शिकार भाग ३

शिकार भाग १,२,३,४,५,६,७,८,९,१०,११

शिकार भाग ३ –

सरपंचांच्या आज्ञेने दोन गावकरी माझी वाट बघत बाहेरच थांबले होते. दोघांच्याही हातात काठ्या होत्या. माझ्यासोबत माझी लोडेड विंचेस्टर होती. तसे आज फक्त मी त्या भागाची माहिती करून घेणार होतो पण धोका तर होताच. कारण नंतरचे वाघाचे हल्ले दिवसाही झाले होते. आणि त्यामुळेच आम्हाला बेसावध राहून चालणार नव्हते. वाघाने नौवा हल्ला ज्या स्थळी केला तिथे आम्ही चौघे पोहोचलो. त्या ठिकाणी अजूनही हल्ल्याच्या खुणा दिसून येत होत्या. शेतात जवळपास कंबरेइतक्या उंचीचे पिक होते. आणि ते बरेच दूरवर पसरले होते. अर्थात आतापर्यंतच्या अनुभवाने किमान इतके मी समजून होतो की वाघ तिथून दूर नक्कीच गेला असणार. पण तरीही शेतात शिरणे म्हणजे स्वतःहून मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे होते. माझी नजर सतत भिरभिरत होती. सोमा आणि सोबतचे गावकरी त्या भागाची जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न करत होते.

आम्ही त्या पूर्ण दिवसभरात जिथे वाघाने हल्ले केले होते ती जवळपास ३/४ ठिकाणे पाहून आलो. सगळी ठिकाणे अशी होती की हल्ला केल्यानंतर वाघ लगेचच नजरेआड होऊ शकत होता. आता खरी परीक्षा होती. सूर्य मावळतीकडे झुकू लागला आणि आम्ही परतण्याचा निर्णय घेतला. दिवसभरात माझे कान जरा जास्तच तिखट बनले होते. अगदी बारीक आवाजही ते टिपू शकत होते. पण मला कुठेच वाघाची गुरगुर किंवा वाघ जवळपास असले तर करण्यात येणारे पक्षांचे आवाज ऐकू आले नाहीत.

दिवेलागणीच्या वेळी खोलीवर आलो. नेहमीप्रमाणे लाईट गेलेलीच होती. कंदील लावला आणि माझी डायरी बाहेर काढून त्यावर दिवसभरातील मुख्य घटनांची नोंद करू लागलो. इतरांसाठी डायरी लिहिणे हा छंद असतो, पण माझ्यासाठी मात्र तो अभ्यास होता. अनेकदा माझे हेच टिपण मला इतर मोहिमेत उपयोगी ठरले होते.

दुसरा दिवस उजाडला तोच मुळी सोनेरी किरणांनी. आदल्या दिवशी दिवसभर पायपीट केल्यामुळे मस्त झोप लागली होती. आणि झोप छान झाल्यामुळे खूपच फ्रेश वाटत होते. मी माझे आवरतच होतो की दाराची कडी वाजली.

“गुड मोर्निग…! येऊ का आत?” दारात वडनेरे साहेब उभे होते.

“अरे… त्यात काय विचारायचे? या..! बसा…!!!” मी त्यांचे स्वागत केले.

“मी मुद्दामच लवकर आलो. तेही इथे… काय आहे ना, काही गोष्टी सगळ्यांसमोर बोलता येत नाहीत.” खुर्चीवर बसत ते उद्गारले.

“होय… काल आलं ते माझ्या लक्षात…”

“काय आहे ना… गावकऱ्यांच्या भावनाही चूक नाहीत. पण आपण ठरलो सरकारी ताबेदार. कायद्याच्या चौकटीत बसूनच आपल्याला काम करावे लागते.”

“होय… खरंय…”

इतक्यात सोमा चहा घेऊन आला.

“हं… बोला… काल तुम्ही काय म्हणत होता?” चहाचा झुरका घेत मी सुरुवात केली.

“एक सांगू? सरकारने वाघाला मारण्याचे आदेश दिले आहेत. पण मला ही गोष्ट खटकते आहे.” वडनेरे साहेब म्हणाले.

“का?”

“काय आहे ना… शेवटी तो वन्यजीव आहे. तो त्याच्या जगण्यासाठी धडपडतो आहे. आणि त्याला मारून आपण नैसर्गिक संतुलनाला बाधा आणत आहोत असे नाही तुम्हाला वाटत?”

“नाही… मला असे मुळीच वाटत नाही… कारण तो एक जीव इथल्या जनतेच्या जीवावर उठला आहे. आणि त्या जनतेचे रक्षण करणे आपल्याला भाग आहे.” मी त्यांचा मुद्दा खोडून काढला.

“पण साहेब… माणसाने वन्य प्राण्यांच्या सीमेत घुसखोरी केली त्यामुळे ते मनुष्य वस्तीत घुसत आहेत.”

“हं… तुमचा मुद्दा तुमच्या दृष्टीने योग्यच आहे, पण किमान आत्तातरी माझ्यासाठी जनतेचे संरक्षण जास्त महत्वाचे आहे. तो वन्यजीव आता नरभक्षक बनला आहे. आणि वेळीच त्याला आवर घातला नाही तर अजून किती माणसांना त्यांचे प्राण गमवावे लागतील ते कुणीही सांगू शकत नाही.” माझ्या या उत्तरावर काय बोलावे हे वडनेरे साहेबांना न सुचल्यामुळे ते काहीवेळ शांत बसले.

“पण त्याला पायबंद करण्याचे इतरही काही उपाय आहेतच की… ते आपण अमलात आणू शकतो.” काही वेळ गप्पं बसल्यानंतर त्यांनी त्यांचा पुढील मुद्दा मांडायला सुरुवात केली.

“कोणते उपाय?”

“आपण जर जंगल परिसर आणि शेती परिसर यांच्या मध्ये कुंपण घातले तर वाघ मनुष्य वस्तीत येऊ शकणार नाही.” वडनेरे साहेबांनी म्हटले.

“हं… पण ही गोष्ट तुम्हाला वास्तवात शक्य होऊ शकेल असे वाटते?”

“होय… शक्य आहे पण त्यासाठी गावकऱ्यांची मदत लागेल. आणि सध्या गावकरी माझे काहीच ऐकायला तयार नाहीत. या आधीही या विषयावर माझे आणि गावकऱ्यांचे मतभेद झालेले आहेत. जर तुम्ही हा विचार सरकारी आदेश आहे असे भासवून मांडून पाहिला तर?” वडनेरेंनी हळूच विषय माझ्यासमोर मांडला आणि माझ्या चेहऱ्यावर स्मित झळकले.

“हं… म्हणजे माझीच शिकार करण्याचा बेत आहे की काय तुमचा?” मी काहीसे हसत विचारले आणि साहेबांच्या चेहऱ्यावरही हसू फुलले.

“नाही… शिकार करण्याचा नाही तर शिकार होण्यापासून एका वन्यजीवाला वाचविण्याचा माझा प्रयत्न आहे.” त्यांनी म्हटले.

“ठीक आहे… थोड्या वेळात सरपंच आणि आजूबाजूच्या गावातील काही गावकऱ्यांना बोलावून घ्या… मी हा विषय त्यांच्यासमोर मांडतो. पाहू काय होते ते…” मी म्हटले आणि आमची खाजगी मिटिंग संपली.

जवळपास साडेअकराच्या वेळी सरपंच आणि जवळपासच्या ४/५ गावातील प्रतिष्ठीत व्यक्ती वडनेरे साहेबांच्या ऑफिसमध्ये जमले.

“वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार आपल्याला तो पर्यंत कोणत्याही वन्यजीवाला मारता येत नाही, जोपर्यंत त्याला मारण्याशिवाय इतर कोणताच पर्याय उरत नाही. त्यामुळे आपल्याला आधी त्याला पकडण्यासाठीच प्रयत्न करावे लागणार आहेत. आणि ते शक्य झाले नाही तरच त्याला मारता येईल. तीच पाहणी काल मी करून आलो आणि मला वाटते की आपण वाघाला मनुष्यवस्तीपासून दूर ठेवण्यासाठी काही उपाययोजना करू शकतो. त्याच बद्दल मला तुमच्याशी बोलायचे आहे.” मी सुरुवात केली.

“सायेब… समद्या गावाचं येकच म्हन्न हाये… त्यो वाघ जित्ता नाय रायला पायजे… सरकार काय हितं ऱ्हातं व्हय? तेन्ला काय लागतं बोलाया… हितं आमचं घराभाईर पडनं मुश्कील झालंया. शेती नाई केली त खायाचं काय आमी?” सरपंच उखडलेच.

“सरपंच… जरा सबुरीनं घ्यावा… सायेब काय म्हनू ऱ्हायले ते त ऐकून घीवू की…” शेजारच्या गावातील एक गावकरी म्हणाले आणि माझ्या बरोबरच वडनेरे साहेबही काहीसे आशावादी बनले.

“तुम्ही म्हणताय ते सगळे खरे आहे… पण आम्ही कायद्याला बांधील आहोत ना? कायद्याच्या चौकटीत राहूनच आम्हाला काम करावं लागेल. आणि जो काही निर्णय घ्यायचा तो आपल्याला सगळ्यांच्या मताने आणि प्रत्येक गोष्टीचा विचार करूनच घ्यायचा आहे. त्यामुळे वडनेरे साहेब त्यांचा मुद्दा मांडतील, तुम्ही तुमचा मांडा, मी माझा मांडेल, इतर कुणी गावकरीही त्यांचा मुद्दा मांडतील. म्हणजे प्रत्येक गोष्टीचा पूर्ण विचार करून आपण निर्णय घेऊ… काय म्हणता?” मी समजुतीच्या सुरात म्हटले.

“होऊ द्या तुमच्या मनाजोगं?” काहीसे शांत होत सरपंच म्हणाले.

“मी काय म्हणतो… जर आपण जंगल परिसर आणि शेती यामध्ये बाड घातली तर? वाघ मनुष्यवस्तीत येऊ शकणार नाही.” वडनेरे साहेबांनी त्यांचा मुद्दा मांडला.

“काय बी बोलून ऱ्हायले सायेब तुमी? असं कुटं व्हयील का?” सरपंचांनी लगेचच मुद्दा खोडून काढला.

“तुम्हाला यात काय वावगं वाटतं?” मी सरपंचांना विचारले.

“अवो सायेब… वाघ काय फकस्त येकाचं ठिकानी ऱ्हातो व्हय? त्यो कुडं बी फिरतोय. आन आमचे गावकरीबी घुसतात की जंगलात, कदी मध गोळा कराया, कधी लाकूड आणाया. त्ये जंगलात नाई ग्येले तर खातील काय?” सरपंचांचा मुद्दा मलाही योग्य वाटू लागला. खरंच होतं ते. एका वाघाचं शिकार क्षेत्र १०० किलोमीटर पर्यंतचं असू शकतं.

“वडनेरे साहेब… सरपंच म्हणतात तेही खोटे नाही. बाड घालून आपण सामान्य वन्य जीवांना प्रतिबंध करू शकतो, पण ज्याला मानवीरक्ताची चटक लागली त्याच्यासाठी हा पर्याय तितकासा पुरेसा पडणार नाही.” मी माझे मत मांडले.

“आपण असे करू… काही पिंजरे मागवून घेऊ… आणि ते पाणथळ जागी लावून ठेवू… त्यात वाघ अडकला तर आपल्या दोन्ही गोष्टी साध्य होतील.” वडनेरे साहेबांनी पुढचा मुद्दा मांडला.

“आन त्यो त्यात घावला नाई तर? तवर काय मानसं मरू द्यायची?” हाही मुद्दा सरपंचांनी खोडून काढला.

“हं… मला काय वाटतं, आपण पिंजरे मागवून घेऊ… पाहू त्याचा किती उपयोग होतो ते. समजा त्यात यश आले नाही तर पुढचा निर्णय घेऊ…” मी माझा मुद्दा मांडला.

“सरपंच…!!!” आमचे बोलणे चालू होते तोच दोघे तिघे जण काहीसे धावतच ऑफिसमध्ये घुसले.

“काय रं… कामून वरडू ऱ्हायला?”

“त्ये… शिरपाच्या शेतावर वाघ दिसला… समद्यांनी कल्ला केला म्हनून त्यो जंगलात शिरला…” काहीशा धापा टाकत एका गावकऱ्याने एका दमात सांगून टाकले. वाघाचे नाव ऐकताच सगळे जागेवरून उठले. आपल्या कामास इतक्या लवकर सुरुवात होईल असे माझ्या ध्यानीमनी ही आले नव्हते. मी लगोलग आपली विंचेस्टर तपासली, ती पूर्ण लोड असल्याची खात्री केली आणि सगळ्यांसोबत आम्ही बाहेर पडलो.

क्रमशःशिकार भाग ३.

मिलिंद जोशी, नाशिक..

Leave a comment