श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग १३

श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग १३

श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग १३ –

श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग १३ | अध्याय दुसरा | सांख्ययोग –

अध्याय २ – सांख्ययोग – श्लोक क्र.२.१ ते २.४

श्री परमात्मने नमः

॥ अथ द्वितीयोडध्यायः ॥

गीतेतील पहिला अध्याय म्हणजे गीतेचे जणू प्रवेशद्वार आहे. जिथे प्रारंभी साधकाला ज्या शंका-कुशंका निर्माण होतात, त्याची जी गोंधळलेली स्थिती निर्माण होते त्या बैचेन करणाऱ्या अनुभवांचे येथे चित्रण आहे. रणभूमीवर सर्व कौरव-पांडव लढणारे होते. परंतु फक्त अर्जुनाच्या मनातच विर्तक उभा राहिला. कारण अर्जुन म्हणजे दयाशीलतेचे प्रतीक आहे. आवडत्या गोष्टींची आसक्ती किंवा प्रेमच क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांच्यातील संघर्षाला प्रेरीत करीत असते. अनुराग किंवा दयाशीलता ही त्याची पहिली पायरी असते.

पूज्य महाराजजी म्हणत – ‘ आश्रमात राहणार्‍या सदगृहस्थाला जेव्हा ग्लानी यायला सुरुवात होते जेव्हा अश्रुपात होतो, जेव्हा त्याचा कंठ दाटून येतो तेव्हा समजावे की आता ईश्वराच्या भजन-पूजनाला खरी सुरुवात झाली आहे. तेव्हा तात्पर्य असे की दयाशीलतेमध्येच सर्व काही समाविष्ट असते. त्यातच धर्म, नियम, सत्संग व भाव सर्व काही विद्यमान असते.

दयाशीलतेच्या पहिल्या टप्प्यात कोटुंबिक प्रेम हे अडसररूप ठरत असते. सुरूवातीला सर्वांना असे वाटत असते की, आपण परम श्रेष्ठ सत्याची प्राप्ती करून घ्यावी. परंतु हे परिपूर्ण सत्य प्राप्त करण्यासाठी कौटुंबिक संबंधाचा- प्रेमाचा त्याग करावा लागेल हे जेव्हा मनुष्याला समजते तेव्हा तो हताश होतो. व मग तो आधीपासून काही धर्म-कर्म म्हणून करत होता त्यात संतोष मानतो. आणि मग आपल्या विचाराच्या पुष्टीसाठी तो प्रचलित रूढींचा पुरावा सादर करतो – जसे अर्जुनाने म्हटले की ‘ कुलधर्म सनातन ‘ आहे.

युद्धामुळे या सनातन धर्माचा लोप होईल, कुलक्षय होईल, स्वैराचार वाढेल. अर्थात हे अर्जुनाचे खरे विचार होते असे म्हणता येणार नाही. तर सदगुरूच्या सान्निध्यात येण्यापूर्वी अवलंबिलेली ती एक कुरीत होती. तो एक खोटा आचार होता.

अशा या गैर आचाराच्या जाळ्यात फसल्यामुळेच मनुष्य नानाविध धर्म, अनेक संप्रदाय, लहान मोठे गट व असंख्य जाती निर्माण करीत असतो. कोणी नाक दाबत असते, कोणी कान कापत असते, कोणाला स्पर्श केल्याने कोणाचा धर्म नष्ट होत असतो; तर कोणाचे अन्न भक्षण केल्याने कोणाचा धर्म नष्ट होत असतो. यामध्ये दोष कोणाचा? कोणत्या जातीत जन्म घेतलेल्या लोकांचा? त्यांच्यामुळे जातिधर्म बुडतो का? नाही, हे धादांत खोटे आहे. दोष भ्रम निमार्ण करणाऱ्यांचा आहे. धर्माच्या नावाखाली आम्ही गैर चालींचे, गैर रूढींचे शिकार बनत असतो. त्यामुळे दोष आमचा आहे.

महात्मा बुद्धाच्या वेळी ‘ केश-कम्बल’ नावाचा एक संप्रदाय होता. या संप्रदायात केस वाढवून त्यांचा घोंगडीसारखा उपयोग करणे म्हणजे पूर्णत्व प्राप्त होते असे समजले जात असे. तेव्हा कोणी गोव्रतिक ( गाईप्रमाणे राहणारा ) असत; कोणी कुक्कुरतव्रतिक ( कुत्र्याप्रमाणे स्वत:चे खाणे, पिणे व फिरणे ठेवणारा ) असे. ते आपल्या या व्रताला-वर्तनाला धर्म मानत, पण ब्रह्मविद्येशी अशा या रूढींचा काही संबंध नसतो. संप्रदाय व अशा खोट्या रूढी पूर्वीही होत्या व आजही आहेत. कृष्णाच्या काळात अशाच प्रकारचे संप्रदाय होते, बाईट रूढी होत्या. त्यातल्या एका गैर रूढीचा अर्जुन शिकार बनला होता व म्हणून तो म्हणाला की युद्धामुळे १ ) सनातन धर्म नष्ट होईल, २) त्यामुळे वर्णसंकर निर्माण होईल, ३ ) पिंडोदकादी क्रिया लुप्त होतील व ४ ) आमच्या हातून कुलक्षय झाला तर ते एक महा पाप ठरेल; आणि तेच पाप करावयास आज आम्ही उद्युक्त झालो आहोत. या अध्यायात श्रीकृष्णांनी अर्जुनाच्या या भ्रांतिमूलक विचारांना उत्तर दिले आहे.

मूळ दुसऱ्या अध्यायाचा प्रारंभ

मूळ श्लोक –

सञ्जय उवाच
तं तथा कृपयाविष्टमश्रुपूर्णाकुलेक्षणम्‌ ।
विषीदन्तमिदं वाक्यमुवाच मधुसूदनः ॥ २-१ ॥

संदर्भित अन्वयार्थ –

सञ्जय = संजय, उवाच = म्हणाले, तथा = तशाप्रकारे, कृपया = करुणेने, आविष्टम्‌ = व्याप्त, अश्रुपूर्णाकुलेक्षणम्‌ = ज्याचे डोळे अश्रूंनी युक्त व व्याकूळ झालेले आहेत, (च) = आणि, विषीदन्तम्‌ = शोकयुक्त (अशा), तम्‌ = त्या(अर्जुना)ला, मधुसूदनः = भगवान मधुसूदन, इदम्‌ = हे, वाक्यम्‌ = वचन, उवाच = म्हणाले ॥ २-१ ॥

अर्थ –

करुणेने व्याप्त झालेल्या, अतिशय दुःखी झालेल्या व ज्याचे डोळे अश्रूनी भरून आले आहेत अशा त्या अर्जुनाला पाहून मधुसूदन, म्हणजे उन्मादाचा- मदाचा नाश करणारे भगवान श्रीकृष्ण म्हणाले,॥ २-१ ॥

मूळ श्लोक –

श्रीभगवानुवाच
कुतस्त्वा कश्मलमिदं विषमे समुपस्थितम्‌ ।
अनार्यजुष्टमस्वर्ग्यमकीर्तिकरमर्जुन ॥ २-२ ॥

संदर्भित अन्वयार्थ –

श्रीभगवान = श्रीभगवान श्रीकृष्ण, उवाच = म्हणाले, अर्जुन = हे अर्जुना, विषमे = अयोग्य वेळी, इदम्‌ = हा, कश्मलम्‌ = मोह, कुतः = कोणत्या कारणाने, त्वा समुपस्थितम्‌ = तुला झाला, (यतः) = कारण, अनार्यजुष्टम्‌ = हा श्रेष्ठ पुरुषांकडून आचरलेला नव्हे, अस्वर्ग्यम्‌ = स्वर्ग प्राप्त करून देणारा नव्हे, (च) = आणि, अकीर्तिकरम्‌ = कीर्ति देणारा पण नव्हे ॥ २-२ ॥

अर्थ –

अर्जुना, अरे या विषम अशा स्थळी तुझ्यामध्ये हे अज्ञान कसे निर्माण झाले? येथे विषम स्थळ म्हणजे त्याच्यासारखे दुसरे कोणतेही स्थळ या पृथ्वीतलावर नाही असे. ज्या स्थळावर लौकीक गोष्टीचा विचार केला जात नाही, पारलौकिक हेच ज्याचे लक्ष्य आहे, अशा निर्विवाद ठिकाणी हे अज्ञान तुझ्या ठिकाणी कोठून निर्माण झाले? तुम्ही म्हणाल सनातन धर्माच्या रक्षणासाठी कटिबद्ध असणाऱ्या अर्जुनाच्या ठिकाणी अज्ञान कोठून असणार? सनातन धर्माच्या रक्षणासाठी अत्यंत तत्पर राहणे किंवा प्राणांचीही तमा न बाळगणे हे काय अज्ञानाचे द्योतक आहे? यावर भगवान श्रीकृष्ण उत्तर देतात- हो, ते अज्ञानच आहे. कारण अशा प्रकारचे आचरण आजपर्यंत कोणत्याही महानुभवाने केलेले नाही. या आचरणाने, या कृतीने स्वर्गही मिळणार नाही व कीर्तीही मिळणार नाही. जो सन्मार्ग सोडीत नाही, जो सन्मार्गावर दूढपणे उभा आहे, त्यालाच श्रेष्ठ समजले जाते. आपल्या कुटुंबासाठी सर्वस्वाचा त्याग करणे,

मरायला सिद्ध होणे हे जर अज्ञान नसते; तर अनेक महापुरुष त्याच मार्गाने गेले असते. जर कुलधर्म हे परम सत्य असते तर कल्याणकारी मार्गाकडे व स्वर्गाकडे जाण्याचा तो एक उत्तम मार्ग ठरला असता. पण तो तसा ठरला नाही. या मार्गाच्या आचरणाने कीतीही प्राप्त होत नाही. जेव्हा मीरा भगवंताचे भजन करू लागली तेव्हा ‘ लोग कहे मीरा भई बावरी, सास कहे कुलनाशी रे’ लोकांनी तिची ‘ बावरी ‘ म्हणून निंदा केली. सासूने तिला कुलकलंकिनी म्हटले. परंतु ज्या परिवाराच्या व कुळाच्या मर्यादांसाठी मीराची सासू व्याकूळ झाली होती त्या सासूला आज जग जाणत नाही. तिला विसरून गेले आहे; पण मीराबाईला आज अखिल विश्व जाणत आहे. अशाच प्रकारे येथे अर्जुन आपल्या कुटुंबासाठी व्याकूळ झालेला आहे.

मग ज्या कृत्याने कीती प्राप्त होत नाही, जे कृत्य कल्याणकारक नसते व ज्या कृत्याचे आचरण कोणत्याही महानुभवाने केलेले नाही ते कृत्य अज्ञानमूलकच नव्हे का?॥ २-२ ॥

मूळ श्लोक –

क्लैब्यं मा स्म गमः पार्थ नैतत्त्वय्युपपद्यते ।
क्षुद्रं हृदयदौर्बल्यं त्यक्त्वोत्तिष्ठ परन्तप ॥ २-३ ॥

संदर्भित अन्वयार्थ –

(अतः) = म्हणून, पार्थ = हे पार्था (अर्थात पृथपुत्र अर्जुना), क्लैब्यं = नपुंसकपणा, मा स्म गमः = पत्करू नकोस, एतत्‌ = हे, त्वयि = तुला, न उपपद्यते = योग्य नाही, परन्तप = हे परंतपा (अर्थात शत्रुतापना), क्षुद्रम्‌ हृदयदौर्बल्यम्‌ = हृदयाचा तुच्छ दुर्बळपणा, त्यक्त्वा = सोडून देऊन, उत्तिष्ठ = युद्धाला उभा ठाक ॥ २-३ ॥

अर्थ –

अरे अर्जुना, तू असे नामर्द बनू नकोस. येथे श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहेत की, तू असा नामर्द बनू नकोस. अर्जुन खरोखर नामर्द-पौरुषहीन होता का? वास्तविक जे पौरुषविहीन आहेत त्यांना नपुसंक म्हंटले जाते. त्या दृष्टीने अर्जुन नार्मद किंबा दुबळा नव्हता तो तर महापराक्रमी होता. अर्जुनाची गोष्ट सोडली तरी प्रत्येक जण आपापल्या कुवतीनुसार पुरुषार्थ करीत असतो. शेतकरी रात्रंदिवस शेतात मेहनत करून एक प्रकारे पुरुषार्थच करीत असतो. कोणी चांगला व्यापार करण्यात पुरुषार्थ समजतो. कोणी आपल्या पदाचा दुरुपयोग करण्यात पुरुषार्थ समजतो. अर्थात, आयुष्यभर असा पुरुषार्थ करूनही शेवटी मनुष्याला रिकाम्या हातानेच जावे लागते.

याचाच अर्थ असा की, हा खरा पुरुषार्थ नव्हे. ‘ आत्म-दर्शन’ हा खरा पुरुषार्थ आहे. गार्गीने याज्ञवल्क्याला म्हटले आहे- ॥ २-३ ॥

नपुसंक पुमान्‌ज्ञेयो यो न वेत्ति हृदि स्थितम्‌ ।
पुरुषं स्वप्रकाशं तस्मानन्दात्मानमव्ययम्‌ ।।”

जे हृदयस्थ आत्म्याला ओळखू शकत नाहीत तेच पुरुष नपुसंक असतात, नामर्द असतात, असे समजावे. हा आत्माच पुरुषस्वरूप, स्वयंप्रकाशी, परम आनंदयुक्त आणि अव्यक्त असतो. या आत्म्याला ओळखणे, त्याला प्राप्त करण्याचा प्रयत्न करणे म्हणजेच पुरुषार्थ करणे होय. तेव्हा हे अर्जुना, तू असा नपुसंक-नामर्द बनू नकोस. हे तुला योग्य नाही. हे शत्रुतापना, हृदयाची ही भीरूता, ही दुर्बलता तू सोडून दे आणि कणखरपणे युद्धासाठी उभा रहा. कौटुंबिक आसक्तीचा त्याग कर. ही आसक्तीच हृदयाला दुर्बल बनवणारी आहे. तेव्हा या दुर्बलतेचा तू त्याग कर. यावर अर्जुनाने तिसरा प्रश्न उपस्थित केला –

मूळ श्लोक –

अर्जुन उवाच
कथं भीष्ममहं सङ्ख्ये द्रोणं च मधुसूदन ।
इषुभिः प्रतियोत्स्यामि पूजार्हावरिसूदन ॥ २-४ ॥

संदर्भित अन्वयार्थ –

अर्जुन = अर्जुन, उवाच = म्हणाला, मधुसूदन = हे मधुसूदना, सङ्ख्ये = रणभूमीवर, भीष्मम्‌ = भीष्म, च = व, द्रोणम्‌ = द्रोण यांचेबरोबर, अहम्‌ = मी, इषुभिः = बाणांनी, कथम्‌ = कसा बरे, प्रतियोत्स्यामि = (त्यांच्या) विरुद्ध लढू, (यतः) = कारण, अरिसूदन = हे अरिसूदना, (तौ) = ते दोघेही, पूजार्हौ = पूजनीय (आहेत) ॥ २-४ ॥

अर्थ –

अंहकाराचे दमन करणाऱया हे मधुसूदना, जे आम्हाला अत्यंत पूजनीय आहेत अशा पितामह भीष्मांवर आणि गुरु द्रोणाचार्यावर या युद्धात बाणांनी मी उलट प्रहार कसा करू? हे शत्रुनाशना, मला हे शक्‍य होणार नाही.

द्वोणाचार्य हे द्वैताचे प्रतीक आहेत. आम्ही वेगळे आहोत, परमे श्वर वेगळा आहे. ह्वैताची ही जाणीवच परमेश्वर प्राप्तीच्या प्रेरणेचा प्रारंभिक स्त्रोत आहे; आणि हेच तर द्रोणाचार्याचे गुरुत्व आहे. तर भीष्म हे भ्रमभ्रांतीचे प्रतीक आहे. जोपर्यंत मनावर या भ्रांतीचा कब्जा असतो तोपर्यंत मुले, कुटुंब, नातेवाईक हे सर्व आपले वाटतात. या आपुलकीचे, आसक्तीचे माध्यम आहे भ्रम! व मग हृदयस्थ आत्मा त्यानाच पूज्य समजून त्यांच्या मोहात गुरफटतो व म्हणू लागतो हे माझे आजोबा आहेत, हे कुलगुरु आहेत.

परंतु जेव्हा साधकाची साधना परिपूर्ण होते तेव्हा ‘गुरु न चेला, पुरुष अकेला ‘

न वन्युर्न मित्रं गुरु्नैव शिष्य: ।
चिदानन्दरुप: शिवो5हम्‌ शिवोहम्‌ ।।

जेव्हा चित्त त्या परमानन्दात विलीन होते तेव्हा तेथे ज्ञान देणारा गुरु व ग्रहण करणारा शिष्य असा भेदच राहत नाही. हीच सर्वश्रेष्ठ अवस्था असते. गुरुचे गुरुत्व प्राप्त केल्यानंतर गुरुत्व एकरूपच होऊन जाते. कृष्ण अर्जुनाला म्हणतात – ‘ अर्जुना, तू माझ्यात निवास करशील ‘- म्हणजे जसे श्रीकृष्ण तसाच अर्जुन! अशा प्रकारे परमानन्द प्राप्त करणारा महापुरुष बनतो. अशा अवस्थेत गुरुचाही विलय होऊन जातो. गुरुत्व हृदयात प्रवाहित होऊन जाते. येथे अर्जुन गुरुपदाची ढाल बनवून या संघर्षातून परावृत्त होऊ इच्छित आहे व म्हणून तो म्हणतो –

क्रमशः श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग १३.

लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

Leave a comment