शिवचरित्र जे चारशे वर्षानंतरही एखाद्याचा जीव वाचवू शकते!
खचलेल्या माणसाला धीर देणे हे सत्कर्म आहे आणि आज अशा खचलेल्या माणसांचा ढीग लागलेला आहे . धीराची गरज सर्वांनाच असते पण धीर देण्याचे सर्वांनाच जमते असे नाही. आपले शब्द/message एखाद्यावर शस्त्रासारखे वार करू शकतात तसे ते अमृतासारखे एखाद्याला जीवदानही देऊ शकतात .
शब्दाचा आधार थेट हृदयाला भिडतो याची जाणीव बोलणाऱ्याला असायला हवी . दवाखान्यात रूग्णाला भेटायला गेलेली माणसे त्याच्यासमोरच रडायला लागली की तो वाचण्याची आशा सोडून देतो. कधी कधी बोलण्याच्या ओघात माणूस आजाराची भयानकता वर्णन करत बसतो , त्यामुळे रूग्णाच्या चिंतेत भरच पडते, खरे तर रूग्णाला भेटायला गेलेल्या माणसाने त्याचा आजार सोडून बोलायला हवे त्यामुळे तो काही काळासाठी तरी त्यातून मानसिक दृष्ट्या बाहेर पडतो . धीराचे शब्द कठीण प्रसंगात आणि खचलेल्या मानसिकतेत हजार हत्तीचे बळ निर्माण करतात. सर्व ठिकाणी आपण अर्थिक आणि शारिरीक मदत करू शकत नाही पण आपले शब्द/message आपण सर्व ठिकाणी आज कोणत्याही माध्यमातून पोहचवू शकतो .
साधारण चार वर्षापूर्वी मला एक मेसेज आला, “आई मी तुला सोडून चाललो आहे , मला माफ कर !”
मी दचकलो , नंबर अनोळखी होता. मी लगेच त्या नंबरवर फोन लावला, त्या व्यक्तीने फोन चारवेळा कट केला.
मी परत फोन लावला त्यावेळी तिकडून आवाज आला, “सर सॉरी माझ्याकडून आईला मेसेज पाठविण्याऐवजी तुम्हाला सेंड झाला, आई आणि आसबे हे नंबर एकापाठोपाठ सेव्ह आहेत म्हणून , सॉरी !”
आवाज तरूण मुलाचा होता आणि तो खूप गोंधळलेला वाटला . मी त्याला विचारले “अरे माझा नंबर तुझ्याकडे कसा ?” तो म्हणाला “सर तुमचे लेक्चर आमच्या कॉलेजवर झाले होते त्यावेळी तो घेतला होता” .
तो थोडा रिल्याक्स झाल्यासारखा वाटला मग मी जवळपास पाउणतास त्याच्याशी बोललो , त्यावेळी मला खूप धक्कादायक वास्तव कळाले. तो आईवडीलांचा एकुलता एक मुलगा होता , पुण्यात एका इंजिनियरींग कॉलेजमध्ये शिकत होता, नैराश्यग्रस्त होऊन त्याने खोलीमधल्या पंख्याला गळफास अडकवला होता आणि शेवटचा मेसेज आईला पाठविला होता तो चुकून मला आला होता .
त्या पाऊणतासात मी त्याला शिवरायांच्या जीवनातील कठीण प्रसंग सांगितले आणि त्यानी त्यावर मात कशी केली?
अग्र्याच्या कैदेत जर शिवरायांनी आत्महत्या केली असती तर मॉंसाहेबांचे काय झाले असते ? या कल्पनेने तो भानावर आला आणि भावनाविवष होऊन खूप रडला. मी त्याला धीर दिला आणि पहिला फोन त्याला आईला करायला सांगितला. संध्याकाळी त्याच्या आईचा फोन आला, आयुष्यभर त्याच्या आईचे शब्द विसरू शकत नाही.
धन्य आहे शिवचरित्र जे चारशे वर्षानंतरही एखाद्याचा जीव वाचवू शकते. फक्त ते आपल्याला पाठ असून चालत नाही तर योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी वापरता आले पाहिजे .
डॉ . आसबे ल.म.