पाप | Sin

पोखरबेळ, पोखर | पोखर लेणी | मोठेपणा

पाप | Sin –

माणसाच्या जीवनात केलेले पाप, झालेले पाप आणि असलेले पाप, त्याला स्वास्थ्य लाभू देत नाही. माणूस आपल्या जीवनात सर्वकाही विसरू शकतो, पण आपण केलेले पाप तो कधीच विसरू शकत नाही. ज्या ज्या वेळी त्याला स्वतः केलेले किंवा स्वतःच्या हातून झालेले किंवा आपल्या जीवनात असलेले पाप आठवते, त्या त्या वेळी त्याला ते आतून भाल्यासारखे टोचत असते.

काळजी आणि चिंता या दोन गोष्टी सोडल्या तर सर्वात जास्त माणूस अस्वस्थ आपण केलेल्या पापामुळे होत असतो. जवानीच्या मस्तीत, तारुण्याच्या धुंदीत बरेचदा आपण करतोय ते पाप आहे की पुण्य आहे⁉️ याचा निर्णय होत नाही. पापाची व्याख्या जो तो आपल्या परीने ठरवत असतो, त्यामुळे आपण करतोय ते पाप आहे, हे अनेकांना मान्यच नसते.

पुण्य पर उपकार l पाप ते परपीडा ll
आणिक नाही जोडा l दुजा यासी ll

ही साधी, सोपी, सरळ व्याख्या तुकोबारायांनी केली. आणखी एका वेगळ्या भाषेत ते बोलतात,

पाप त्याचे नाव न विचारता नीत l
भलतेच उन्मत्त करी सदा ll
धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार l
निवडिले सार असार ते ll

हे आपल्याला कळून यायला अध्यात्मिक पातळीवरचा विचार अंगीकारावा लागतो. सर्वांना हे शक्य होत नाही म्हणून आपली जी कृती आपल्याला आतून टोचत राहते, ते पाप असते किंवा जी कृती करताना आपले मन घाबरते ते पाप असते .

आपला अंतरात्मा शुद्ध, पवित्र, नित्य आनंदमय असा आहे. त्यामुळे पाप करण्याच्या कृतीला तो कधीच साथ देत नाही. त्यामुळे पापी असणारी कृती करताना आपले मन घाबरते. आपल्या जीवनात असणारे वैभव, प्रगती, संपत्ती, संतती या गोष्टी जीवनात काळजी आणि चिंता निर्माण करतात.

जीवनात विरक्ती आणि वैराग्य आले, की ही काळजी आणि चिंता संपविता येते, परंतु केलेले पाप, विरक्ती वैराग्यानेसुद्धा आपली पाठ सोडत नाही, शेवटच्या क्षणापर्यंत ते आपल्याला त्रास देत राहते. आपल्याला जेवढे आपण केलेले, झालेले आणि असलेले पाप आठवते, तेवढे सगळे पाप आपण मृत्यूपूर्वी भोगूनच संपवायला हवे.

पाप संपल्याशिवाय आपल्याला विसावा किंवा विश्रांती मिळत नाही. शरीराला जडलेली असाध्य व्याधी जसे शरीर पोखरत राहते, तसे आपले पाप आपल्या मनाच्या शांतीला पोखरत राहते. आपल्या हातून पाप घडले आहे, हे लक्षात येताच आपल्याला पश्चाताप होतो, परंतु त्याने पाप जात नाही. त्यासाठी प्रायःश्चित्त घ्यावे लागते.

प्रायःश्चित्त घेण्यासाठी खूप धाडस असावे लागते कारण प्रत्येक व्यक्ती आपण केलेले पाप सर्वतोपरी झाकण्याचा प्रयत्न करत असते, प्रायःश्चित्त घेण्यासाठी पाप उघड करावे लागते, हे धाडस सर्वांच्यात नसते. अंतःकाळी सर्वात जास्त वेदना या आपण केलेल्या पापांच्या असतात. ही पापे जिवंत असताना सुखाने जगू देत नाहीत आणि मरताना भगवंताची आठवण आणि स्मरण करू देत नाहीत, त्यामुळे सुखाने मरु देत नाहीत.

डॉ. आसबे ल.म.

Leave a comment