शिकार भाग २

शिकार भाग २ –

रात्री जेवणे उरकल्यावर चौघेही जण त्यांच्या खोलीसमोरील पडवीत येऊन बसले. ६० वॅट बल्पच्या पिवळसर उजेडामुळे बाहेरील चंद्रप्रकाश खूपच अंधुक वाटत होता. काहीशा दूरवर असलेले डोंगर पूर्णतः काळेकुट्ट दिसत होते. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे रातकिड्यांची किरकिर एकीकडे चालूच होती. दूरवरून भजनाचे आवाज येत होते. अशा वातावरणाची सवय नसल्याने चिकू विक्रमच्या अगदी शेजारी बसली होती. आणि आता सगळे प्रतापरावांचे अनुभव ऐकण्यासाठी कान टवकारून बसले. प्रतापराव बोलायला सुरुवात करणार तेवढ्यात रिसोर्टचा एक वेटर हातात ३/४ मोठ्या आकाराच्या मेणबत्त्या आणि काडेपेटी घेऊन आला.

“सर… आजकाल पावसामुळे कधीही लाईट जाते. त्यासाठी हे घेऊन आलो आहे.” हातातील समान विक्रमच्या हाती देत त्याने म्हटले.

“किती वेळ जाते लाईट?” रेखाने विचारले.

“काही सांगता येत नाही. कधी कधी तर मध्यरात्र उलटून जाते तरी लाईट येत नाही.” त्याने सांगितले.

“मग तुम्ही जनरेटरची व्यवस्था नाही ठेवत?” तिने पुढचा प्रश्न केला.

“हो.. असते ना… पण दोन दिवसांपासून ते खराब झाले आहे. उद्या माणूस येईल… पण तो पर्यंत…” त्याने वाक्य अर्धवट सोडले. त्यांचे बोलणे चालूच होते तेवढ्यात लाईट गेली. काहीशी घाईतच विक्रमने मेणबत्ती लावली.

“सर… मला वाटते तुम्ही खोलीत जाऊन बसणे जास्त योग्य राहील.” म्यानेजरचा आवाज आला.

“का?” विक्रमने विचारले.

“सगळा जंगली परिसर आहे. अनेकदा जंगली जनावरे बाहेर निघतात. मनुष्यवस्तीत सहसा येत नाहीत ते… पण आपण आपली काळजी घेणे योग्य नाही का?”

“विक्रम… म्यानेजर म्हणतात ते बरोबर आहे. चल आपण आतच बसू…” प्रतापराव म्हणाले.

“बाबा… हे तुम्ही म्हणताय?”काहीशा अविश्वासाने रेखाने विचारले.

“होय… मीच म्हणतोय…” प्रतापराव उद्गारले.

शेवटी काहीशा नापसंतीनेच सगळ्यांनी खोलीत जाण्याचा निर्णय घेतला.

“हं… बाबा… करा आता तुम्ही सांगायला सुरुवात…” विक्रम म्हणाला आणि प्रतापरावांनी सांगायला सुरुवात केली.

————————————–

ते दिवस होते १९८७ सालातील सप्टेंबर महिन्यातले, मी पहिल्यांदाच भावली गावात पाऊल ठेवले होते. इगतपुरी पासून अवघ्या १० मैलावर असलेलं लहानसं खेडं. एका बाजूला उंचच उंच डोंगर, त्याच्या पायथ्याशी असलेले घनदाट जंगल, प्रशस्त पाण्याचा जलाशय आणि त्यापासून काही अंतरावरून वाहणारी दारणा नदी, तर दुसऱ्या बाजूला हिरवीगार शेते. हा सगळा देखावा पाहून माझे भान हरपले नसते तरच नवल. खरंय ना..!!! निसर्ग सौंदर्याचे दान देताना जराही कंजूसपणा करत नाही. इथेही त्याने तो केला नव्हता. मी तर पहिल्याच नजरेत येथील निसर्गाच्या प्रेमात पडलो.

पण निसर्गाच्या या सौंदर्याला गालबोट लागणाऱ्या घटना काही महिन्यांपासून इथे घडू लागल्या होत्या. दिवसा मन मोहून टाकणारा निसर्ग रात्री उग्र रूप धारण करत होता. सूर्य मावळला की लगेचच घराची दारे बंद होत होती. लोकंच काय पण पाळीव जनावरेही बाहेर दिसत नव्हती. अंधारात चकाकणारे लाल रंगाचे दोन डोळे संपूर्ण परिसरावर हुकुमत गाजवत होते. हे डोळे होते एका ढाण्या वाघाचे. खरे तर या परिसरात अधूनमधून बिबटे दिसायचे. पण पट्टेदार वाघाने या परिसराला आपले घर बनवले अन लोकांचे रात्री घराबाहेर पडणे बंद झाले. याच वाघापासून कायमची सुटका करण्यासाठीच सरकारतर्फे मला पाचारण केले गेले होते.

त्यावेळी माझे वय तरी किती असेल? फार तर फार पस्तीस छत्तीस. पण तेवढ्या कालावधीतही मी जवळपास ३० एक नरभक्षक यमसदनास धाडले होते. आणि इथेही मी त्यासाठीच आलो होतो. माझी फेवरेट विंचेस्टरही त्यासाठी सज्ज झाली होती.

मी गावात पोहोचलो त्यावेळी अकरा साडेअकरा वाजले असावेत. रस्त्यावर अगदीच तुरळक माणसे दिसत होती. मी जसा वनविभागाच्या कार्यालयात पोहोचलो, तेथील वनअधिकारी वडनेरे साहेबांनी माझे स्वागत केले. माझ्या स्वागताला त्यांच्या बरोबरच काही गावकरीही हजर होते. आम्ही एकमेकांची प्राथमिक औपचारिक ओळख करून घेतली आणि मी लगेच मुद्द्याला हात घातला.

“मला वाटतं आपण वेळ न दवडता कामाला सुरुवात करावी. पण त्याआधी मला या प्रकरणाची तपशीलवार माहिती मिळाली तर जास्त फायदेशीर ठरेल.”

“सोमा… आपली नोंदवही घेऊन ये बरं…” वडनेरे साहेबांनी सोमाला हुकुम सोडला आणि पाच सात मिनिटात सोमाने नोंदवही माझ्यासमोर ठेवली. मी ती हातात घेऊन चाळायला सुरुवात केली. वडनेरे साहेबांनी प्रत्येक गोष्टीची नोंद अगदी सुस्पष्ट आणि तपशीलवारपणे केली होती.

नोंदवहीतील माहितीनुसार वाघाने पहिला बळी जवळपास ३ महिन्यापूर्वी घेतला होता. जमुंडे गावाच्या शिवारात प्रातर्विधीसाठी गेलेली एक म्हातारी वाघाचा पहिला बळी ठरली, त्यानंतर जवळपास ३ दिवसांनी जमुंडे गावातील एका सायकलस्वरावर वाघाने हल्ला केला. त्यानंतर आठ दिवसांनी त्याच गावातील एका म्हाताऱ्या माणसाला वाघाने ओढून नेले. त्यानंतर चौथा हल्ला गव्हांडे गावाच्या शेतात झाला. तिथे एक तरुण मुलगा वाघाचा बळी ठरला. हे सगळे हल्ले सूर्य मावळल्यानंतर झालेले होते. पाचवा हल्ला मात्र सूर्य मावळण्यापूर्वीच झाला होता. गव्हांडे गावातील शेतात हा हल्ला झाला. पण त्यावेळेस जवळपास इतरही अनेक व्यक्ती असल्यामुळे तसेच त्या व्यक्तीचे नशीब चांगले म्हणून त्याचा जीव वाचू शकला. सहावा हल्ला त्यानंतर १५ दिवसांनी याच गावात दारणा नदीच्या काठालगतच्या शेतात झाला. त्यानंतर जवळपास २० दिवस शांत होते आणि सातवा हल्ला झाल्याची बातमी आली. याच गावातील लहान मुलाला यावेळेस वाघाने भक्ष बनवले. त्यानंतर आठवा हल्ला आठ दिवसांपूर्वी झाला. शेतात काम करणाऱ्या एका महिलेला वाघाने ओढून नेले. आणि काल शेतात काम करणाऱ्या एका मुलावर वाघाचा नौवा हल्ला झाला.

“या हल्ल्याबाबत तुम्ही कोणत्या निष्कर्षाप्रत पोहोचला आहात?” मी वडनेरे साहेबांना प्रश्न केला.

“मला वाटते त्या वाघाला जेरबंद करता येऊ शकेल.” वडनेरे साहेबांनी आपले मत मांडले आणि गावाचे सरपंच सोनबा पवार भडकले.

“सायेब… वाघानं आठ मानसं मारली, डझनावारी शेळ्या खाल्ल्या, आता त्यो शेतात बी घुसला आन आजूक तुमी त्याला पकडायचं म्हनतात? न्हाई… समद्या गावकऱ्यांचं येकच म्हंन हाये… त्याला जिता ठिवायचा नाई…” सरपंचाला भडकेलेला पाहताच वडनेरे साहेबांच्या चेहऱ्यावर ही राग दिसू लागला.

“सरपंच… आम्ही सरकारी माणसे. आम्हाला सरकारी नियमात राहूनच काम करावे लागते.” काहीशा चढलेल्या आवाजात वडनेरे साहेब म्हणाले.

“आन मानसं? त्यांचं काय? तेन्ला तसंच मरू द्यायचं का? सरकारची न्हाई का ती जबाबदारी?” सरपंचही माघार घ्यायला तयार नव्हते.

“असं कसं? सरकारला तुमची काळजी आहे म्हणूनच तर या साहेबांना इथे पाठवले आहे ना?” वडनेरेही माघार घेत नव्हते.

“एक मिनिट… मी काही बोलू का? आपण इथे वाद घालून काहीच उपयोग नाही. त्यापेक्षा जर कुणी मला कोणकोणत्या ठिकाणी वाघाने हल्ले केले हे दाखवले तर त्याला पकडणे किंवा मारणे जास्त सोपे जाईल.” शेवटी मीच हळूहळू तापणारे वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला.

“सोमा ! तू साहेबांसोबत जाऊन त्यांना हल्ल्याची ठिकाणे दाखव!” वडनेरे साहेबांनी सोमाला हुकुम केला.

“बरं…! बाकी तुमची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था समोरच्याच एका खोलीत केली आहे. बाकी काही लागलं तर आम्ही आहोतच…” सोमाला योग्य त्या सूचना देऊन वडनेरे साहेबांनी माझ्याकडे मोर्चा वळवला.

“हां… आमचे दोन गावकरीबी तुमच्या संग येतीन… न्हाई म्हंजी चार जन असले तर त्ये जनावर हल्ला करत न्हाई…” सरपंचही मदतीला पुढे आले.

“आधी साहेबांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था कर… आणि आता तुझी ड्युटी त्यांच्यासोबतच आहे हे लक्षात ठेव…” वडनेरेंनी सोमाला सांगितले आणि मी सोमाच्या मागोमाग खोलीकडे निघालो.

मला देण्यात आलेली खोली म्हणजे संपूर्ण दगडी बांधकाम असलेल्या एक ब्रिटीशकालीन बंगल्याचाच एक भाग होता. आणि त्याच्या दुसऱ्या भागात दवाखाना चालत होता. मी खोलीवर दारातूनच नजर फिरवली.

वर कौलारू छत. पंखा नव्हताच. जरी असता तरी कायम लाईट जात असल्यामुळे असून नसून सारखाच असता. खोलीला दोन खिडक्या होत्या. एका खिडकीजवळ एक टेबल आणि दोन खुर्च्या ठेवण्यात आल्या होत्या. टेबलावर एका बाजूला कंदील आणि काडेपेटी ठेवलेली होती तर दुसऱ्या बाजूला पितळाच्या तांब्यात पिण्यासाठी पाणी भरून ठेवले होते. खोलीच्या दुसऱ्या बाजूला एक लोखंडी पलंग होता. ज्यावर एक गादी आणि अंगावर घेण्यासाठी एक कांबळे घडी घालून ठेवले होते.

“सायेब… दोन घास खाऊन घ्यावा…” माझे खोलीचे निरीक्षण चालू असतानाच सोमा ताट वाढून घेऊन आला. ताटात नागलीची भाकरी, कुर्डूची भाजी आणि फोडलेला कांदा होता. मलाही तशी भूक लागलेलीच होती. हात न धुताच मी ताट पुढे ओढले आणि त्यावर तुटून पडलो. चार घास पोटात पडल्यावर अंगात चांगलीच तरतरी आली.

“सोमा… चल… आता मला ती ठिकाणे दाखव !” म्हणत मी सोमासोबत बाहेर पडलो.

क्रमशःशिकार भाग २.

मिलिंद जोशी, नाशिक…

Leave a comment