शिकार भाग ९ –
वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात एका वेगळ्याच बिबट्याला अडकून देखील दीड महिना होऊन गेला होता. कुठूनही बिबट्याच्या हल्ल्याची खबर मिळत नव्हती. वडनेरे साहेबही आता ‘बिबट्या दुसऱ्या परिसरात गेला असणार’ असे म्हणू लागले होते. गावकरीही आमच्या शोध मोहिमांना कंटाळले होते.
“सायेब… आत यावं का आमी?” कार्यालयाच्या दारातून आत येत सरपंचांनी विचारले.
“या सरपंच..!!!” वडनेरे साहेबांनी त्यांचे स्वागत केले.
“गावकरी म्हनू ऱ्हायले… ह्ये असं कवर चालायचं?” सरपंचांनी एकदम मुद्द्यालाच हात घातला.
“म्हणजे? मी नाही समजलो.”
“म्हंजी आता कवर नुकसानी झेलायची? ना वाघरू सापडून ऱ्हायलं… ना कामं हून ऱ्हायले? दिवाळीबी लैच दिवाळं काढून गेली… तुमचे त्ये हत्ती… वाघरू हुडकाया शेतात घुसतात आन समदा इस्कोट करून ठिवतात. त्ये रोगापेक्षा विलाजच तरास दिवू ऱ्हायला.” सरपंच म्हणाले आणि त्यावर काय बोलावे हे वडनेरे साहेबांना समजेना. माझी तरी काय वेगळी गत होती?
चार दिवसात हत्ती आणि सहाय्यक शिकारी यांनाही माघारी पाठवले गेले. आपलाही इथे थांबून काही उपयोग नाही असे लक्षात घेऊन मीही परतण्याची तयारी करू लागलो.
तसे मलाही या भागात येऊन खूप दिवस झाले होते. या दरम्यान एका नरभक्षकाचा खात्मा केला होता. दुसरा मात्र हाती लागला नव्हता. मी माझे सगळे सामान आवरले. ब्याग भरली आणि परतण्यापूर्वी एकदा सगळ्यांची भेट घेण्यासाठी वनविभागाच्या कार्यालयात आलो. मला निरोप देण्यासाठी सरपंच आणि काही गावकरीही कार्यालयात जमा झाले होते.
“चला… तुम्हा सर्वांसोबत काम करून खूप छान वाटले. तुम्हा सर्वांनी जे प्रेम आणि आदर दिला तो मी विसरणे कदापि शक्य नाही.” मी म्हटले. इतका रम्य परिसर सोडून जाताना वाईटही वाटत होते.
“आमी बी तुमाला इसरनार नाई…” माझा हात हातात घेत सरपंच म्हणाले. त्यांच्याही डोळ्याच्या कडा काहीशा ओलावल्या होत्या. सोमाने माझे समान जीपमध्ये नेऊन ठेवले आणि तेवढ्यात एकजण धावत तिथे आला.
“सरपंच… बिबट्यानं तात्याचं ४ वर्साचं पोरगं वढून न्येलं…” त्याने धापा टाकत सांगितले.
“आं??? काय बोलू ऱ्हायला??? त्यो बिबट्याचं व्हता का?” सरपंचांनी विचारले.
“व्हय जी… तात्या शेतावर काम करत व्हता… त्याची बायकूबी तिढंच काम करत व्हती. पोरगं खेळत व्हतं. आन त्या पोरावर येकदम बिबट्यानं झडप घातली.” त्याने सांगितले आणि आम्ही सगळ्यांनी तात्याच्या शेताकडे धाव घेतली.
शेतावर पोहोचलो त्यावेळी तात्यासह ५/६ जण हाती कुऱ्हाड आणि कोयते घेऊन बिबट्यामागे गेले होते. तात्याच्या बायकोने तिथेच फतकल मारून टाहो फोडला होता. ४/६ बायका तिला धीर देण्याचा प्रयत्न करत होत्या. वडनेरे साहेब आणि मी त्या ठिकाणाचे बारकाईने निरीक्षण करू लागलो. त्या भागाचे निरीक्षण केल्यानंतर एक गोष्ट आमच्या चांगलीच लक्षात आली. बिबट्याने अगदी चपळाईने आणि घात लावून डाव साधला होता. पण यावेळी तो जंगलाच्या बाजूने नाही तर शेताच्या बाजूने पळाला होता. त्याने इतके दिवस आम्हाला कसे चकवले ते आता कुठे आमच्या लक्षात आले. आम्ही त्याला जंगलात शोधत होतो आणि तो मात्र खुल्या मैदानातील शेतांमध्ये लपत होता.
प्राथमिक पडताळणी करून आम्हीही बिबट्या ज्या दिशेने गेला होता त्या दिशेने चालू लागलो. जवळपास एक सव्वा किलोमीटर अंतरावर तात्या आणि इतर गावकरी दिसले. सगळे जण जवळपासच्या झुडपांमध्ये शोध घेत होते. सगळेच काहीसे हतबल बनले होते. आम्ही तिथे पोहोचलो आणि प्राथमिक चौकशी करून परत शोध चालू केला. तिथून काहीच अंतर गेलो असेल आणि नदीकाठावरील एका मोठ्या झाडाच्या बुंध्याशी बराचसा पालापाचोळा तसेच झाडाच्या काही तुटक्या फांद्यांचा ढीग गोळा झालेला दिसला. आम्ही त्याच्या जवळ पोहोचलो.
“सोमा… पाचोळा बाजूला कर…” वडनेरे साहेबांनी सोमाला म्हटले तसा तो पुढे झाला. त्याने फांद्या बाजूला सारल्या आणि सगळ्यांच्या अंगावर सरसरून काटा आला. बिबट्याने तात्याच्या मुलाचे प्रेत अगदी व्यवस्थितपणे लपविण्याचा प्रयत्न केला होता. मानेत घुसलेले दोन सुळे सोडले तर इतरत्र अंगावर वरकरणी फारशा जखमा दिसत नव्हत्या. ते पाहताच तात्या त्याकडे धावला पण वडनेरे साहेबांनी इतर सहकाऱ्यांना डोळ्याने खुणावले आणि त्यांनी तात्याला बाजूला घेतले.
“पोलीस स्टेशनला वर्दी द्या…” वडनेरे साहेबांनी सांगितले आणि लहान मुलाच्या प्रेताला कुठेही हात न लावता आजूबाजूच्या परिसराचे निरीक्षण आणि नोंदी चालू झाल्या.
जवळपास अर्ध्या तासातच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. रीतसर पंचनामा झाला आणि मुलाचे प्रेत पुढील तपासासाठी ताब्यात घेण्यात आले. या घटनेनंतर संपूर्ण गावावर शोककळा पसरली.
“प्रतापराव… आपले काम वाढले परत…” वडनेरे साहेब म्हणाले.
“हं… आता पासूनच कामाला सुरुवात करावी लागेल.” मी म्हटले.
“बरोबर… पण करणार कसं? बिबट्या रात्री परत इथे येईल हे नक्की. आपल्या हातात वेळ खूपच कमी आहे.” त्यांनी विचारले.
“आता आपल्याकडे दोन पर्याय आहेत. एकतर घोले घालायचे किंवा टवं तयार करायचा.” मी सांगितले.
“घोले घालणे तितके सुरक्षित वाटत नाही मला… किमान यावेळी तरी. कारण बिबट्याला जरा जरी वास आला तरी तो इकडे फिरकणार नाही. त्यापेक्षा टवं मला जास्त सुरक्षित तसेच योग्य पर्याय वाटतोय…” वडनेरे साहेब म्हणाले. त्यांचे म्हणने काही खोटे नव्हते. रात्रीच्या वेळी बिबट्या जास्त घातक बनणार होता. त्यामुळेच मग दुसरा पर्याय निवडला आणि वनविभागाचे कर्मचारी कामाला लागले. ज्या ठिकाणी बिबट्याने शिकार लपवली होती त्यापासून १५/१६ फुटांवर वाऱ्याची दिशा लक्षात घेऊन दोन जण व्यवस्थित बसू शकतील इतपत मोठा खड्डा बनवला गेला. त्याच्या बाजूने दोन फुटाचे दगड, मातीचा बांध अशा पद्धतीने घातला ज्यातून आमच्या शस्त्रांची नळी बाहेर काढता येऊ शकेल.
हे सगळे होईस्तोवर बरीच संध्याकाळ झाली होती. आम्ही घाईने कार्यालयात आलो. दोन घास पोटात ढकलले. आमची शस्त्रे व्यवस्थित सज्ज केली. आणि सहा जणांना बरोबर घेऊन टव बनवलेल्या ठिकाणी आलो.
सगळीकडे सामसूम झाली होती. चंद्रप्रकाशही अगदी बेताचाच होता. एकतर थंडीचे दिवस, त्यातुनच काही अंतरावर वाहणारी दारणा नदी आणि आजूबाजूला असलेली शेते यामुळे थंडीचा कडाका चांगलाच जाणवत होता. तसे आम्ही थंडीपासून रक्षण करणारे कपडे बरोबर घेतले होते पण त्याचा कितपत उपयोग होईल हे सांगता येणार नव्हते. त्यातल्या त्यात एकच चांगली गोष्ट होती. या थंडीमुळे किमान डोळ्यावर झापड तरी येणार नव्हती.
सगळी तयारी व्यवस्थित आहे याची पुन्हा एकदा खात्री करून मी आणि वडनेरे साहेब टवमध्ये उतरलो आणि बाकी कर्मचारी त्यांच्या कामाला लागले. त्यांनी पटापट बाजूने झाडाच्या फांद्या टाकून खड्ड्याचे तोंड अगदी कमी उघडे राहील याची काळजी घेत बंद केले. त्याची सुरक्षितता वाढावी म्हणून टवच्या तोंडावर जीपचे टायर टाकून त्याच्या भोवती काटेरी झाडांच्या फांद्या पसरल्या. सगळे व्यवस्थित आहे याची खात्री केली आणि त्यानंतर सर्वजण ज्या ठिकाणी बिबट्याने शिकार लपवली होती त्या ठिकाणी गेले. तिथे एक मेलेले कुत्रे टाकून त्यावर झाडाच्या छोट्या फांद्या, पालापाचोळा टाकून ते पहिल्यासारखे दिसेल असे बुजवले आणि सगळे माघारी फिरले. आता त्या खड्ड्यात मी आणि वडनेरे साहेब असे दोघेच उरलो होतो.
हळूहळू रात्र वाढत होती तशी थंडीही वाढत होती. एकाच पद्धतीने बसून हळूहळू आमच्या पायाला मुंग्या येऊ लागल्या होत्या. थोडीफार बैठक बदलण्याशिवाय इतर कोणतीही गोष्ट आम्हाला करता येण्यासारखी नव्हती. आम्ही दोघे एकमेकांशी एक शब्दही बोलत नव्हतो. आमचे लक्ष फक्त आणि फक्त ज्या ठिकाणी बिबट्याने शिकार लपवली होती त्या जागेवर होते.
रात्रीचा तिसरा प्रहर चालू झाला. रातकिड्यांच्या आवाजाशिवाय इतर कोणताही आवाज तिथे येत नव्हता. आणि तेवढ्यात आमचे कान टवकारले. एकदम हळूहळू पावले टाकत कोणतेतरी जनावर त्या बाजूला सरकत होते. वाळलेल्या पानांवर जो काही त्याच्या पायांचा भार पडत होता त्यावरून ते जनावर खूप मोठे नसणार याचा आम्हाला अंदाज आला. आता आमची नजर अजूनच तीक्ष्ण बनली. हळूच झाडामागून दोन डोळे चमकले. ते दोन डोळे चहुबाजूचा अंदाज घेत होते. ज्याची आम्ही आतुरतेने वाट बघत होतो तो नरभक्षक बिबट्या आमच्यापासून अगदी काही अंतरावर पाहणी करत होता.
क्रमशःशिकार भाग ९.
मिलिंद जोशी, नाशिक…