शिकार भाग ५

शिकार भाग १,२,३,४,५,६,७,८,९,१०,११

शिकार भाग ५ –

डोळे जसे जवळ आले तसे ते वाघाचेच असल्याचे मी ओळखले. पण लगेच त्याच्यावर गोळी चालवणे मला योग्य वाटले नाही. कारण गोळी वर्मी लागली तरच धोका संपणार होता… नाहीतर तो अधिकच वाढणार होता. आतापर्यंत सगळ्यांचे डोळे अंधाराला सरावले होते त्यामुळे आम्हाला अंधारातही वाघाची आकृती अगदी व्यवस्थित दिसत होती. एकेक पाऊल ऐटदारपणे टाकत वाघ पाणवठ्यावर आला आणि चंद्रप्रकाशात न्हाऊन निघाला. आता त्याच्या शरीरावरील पट्टे देखील स्पष्ट दिसू शकत होते.

वनविभागाचे दोन्ही कर्मचारी अगदी स्तब्ध झाले होते. झाले म्हणजे काय, एक नरभक्षक आपल्या इतक्या जवळ आहे हे पाहूनच त्यांची वाचा बसली होती. वडनेरे साहेबांच्या हातात जरी त्यांचे पिस्तुल होते तरी ते इतक्या उमद्या जनावराला मारायला तयार नव्हते. जे करायचे ते मलाच करावे लागणार होते.

वाघाने पाण्यात तोंड घातले आणि पाणी पिण्याचा आवाज येऊ लागला तसा मी नेम धरून गोळी झाडली. गोळीचा आवाज त्या शांत वातावरणात घुमला आणि पाठोपाठ वाघाची डरकाळी ऐकू आली. गोळी त्याला लागली याची ती खुण होती. मागे वळणे शक्य नसल्याने वाघाने पाण्यातच उडी घेतली आणि पाठोपाठ मी दुसरा बार उडवला. पण तो पूर्णतः खाली गेला. अगदी काही वेळातच पाणी पार करून वाघ दुसऱ्या काठावर पोहोचला आणि अंधारात दिसेनासा झाला. जी गोष्ट घडू नये असे वाटत होते तीच घडली होती. वाघ मनुष्यवस्तीच्या दिशेने गेला होता. त्यामुळे धोका पहिल्यापेक्षा अनेक पटीने वाढला होता. या अंधारात फक्त दोन हत्यारांसह वाघाचा पाठलाग करणे किंवा त्याचा शोध घेणे म्हणजे साक्षात मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे होते.

रात्रीच्या वेळी गावात बाहेर कुणी नसणार याची जरी मला खात्री होती तरी पहाटे? पहाटे शेतात प्रातर्विधीसाठी आलेली माणसे वाघाची शिकार बनणार होती आणि त्यांना सावध करणे शक्यच नव्हते.

दिवस उजाडला. मी आणि वडनेरे साहेब मचाणावरून खाली आलो, परंतु दोघेही कर्मचारी खाली उतरायला बिलकुल तयार नव्हते. एकतर त्यांच्या हातात शस्त्रही नव्हते आणि जर वाघ एखाद्या ठिकाणी दबा धरून बसला असेल आणि त्याने हल्ला केला तर? मी तसेच वडनेरे साहेब त्यांना वाचवू शकतील याची त्यांना खात्रीही नव्हती. शेवटी वडनेरे साहेबांनी कसेतरी करून त्यांना तयार केले आणि दोघे खाली उतरले. येताना काहीसे निर्धास्त असलेले दोघेही कर्मचारी परत फिरताना मात्र पूर्णतः घाबरले होते. कुठून आपल्याला दुर्बुद्धी सुचली आणि आपण ही नोकरी पत्करली असेच त्यांना वाटत होते. वडनेरे साहेब आणि माझी चिंता मात्र वेगळीच होती. जखमी झालेला वाघ जास्त घातक बनला होता.

“काय वाटते? जखमी झालेला वाघ जवळपास असेल?” मी वडनेरे साहेबांना विचारले.

“काही सांगता येत नाही. पण मला वाटते इथे त्याच्यावर हल्ला झाल्यानंतर तो इथून शक्य तितके दूर जाण्याचा प्रयत्न करेल. आणि ज्या फुर्तीने गोळी लागल्यानंतरही तो पाण्यात शिरला त्यानुसार ती त्याच्या वर्मी लागलेली नाही.” वडनेरे साहेब म्हणाले. पण झाल्या प्रकाराला मी कारणीभूत आहे असे भाव मला त्यांच्या चेहऱ्यावर जाणवले.

“हं…! असं करा… काही गावकऱ्यांनाही आपल्या सोबत घ्या. आता आपल्यालाच त्याच्या मागावर जावे लागेल. आणि हो… ४/५ पिंजरे देखील मागवून घ्या.” मी सांगितले आणि वडनेरे साहेबांनी मान डोलावली.

आम्ही चौघेही अगदी सावध नजरेने शेताच्या बांधावरून चालत होतो. आम्ही दोघांनीही आपापली शास्त्रे सज्ज ठेवली होती. पुसटशी गुरगुर ऐकायलाही माझे कान सरसावले होते. शेते संपून गावाचा परिसर लागला पण कोणत्याही प्रकारची हालचाल अजूनपर्यंत तरी ऐकू आली नव्हती. कार्यालयात आल्याबरोबर वडनेरे साहेबांनी सरपंचांना बोलावणे पाठवले. त्याच बरोबर ‘आज कुणीही शेतात जाऊ नये’ अशी दवंडी पिटण्याचीही सोय केली.

जवळपास अर्ध्या तासात सरपंचांसोबत काही गावकरी शासकीय कार्यालयाच्या प्रांगणात जमले.

“काल रात्री जंगलातील पाणवठ्यावर मी वाघाला मारण्याचा प्रयत्न केला. दुर्दैवाने तो पूर्णपणे यशस्वी होऊ शकला नाही. मात्र त्याला एक गोळी लागून तो जखमी झाला आहे. आणि त्याच अवस्थेत तो गावाच्या दिशेने पळाला. रात्रीची वेळ आणि कुमक कमी असल्यामुळे त्याचा पाठलाग करून त्याला मारणे शक्य नव्हते. आता तो जंगलातही जाऊ शकतो आणि एखाद्या शेतातही दबा धरून बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हे दोन / तीन दिवस शक्यतो शेतावर जाणे टाळा.” मी एका दमात सगळे सांगण्याचा प्रयत्न केला.

“अरारारा… ह्ये त लैच इपरीत झालं नव्हं… येक टायमाला काम बाजूला ठिवता यील पन सकाळच्या टायमाला परसाकडंला जानार कसं?” सरपंच म्हणाले आणि सगळ्यांचेच धाबे दणाणले. कारण त्यांच्या म्हणण्यात काहीच वावगे नव्हते.

“असं करू…. जो पर्यंत जादाची सरकारी मदत येत नाही, तोपर्यंत आपण वाघाला जंगलात पळवून लावण्याचा प्रयत्न तर करू शकतो…” मी म्हटले आणि मग त्या मोहिमेचे नियोजन करून मिटिंग आवरती घेतली.

दुपारच्या वेळी जेवण उरकून पुन्हा एकदा शासकीय कार्यालयाच्या प्रांगणात २५/३० जण जमा झाले.

“तुमच्यामधील कोण कोण हाका काढू शकतात?” मी प्रश्न केला तसे ५/६ तरुण पुढे आले.

“छान… तुम्ही शेताच्या सुरुवातीलाच हाका काढा. तुमच्या सुरक्षेसाठी तुमच्या सोबत इतर १० जणांनाही घ्या. कारण जखमी झालेला वाघ तुमच्यावर हल्ला करू शकतो. मी आणि वडनेरे साहेब पलीकडील बाजूला सज्ज राहू. आमच्या सोबत उरलेले लोक असतील. पण एक लक्षात घ्या. कुणीही भलते साहस करू नका. समजले?” मी जरुरी त्या सूचना दिल्या आणि सगळे जण दोन टीम मध्ये विभाजित झाले.

काही वेळातच आम्ही आमची पोझिशन घेतली आणि दुसऱ्या टीमने हाका काढायला सुरुवात केली. जवळपास १५/२० मिनिटे होऊनही शेतपिकांमध्ये कोणतीही हालचाल दिसली नाही. म्हणजेच वाघाने जरी मनुष्यवस्तीच्या दिशेने पळ काढला होता तरी किमान तो आता तरी तिथे नव्हता. पळून जाण्यासाठी त्याला दाही दिशा मोकळ्या होत्या. त्याची पळण्याची दिशा कोणती हे समजायला काहीच मार्ग नव्हता. ४/६ जण सोडले तर आमच्या सोबत जंगलात वाघाच्या मागावर येण्यास कुणीही तयार नव्हते. शेवटी शासनाकडून अतिरिक्त मदत आल्याशिवाय जंगलात शिरायचे नाही हे ठरवून आम्ही माघारी वळलो.

या गोष्टीला जवळपास ६ दिवस उलटले. या दरम्यान वाघाने कुठेही हल्ला केल्याची कुणकुण लागली नव्हती. २/३ दिवसानंतर गावकऱ्यांनीही शेतीची कामे चालू केली. फक्त जंगलात शिरायचे नाही हे प्रत्येक जण जाणून होता. कुणाला ना कुणाला सोबत घेऊन मी आजूबाजूचा बराचसा परिसर फिरून आलो होतो. पण कुठेही वाघाच्याच काय पण बिबट्याच्या शिकारीच्या खुणाही दिसत नव्हत्या. त्यामुळे मीही काहीसा निर्धास्त झालो होतो. नक्कीच वाघाने आपले शिकार क्षेत्र बदलले असणार हेच मला वाटत होते.

दुपारच्या वेळी मी माझे जेवण उरकले आणि थोडी विश्रांती घ्यावी म्हणून विचार करतच होतो की दोन जण धापा टाकत दारात उभे राहिले.

“सायेब… त्यो… वाघ… त्यानं गव्हांड्याच्या वावरात येकाला वढला…” एकाने सांगितले आणि माझ्या काळजात धस्स झाले. गेले ६ दिवस मी रोजच या परिसरात जात होतो. पण एकदाही या भागात वाघाची चाहूल लागली नव्हती. याचा अर्थ एकच होता. वाघ सारखे त्याचे ठिकाण बदलत होता. पण या भागातून दूर गेला नव्हता.

अंगावर कपडे चढवत मी वडनेरे साहेबांच्या कार्यालयात पोहोचलो. त्यांच्या पर्यंत ही बातमी आधीच  पोहोचली होती.

“या… मी तुमचीच वाट पहात होतो. आज पुन्हा वाघानं बळी घेतलाय.” मला दारात पाहताच त्यांनी म्हटले.

जवळपास अर्ध्या तासात आम्ही ज्याठिकाणी हल्ला झाला त्याठिकाणी पोहोचलो. आता दोघेही अगदी बारकाईने जागेचे निरीक्षण करत होतो. १० मिनिटाच्या प्राथमिक पाहणीनंतर वडनेरे साहेब माझ्या जवळ आले.

“आपले काम वाढले…” त्यांनी म्हटले.

“होय… नरभक्षक फक्त वाघच नाही तर बिबट्या देखील आहे.” मी त्यांच्या बोलण्याचा रोख ओळखला.

“थोडक्यात आपल्याला यावेळी दोन मोहिमेवर काम करावे लागणार तर…” त्यांनी काहीसे स्वागत म्हटले.

“होय… मलाही तसेच वाटते आहे. पण आता धोका एका बाजूने नाही तर दोन बाजूने आहे. त्यामुळे अतिरिक्त कुमक येईस्तोवर शांत राहणेच योग्य आहे.” मी माझे मत मांडले आणि आम्ही माघारी वळलो.

क्रमशःशिकार भाग ५.

मिलिंद जोशी, नाशिक…

Leave a comment