श्रीमद् भगवद् गीता भाग १६
अध्याय २ – सांख्ययोग – श्लोक क्र.२.१३ ते २.१६ | श्रीमद् भगवद् गीता भाग १६.
मूळ श्लोक –
देहिनोऽस्मिन् यथा देहे कौमारं यौवनं जरा ।
तथा देहान्तरप्राप्तिर्धीरस्तत्र न मुह्यति ॥ २-१३ ॥
संदर्भित अन्वयार्थ –
यथा = ज्याप्रमाणे, देहिनः = जीवात्म्याला, अस्मिन् देहे = या देहात, कौमारम् = बालपण, यौवनम् = तारुण्य, (च) = आणि, जरा = वार्धक्य (येते), तथा = त्याप्रमाणे, देहान्तरप्राप्तिः = दुसरे शरीर मिळते, तत्र = त्या बाबतीत, धीरः = धीर माणूस, न मुह्यति = मोहित होत नाही ॥ २-१३ ॥
अर्थ –
ज्याप्रमाणे देहधारी जीवात्म्याला बाल्य, तारुण्य, व वृद्धत्व या अवस्था प्राप्त होत असतात त्याप्रमाणे मृत्युनंतर हा जीवात्मा दुसर्या शरीरात प्रवेश करत असतो. म्हणजे त्याला दुसरा देह प्राप्त होत असतो व म्हणून ज्ञानी लोक कधीही मोह पावत नाहीत किंवा गोंधळून जात नाहीत. या देहात ‘काही काळ बाल्य, काही काळ तारुण्य ब काही काळ वृद्धत्व दिसते. तरीपण तो आत्मा एकच असतो, तो मनुष्यही तोच असतो. त्याप्रमाणे मृत्युनंतर त्या जीवात्म्याला वेगवेगळे देह प्राप्त होत असतात. व जोपर्यंत परिवर्तनापेक्षा श्रेष्ठ अशी वस्तू-गती मिळत नाही तोपर्यंत जीवात्म्याचे हे परिवर्तन सुरुच असते. ॥ २-१३ ॥
मूळ श्लोक –
मात्रास्पर्शास्तु कौन्तेय शीतोष्णसुखदुःखदाः ।
आगमापायिनोऽनित्यास्तांस्तितिक्षस्व भारत ॥ २-१४ ॥
संदर्भित अन्वयार्थ –
कौन्तेय = हे कुंतीपुत्रा, शीतोष्णसुखदुःखदाः = थंडी-उष्णता, व सुख-दुःख देणारे, मात्रास्पर्शाः = इंद्रिये आणि विषयांचे संयोग, तु = तर, आगमापायिनः = उत्पत्ति-विनाश-शील, (च) = आणि, अनित्याः = अनित्य (आहेत), (अतः) = म्हणून, भारत = हे भारता, तान् = त्यांना, तितिक्षस्व = तू सहन कर ॥ २-१४ ॥
अर्थ –
हे कुंतीपुत्रा, शीत-उष्ण व सुख-दुःख देणारे इंद्रिय व विषय ह्यांचे संयोग ह्याना उत्पत्ती व नाश आहे, ते अनित्य आहेत, क्षणभंगुर आहेत. म्हणून हे भरतवंशी अर्जुना, तू त्याचा त्याग कर, तू ते सहन कर. त्यांनी तू मोहित होऊन विकल होऊ नकोस. अर्जुन इंद्रिय व विषय यांच्या संयागातून निर्माण होणार्या सुखाच्या चिंतनाने विव्हळ झाला होता. इतका सद्गुणी व श्रेष्ठ आचरण असणारा अर्जुन इतका गोंधळून गेला होता की कुलधर्म, कुलगुरुंची पूजनीयता किंवा त्यांच्याबद्दल असणारा नितांत आदर या सर्व गोष्टी म्हणजे इंद्रियांची क्षणिक ओढ आहे. या भावना, स्नेह, आदर हे सर्व क्षणिक आहे, नाशवंत आहे. विषयांचा संयोग कधीच नित्य असत नाही व असणारही नाही आणि इंद्रियांची तेवढी क्षमताही नाही, ही गोष्ट त्याला समजत नव्हती म्हणून श्रीकृष्ण म्हणतात, हे अर्जुना, या इंद्रियापासून निर्माण होणाऱ्या जाणिवांचा तू त्याग कर किंवा तू त्या सहन कर. पण अर्जुनाला ते सहन करणे का अशक्य आहे? ती काय हिमालयातील लढाई होती की रेगिस्तानमधील ? की अर्जुनाला तीव्र थंडीत किंबा तीव्र उष्णतेला तोंड द्यावे लागणार होते?
ही तर समशीतोष्ण वातावरण असणाऱ्या कुरूक्षेत्रावरील लढाई होती. अर्थात या सर्व बाह्य गोष्टी आहेत. येथे खरी लढाई होती ह॒दयदेशाशी. तो हा संघर्ष आहे. त्याचे येथे चित्रण आहे. येथे क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांमधील संघर्ष आहे. येथे आसुरीसंपदेचे दमन करुन, सर्वसंग परित्याग करुन ईश्वरात विलीन होऊन जायचे आहे. मनबुद्धीसह भगवतमय झाल्यावर दैवी संपदेचेही तेथे अस्तित्व उरत नाही. कोणते विकारच उरत नाहीत. मग दुष्ट किंवा सुष्ट प्रवृत्ती कोठून आक्रमण करणार ?
योगी अशा पूर्णत्वाला पोहचल्यानंतरच त्याला परम शांती प्राप्त होत असते. ही गीता म्हणजे अंत:प्रवृत्तीच्या लढाईचे चित्रण आहे. तेव्हा या प्रवृत्ती, इंद्रियांच्या जाणिवा यांचा त्याग का करायचा? त्याने काय लाभ होईल? याचे उत्तर श्रीकृष्णांनी पुढे दिले आहे. ॥ २-१४ ॥
मूळ श्लोक –
यं हि न व्यथयन्त्येते पुरुषं पुरुषर्षभ ।
समदुःखसुखं धीरं सोऽमृतत्वाय कल्पते ॥ २-१५ ॥
संदर्भित अन्वयार्थ –
हि = कारण, पुरुषर्षभ = हे पुरुषश्रेष्ठा, समदुःखसुखम् = सुखदुःखाला समान मानणाऱ्या, यम् = ज्या, धीरम् = धीर, पुरुषम् = पुरुषाला, एते = हे (इंद्रियांचे विषयांशी संयोग), न व्यथयन्ति = व्याकुळ करीत नाहीत, सः = तो (पुरुष), अमृतत्वाय = मोक्षाला, कल्पते = योग्य ठरतो ॥ २-१५ ॥
अर्थ –
श्रीकृष्ण म्हणतात – हे पुरुषश्रेष्ठा, जो मनुष्य सुखदुःख समान समजतो व जो त्यांनी विचलित होत नाही म्हणजे जो दोन्ही अवस्थांमध्ये स्थिर असतो तो मोक्षाला योग्य होतो. तो अम्रृततत्त्व प्राप्त करण्यास पात्र असतो. अर्जुनाला असे वाटत होते की, या युद्धाचा परिणाम म्हणजे जिंकलो तर पृथ्वीचे राज्य प्राप्त होईल व मृत्यू आला तर स्वर्ग प्राप्त होईल. श्रीकृष्ण म्हणतात अरे तुला ना स्वर्ग मिळेल ना पृथ्वी! तुला येथे अमृतत्त्वाचा लाभ होईल. पण अमृत म्हणजे काय? ॥ २-१५ ॥
मूळ श्लोक –
नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सतः ।
उभयोरपि दृष्टोऽन्तस्त्वनयोस्तत्त्वदर्शिभिः ॥ २-१६ ॥
संदर्भित अन्वयार्थ –
असतः = असत् वस्तूला, भावः = अस्तित्व, न विद्यते = नसते, तु = आणि, सतः = सत् वस्तूचा, अभावः = अभाव, न विद्यते = असत नाही, (एवम्) = अशाप्रकारे, अनायोः उभोयोः अपि = या दोहोंचेही, अन्तः = तत्त्व, तत्त्वदर्शिभिः = तत्त्वज्ञानी पुरुषांनी, दृष्टः = पाहिलेले आहे ॥ २-१६ ॥
अर्थ –
अर्जुना, जी वस्तू असत् असते तिला अस्तित्व नसते. अरे, अभावाला असित्व नसते कारण ती वस्तू अस्तित्वातच नसते. जी वस्तू असतच नाही, ती थांबबशील कशी? व जी वस्तू सत्-म्हणजे सत्य असते तिला अस्तित्व असते व तिन्ही कालात ती नाहीही होत नाही व तिला कोणी नष्टही करू शकत नाही.
अर्जुन म्हणाला- भगवन्, हे आपण सांगत आहात? तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले- हो मीच तुला सांगत आहे व माझ्याबरोबर ज्यांनी या दोन्हींच्या स्वरूपाचा अभ्यास केला आहे त्यांनीही हाच निर्णय घेतला आहे. म्हणजे तत्त्वदर्शी पुरुषांनी जे तत्त्व सांगितले होते तेच श्रीकृष्णानी येथे पुन्हा सांगितले आहे कारण श्रीकृष्णही एक तत्त्वज्ञानी महापुरुष होते. परमतत्त्व परमात्म्याचे ज्यांना दर्शन झाले आहे व ज्यांनी स्वत:ला त्यामध्ये समर्पित करून जे अत्यंत स्थितप्रज्ञ अवस्थत राहतात त्यांनाच तत्त्वज्ञानी म्हटले जाते. या सत् व असतूचे अधिक स्पष्टीकरण करताना श्रीकृष्ण म्हणतात- ॥ २-१६ ॥
क्रमशः श्रीमद् भगवद् गीता भाग १६.
लेखन/माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.