श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग १९

श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग १९

श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग १९ –

अध्याय २ – सांख्ययोग – श्लोक क्र.२.२५ ते २.२८ | श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग १९.

मूळ श्लोक –

अव्यक्तोऽयमचिन्त्योऽयमविकार्योऽयमुच्यते ।
तस्मादेवं विदित्वैनं नानुशोचितुमर्हसि ॥ २-२५ ॥

संदर्भित अन्वयार्थ –

अयम्‌ = हा (आत्मा), अव्यक्तः = अव्यक्त (आहे), अयम्‌ = हा (आत्मा), अचिन्त्यः = अचिंत्य (आहे), (च) = तसेच, अयम्‌ = हा (आत्मा), अविकार्यः = विकाररहित (आहे असे), उच्यते = म्हटले जाते, तस्मात्‌ = म्हणून, एनम्‌ = या(आत्म्या)ला, एवम्‌ = अशा वरील प्रकारे, विदित्वा = जाणून, अनुशोचितुम्‌ = शोक करण्यास, न अर्हसि = तू योग्य नाहीस, म्हणजे तुला शोक करणे उचित नाही ॥ २-२५ ॥

अर्थ –

हा आत्मा अव्यक्त आहे, तो इंद्रियांना अगोचर आहे. इंद्रियांच्याद्वारे आत्म्याचे स्वरूप समजू शकत नाही किंवा जीवात्म्याचे अस्तित्व प्रस्थापित करता येत नाही. अर्थात इंद्रिय व विषय यांचा संयोग जोपर्यंत असतो, तोपर्यंत आत्म्याचे अस्तित्व असते; परंतु त्याचा स्पष्ट बोध होत नाही. तो अचिंत्य आहे, अकल्पनीय आहे. तोपर्यंत मन आणि मनातील विचार व भावनांचे तरंग आहेत, तोपर्यंत तो शाश्वत आहे, परंतु आम्ही त्याला पाहू शकत नाही, त्याचा उपभोग घेवू शकत नाही. किंवा त्यात डोकावू शकत नाही. कारण तो मनालाही अगोचर आहे. व म्हणून मनाचे नियमन करणे, मनाचा निरोध करणे आवश्यक आहे.

श्रीकृष्णांनी यापूर्वी सांगितले आहे की, असत्‌ वस्तूला अस्तित्व नसते, ती शाश्वत नसते, ती क्षणभंगूर असते आणि जे सत्‌ म्हणजे सत्य आहे ते तिन्ही काळात शाश्वत असते, तिन्ही काळात त्याचा अभाव नसतो. ते सत्‌ म्हणजे आत्मा आहे. हा आत्माच अपरिवर्तनशील, शाश्वत, सनातन व अव्यक्त आहे, अगोचर आहे.या गुणधर्मांनी युक्त असणाऱ्या आत्म्याला फक्त तत्त्वदर्शी लोक पाहू शकले; परंतु विद्वान पंडित किंवा वैभवसंपन्न असणारा मनुष्य त्याचे स्वरूप पाहू शकला नाही. परंतु तत्त्वदर्शी लोकमात्र त्याला पाहू शकले आहेत.

श्रीकृष्णांनी पुढे सांगितले आहे की, तत्त्व म्हणजेच परमात्मा होय. मनाच्या निरोधकालात साधक या परमात्म्याचे दर्शन घेऊ शकतो, त्याच्यात प्रवेशही करू शकतो.जेव्हा साधकाला परमात्म्याचा साक्षात्कार होतो तेव्हा स्वतःचा आत्माही ईश्वरीय गुणांनी युक्त असल्याचे त्याला दिसते.हा आत्मा सत्य, सनातन आहे व परिपूर्ण असल्याचे त्याला समजते.तो अचिंत्य- अकल्पनीय आहे हे तो जाणतो. आत्मा हा असा अचिंत्य, अगोचर व अविकारी आहे. तो न बदलणारा आहे.

म्हणून श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की, आत्म्याचे हे स्वरूप जाणून नश्वर शरीराबद्दल शोक करण्याचे सोडून दे. आता श्रीकृष्ण अर्जुनाला त्याच्या विचारात असणारा विरोधाभास दाखवून अर्जुनाने शोक करणे कसे अयोग्य आहे, ते पुढे सांगत आहेत.

मूळ श्लोक –

अथ चैनं नित्यजातं नित्यं वा मन्यसे मृतम्‌ ।
तथापि त्वं महाबाहो नैवं शोचितुमर्हसि ॥ २-२६ ॥

संदर्भित अन्वयार्थ –

अथ = परंतु, च = जर, एनम्‌ = हा (आत्मा), नित्यजातम्‌ = नेहमी जन्माला येणारा, वा = तसेच, नित्यम्‌ = सदा, मृतम्‌ = मरणारा (आहे असे), त्वम्‌ = तू, मन्यसे = मानत असशील, तथापि = तरीसुद्धा, महाबाहो = हे महाबाहो, एवम्‌ = अशा प्रकारे, शोचितुम्‌ = शोक करण्यास, न अर्हसि = तू योग्य नाहीस ॥ २-२६ ॥

अर्थ –

हे अर्जुना, तथापि हा आत्मा नेहमी जन्म घेतो व नित्य मरतो असे जरी तुला बाटत असेल तरीदेखील; हे महाबाहो तुला शोक करण्याचे कारण नाही.

कारण –

मूळ श्लोक

जातस्य हि ध्रुवो मृत्युर्ध्रुवं जन्म मृतस्य च ।
तस्मादपरिहार्येऽर्थे न त्वं शोचितुमर्हसि ॥ २-२७ ॥

संदर्भित अन्वयार्थ –

हि = कारण (वरीलप्रमाणे मानल्यास), जातस्य = जन्मास आलेल्याला, मृत्युः = मृत्यू, ध्रुवः = निश्चित (आहे), च = तसेच, मृतस्य = मेलेल्याला, जन्म = जन्म, ध्रुवम्‌ = निश्चित आहे, तस्मात्‌ = म्हणूनही, अपरिहार्ये = उपाय नसलेल्या, अर्थे = त्या गोष्टीच्या बाबतीत, त्वम्‌ = तू, शोचितुम्‌ = शोक करण्यास, न अर्हसि = योग्य नाहीस ॥ २-२७ ॥

अर्थ –

जो जन्मला आहे त्याचा मृत्यू निश्चित आहे व जो मृत्यू पावला आहे त्याला जन्म निश्चित आहे. जन्ममृत्यूचे हे चक्क असेच फिरत राहणार आहे; तेव्हा ज्यावर काही उपाय नाही, जी गोष्ट अटळ आहे त्याचा शोक करणे अयोग्य आहे.असा शोक करणे म्हणजे दुसर्‍या दुःखाला आमंत्रित करण्यासारखे आहे.

मूळ श्लोक –

अव्यक्तादीनि भूतानि व्यक्तमध्यानि भारत ।
अव्यक्तनिधनान्येव तत्र का परिदेवना ॥ २-२८ ॥

संदर्भित अन्वयार्थ –

भारत = हे भरतवंशी अर्जुना, भूतानि = सर्व प्राणी, अव्यक्तादीनि = जन्मापूर्वी अप्रकट (होते), (च) = आणि, अव्यक्तनिधनानि एव = मेल्यानंतरही अप्रकट होणारे (असतात), (केवलम्‌) = केवळ, व्यक्तमध्यानि = मध्ये प्रकट आहेत, (अथ) = मग, तत्र = अशा स्थितीत, का = काय, परिदेवना = शोक (करायचा आहे) ॥ २-२८ ॥

अर्थ –

हे अर्जुना, ही सर्व भूते – हे सर्व प्राणिमात्र जन्माच्या म्हणजे उत्पत्तीच्या पूर्वी अव्यक्त असतात, अशरीरी असतात आणि मृत्यूनंतरही ते अव्यक्तच असतात, अशरीरीच असतात. म्हणजे जन्माच्या पूर्वी व मृत्यूनंतर हे या प्राणिमात्रांचे स्वरूप अव्यक्तच असते. फक्त जन्ममृत्यूच्या मधल्या काळात हे प्राणिमात्र शरीर धारण करीत असतात. म्हणजे त्यांची ही मधली स्थिती फक्त दृश्य असते-व्यक्त असते. तेव्हा या परिवर्तनाबद्दल तू व्यर्थ चिंता किंवा शोक करु नयेस. यापुढे या अव्यक्त आत्म्याला कोण कशा प्रकारे पाहतो ते सांगितले आहे.

क्रमशः श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग १९.

लेखन/माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

Leave a comment