शिकार भाग ६ –
शासनाकडून मदत येण्यास पुढचे तीन दिवस लागले. जंगलात शिरून वाघाचा शोध घेण्यासाठी महुतासह दोन हत्ती, ५ सहाय्यक शिकारी, ५ पिंजरे आणि चार हाका काढणारे हाकारे असा लवाजमा भावली गावात दाखल झाला. तसेच नरभक्षक बिबट्याला पकडण्याचा आणि ते शक्य नसेल तर गोळी मारण्याचा आदेशही वडनेरे साहेबांकडे आला.
तसे अजूनपर्यत धोका एक नाही तर दोन बाजूंनी आहे हे फक्त वडनेरे साहेब, मी आणि सहाय्यक सोमा अशा तिघांनाच माहित होते. गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण तयार होऊ नये यासाठी वडनेरे साहेबांनी ही गोष्ट आमच्या तिघांमध्येच राहील याची पुरती काळजी घेतली होती.
नरभक्षक वाघाला गोळी लागून जवळपास १० दिवस झाले होते आणि तरीही तो कुठे गेला असेल? कोणत्या स्थितीमध्ये असेल याची काहीच कल्पना किंवा माहिती अजूनपर्यंत मिळू शकली नव्हती. माझ्या दृष्टीने ही चांगलीच गोष्ट होती, पण मला आश्चर्य वाटत होते ते वडनेरे साहेबांचे. मला लोकांची काळजी आणि त्यांना वाघाची. या दरम्यान दोन तीन वेळेस आमचे जे संभाषण झाले त्यातही मला ती प्रकर्षाने दिसून आली होती. एकदा तर मी त्यांना हसून म्हटलेही…
“साहेब… आता तर मला तुम्हाला शिकारीला सोबत न्यायची खूप भीती वाटतेय.” मी काहीसे हसत म्हटले.
“भीती? का?” त्यांना माझ्या बोलण्यातील उपरोध लक्षात आला नाही.
“अहो… आजपर्यंत तुम्ही त्या वाघाची इतकी चिंता वहात आहात की, समजा त्याचा आणि माझा सामना झाला तर तुम्ही माझ्यावरच पिस्तूल रोखाल आणि वाघाला म्हणाल… पळ बाबा तू… मी थोपवतो याला.” मी हसत म्हटले आणि त्यांच्या चेहऱ्यावरही हसू फुटले.
“नाही… असे काहीही मी करणार नाही… पाहिजे तर वचन देतो तुम्हाला.” त्यांनी म्हटले.
“हं… धन्यवाद… पण काय हो… कायम तुम्ही त्याच्या बाजूने जास्त का विचार करतात?” मी काहीशा उत्सुकतेने विचारले.
“त्याचे कारण म्हणजे आपण त्यांच्या क्षेत्रात दाखल झालो आहोत… पर्यावरणासाठी सगळीच जनावरे महत्वपूर्ण आहेत. ज्या अर्थी तो नरभक्षी झाला त्याअर्थी एकतर तो म्हातारा झाला असणार किंवा अपघाताने जखमी झाला असणार. सहसा वाघ मनुष्य वस्तीपासून शक्य तितके दूर राहण्याचा प्रयत्न करतात, पण अनेकदा माणूसच त्याच्या क्षेत्रात प्रवेश करतो आणि अपघात घडतात. एकेकाळी लाखांच्या घरात असलेल्या वाघांची संख्या फक्त ३/४ हजारांवर आली आहे याला कारण कोण? माणूस आपल्या काही वेळच्या मजेखातर दुसऱ्या प्राण्याचा जीव घेत असेल तर क्रूर कुणाला म्हणायचे? वाघाने हल्ला केला तर तो सगळ्यात आधी नरडी फोडतो. अगदी काही क्षणातच शिकार प्राण सोडते. तेही जास्त करून आपली भूक भागविण्यासाठी… आणि माणूस? वाघाचे मांस तर त्याचे अन्न नाही. तरीही त्याला मारले जाते. तेही अगदी हाल हाल करून. अजूनही अशा काही जमाती आहेत ज्या वाघावर पाळत ठेवतात, त्याच्या पाणवठ्यावर सापळा रचतात. वाघाचा पाय सापळ्यात अडकला की तो डरकाळी फोडतो. लगेचच झाडावर बसलेले लोकं बाहेर येतात आणि नेम धरून वाघाच्या तोंडात ओंडका फेकतात. तोंडातच ओंडका अडकल्यामुळे गुदमरून आणि हाल हाल होऊन वाघ प्राण सोडतो. पण त्यामुळे त्याची कातडी त्या लोकांना अखंड मिळते. आता तुम्हीच सांगा… यात क्रूर कोण?” वडनेरे साहेब अगदी पोटतिडकीने बोलत होते.
“हं… अगदी खरे आहे तुमचे. पण असा विचार मी केला तर सर्वसाधारण माणसाचा हकनाक बळी जाईल ना?” मी म्हटले.
“होय… तुम्ही तुमच्या जागी बरोबर आहात आणि मी माझ्या? भलेही आज आपण एकत्र काम करत आहोत. पण मुख्यतः आपली कामेच परस्परविरोधी आहेत. शासन तुम्हाला ज्या जनावरांना मारण्याचे अधिकार देते, त्याच जनावरांना संरक्षण देण्याचे काम त्याच शासनाने मला दिले आहे. अर्थात एखादे जनावर मानवाला धोकादायक ठरले तर मलाही माझ्या मनाविरुद्ध त्यावर कठोर पावले उचलावीच लागतात.”
“हं… पण या वाघाबद्दल तुम्हाला आता काय वाटते आहे?” मी प्रश्न विचारला.
“त्याला गोळी लागल्यानंतर त्याला लवकरात लवकर पकडणे किंवा मारणेच गरजेचे झाले आहे. कारण त्याला शिकार मिळाली नाही तर तो भुकेने तडफडून प्राण सोडेल. ते त्याच्यासाठी जास्त वेदनादायी असेल.” काहीसे शून्यात पहात वडनेरे साहेब म्हणाले.
पुढील दोन दिवसही असेच गेले आणि खबर आली.
“सायेब… आंबेवाडीत वाघानं हल्ला केला…” एकाने बातमी आणली.
“जरा सविस्तर सांग…” मी म्हटले. पण वडनेरे साहेबांच्या चेहऱ्यावर चिंता साफ साफ दिसत होती.
“आंबेवाडीच्या वावरात लोकं काम करत असताना येका मानसाला गुरगुर ऐकू आली. त्यानं जवळ जाऊन बघितलं त वाघानं येकदम झडप घातली. झटापटीचा आवाज झाला म्हनून ४/५ जन तिकडं धावली, पन त्या मानसाचा जीव कवाच ग्येल्था. आन त्यो वाघ त्या मानसाला जंगलात घिवून जाताना दिसला.” त्या माणसाने विस्ताराने सांगितले.
“अरे पण तो वाघच होता का?” मी काहीशा संशयाने विचारले.
“व्हय जी… त्यो ढान्याच व्हता… पन जास लोकं नसल्यानं त्यांनी त्याचा पाठलाग नाई क्येला.” त्या इसमाने सांगितले.
काही दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आज पुन्हा मोहीम चालू होणार होती. यावेळी जंगलात शिरून वाघाचा माग काढायचा होता. जरी आम्हाला हत्तीचे मदत आली होती, सहाय्यक शिकारीही सोबत होते तरीही एक नवीनच पेच निर्माण झाला होता. आंबेवाडी म्हणजे अलंगगडाच्या पायथ्याचा भाग. ते जंगल भावलीच्या मानाने अगदीच वेगळ्या प्रकारचे तर होतेच, पण त्याच बरोबर दऱ्याखोऱ्यांचा परिसरही आमच्या मोहिमेवर प्रतिकूल परिणाम करणारा होता. या भागात आम्हाला अनेक मर्यादा होत्या पण वाघाचे तसे नव्हते.
जवळपास तासभरात हत्तींना भावली गावातच ठेवून आम्ही आंबेवाडीत पोहोचलो. गावं तसं छोटंच होतं. गावापासून जवळपास ४/५ कोसावरून अलंगगडाच्या पायथ्याचं जंगल चालू होत होतं. यावेळी पायपीट बरीच करावी लागणार होती. आंबेवाडीतून दोन माहितगार लोकांना आम्ही बरोबर घेतले आणि जवळपास १५ जणांच्या लवाजम्यासह आम्ही जंगलात शिरलो. भावलीच्या पायथ्याशी असलेल्या जंगलात आणि या जंगलात बराच फरक होता. तिथे घनदाट झाडी असली तरीही जमीन काहीशी सपाट होती. येथील जंगलात कंबरेइतक्या खुरट्या रानवनस्पती तसेच करवंदासारख्या जाळ्या जास्त करून होत्या. जर एखाद्या झाडीच्या आडोशाला बसले तरच सावली मिळणार होती. अशा जाळ्या जास्त घातक होत्या. कारण या कोणत्याही ठिकाणी वाघाने दबा धरलेला असू शकणार होता. जर वाघाशी सामना झालाच तर त्यामध्ये भौगोलिक परिसराचा वाघालाच जास्त फायदा मिळणार होता.
जवळपास दीड तासाच्या पायपिटीनंतर सगळ्यांनीच थोडी पोटपूजा करण्याचे ठरवले. त्यासाठी एका काहीश्या मोठ्या जाळीच्या सावलीची आम्ही निवड केली. सगळ्यांना दोन टीम मध्ये विभागले. ज्यावेळी एक टीम जेवत असेल त्यावेळी दुसऱ्या टीमने त्यांच्या आजूबाजूला थांबून चहुबाजूला लक्ष ठेवावे आणि नंतर तीच गोष्ट पहिल्या टीमने करावी असे ठरले. वाघ जरी जास्त माणसे दिसली तर आपला रस्ता बदलतो, तरीही तिथे धोका फक्त त्याच्याकडूनच नव्हता तर तिथे असलेल्या माकडांच्या समूहापासुनही होताच. बरे ही माकडे समुहाने हल्ला करतात. आणि त्यांच्यावर शस्त्र चालवणे कायद्याच्या चौकटीत बसत नव्हते.
पोटपूजा आटोपल्यावर आम्ही पुढे निघालो. इथून गडाच्या चढणीला सुरुवात होत होती. अनेक ठिकाणी पायऱ्या खोदल्या होत्या. हातातील शस्त्रे सांभाळत तोल सावरणे वाटते तितके सोपे नव्हते. आमचा आवाज ऐकून वाघ तिथून पळून जाऊ शकणार होता. त्यामुळे शक्य तितका आवाज कमी करणेच आमच्या हिताचे होते.
“साहेब… हे पहा…” सगळ्यात पुढे असलेल्या आमच्या एका सहकाऱ्याने शक्य तितक्या हळू आवाजात म्हटले. मी आणि वडनेरे साहेब काहीसे जलद त्याच्या जवळ पोहोचलो. तो आम्हाला एका झाडीवर रक्ताचे डाग दाखवत होता. रक्ताचे डाग बरेचसे काळपट पडले होते. त्यानंतर थोडे बारकाईने पाहिल्यावर जवळपासच्या दगडावरही रक्ताचे डाग दिसले.
“आपण योग्य मार्गावर आहोत. याच बाजूने वाघाने शिकारीला ओढत नेले आहे. आणि ज्या पद्धतीच्या खुणा दिसताहेत त्यावरून ती शिकार कोणतेही जनावर नसून मनुष्यच असणार हे मी खात्रीपूर्वक सांगू शकतो.” मी म्हटले.
आता त्याच खुणांचा माग काढत आम्ही हळूहळू पुढे सरकू लागलो. एक दोन ठिकाणी तर रस्त्यात खूपच मोठे दगड दिसत होते. जवळपास ६०/७० किलोचे धूड अंगावर घेऊन अशी अवघड वाट चढणाऱ्या वाघाचे मी मनोमन कौतुक केले. जसजसे आम्ही पुढे जाऊ लागलो तसतसा काहीसा कुबट वास नाकाला झोंबू लागला. नक्कीच जवळपास वाघाने त्याची शिकार ठेवलेली असणार याची मनातली खूणगाठ पक्की झाली. प्रश्न फक्त एकच होता. वाघ तिथे असेल की नाही? समजा नसला तर? तर पुन्हा तो त्याने केलेली शिकार खाण्यासाठी इथे येणार हे नक्की होते पण याठिकाणी दबा धरून बसणे शक्यच नव्हते.
अजून थोडे पुढे गेल्यावर पुन्हा एकदा कातळात कोरलेल्या दगडी पायऱ्या लागल्या. एकावेळी एकाच माणूस जाऊ शकेल इतक्या त्या लहान होत्या. तिथून तोल सांभाळत चढणे एक दिव्यच होते. जवळपास २५/३० पायऱ्यांची उभी चढण चढून आम्ही काहीशा सपाट जागेवर आलो. एकावेळी जास्तीत जास्त ४/५ जण बसू शकतील इतकी ती जागा लहान होती. तिथूनच जवळपास ५/६ फुट रुंद असलेली पायवाट पुढे जात होती. एका बाजूला उभा कातळ आणि दुसऱ्या बाजूला दरी. प्रत्येक पाऊल अगदी सावधपणे पुढे टाकावे लागणार होते. मनात जराही संशय आला तरीही तोल ढळणार होता. आणि आम्ही वाघाला न पाहताच त्याचा घास बनू शकणार होतो.
“साहेब… आता येक गुहा हाय… तितंच वाघ असू शकतो.” आंबेवाडीमधून आमच्या सोबत असलेला एकजण म्हणाला आणि माझ्या कपाळावर घामाचे बिंदू दिसू लागले. तसे पूर्वीही मी वाघासोबत समोरासमोर सामना केला होता. त्याच्यावर गोळ्याही झाडल्या होत्या. पण इथली भौगोलिक परिस्थिती खूपच वेगळी होती. गुहेमध्ये वाघ आहे की नाही हे गुहेच्या तोंडासमोर गेल्याशिवाय समजणार नव्हते. आणि समजा गुहेत वाघ असेल आणि त्याने हल्ला केला तर तो चुकविण्यासाठी पुरेशी जागाही नव्हती. आणि त्यामुळेच माझ्या कपाळावर घामाचे बिंदू चमकू लागले होते.
क्रमशःशिकार भाग ६.
मिलिंद जोशी, नाशिक…