शिकार भाग ७

शिकार भाग १,२,३,४,५,६,७,८,९,१०,११

शिकार भाग ७ –

माझ्या मनात चलबिचल चालू होती. जोपर्यंत गुहेत डोकावून पहात नाही तोपर्यंत कोणताही निर्णय घेणे योग्य नव्हते. ‘जर गुहेच्या कडेला उभे राहून फक्त बंदुकीची नळी गुहेत सरकावून बार काढला तर?’ मनात विचार आला. पण जेवढ्या तत्परतेने हा विचार आला तेवढ्याच तत्परतेने अजून एक विचार आला. ‘समजा गुहेत वाघाऐवजी इतर कोणता वन्यपशु असेल तर?’ तर तो हकनाक मरणार होता. आणि माझी तत्वे त्याला कधीही मान्यता देणार नव्हती. फक्त संशयावरून एका मुक्या प्राण्याचा जीव घेणे हे वडनेरे साहेबांच्याही तत्वात बसणारे नव्हते. कधी नव्हे इतकी छाती धडधडत होती. शेवटी एकदम शांत राहून कानोसा घेण्याचा मी प्रयत्न करू लागलो. पण बाहेरील वारे कातळाला धडकून काहीसा विचित्र आवाज करत असल्याने नक्की गुहेत कोणत्या प्रकारचा आवाज येतो आहे हे सांगणे मुश्कील होते.

“मी पुढे जाऊन पाहू का? मी डोकावून लगेच मागे वळेन.” माझ्या बाजूला असलेला एक गावकरी म्हणाला.

“नाही… मी असताना कुणाचाही जीव धोक्यात घालणे मला योग्य वाटत नाही.” मी म्हटले. आता जे काही करायचे ते मलाच करावे लागणार होते. मी दीर्घ श्वास घेतला, एका हाताने कपाळावरील घाम पुसला, मनात देवाचे नाव घेतले आणि गुहेच्या दारासमोर जाऊन उभा राहिलो. समोर मेलेल्या माणसाचे जवळपास खाल्लेले प्रेत पडले होते. रक्ताने माखलेला सांगाडाच काय तो दिसत होता. त्यामागे वाघ काहीसा तयारीतच बसला होता. त्याचे डोळे गुहेतून बाहेर पहात होते. बहुतेक त्याला माणसाचा वास या आधीच आलेला असावा. पण गुहेचे तोंड त्यामानाने बरेच लहान असल्यामुळे त्याला दबकून बसण्याशिवाय पर्याय नव्हता. या सगळ्या गोष्टी पाहण्यासाठी मला फक्त काही क्षणच लागले आणि मी शक्य तेवढ्या तत्परतेने बाजूला झालो.

यापूर्वी अनेकदा वाघ समोर असताना मी अगदी ऐटीत त्यांच्यापुढे उभा राहून त्यांच्या डोळ्यात डोळे घातले होते. त्यांनी अंगावर झेप घेतल्यानंतर माझ्या शस्त्रातून निघालेल्या गोळीने त्यांच्या मानेचा वेध घेतला होता. पण तोच मी, इतक्या तत्परतेने बाजूला कसा झालो; याचेच आता मला आश्चर्य वाटत होते. बहुतेक माणसाचा मेंदू विपरीत परिस्थितीमध्ये तत्काळ निर्णय घेण्यात खूप अग्रेसर असतो.

वाघाची आणि माझी नजरानजर झाली होती. त्याच बरोबर त्याने माझ्या हातातील शस्त्रही पाहिले होते. तिथून पळणे वाघालाही शक्य नव्हते आणि त्यासमोर जाणे माझ्यासाठीही खूपच धोकादायक होते. इतक्यात गुहेतून वाघाची डरकाळी ऐकू आली. त्याच्या डरकाळीचा आवाज संपूर्ण गुहेत निनादला. त्याच्या डरकाळीने पहिल्यांदा माझ्या छातीत धस्स झाले.

बहुतेक वाघालाही आपण अडकलो याची कल्पना आली होती आणि त्यामुळे तर तो अधिकच धोकादायक बनणार होता.

“साहेब… तुमचे पिस्तूल द्या माझ्याकडे. मी त्याच्यावर समोरून गोळी झाडणार आहे. त्याबरोबर तो माझ्यावर हल्ला करेल. मी गोळी झाडून लगेच बाजूला होईन.” मी वडनेरे साहेबांना म्हटले. हातात ग्लोक १७ घेतले तर ते मला एका हातानेही चालवता येणार होते.

“तुम्ही सर्वजण सज्ज रहा. त्याची उडी दरीत पडल्याबरोबर त्याच्यावर गोळ्यां झाडा. एक लक्षात ठेवा. समजा तो इथूनही पळून जाण्यात यशस्वी झाला तर मात्र आपली डोकेदुखी अजूनच वाढेल.” माझ्या इतर सहकाऱ्यांना मी योग्य त्या सूचना दिल्या.

मी क्षणभर डोळे मिटले. पुन्हा एकदा मोठा श्वास घेतला आणि गुहेच्या तोंडाशी जाऊन उभा राहिलो. यामध्ये जास्तीत जास्त २/३ सेकंदांचा वेळ गेला असेल, पण त्या दोन तीन सेकंदांत माझ्या मनात असंख्य विचार येऊन गेले. माझी एका क्षणाची चूक माझा इहलोकीचा प्रवास संपवू शकणार होती.

वाघाचे लक्ष गुहेच्या तोंडावरच होते. त्याने पावित्रा घेतलेलाच होता. जसा मी पुन्हा एकदा त्याच्या नजरेस पडलो, त्याने अंगावर झेप घेतली. मी कोणताही मागचापुढचा विचार न करता गोळी झाडली आणि झटक्यात बाजूला होतच होतो की वाघाची कर्णकर्कश डरकाळी ऐकू आली. थोडक्यात गोळीने तिचे काम बजावले होते. मी बाजूला झाल्यामुळे वाघाची उडी एकदम दरीत कोसळली. तशी ही गुहा चढणीच्या सुरुवातीलाच असल्यामुळे इथे दरी फारतर फार २०/२२ फुट खोल होती. त्यामुळे दरीत पडल्या बरोबर वाघाने उठून पळण्याचा प्रयत्न केला, पण माझ्या सोबतच्या सहकारी शिकाऱ्यांनी त्यांचे काम अगदी चोख बजावले होते.

जवळपास १० ते १२ मिनिटात वाघाची गुरगुर शांत झाली. श्वासागणिक वरखाली होणारा पोटाचा भाग शांत झाला आणि आम्ही हळूहळू त्याच्या जवळ जाऊ लागलो. अर्थात पूर्ण सावधतेनेच. कारण अगदी मरताना देखील जीवाच्या आकांताने मारलेला वाघाचा एक पंजा माणसाची खोपडी तोडण्याची ताकद बाळगून होता. सर्वात प्रथम मी आणि वडनेरे साहेब वाघाजवळ पोहोचलो. माझ्या चेहऱ्यावर अभिमान होता तर वडनेरे साहेबांचा चेहरा पडला होता. त्यांनी जरी स्वतः वाघावर एकही गोळी चालवली नव्हती तरीही ते या मोहिमेचा भाग होतेच.

“शिवा…! आगपेटी आन…” वाघाच्या तोंडाजवळ उभ्या असलेल्या आंबेवाडीतील एका गावकऱ्याने म्हटले आणि त्याचा मित्र शिवा लगेचच काडेपेटी घेऊन पुढे झाला.

“ओ… काय करताय?” वडनेरे साहेबांनी काहीसे चढ्या आवाजात विचारले.

“व्हागाच्या मिशा जाळतोय !” त्या गावकऱ्याने उत्तर दिले.

“का?”

“सायेब… तुमाला म्हाईत नाई व्हय? त्या लैच इशारी ऱ्हातेत…” त्याने सांगितले.

“अरे… काहीही अंधश्रद्धा पाळू नका! ठेवा ती काडेपेटी खिशात! आधी याचा पंचनामा करायचा आहे.” वडनेरे साहेब भडकलेच.

“आवो पर…” वडनेरे साहेबांना भडकलेले पाहून तो गावकरी काहीसा गोंधळाला.

“तुमच्या अशा अंधश्रद्धाच वाघांची संख्या कमी होण्यास कारणीभूत आहेत. ना त्याच्या मिशा विषारी असतात, ना त्याची नखे आणि पंजे घरात ठेवल्याने पैसा मिळतो, ना त्याच्या कातडीवर बसून तप केल्याने स्वर्गप्राप्ती होते… कुणी काहीही बोलतात आणि तुम्ही ते खरे मानून वाघाची हत्या करू लागतात.” वडनेरे साहेब म्हणाले आणि मग ते गावकरी आणि दोन सहाय्यक यांना वाघाचे धूड भावली मध्ये नेण्याची व्यवस्था करण्यास पिटाळले.

आम्ही भावलीत पोहोचलो त्या आधीच नरभक्षकाची शिकार झाल्याची बातमी तिथे पोहोचली होती. त्यामुळे गावातील स्त्रियांनी आमचे ओवाळून स्वागत केले. त्यानंतर पंचायत बोलावली गेली. पंचायतीच्या कामाला सुरुवात होईस्तोवर वडनेरे साहेब आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी वेगवेगळ्या कोनातून वाघाचे फोटो काढून घेतले. त्याची लांबी, रुंदी मोजून घेतली. काही दिवसांपूर्वी लागलेली माझी गोळी धरून वाघाला एकूण ९ गोळ्या लागल्या होत्या. त्यानंतर त्याच्या तोंडाची तपासणी केली असता असे लक्षात आले की त्याचा एक सुळा निम्म्यापेक्षा जास्त तुटला होता तसेच सुळ्याशेजारील दोन दातही अर्धवट तुटले होते. अशा दातांनी मोठे जनावर फाडून खाणे वाघाला अवघड जात होते; त्यामुळेच त्याने माणसाला आपले भक्ष बनवले होते. सगळ्या नोंदवहीतील नोंदी पूर्ण करून, त्याला योग्य ते पुरावे जोडून वडनेरे साहेबांनी त्यावर माझी तसेच सरपंचांची साक्षीदार म्हणून सही घेतली.

“सायेब… आता ह्यो आमच्या ताब्यात द्या…” सरपंच म्हणाले.

“का?” वडनेरे साहेबांनी विचारणा केली.

“यानं लै जीव घेतलेत. आता याचं काय करायचं ह्ये गावकरी बघतीन..!!!”

“नाही सरपंच.., कायदा मला याची परवानगी देत नाही…” वडनेरे साहेबांनी ठासून सांगितले.

“आवो पर गावाच्या भावना….” सरपंच त्यांचे वाक्य पूर्ण करणारच होते की वडनेरे साहेबांनी सुरुवात केली.

“कायद्यात भावनेला थारा नसतो सरपंच..!! आणि गावकरी तरी काय करणार? मेलेल्या वाघाच्या शरीराची विटंबनाच करणार ना? त्यावर पाय देऊन आणि त्याचे तुकडे करून? सांगा ना… एकीकडे त्याला बघोबा म्हणत देव मानायचे आणि दुसरीकडे त्याची अशी विटंबना करायची हे तुम्हाला तरी पटते का? त्याने जीव घेतले पण त्याचे पोट भरावे म्हणून… ज्यावेळी माणूस हौशेसाठी वाघाचा बळी घेतो तेंव्हा?” वडनेरे साहेबांच्या या तर्कावर काय बोलावे हेच सरपंचांना सुचेना. अर्थात वडनेरे साहेब तरी काय खोटं बोलत होते?

“सोमा ! सगळ्या नोंदी झाल्या आहेत ना, हे पुन्हा एकदा तपासा आणि याची विल्हेवाट लावण्याची व्यवस्था करा…” वडनेरे साहेबांनी हुकुम सोडला.

काही वेळातच दारणेच्या काठावर एक जागा निवडून चिता रचण्यात आली. पंचायत ते चितेची जागा अशी मेलेल्या वाघाची मिरवणूक काढली गेली आणि त्यानंतर ते धुड चितेवर ठेवून त्याला अग्नी दिला गेला. म्हणता म्हणता एका पर्वाची सांगता झाली. मनात म्हटले ‘चला आज आपल्याला सुखाची झोप येणार.’

“काय साहेब… अजूनही तुमच्या चेहऱ्यावर चिंता दिसतेय?” मी माहोल काहीसा हलका व्हावा म्हणून वडनेरे साहेबांना म्हटले.

“होय… त्याचे कारणही तसेच आहे…” त्यांनी उत्तर दिले.

“कोणते?”

“तुम्ही विसरलात… पण मी विसरलो नाहीये… या भागात नरभक्षक एक नाही तर दोन होते… त्यातील एक जरी तुम्ही मारला तरी दुसरा अजून मोकळा फिरतोय. आणि त्याचे मोकळे फिरणे किती घातक आहे हे मी तुम्हाला वेगळे सांगायला नको… नाही का?” अगदी हळू आवाजात वडनेरे साहेब म्हणाले आणि सगळी चिंता माझ्या तोंडावर दिसू लागली. आज सुखाने झोपता येईल या माझ्या मनातील इच्छेला क्षणार्धात सुरुंग लागला होता.

क्रमशःशिकार भाग ७.

मिलिंद जोशी, नाशिक…

Leave a comment