श्रीमद् भगवद् गीता भाग १७
अध्याय २ – सांख्ययोग – श्लोक क्र.२.१७ ते २.२० | श्रीमद् भगवद् गीता भाग १७.
मूळ श्लोक –
अविनाशि तु तद्विद्धि येन सर्वमिदं ततम् ।
विनाशमव्ययस्यास्य न कश्चित्कर्तुमर्हति ॥ २-१७ ॥
संदर्भित अन्वयार्थ –
येन = ज्याने, इदम् = हे, सर्वम् = संपूर्ण जगत (दृश्य वर्ग), ततम् = व्यापून टाकले आहे, तत् = ते, तु = तर, अविनाशि = अविनाशी, (अस्ति) = आहे, (इति) = असे, विद्धि = तू जाण, अस्य = या, अव्ययस्य = अविनाशीचा, विनाशम् = विनाश, कर्तुम् = करण्यास, कश्चित् = कोणीही, न अर्हति = समर्थ नाही ॥ २-१७ ॥
अर्थ –
ज्याने हे जग व्यापिले आहे व ज्याच्यापासून हे जग विस्तावले आहे ते मूळ आत्मतत्त्व नाशरहित आहे, अविनाशी आहे असे समज व जे’ अव्ययस्य’ म्हणजे अविनाशी आहे त्या अव्यय तत्त्वाचा नाश करण्यास कोणीही समर्थ नाही. परंतु या ‘ अविनाशी ‘ अमृताचे नाव काय आहे? ते आहे कोण?
मूळ श्लोक –
अन्तवन्त इमे देहा नित्यस्योक्ताः शरीरिणः ।
अनाशिनोऽप्रमेयस्य तस्माद्युध्यस्य भारत ॥ २-१८ ॥
संदर्भित अन्वयार्थ –
अस्य = या, अनाशिनः = नाशरहित, अप्रमेयस्य = अप्रमेय, नित्यस्य = नित्यस्वरूप (अशा), शरीरिणः = जीवात्म्यांचे, इमे = हे, देहाः = (सर्व) देह, अन्तवन्तः = नाशवंत आहेत, उक्ताः = (असे) म्हटले गेले आहे, तस्मात् = म्हणून, भारत = हे भरतवंशी अर्जुना, युध्यस्व = तू युद्ध कर ॥ २-१८ ॥
अर्थ –
अविनाशी, अमर्याद आणि नित्य अशा जीवात्म्यांचे फक्त भौतिक शरीर नाशवंत असते आणि म्हणून हे अर्जुना, तू युद्ध कर. अरे आत्मा हेच अपृतत्व आहे. आत्मा अविनाशी आहे व त्याचा तिन्ही काळात नाश होत नाही. आत्मा सत्य आहे. शरीर मात्र नाशवंत आहे, असत् आहे व म्हणून हे शरीर तिन्ही काळात कधीच टिकून राहू शकत नाही.
शरीर नाशवंत आहे, म्हणून तू युद्ध कर’ असा श्रीकृष्णांनी आदेश दिलेला आहे. परंतु अर्जुनाने केवळ कौरवांनाच मारावे असे यातून स्पष्ट होत नाही. पांडवांच्या पक्षातही सर्व शरीरधारीच होते. मग पांडवांची शरीरे अविनाशी होती का? मग शरीर जर नश्वर आहे तर श्रीकृष्ण कोणाचे संरक्षण करणार होते? शरीरधारी अर्जुनाचे? जर शरीर नश्वर आहे, त्याला अस्तित्व नाही, त्याचे संरक्षण केले जात नाही मग अशा शरीराचे रक्षण करायला श्रीकृष्ण तेथे उभे होते? जर असे असेल तर श्रीकृष्णांना अविवेकी म्हंटले पाहिजे; कारण पुढे स्वत: श्रीकृष्णांनीच म्हटले आहे की, जो केवळ शरीरासाठी खातो किंवा शरीरसुखासाठी श्रम करतो ( ३/१३ ) तो अविवेकी व मूर्ख समजावा. अशा पापी पुरुषाचे जगणे व्यर्थ असते. मग अर्जुन कोण होता?
अर्जुन म्हणजे अनुराग, दयाशीलता! अशा दयशील, प्रेमळ भक्तासाठी परमेश्वर त्याचा सारथी बनून त्याच्या बरोबर राहतो. मित्राप्रमाणे त्याला मार्गदर्शन करतो. म्हणजे येथे अर्जुन म्हणजे शरीर नव्हे. शरीर म्हणजे जीवात्म्याचे आवरण आहे, त्याच्या राहण्याचे घर आहे व त्यात राहणारा जो जीवात्मा , तो दयाशील आहे. भौतिक युद्ध केल्याने, मारल्याने किंवा कापल्याने शरीराचा अंत होत नाही हे शरीर संपले किंवा एका शरीराचा त्याग केला तरी आत्म्याला दुसरे शरीर प्राप्त होत असते. या संदर्भात श्रीकृष्णांनी म्हटले आहे की ज्या प्रकारे शरीराला बाल्य, युवा किंवा जरावस्था प्राप्त होत असतील त्या प्रकारे मृत्युनंतर आत्म्याला वेगवेगळे शरीर प्राप्त होत असते. जर शरीर कापून टाकले तर जीवात्मा शरीररूपी नवे वस्त्र बदलत असतो.
हे शरीर संस्कारांचे आश्रित असते आणि संस्कार मनावर अवलंबून असतात. “मन एव मनुष्याणां कारणं बन्यमोक्षयो:। ‘ मनाचे नियमन करणे, ते अचल किंवा स्थिर राहणे किंवा ते अंतिम संस्कारात विलीन होणे ही सर्व एक क्रिया आहे. संस्कारांची मालिका तुटणे म्हणजेच शरीराचा अंत होणे होय. तिला तोडण्यासाठी आराधना करणे आवश्यक असते. तिलाच श्रीकृष्णांनी ‘कर्म’ किंबा निष्काम कर्मयोग म्हंटले आहे. श्रीकृष्णाने प्रत्येक वेळी युद्धासाठी प्रेरेत केले आहे; पण भौतिक युद्ध किंवा हिंसा यांचे समर्थन करणारा एकही श्लोक नाही. कारण हे युद्ध आहे ते सजातीय व विजातीय ( सुष्ट व दुष्ट ) प्रवृत्तींचे आहे व ते अंतरंगात आहे.
मूळ श्लोक –
य एनं वेत्ति हन्तारं यश्चैनं मन्यते हतम् ।
उभौ तौ न विजानीतो नायं हन्ति न हन्यते ॥ २-१९ ॥
संदर्भित अन्वयार्थ –
एनम् = हा, (आत्मानम्) = आत्मा, हन्तारम् = मारणारा (आहे), (इति) = असे, यः = जो (कोणी), वेत्ति = समजतो, च = तसेच, एनम् = हा, हतम् = मेला (असे), यः = जो (कोणी), मन्यते = मानतो, तौ = ते, उभौ = दोघे, न विजानीतः = जाणत नाहीत, (यतः) = कारण, अयम् = हा (आत्मा) (वस्तुतः), न हन्ति = (कोणालाही) मारत नाही, च = तसेच, न हन्यते = मारलाही जात नाही ॥ २-१९ ॥
अर्थ –
ज्यांना असे वाटते की जीवात्मा हा मारणारा आहे किंवा मारला जाणारा आहे त्या दोघांनाही काही समजत नाही. कारण हा आत्मा कोणाला मारीतही नाही व कोणाकडून मारलाही जात नाही.
मूळ श्लोक –
न जायते म्रियते वा कदाचिन्नायं भूत्वा भविता वा न भूयः ।
अजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे ॥ २-२० ॥
संदर्भित अन्वयार्थ –
अयम् = हा (आत्मा), कदाचित् = कोणत्याही काळी, न जायते = जन्मत नाही, वा = तसेच, न म्रियते = मरतही नाही, वा = तसेच (हा), भूत्वा = उत्पन्न होऊन, भूयः = पुन्हा, न भविता = उत्पन्न होणार नाही, (यतः) = कारण, अयम् = हा (आत्मा), अजः = अजन्मा, नित्यः = नित्य, शाश्वतः = सनातन, पुराणः = पुरातन (आहे), शरीरे = शरीर, हन्यमाने = मारले गेलेले असतानाही, (अयम्) = हा (आत्मा), न हन्यते = मारला जात नाही ॥ २-२० ॥
अर्थ –
हा आत्मा कधी जन्मतही नाही किंबा कधी मरतही नाही कारण तो ‘फक्त वस्त्र बदलत असतो. हा जन्मला व पुन्हा नाहीसा झाला असेही कधी होत नाही कारण हा जन्मरहित, नित्य, शाश्वत आणि पुरातन आहे. देहाचा नाश झाला तरी ह्याचा नाश होत नाही. तेव्हा आत्माच सत्य आहे. आत्माच पुरातन आहे, आत्माच शाश्वत आणि सनातन आहे. मग आपण कोण? आपण सनातन धर्माचे अनुयायी आहोत. सनातन कोण आहे तर आत्मा! तेव्हा आपण आत्म्याचे अनुयायी आहोत, आत्मा, परमात्मा आणि ब्रह्म हे एक दुसर्याचे पर्याय आहेत. मग आपण कोण? तर शाश्वत धर्माचे उपासक आहोत. शाश्वत कोण आहे? शाश्वत आत्मा आहे. तेव्हा आपण सर्वजण आत्म्याचे उपासक आहोत. जर आपण चैतन्यमय आत्म्याचा मार्ग जाणत नसाल तर आपल्याजवळ शाश्वत, सनातन नावाची कोणती गोष्टच नाही. त्याची तुम्ही वाट पाहत असाल तर तुम्ही आशावादी आहात, परंतु सनातनधर्मी म्हणता येणार नाही.
सनातन धर्माच्या नावावर चुकीच्या रूढीचे तुम्ही शिकार आहात. जगातील सर्व मानवमात्रात आत्मा एक सारखाच असतो. तेव्हा जगात कोठेही कोणी आत्म्याचा मार्ग जाणत असेल व तो त्या मार्गावर प्रयत्नशील असेल तर ती व्यक्ती सनातनधर्मी आहे असे समजावे. मग ती व्यक्ती स्वत:ला खिश्चन समजो, मुसलमान समजो किंवा यहुदी समजो अथवा कोणीही समजो. ती सनातन धर्माचे पालन करणारी आहे.
क्रमशः श्रीमद् भगवद् गीता भाग १७.
लेखन/माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.