शृंगारपेटी

शृंगारपेटी

शृंगारपेटी –

झरझर काळ पुढे सरकतोय तशा अनेक वस्तूृ त्यांच्या आठवणींसह काळाच्या पडदयाआड लुप्त होतांना दिसताय . काही वस्तू तर कायमच्या नष्ट झाल्यात . ज्या अस्तित्वात आहेत त्या शेवटची घटका मोजत आहेत . वस्तू नष्ट होण्याचं दुःख नक्कीच आहे पण त्या वस्तूंसोबत असलेल्या आठवणी मात्र कायमच्या गुडूप होतील की काय याचीच भिती अधिक आहे . त्या वस्तू सोबत आपल्या घरातील अनेक सुखद व दुःखद प्रसंग जोडले गेलेले असतात . अशीच एक वस्तू जुन्या अडगळीतून बाहेर आली – शृंगारपेटी !

होय ! त्या काळातील तो ड्रेसिंग टेबलच ! त्याला तीन कप्पे असले तरी खरं म्हणजे आठवणीचे अनेक कप्पे त्याला जोडले गेले आहेत .आजी आजोबांचे लग्न साधारणत: 192Oमध्ये झाले असावे . आज किमान शंभर ते सव्वाशे वर्षांपूर्वीची ती पेटी असावी . ती पेटी डोळ्यात भरते ती तिच्या आतल्या खुबीने . तिला आतून तीन ताल आहेत . खालचा बराच मोठा आहे . त्या मानाने मधला छोटा आहे व वरचा अर्धाच आहे .

त्या पेटीबाबत आईला विचारले तर आजीच्या नित्य वापरातील ती पेटी असल्याचे तिनेसांगितले .वरच्या झाकणाला दोन बिजागरे लावून त्याचे दोन स्वतंत्र भाग दिसतात . त्याच्या कडीकडील भागात आरसा बसवलेला होता .पेटीच्या वरच्या तालात कुंकवाची, हळदीची व मेणाची डबी ठेवलेली असायची.

अंघोळ झाली की आजी दारासमोरच्या खांबाला टेकून बसायची. पुढयात शृंगारपेटी असायची. त्यावरील झाकण उघडले जायचे. प्रथम मेणाची डबी उघडली जायची. मेण तयार करण्याची पद्धत मोठी मजेशीर होती .मधमाशीच्या पोळ्यातील मेण कुणीतरी आणून द्यायचे. काळ्या रंगाचे मेण तापवले की त्यात चमचाभर हळद टाकली जायची. नंतर मोठ्या ताटात थंडगार पाण्यात वितळलेले मेण कापडाने गाळले जायचे. थंड झाल्यावर अलगदपणे मेण काढून डबीत भरले जायचे. त्याचा रंग एकदम पिवळाधम्म असायचा. हे मेण मग पुर्ण गल्लीभर पुरायचे.

मेणाच्या डबीतील बोट  गोल गोल कपाळावर फिरवले जायचे मग उजव्या हाताच्या अनामिकेने त्यावर कुंकू छापायची. कुंकू देखील घरीच बनवले जायचे. हळद पुडमध्ये लिंबाचा रस टाकून वाळवले की कुंकू तयार व्हायचे असे आई सांगायची. ( मी मात्र आमच्याकडे बाजारातील रेडिमेड कुंकूच पाहिला आहे.) रुपयाच्या आकाराचे कुंकू छापून झाले की लुगडयाच्या पदराचे टोक हातात घ्यायची व तर्जनीने कडा पुसत त्याला गोलाकार आकार दयायची.कपाळावरील तिचा कुंकू थोडासा लंबाकार असायचा. त्यामुळे तिची उंच ललाटपाटी अजून भव्य वाटायची.

शृंगारपेटीच्या आतले दोन कप्पे रिकामेच असायचे. त्याबाबत आजीला विचारले तर ती मौन असायची नंतर आईने सांगितले की त्यात तिचे सोन्याचे दागिने असायचे. मोहन माळ, ठुशी, बिरद्या, तीन पदरी हार असे मोजकेच दागिने पण शेत शिवाराच्या अडचणी मुळे एकेक दागिना नाशिराबादच्या सावकाराकडे गहाण पडत गेला. गेला तो कायमचाच! शेतीचा कुणबावा सांभाळता सांभाळता आजोबांना कसरत करावी लागे. दागिने गेल्याच दुःख त्यांनाही असेलच, पण आजीने कधी चकार शब्दाने तक्रार केली नाही. संसाराचा गाडा ओढतांना तीने सदैव हातभारच लावला. तिच्या हातातील खुरपं व डोक्यावरील पाटी कधी सुटली नाही.

कुणब्याच्या व्यथा सांगता पण येत नाही व दाखवता पण येत नाही.शृंगारपेटी उघडतांना त्या गतवैभवाची आठवण तिला नक्कीच येत असेल, पण तिने तसे कधी दाखवले नाही.आईने पाहिले तेव्हा त्यात काचेचे मणी, काळ्या पोतचे सर, सुईदोरा, बटणे असे काहीबाही भरलेले असायचे.आजीला शृंगारपेटी बघतांना कधीतरी आठवण यायची त्या दागिन्यांची ! आईला सांगतांना ती त्यात रमून जायची.त्यांचे वजन, त्यावरील कलाकुसर, कुणाच्या लग्नात ते घातले त्याची आठवण…. हे सांगतांना शृंगारपेटीचा एकेक कप्पा कुरवाळत असायची.तिच्या चेहऱ्यावर दुःखाचा लवलेशही नसायचा तर एक तृप्त समाधान दिसायचे. ती शृंगारपेटी जणू तिच्या त्या सुखद क्षणांची साक्षीदारच होती.

आजीचीच शिकवण आमच्या आईने उचलली.माझ्या वडिलांना शेत घ्यायचे होते पण पैशांची गरज होती तेव्हा आईने तिच्या लग्नात आलेले सगळे स्त्रीधन वडिलांच्या हवाली केले.आजी भरल्या डोळ्यांनी पाहत होती. दागिने गेले तरी चालतील पण सावकाराचे कर्ज नको ही आजीची शिकवण आईने घेतली. हाती खुरपे घेत आजीसोबत तिने शेताचा रस्ता धरला.

आजीला नंतर श्वसनाचा त्रास सुरू ती घरीच राहायची.घरातील छोटीमोठी कामे आम्हा भावंडांकडून करून  घ्यायची. आजाराने ती गेली पण जातांना सौभाग्याचे अहेव लेणे कपाळावरील भले मोठे कुंकू सोबतच घेऊन गेली.आजी गेली अन कसा कुणास ठाऊक शृंगारपेटीचा काचही फुटला.कालांतराने ती अडगळीत पडली.शिक्षण घेण्यासाठी आम्हीही घराबाहेर पडलो.वारंवार धूळ बसल्याने त्यावरील रंगकामही नष्ट झाले.

खुप वर्षांनंतर ती अचानक हाती लागली. त्यावरील धूळ झटकली, जळमटे काढली.अन आईसमोर घेऊन गेलो.ती हर्षभरीत अंतःकरणाने पाहू लागली.त्या पेटीचे कितीतरी पदर ती उकलून दाखवू लागली. सासू सुनांच्या नात्यातला तो रेशमी धागा अचानक हाती लागला.त्या धाग्याची ती घट्ट वीण काळाच्या पडद्यावर जरतारी नक्षी उमटवत गेली.आमच्या मायलेकरांच्या समोर असलेली ती शृंगारपेटी  केवळ निमित्त ठरली.निपचित पडलेल्या त्या पेटीने आठवणींची कितीतरी दालने खुली केली.सासू सुनांच्या नात्यातील तरलता अलगद उडणाऱ्या फुलपाखराप्रमाणे माझ्या भोवती भिरभिरू लागली.

आता रक्ताची नातीच अडगळ ठरू लागली त्यात असल्या निर्जीव वस्तूंना थारा कुठून असणार?  आज आम्हाला सुखाचे दिवस आहेत पण त्याला आमचे आजी आजोबा , आई वडील यांच्या त्यागाची किनार आहेच! आज आजी हयात नसली तरी तिच्या कष्टाची मूक साक्षीदार असलेली तिची शृंगारपेटी वारसा रूपाने जपून ठेवायलाच हवी!

संजीव बावसकर, नगरदेवळे, जळगाव

Leave a comment