्परविरोधी अनेक विचारांचा अंधार पसरत होता.

समाप्त

मिलिंद जोशी, नाशिक…

Leave a comment