शिकार भाग ४

शिकार भाग १,२,३,४,५,६,७,८,९,१०,११

शिकार भाग ४ –

शिरपाच्या शेतात आधीच बरीच गर्दी जमली होती. आमचा ताफा तिथे पोहोचताच लोकांनी आम्हाला गराडा घातला. प्रत्येक जण आपले मत बोलून दाखवू लागला. ज्या ठिकाणी वाघाचे दर्शन झाले होते त्या ठिकाणी सगळे पोहोचलो. मी अगदी बारकाईने त्या जागेची पाहणी करू लागलो. इतर गावकरी मात्र उगाचच माझ्या मागे फिरत होते. त्यामुळे त्या जागेवरील अनेक खुणा नष्ट होत होत्या. त्यामुळे मी वैतागलो.

“सरपंच… आधी या सगळ्यांना इथून घालवावे लागेल… यांच्यामुळे पाउलखुणा नष्ट होत आहेत.” मी सरपंचांना सांगितले.

“ये पोराहो… सायबांना काम करू द्या. तुमच्यामुळं त्यांना तरास हू ऱ्हायला, आन त्यास्नी तरास झाला त आपली सुटका व्हायाची नाई… पळा हितंनं…” सरपंचांनी हुकुम सोडला आणि काहीशा नाखुशीनेच अनेक गावकरी आपापल्या घराकडे वळले. मी अगदी बारकाईने जागेची पाहणी करत होतो. जसजसा वेळ जात होता, माझ्या चेहऱ्यावरील चिंता वाढत होती.

त्या जागी फक्त वाघाच्याच नाही तर बिबट्याच्या पाऊलखुणाही स्पष्ट दिसत होत्या. म्हणजेच जे हल्ले झालेत ते एकट्या वाघानेच केले असतील असे नाही. काही हल्ले बिबट्याने केले असण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. आणि याच गोष्टीमुळे माझा त्रास वाढणार होता. वाघ काय किंवा बिबट्या काय, दोन्हीही संरक्षित पशू. जो पर्यंत मुख्य वनरक्षकाची परवानगी मिळत नाही तोपर्यंत त्यांना जेरबंद करणे शक्य नव्हते. बरे वन रक्षकाची परवानगी घ्यायची तर झालेले हल्ले फक्त वाघाने नाही तर बिबट्यानेही केले आहेत अशी त्या अधिकाऱ्याची खात्री पटवून द्यावी लागणार होती. त्यात बराच कालावधी जाणार होता. आमची पाहणी पूर्ण होईस्तोवर सूर्य मावळतीकडे झुकला होता. अशा वेळेस जंगलात शिरणे धोक्याचे होते. त्यामुळे मग दुसऱ्या दिवशी सकाळच्या वेळेस जंगलात शिरण्याचे ठरवून आम्ही सगळे मागे फिरलो.

आम्ही जसे वनविभागाच्या कार्यालयात पोहोचलो त्यावेळेस मी वडनेरे साहेबांना एकटे पाहून हळूच विषय काढला.

“मला वाटतं धोका जास्त आहे…” वडनेरे साहेबांकडे पहात मी म्हटले.

“हो… ते माझ्याही लक्षात आले… त्या शेतात वाघाबरोबरच बिबट्याच्या पायांचे ठसेही आढळले. म्हणजेच बिबट्यानेही त्याची हद्द ओलांडली आहे. त्यामुळे सगळे हल्ले वाघानेच केले आहेत असे ठामपणे सांगणे धाडसाचे होऊ शकेल.” वडनेरे साहेबांनी त्यांचे मत मांडले.

“मग?”

“मग काय? फक्त ठसे आढळले आहेत आणि आपल्या मनात फक्त शंका आहे. त्या एका शंकेपायी आपल्याला कोणतीही कार्यवाही करता येणार नाही. त्यावेळेस मी यासाठी शांत बसलो कारण गावकऱ्यांना या गोष्टीची माहिती झाली तर ते त्या बिबट्याच्या जीवावरही उठतील.”

“हं… ठीक आहे… आता जशी परिस्थिती समोर येईल त्याप्रमाणे निर्णय घेऊ…” म्हणत मी विषय संपवला.

जंगल कितीही घनदाट असो, मला त्याबद्दल कधीच काळजी वाटली नाही. पण आज मात्र माझे चित्त काहीसे विचलित झाले होते. असे का होते आहे हे त्यावेळी मलाही सांगता येत नव्हते. या जंगलात एक नाही तर दोन नरभक्षक असण्याची शक्यता नाकारता येत नव्हती हेच यामागील कारण असावे. अर्थात दोन्ही श्वापदे एकाच ठिकाणी असण्याची शक्यता खूपच कमी होती. पण तरीही धोका होताच की. तसा माझा माझ्या शस्त्रावर पूर्ण भरवसा होता, पण सगळी वेळ थोडीच सारखी असते? त्यातून जंगलात कोण शिकार आणि कोण शिकारी हे अगदी काही सेकंदच ठरवत असतात. ज्याने ते क्षण साधले तो शिकारी आणि ज्याला ते क्षण साधता आले नाहीत तो शिकार हा जंगलाचा अगदी साधा सरळ कायदा.

दुसऱ्या दिवशी मी, वडनेरे साहेब, ४ सहाय्यक आणि ५ ग्रामस्थ असे एकूण ११ जण जंगलात शिरलो. माझ्या हातात माझी विंचेस्टर होती. वडनेरे साहेबांकडे त्यांच्या स्वसंरक्षणार्थ असलेले ग्लोक १७ पिस्तोल होते. ग्रामस्थांच्या हातात वृक्ष तोडण्याची कुऱ्हाड आणि कोयते होते. तर चारही सहाय्यक कर्मचाऱ्यांच्या हाती रात्रीच्या मुक्कामाला आवश्यक असलेल्या सामानाच्या पिशव्या होत्या. जंगल सुरु झाल्यापासून आतील बाजूला ४००/५०० मीटर पर्यंत मनुष्य रहदारीच्या खुणा दिसत होत्या पण पुढे जाऊन त्या अगदी विरळ होत होत्या. इथून पुढे सुरु होणारे जंगल इतके घनदाट होते की माध्यान्हीचा सूर्यप्रकाश देखील जमिनीपर्यंत पोहोचण्यास अडचणी येत होत्या. त्यामुळे अनेक ठिकाणी जामीन ओली आणि दलदलीची बनली होती. अशा ठिकाणी वन्य पशुंचे वास्तव्य जास्त असते. भीती फक्त त्या पशूंचीच नाही तर सरपटणारे प्राणी देखील या जंगलात मुबलक प्रमाणात आढळत होते. तसे आम्ही सगळ्यांनीच रबराचे सेफ्टीशूज घातले असले तरी असे प्राणी फक्त जमिनीवरच असतील असे थोडेच असते? अनेक साप तर झाडांच्या फांद्यावरही आढळून येतात. कित्येकदा ते अगदी निरखून पाहिल्याशिवाय समजतही नाहीत. त्यामुळेच प्रत्येक पाउल अगदी सावधगिरीने टाकणे गरजेचे होते. एकीकडे पक्षांचे वेगवेगळे आवाज आणि दुसरीकडे झाडांच्या पानांची होणारी सळसळ अंगावर सरसरून काटा आणण्यास पुरेसी होती. मध्येच कुठे जास्तीचा आवाज आला तर प्रत्येकाचे कान टवकारले जात होते. वडनेरे साहेबांनी आपले पिस्तोल हातात घेऊन ठेवले होते.

संपूर्ण टीम मनुष्यवस्तीपासून फारफार तर ८०० मीटरच लांब आली होती, पण तरीही आपण जंगलाच्या मध्यावर आल्यासारखेच आम्हाला वाटत होते. तिथून पुढे १०० पावलांवर एक पाणवठा होता. त्याच्या आजूबाजूला मोठमोठ्या वृक्षांची दाटी बनली होती.

“ही जागा मचाण बांधण्यासाठी योग्य वाटते आहे… कारण वाऱ्याची दिशा आपल्याला अनुकूल आहे.” मी वडनेरे साहेबांकडे पहात म्हटले आणि गावकऱ्यांनी आपल्या कुऱ्हाडी, कोयते सरसावले.

“चला रे… लागा कामाला…” वडनेरे साहेबांनी हुकूम सोडला आणि प्रत्येक जण आपापल्या परीने कामाला लागले. या दरम्यान सुरक्षेची जबाबदारी मी आणि वडनेरे साहेबांनी घेतली होती. दोघांचेही लक्ष चौफेर फिरत होते. जवळपास ४ एक तासात मचाण तयार करण्यात यश आले. चार ते पाच जण अगदी व्यवस्थित बसू शकतील अशी जागा तयार झाली. त्या जागेपासून पाणवठा जास्तीत जास्त साठ यार्ड लांब होता. आता कोणतेही जनावर पाणी पिण्यासाठी आले असताना दोघांच्याही गोळीच्या रेंजमध्ये येऊ शकत होते.

मी वडनेरे साहेब आणि दोन वनविभागाचे कर्मचारी यांना थांबवून घेऊन बाकी सगळ्यांना परत पाठवले. कारण जितकी माणसे जास्त तितके वन्य प्राणी लांब राहणार हे मला अनुभवाने पक्के ठाऊक होते. आतापर्यंत सूर्य बराच कलला होता. हवेतील गारवा वाढत होता तसाच अंधारही वाढत होता. रातकिड्यांची किरकिर आता कमालीची वाढली होती. सगळ्यांनी डासांपासून संरक्षण करणारी क्रीम लावल्यामुळे जरी डास चावत नसले तरी डासांची गुनगुन लक्ष विचलित करण्यास पुरेशी होती. काळोखाने आपले साम्राज्य पसरवण्यास सुरुवात केली तशी आम्ही चौघांनीही थोडीशी पोटपूजा करून घेतली. यानंतर कोणताही आवाज करणे आम्हाला त्रासदायक ठरू शकणार होते.

एकमेकांशी एक शब्दही न बोलता सर्वजण बसून होतो. मला जरी याची सवय होती तरी बाकी तिघे हे सर्व पहिल्यांदाच अनुभवत होते. आणि तेवढ्यात गुरगुर ऐकू आली. सगळ्यांचे कान आवाजाचा वेध घेऊ लागले. मी आणि वडनेरे साहेबांनी आपापली शस्त्रे सज्ज केली. अगदी सावधगिरीने दोन डोळे झाडीतून बाहेर येताना दिसले. सगळीकडे संपूर्ण अंधार असल्यामुळे हे डोळे वाघाचे की बिबट्याचे हे दुरून ओळखू येत नव्हते. जर बिबट्या असेल तर त्याला मारता येणार नव्हते. कारण मुख्य वनरक्षकाकडून तशी परवानगी मिळालेली नव्हती. पण धोका जास्त होता. कारण माणसाचा वास त्याच्या पर्यंत पोहोचला तर तो झाडावर चढून हल्ला करू शकणार होता. वाघ असेल तर भले ही तो आमच्यावर हल्ला करू शकणार नव्हता तरीही तो मारला गेला नाही तर जास्त घातक बनणार होता. इकडे आड, तिकडे विहीर अशी परिस्थिती बनली होती.

क्रमशःशिकार भाग ४.

मिलिंद जोशी, नाशिक…

Leave a comment