श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग १८

श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग १८

श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग १८ –

अध्याय २ – सांख्ययोग – श्लोक क्र.२.२१ ते २.२४ | श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग १८.

मूळ श्लोक –

वेदाविनाशिनं नित्यं य एनमजमव्ययम्‌ ।
कथं स पुरुषः पार्थ कं घातयति हन्ति कम्‌ ॥ २-२१ ॥

संदर्भित अन्वयार्थ –

पार्थ = हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), एनम्‌ = हा (आत्मा), अविनाशम्‌ = नाशरहित, नित्यम्‌ = नित्य, अजम्‌ = अजन्मा, (च) = आणि, अव्ययम्‌ = अव्यय (आहे असे), यः = जो कोणी, पुरुषः = पुरुष, वेद = जाणतो, सः = तो (पुरुष), कम्‌ = कोणाला, कथम्‌ = कसा बरे, घातयति = ठार करवील, (तथा) = तसेच, कम्‌ = कोणाला, (कथम्‌) = कसा बरे, हन्ति = मारील ॥ २-२१ ॥

अर्थ –

पार्थिव शरीराला रथ बनवून ब्रह्मरूपी लक्ष्यावर अचूक नेम मारणार्‍या पृथापुत्र अर्जुना! ज्याला आत्मा हा अविनाशी नित्य, जन्मरहित व अक्षय आहे हे समजले तो पुरुष कसा मृत्युचे कारण होईल किंवा स्वतः कोणाला कसा मारील? अविनाशीचा नाश असंभव आहे, अजन्म जन्मतच नाही, म्हणून शरीराचा शोक करू नये. याचेच स्पष्टीकरण करताना श्रीकृष्ण म्हणतात-

मूळ श्लोक –

वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोऽपराणि ।
तथा शरीराणि विहाय जीर्णान्यन्यानि संयाति नवानि देही ॥ २-२२ ॥

संदर्भित अन्वयार्थ –

यथा = ज्याप्रमाणे, नरः = माणूस, जीर्णानि = जुनी, वासांसि = वस्त्रे, विहाय = टाकून देऊन, अपराणि = दुसरी, नवानि = नवी (वस्त्रे), गृह्णाति = घेतो, तथा = त्याप्रमाणेच, देही = देहात निवास करणारा जीवात्मा, जीर्णानि = जुनी, शरीराणि = शरीरे, विहाय = टाकून देऊन, अन्यानि = दुसऱ्या, नवानि = नवीन शरीरात, संयाति = जातो ॥ २-२२ ॥

अर्थ –

ज्याप्रमाणे मनुष्य जुनी वस्त्रे टाकून दुसरी नवी वस्त्रे परिधान करतो, त्याचप्रमाणे जीवात्मा जुन्या शरीराचा त्याग करून नवे भौतिक शरीर धारण करतो. जर जीवात्मा जीर्ण शरीराचा त्याग करत असतो तर मग काही लहान मुले का बरे मरतात? त्यांचे शरीररूपी वस्त्र तर नवे असते. त्यामुळे त्याचा उलट विकास व्हायला हवा. मग असे का घडते? याचे कारण म्हणजे मनुष्याचे शरीर संस्कारांवर आधारित असते. जेव्हा संस्कार जीर्ण होतात तेव्हा आत्मा शरीराचा त्याग करतो. जर संस्कार दोन दिवसांचा असेल तर ते शरीर दुसर्‍या दिवशीच जीर्ण बनते. त्यानंतर मनुष्य एक श्वासही अधिक घेवू शकत नाही. तेव्हा संस्कार हेच शरीर आहे व या संस्कारानुसार आत्मा नवीन शरीर धारण करीत असतो. ‘

अथ खलु क्रतुमय: पुरुष:। यथा इहैव, तथैव प्रेत्य भवति । कृतं लोकं पुरुषो भिजायते। ‘ ( छान्दोग्योपनिषद, ३/१४) अर्थात हा आत्मा निश्चय करणारा-संकल्प करणारा असतो.

मृत्यूलोकात तो जसा संकल्पमयी असतो, तसाच शरीराचा त्याग केल्यावरही असतो. त्यामुळे त्याने ठरविलेल्या, निश्चित केलेल्या शरीरात तो निर्माण होतो. संकल्प, जीवित कार्य संपताच निघून जातो. या प्रकारे मृत्यू म्हणजे शरीराचे परिवर्तन आहे. आत्मा कधीही मरत नाही. आत्म्याच्या अमरतेवर भर देताना श्रीकृष्ण पुढे म्हणतात.

मूळ श्लोक –

नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः ।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः ॥ २-२३ ॥

संदर्भित अन्वयार्थ –

एनम्‌ = या(आत्म्या)ला, शस्त्राणि = शस्त्रे, न छिन्दन्ति = कापू शकत नाहीत, एनम्‌ = या(आत्म्या)ला, पावकः = अग्नी, न दहति = जाळू शकत नाही, एनम्‌ = या(आत्म्या)ला, आपः = पाणी, न क्लेदयन्ति = भिजवू शकत नाही, च = तसेच, (एनम्‌) = या आत्म्याला, मारुतः = वारा, न शोषयति = वाळवू शकत नाही ॥ २-२३ ॥

अर्थ –

अर्जुना, या आत्म्याला शस्त्रे तोडू शकत नाहीत. अग्नी जाळू शकत नाही. तसेच पाणी भिजवू शकत नाही अगर वायू सुकवू शकत नाही.

मूळ श्लोक –

अच्छेद्योऽयमदाह्योऽयमक्लेद्योऽशोष्य एव च ।
नित्यः सर्वगतः स्थाणुरचलोऽयं सनातनः ॥ २-२४ ॥

संदर्भित अन्वयार्थ –

(यतः) = कारण, अयम्‌ = हा आत्मा, अच्छेद्यः = अच्छेद्य (आहे), अयम्‌ = हा आत्मा, अदाह्यः = अदाह्य, अक्लेद्यः = अक्लेद्य, च = आणि, एव = निःसंदेहपणे, अशोष्यः = अशोष्य (आहे), अयम्‌ = हा आत्मा, नित्यः = नित्य, सर्वगतः = सर्वव्यापी, अचलः = अचल, स्थाणुः = स्थिर राहाणारा, (च) = आणि, सनातनः = सनातन, (अस्ति) = आहे ॥ २-२४ ॥

अर्थ –

अरे, हा आत्मा अच्छेद आहे- त्याला कधी छेदता येत नाही, तोडता येत नाही, तो अदाह्य आहे. त्याला कधी कोणी जाळू शकत नाही, कारण तो जाळला जाणार नाही. तो अक्लेद्य आहे- तो न भिजणारा आहे. आकाश त्याला स्वत:मध्ये विलीन करु शकत नाही, एकरुप करु शकत नाही. हा आत्मा नि:संदेह अशोष्य, सर्वव्यापक, अचल, स्थिर आणि सनातन आहे.

अर्जुनाने म्हंटले होते की, कुलधर्म हाच सनातन धर्म आहे व असे युद्ध करण्याने हा सनातन धर्म नष्ट होईल. परंतु श्रीकृष्णाने अर्जुनाचे हे मत अज्ञानयुक्त आहे असे सांगून आत्मा हाच सनातन आहे असे सांगितले. आपण कोण आहोत? सनातन धर्माचे अनुयायी !सनातन कोण आहे? तर आत्मा !जर आपल्याला आत्म्यापर्यंतचे अंतर पार करण्याची विशिष्ट पद्धत अवगत नसेल तर आपण सनातन धर्मच जाणत नाही. याचा दुष्परिणाम भारताला भोगायला लागला आहे. मध्यकालीन भारतात बाहेरुन आलेले मुसलमान फक्त बारा हजार होते; पण आज त्यांची संख्या अठ्ठावीस करोड आहे. बारा हजारावरुन वाढून लाख होतील, जास्तीतजास्त करोड होतील आणखी किती वाढतील? पण आज अठ्ठावीस करोडपेक्षाही त्यांची संख्या जास्त वाढत आहे. हे कसे? ते सर्व आपले जातिबांधव आहेत. शिवाशीव आणि बाटण्याने ते नष्ट झाले आहेत. अर्थात ते नष्ट झाले नाहीत; तर त्यांचा सनातन, अपरिवर्तनशील धर्म नष्ट झाला आहे. भौतिक क्षेत्रात निर्माण होणारी कोणतीही वस्तू या सनातनाला स्पर्श करु शकत नाही, मग शिवाशीव किंवा बाटण्याने सनातन धर्म कसा नष्ट होईल? हा खरोखर धर्म नव्हे. ही एक वाईट-निंद्य रुढी होती- परिस्थिती होती. त्यामुळे भारतात साम्प्रदायिक वैमनस्य वाढले, देशाचे विभाजन झाले आणि राष्ट्रीय एकता ही आज मोठी समस्या बनली आहे.

या निंद्य रुढीच्या अनेक कथा इतिहासात विखुरलेल्या आहेत. अशीच एक गोष्ट हमीरपूर जिल्ह्यात घडली. हमीरपूर जिल्ह्यात पन्नास-साठ कुलीन क्षत्रिय कुटुंबे राहत होती. आज ते सर्व मुसलमान आहेत. त्यांच्यावर ना तलवारी चालवल्या गेल्या ना तोफा डागल्या गेल्या.मग काय घडले? एक दिवस मध्यरात्री एक दोन मौलवी त्या गावातील एकमात्र असणाऱ्या बिहिरीजवळ लपून बसले.पहाटे येथे कर्मकाण्डी ब्राह्मण स्नानाला येईल अशी त्यांची अटकळ होती.म्हणून ते तेथेच दबा धरुन बसले. पहाटे त्यांच्या होऱ्याप्रमाणे ब्राह्मण तेथे आल्याबरोबर मौलवीनी पकडले, त्याचे तोंड बंद केले आणि मग त्याच्या देखत त्या मौलवींनी विहिरीतून पाणी काढले, तोंड लावून पाणी प्यायले व तेच उष्टे पाणी परत विहिरीत फेकून दिले. भाकरीचा एक तुकडाही विहिरीत फेकला.विद्वान ब्राह्मण विवश होऊन नुसता बघत राहिला. नंतर ते मौलवी ब्राह्मणाला आपल्याबरोबर घेऊन गेले व आपल्या घरात त्याला डांबून ठेवले.

दुसर्‍या दिवशी त्यांनी ब्राह्मणाला भोजन करण्याची विनंती केली. त्याबरोबर ब्राह्मण खवळून म्हणाला, ” अरे तुम्ही यवन आहात. तुमचे भोजन मी एक कुलीन ब्राह्मण कसे घेणार” मौलवी म्हणाले ‘ महाराज, आपल्यासारख्या विठ्ठान लोकांची आम्हाला अत्यंत आवश्यकता आहे. आम्हांला क्षमा करावी ” नंतर त्यांनी ब्राह्मणाला सोडून दिले.

ब्राह्मण आपल्या गावी परत आला तेव्हा त्याने पाहिले की सर्व लोक नेहमीप्रमाणे विहिरीचे पाणी वापरत आहेत. तेव्हा तो ब्राह्मण तेथेच उपोषणाला बसला तेव्हा लोकांनी उपोषणाचे त्याला कारण विचारले. त्यावर तो त्यांना म्हणाला – अरे काही यवन विहिरीच्या या कट्ट्यावर चढले होते. माझ्या देखत त्यांनी विहिरीचे पाणी काढले, ते उष्टे केले व परत ते विहिरीत टाकले. त्यांनी विहिरीत भाकरीचा एक तुकडाही टाकला. हे ऐकून गावकरी स्तब्ध झाले. त्यांनी विचारले – ” आता काय होईल?” पंडितजी म्हणाले आता काय? तुम्ही भ्रष्ट झालात. तुमचा धर्म नष्ट झाला”.

त्यावेळी लोक सुशिक्षित नव्हते. शुद्रांना व स्त्रियांना शिकण्याचा अधिकार नव्हता. हा त्यांचा अधिकार न जाणो केव्हापासून हिरावून घेतला गेला होता. वैश्य लोक धनोपार्जन हाच आपला धर्म आहे असे समजत होते.

क्षत्रिय लोक स्तुतिपाठकांच्या स्तुतिगीतांत रममाण झाले होते-अन्नदात्याने तलवार परजली, बिजली त्याबरोबर तळपली, डगमगू लागले दिल्लीचे तख्त, अशा प्रशस्ती-गीतात क्षत्रियांचे भान हरपून गेले होते. आणि मान सन्मान तर आपोआप प्राप्त होतच होते. मग शिकण्याची काय आवश्यकता होती? आणि धर्माशी त्यांचे काय देणे घेणे? धर्म फक्त ब्राह्मणांसाठी होता. तेच धर्मसूक्तांचे रचनाकार होते, तेच भाष्यकार होते व तेच धर्मातील खऱय खोटया गोष्टींचे निर्णायक होते. वास्तविक प्राचीन काळी सर्वाना म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र या चारी वर्णातील लोकांना व स्त्रियांनाही वेदपाठाचा अधिकार होता. त्यामुळे प्रत्येक वर्णातील क्रषींनी वैदिक मंत्रांची रचना केलेली आहे, वादविवादात, शास्त्रर्थनिर्णयात भाग घेतला आहे. प्राचीन राजांनीदेखील धर्माच्या नावावर अवडंबर माजवणाऱ्या व्यक्तींना सजा केलेली आहे, तर धर्मपरायण लोकांचा सन्मान केला आहे.

परंतु मध्यकालीन भारतात सनातन धर्माचे यथार्थ ज्ञान नसल्यामुळे हमीरपूर गावाचे रहिवासी एखाद्या मेंढयाप्रमाणे नेभळटाप्रमाणे एका कोपर्‍यात उभे राहिले. आपण धर्मभ्रष्ट झालो, आपला धर्म नष्ट झाला अशीच त्यांची समजूत झाली. काही लोकांनी तर हे अप्रिय शब्द ऐकून आत्महत्या केली. परंतु कितीजण प्राण देणार? धर्मावर अतूट श्रद्धा असली तरी त्याना विवश होऊन अन्य मार्ग शोधावाच लागला. आजही ते लोक बांबू जमिनीत पुरून व मुसळ ठेवून हिंदूच्याप्रमाणे विवाह करत असतात. नंतर मौलवी येऊन निका वाचून निघून जातो. ते सर्वजण शुद्ध हिंदू आहेत. पण ते सर्व लोक – सगळे गाव आज मुसलमान बनले आहे.

काय घडले होते हो? विहिरीचे पाणी यवनांनी प्यायले होते. नकळत मुसलमानांनी शिवलेले खाल्ले गेले होते. तेवढया कारणासाठी धर्म नष्ट झाला. म्हणजे धर्म ‘लाजाळू ‘ बनला. ‘लाजाळू’ नावाचे एक झाड असते. आपण त्या झाडाला स्पर्श केला की त्या झाडाची पाने संकुचित होतात व हात बाजूला करताच ती पाने पुन्हा पूर्ववत विकसित बनतात. परंतु येथे धर्म तर असा संकुचित झाला की पुन्हा तो कधीच विकसित होऊ शकणार नाही. जिवंतपणीच ते लोक मरुन गेले, त्यांचा धर्म मरून गेला, त्यांचे राम-कृष्ण आणि परमात्मा मरून गेले. जे शाश्वत समजले जाते तेच नष्ट झाले. वास्तविक लोक ज्याला धर्म समजत होते ती शाश्वत धर्माच्या नावावर रूढ असणारी कुरीती होती. दुष्ट रूढी होती.

आम्ही धर्माच्या आश्रायाला का जातो? आम्ही धर्माला शरण का जातो? कारण आम्ही मर्त्य आहोत, मरणशील आहोत आणि धर्म ही अशी एक भरीव-ठोस गोष्ट आहे की तिला शरण जाऊन आम्ही अमर बनू शकतो. धर्म केवळ स्पर्शाने किंवा बाटण्याने नष्ट झाला तर तो आमचे रक्षण काय करणार? आम्हाला कोणी मारले तर आम्ही मरतो व येथे हा धर्म फक्त शिवाशीवीने व उष्टे खाण्याने नष्ट होईल? आम्ही तलवारीने कापले गेलो तर मरणार आणि धर्म फक्त स्पर्शाने नष्ट होईल? कसला हा आमचा धर्म? बाईट रूढी, खराब चाली पद्धती, नष्ट होत असतात, सनातन नष्ट होत नसते.

सनातन तर अशी ठोस-भरीव वस्तू आहे की जिला शस्त्र तोडू शकत नाही. अग्नी जाळू शकत नाही, पाणी जिला भिजवू शकत नाही आणि खाणे-पिणे तर दूर पण या पृथ्वीवर निर्माण झालेली कोणतीही वस्तू तिला स्पर्शही करु शकत नाही. असे सनातन कसे नष्ट होईल?

अशाच काही वाईट रूढी अर्जुनाच्या काळात रुढ होत्या व अर्जुन त्यांच्या आहारी गेला होता व म्हणून त्याने विलाप करीत, शोक करीत नग्नपणे सांगितले की, कुलधर्म हाच सनातन धर्म आहे आणि या युद्धामुळे हा सनातन धर्म नष्ट होईल. कुलधर्म नष्ट झाल्याने आम्हांला अनंतकालपर्यंत नरकवास भोगावा लागेल. यावर श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितले अर्जुना, तुझ्यामध्ये हे अज्ञान कोठून उत्पन्न झाले? येथे ती कुरूढी आहे म्हणून श्रीकृष्णांनी त्याचे निराकरण केले, खंडन केले व सांगितले की, आत्मा हाच सनातन आहे. जर तुम्ही आत्म्याचा मार्ग जाणत नसाल तर सनातन धर्मामध्ये तुमचा अद्याप प्रवेश झाला नाही असे समजावे.

जर हा सनातन-शाश्वत आत्मा सर्वाच्या शरीराला व्यापून आहे, तर मग कोणाचा शोध घ्यायचा? यावर श्रीकृष्ण म्हणतात –

क्रमशः श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग १८. | श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग १८.

लेखन/माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

Leave a comment