शिकार भाग ८ –
“सरपंच..!!!” सगळे आटोपून घराकडे फिरणाऱ्या सरपंचांना वडनेरे साहेबांनी आवाज दिला.
“बोला सायेब…” सरपंच थांबले.
“संध्याकाळी परत एकदा गावकऱ्यांना बोलावून घ्या…”
“कायला?” काहीसे गोंधळून सरपंचांनी विचारले.
“कारण धोका कमी झालाय पण संपला नाही…” वडनेरे साहेब म्हणाले.
“म्हंजी?” सरपंच पुरते गोंधळले. ज्या वाघाने संपूर्ण परिसरात दहशत माजवली होती त्याला मारल्यानंतरही धोका संपला नाही?
“सरपंच… काही गोष्टी योग्य वेळ आल्यावरच सांगाव्या लागतात…” मी म्हटले आणि सरपंच माघारी वळले.
“काय झालं सायेब?” त्यांनी विचारले.
“शिरपाच्या शेतात आम्हाला वाघाबरोबरच बिबट्याचेही ठसे आढळले होते. आणि काही दिवसांपूर्वी गव्हांड्याच्या शेतात जो हल्ला झाला तो वाघाने नाही तर बिबट्याने केला होता. त्यावेळी गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण जास्त पसरू नये यासाठी आम्ही काही बोललो नाही. पण आज बोलणे भाग आहे.” वडनेरे साहेबांनी सांगितले आणि सरपंचांच्या चेहऱ्यावर चिंता साफ दिसू लागली.
“द्येवा… आजुक किती परीक्षा बघनार?” आकाशाकडे बघत काहीसे स्वगत सरपंच म्हणाले.
संध्याकाळी पुन्हा एकदा पंचायत बोलावली गेली. जवळपासच्या गावातील काही मुख्य लोकांनाही यावेळी बोलावले गेले होते.
“मंडळी… आज परतापरांव, वडनेरे सायेब आनी त्यांच्या मानसांनी वाघाला मारून आपल्या पंचक्रोशीवर लई उपकार क्येले. लैच आनंदाची गोष्ट हाय ही. पर ह्यो आनंद आपल्याला साजरा करता येनार नाई. कारन येक वाघरू बी मानसास्नी मारू ऱ्हायलंय. जवर त्येचा बंदूबस्त व्ह्त नाई तवर आपल्याला जपून ऱ्हावं लागन. जास घाबरायचं काम नाई, ह्ये समदे सरकारी पावने तवर हितच ऱ्हानार हायेत.” सरपंचांनी सगळ्यांना एका दमात सांगितले आणि लोकांमध्ये कुजबुज वाढली.
“हे बघा… जास्त घाबरण्यासारखं काही नाहीये. कारण बिबट्या हा मुळातच खूप घाबरट प्राणी आहे. त्यामुळे तो सहसा समोरासमोर हल्ला करत नाही. पण आपण सावध रहाणे कधीही चांगलेच. आणि शक्यतो लहान मुले तसेच आपली पाळीव जनावरे यांची पहिल्यासारखीच काळजी घ्यावी लागणार आहे. लवकरच त्याचाही बंदोबस्त करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोतच.” वडनेरे साहेबांनी पुढील माहिती दिली आणि त्यानंतर इतर काही सूचना देऊन सभेची सांगता झाली.
दुसऱ्या दिवशीपासून पुन्हा आमची शोधमोहीम चालू झाली. यावेळेस आमच्या समोर असलेल्या अडचणी वेगळ्याच होत्या. या भागात वाघ नसल्यामुळे दिसणारा वाघ हाच नरभक्षक आहे हे समजून येत होते. बिबट्याचे मात्र तसे नव्हते. या भागात बिबटे मुबलक प्रमाणावर आढळत असल्यामुळे नजरेला पडणारा बिबट्या नरभक्षक आहे किंवा नाही याची खात्री करणे खूप अवघड जाणार होते.
शासनाकडून मिळालेल्या पाच पैकी तीन पिंजरे तीन वेगवेगळ्या जागी लावले होते. दर दोनतीन दिवसांच्या अंतराने त्यातील जनावर बदलले जात होते. पण बिबट्याच काय तर साधे तरसही अजूनपर्यंत त्यात अडकले नव्हते. रोज आमची टीम आसपासच्या परिसरात फिरत होती, पण कुठेच काही माग लागत नव्हता. तीन चार वेळेस जंगलात जाऊनही तपास केला. पण नजरेला पडलेल्या शिकारी ह्या प्राण्यांच्या असल्यामुळे त्यावरून काही निष्कर्ष काढणे शक्यच नव्हते. एकेक दिवस पुढे जात होता. या परिसरात अजून एक नरभक्षक फिरतोय हे हळूहळू लोक विसरू लागले होते. सगळ्यांचे सगळे व्यवहार पूर्वपदावर आले होते. हळूहळू थंडीही वाढू लागली होती. मनात सारखे विचार येत होते… आपण इथे थांबून आपला वेळ तर घालवत नाही आहोत ना? शेवटी एक दिवस मी विषय वडनेरे साहेबांजवळ काढलाच.
“बरेच दिवस झाले पण कुणावर हल्ला झाल्याची बातमी नाहीये. बहुतेक बिबट्याने परिसर सोडला असावा.” मी म्हटले.
“हं… हल्ला झाला नाही हे खरे आहे… पण परिसर सोडला असावा असे नाही मला वाटत.” वडनेरे साहेब म्हणाले.
“का?” मी विचारले.
“कारण… बिबट्याचे स्वभाववैशिष्ट्य असे आहे की तो कोणत्याही वातावरणाशी खूप पटकन जुळवून घेतो. पण सहसा आपला इलाका सोडून जात नाही. तसेच तो इतका चतुर प्राणी आहे की आपण लावलेले सापळे कोणते आणि सामान्य शिकार कोणती याचाही त्याला चांगल्यापैकी अंदाज बांधता येतो. त्यामुळे तर तो आपल्या जवळपास अजूनही अनेकदा त्याचे अस्तित्व आपल्याला जाणवू देत नाही.” वडनेरे साहेबांनी सांगितले.
“हं… खरंय तुमचं…!” मी म्हटले.
“तसेही हिवाळ्याचे दिवस त्यांना जास्त सोयीस्कर ठरतात. एकतर दिवस लहान असल्यामुळे रात्र मोठी बनते आणि शिकारीचे चान्सेस वाढतात.” वडनेरे साहेब म्हणाले. आमचे बोलणे चालूच होते की एक गावकरी वनविभागाच्या कार्यालयात आला.
“सायेब… म्या वाघरू पायलं!” तो आत येत म्हणाला.
“कधी आणि कुठे?” आम्ही काहीसे सजग झालो.
“जंगलातल्या पानवठ्यावर… म्या गुरं चरायला घेऊन गेल्तो… बरुबर अजुक ३/४ जन व्हते. गुरं येकदम वरडायला लागली म्हनून म्या तिकडं बघितलं त वाघरू दिसलं. म्या आन माहे मित्र लै जोरात वरडून त्याच्यावर धावलो. मंग त्यो पळून गेला. बाकी समदे तितं राखन करू ऱ्हायले आन म्या लगोलग हितं सांगाया आलो.” त्या गावकऱ्याने सांगितले.
“चल तर मग…” म्हणत आम्ही सर्वजण जिथे बिबट्या दिसला तिथे पोहोचलो. जनावरे अजूनही काहीशी भेदरलेलीच होती. ६/७ जणांनी जनावरांना एका ठिकाणी गोळा केले होते आणि हातात काठ्या, कुऱ्हाडी घेऊन ते सर्व त्या जनावरांच्या भोवती फेऱ्या मारत होते. आम्हाला पाहताच सगळे आमच्या बाजूला गोळा झाले.
मी आणि काही सहकारी आजूबाजूला पाहणी करू लागलो. वडनेरे साहेब ठश्यांची पाहणी करण्यात मग्न होते. यावेळी आमचे लक्ष अगदी चौफेर होते. मधूनच आम्ही झाडावर काही असामान्य हालचाली तर दिसत नाही ना हेही बघत होतो. जवळपास १ तास संपूर्ण परिसर पाहिल्यानंतर आम्ही परत आलो.
“साहेब… इथे आता बिबट्या दिसत नाहीये. बहुतेक तो दाट जंगलात शिरला असणार.” मी म्हटले.
“ठीक आहे… उद्यापासून आपण या भागावर लक्ष केंद्रित करू…” वडनेरे साहेब म्हणाले आणि आम्ही परत फिरलो.
दुसऱ्या दिवशी संपूर्ण तयारीनिशी जंगलात शोधमोहीम चालू झाली. मी आणि सोमा एका हत्तीवर बसून चौफेर नजर टाकत होतो. वडनेरे साहेब आणि दोन सहाय्यक शिकारी दुसऱ्या हत्तीवर बसून पहाणी करत होते. पायी चालणाऱ्या लोकांमध्ये दोन वनविभागाचे कर्मचारी, ५/६ हाकारा काढणारे, तीन सहाय्यक शिकारी आणि जवळपास ७/८ गावकरी असा लवाजमा होता. गावकऱ्यांच्या हातात कोयते, अन कुऱ्हाडी होत्या. दुपार टळत आली परंतु बिबट्याचा काहीही मागमूस नव्हता. शेवटी हात हलवत आम्ही परत फिरलो.
“सायेब… दारणेच्या काठालगतच्या पिंजऱ्यात एक बिबट्या अडकलाय.” आम्ही कार्यालयात पाय ठेवतो न ठेवतो तोच एका कर्मचाऱ्याने माहिती दिली.
“गुड… व्हेटर्नरी डॉक्टरला फोन लावलाय का?” वडनेरे साहेबांनी विचारले.
“व्हय… त्यास्नी दुपारीच फोन केल्था… यीवूच ऱ्हायले ते…” कर्मचाऱ्याने माहिती दिली. तेवढ्यात व्हेटर्नरी डॉक्टर आढाव आत आले.
“चला… तिकडेच जाऊ आपण…” डॉक्टरांकडे बघत वडनेरे म्हणाले आणि आम्ही पूर्ण लवाजम्यासह ज्या ठिकाणी बिबट्या अडकला होता त्या ठिकाणी पोहोचलो. पिंजऱ्यात अडकलेला बिबट्या पिंजऱ्यातून सुटण्याचा प्रयत्न करत होता. आम्हाला बघताच त्याची धडपड वाढली. तिथे पोहोचताच सगळी सूत्रे डॉक्टर आढाव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हाती घेतली. कसेही करून त्यांना बिबट्याला बेशुद्ध करायचे होते. बऱ्याच प्रयत्नानंतर महत्प्रयासाने डॉक्टरांनी अडकलेल्या बिबट्याला गुंगीचे इंजेक्शन दिले आणि तो आता किमान दोन तीन तास उठणार नाही अशी खात्री झाल्यावर पिंजऱ्यातून बाहेर काढून तपासणी चालू केली.
अडकलेला बिबट्या जेमतेम दीड वर्षाचा होता. प्रथमदर्शनी त्याला कोणतीही दुखापत झालेली नव्हती. तसेच त्याच्या पायांच्या ठश्याचा आकार गव्हांड्याच्या शेतात सापडलेल्या ठशांपेक्षा काहीसा लहान होता. म्हणजेच हा तो नरभक्षक बिबट्या नव्हता. वडनेरे साहेबांनी जी शंका बोलून दाखवली होती ती किती रास्त होती हे लगेचच इतरांच्या लक्षात आले. थोड्या वेळापूर्वी माझ्या चेहऱ्यावर पसरलेल्या समाधानाची जागा पुन्हा एकदा वैतागाने घेतली होती. थोडक्यात अजूनही आमची परीक्षा संपलेली नव्हती.
क्रमशःशिकार भाग ८.
मिलिंद जोशी, नाशिक…