श्रीमद् भगवद् गीता भाग २० –
अध्याय २ – सांख्ययोग – श्लोक क्र.२.२९ ते २.३२ | श्रीमद् भगवद् गीता भाग २०.
मूळ श्लोक –
आश्चर्यवत्पश्यति कश्चिदेनमाश्चर्यवद्वदति तथैव चान्यः ।
आश्चर्यवच्चैनमन्यः शृणोति श्रुत्वाप्येनं वेद न चैव कश्चित् २-२९ ॥
संदर्भित अन्वयार्थ –
कश्चित् = कोणी विरळ महापुरुषच, एनम् = ह्या आत्म्याला, आश्चर्यवत् = आश्चर्याप्रमाणे, पश्यति = पाहातो, च = आणि, तथा एव = त्याचप्रमाणे, अन्यः = दुसरा एखादा महापुरुषच, आश्चर्यवत् = आश्चर्याप्रमाणे, (एनम्) = याचे, वदति = वर्णन करतो, च = तसेच, अन्यः = दुसरा कोणी अधिकारी पुरुषच, एनम् = याच्याविषयी, आश्चर्यवत् = आश्चर्याप्रमाणे, शृणोति = ऐकतो, च = आणि, कश्चित् = कोणी कोणी तर, श्रुत्वा = ऐकून, अपि = सुद्धा, एनम् = याला, न एव वेद = जाणतच नाही ॥ २-२९ ॥
अर्थ –
या पूर्वी श्रीकृष्णांनी म्हटले होते की तत्त्वदर्शी लोक या आत्म्याला पाहू शकतात. परंतु आता हे म्हणतात तत्त्वदर्शन करणारे लोक हे महापुरुष असतात ब ते फार विरळ असतात आणि असे काही महापुरुष या आत्म्याकडे आश्चर्य म्हणून अदभुत वस्तू म्हणून पाहतात. केवळ ऐकत नाहीत तर त्याला प्रत्यक्ष पाहतात. तर दुसरे काही महापुरुष आश्चर्यकारक म्हणून त्याचे वर्णन करतात. अर्थात जे पाहू शकतात तेच त्याचे यथार्थ वर्णन करू शकतात. दुसरे काही साधक त्याला आश्चर्यकारक म्हणून त्याच्याविषयी ऐकतात. सर्वानाच असे ऐकता येत नाही कारण ही गोष्ट फक्त अधिकारी साधकांनाच साधते, इतरांना नाही.
हे अर्जुना, कोणी कोणी तर ऐकूनही या आत्म्याला मुळीच जाणू शकत नाहीत कारण त्यांची तेवढी कठोर साधना नसते. व कठोर साधना नसेल तर मनाचा निरोध कोठून होणार? मग तुम्ही लक्षावधी ज्ञानाच्या गोष्टी ऐकल्या, समजून घेतल्या, अगदी केसाची शेंडी उपटून तुम्ही एखादी गोष्ट समजून घेतलीत किंवा समजून घेण्याची दुर्दम्य इच्छा ठेवलीत तरी मोह मोठा प्रबल असतो. त्यामुळे सर्व ऐकून, समजून घेऊनही थोडया वेळाने तुम्ही तुमच्या सांसारिक उद्योगात मग्न होत असता. शेवटी श्रीकृष्ण निर्णय देतात-
मूळ श्लोक –
देही नित्यमवध्योऽयं देहे सर्वस्य भारत ।
तस्मात्सर्वाणि भूतानि न त्वं शोचितुमर्हसि ॥ २-३० ॥
संदर्भित अन्वयार्थ –
भारत = हे भरतवंशी अर्जुना, सर्वस्य = सर्वांच्या, देहे = देहांमध्ये, अयम् = हा, देही = आत्मा, नित्यम् = नेहमीच, अवध्यः = अवध्य आहे, तस्मात् = म्हणून, सर्वाणि = सर्व, भूतानि = प्राण्यांच्यासाठी, त्वम् = तू, शोचितुम् = शोक करण्यास, न अर्हसि = योग्य नाहीस ॥ २-३० ॥
अर्थ –
हे अर्जुना, सर्वांच्या शरीरात राहणारा आत्मा हा अवध्य असतो. त्याला कधीही मारता येत नाही. तो अभंग असल्याने त्याला तोडता किंवा कापता येत नाही. तेव्हा कोणत्याही प्राण्याबद्दल तू शोक करु नकोस.
‘आत्माच सनातन आहे- या तथ्याचे-सत्याचे प्रतिपादन करुन, त्याच्या महानतेचे वर्णन करुन हा प्रश्न आता येथे संपत आहे. आता प्रश्न असा आहे की या सनातन सत्याची प्राप्ती कशी होईल? संपूर्ण गीतेत याच्या प्राप्तीचे दोनच मार्ग सांगितले आहेत- एक निष्काम कर्मयोग आणि दुसरा ज्ञानयोग. दोन्ही मार्गात केले जाणारे कर्म एकच आहे. त्या कर्माच्या अनिवार्यतेवर भर देत योगेश्वर श्रीकृष्ण पुढे ज्ञानयोगाबद्दल सांगत आहेत-
मूळ श्लोक –
स्वधर्ममपि चावेक्ष्य न विकम्पितुमर्हसि ।
धर्म्याद्धि युद्धाच्छ्रेयोऽन्यत्क्षत्रियस्य न विद्यते ॥ २-३१ ॥
संदर्भित अन्वयार्थ –
च = तसेच, स्वधर्मम् = स्वतःचा धर्म, अवेक्ष्य = लक्षात घेऊन, अपि = सुद्धा, विकम्पितुम् = भय बाळगण्यास, न अर्हसि = तू योग्य नाहीस, हि = कारण, क्षत्रियस्य = क्षत्रियाच्या बाबतीत, धर्म्यात् = धर्मयुक्त, युद्धात् = युद्धापेक्षा (वरचढ), अन्यत् = दुसरे कोणतेही, श्रेयः = कल्याणकारी कर्तव्य, न विद्यते = नसते ॥ २-३१ ॥
अर्थ –
अर्जुना, तुझ्या स्वधर्माचा विचार केलास तरी तुला घाबरण्याचे काहीच कारण नाही, कारण तुझा क्षात्रधर्म आहे. व क्षत्रियांना धर्मयुद्धाहून अधिक श्रेयस्कर परम कल्याणकारी असा दुसरा कोणताही मार्ग नाही. आतापर्यंत ‘आत्मा शाश्वत आहे’, ‘ आत्मा सनातन आहे’, “तोच एकमात्र धर्म आहे’ असे सांगितले गेले आहे. आता प्रश्न असा की तो स्वधर्म कसा? एकमात्र आत्मा म्हणजे धर्म आहे बव तो तर अचल आहे, स्थिर आहे मग धर्माचरण म्हणजे काय? आत्म्याकडे जाण्याचा जो मार्ग त्याला आत्मपथ म्हंटले जाते व या मार्गाकडे जाण्याची-प्रवृत्त होण्याची प्रत्येक व्यक्तीची क्षमता वेगवेगळी असते.
मनुष्यस्वभावातून उत्पन्न होणार्या या क्षमतेला स्वधर्म असे म्हंटले गेले आहे. आत्म-पथावर चालणाऱ्या साधकांना त्यांच्या स्वभावाच्या क्षमतेप्रमाणे महापुरुषाने चार श्रेणीत विभागले आहे- शूद्र, वैश्य, क्षत्रिय आणि ब्राह्मण. या त्या चार श्रेणी ! साधनेच्या प्राथमिक अवस्थेत प्रत्येक साधक शूद असतो- म्हणजेच तो अल्पज्ञ असतो. तासनतास भजनाला बसून तो एक दहा मिनिटेही स्वत:साठी प्राप्त करु शकत नाही. तो प्रकृतीचे मायाजाळही भेदू शकत नाही. या अवस्थेमध्ये महापुरुषांची सेवा केल्यास त्याच्या स्वभावात सदगुणांचा प्रादुर्भाव होतो व मग तो वैश्य श्रेणीचा साधक बनतो.
आत्मिक संपत्ती हीच स्थिर संपत्ती आहे व या अवस्थत साधक या संपत्तीचा हळूहळू संग्रह करण्यास व गोपालन म्हणजे इंद्रियांचे रक्षण करण्यास तो सक्षम बनतो. काम-क्रोध इत्यादी विकारांनी इंद्रियांची हिंसा होत असते, तर विवेक-वैराग्याने त्यांचे संरक्षण होत असते. परंतु प्रकृतीला निर्बीज करण्याची क्षमता त्याच्यात असत नाही. क्रमश: उन्नती करता करता साधकामध्ये तिन्ही गुणांशी प्रतिकार करण्याची क्षमता म्हणजेच क्षत्रियत्व त्याच्यामध्ये निर्माण होते. या अवस्थेत प्रकृती व तिच्या विकारांना नष्ट करण्याची क्षमता साधकामध्ये निर्माण होते व म्हणून युद्धाला येथूनच आरंभ होतो. क्रमश: साधना करीत करीत साधक शेवटी ब्राह्मणत्वाची श्रेणी प्राप्त करतो. या अवस्थत मनोनिग्रह इंद्रियदमन, धारावाही चिंतन, सरलता, अनुभव व ज्ञानप्राप्ती ही लक्षणे साधकामध्ये प्रकट झालेली दिसून येतात. या प्रकारे साधना करीत करीत साधक शेवटी ब्रह्ममय होऊन जातो की जेथे त्याचे ब्राह्मणत्वही उरत नाही.
विदेश नगरीचा राजा जनक याच्या दरबारात महर्षी याज्ञवल्क्य यांनी चक्रायाण, उबस्ती, कहोल, आरुणी, उद्दालक व गागी यांच्या प्रश्नांचे समाधान करताना सांगितले की, ज्याला आत्मसाक्षात्कार होतो तोच ब्राह्मण असतो.
लोक-परलोक व समस्त प्राण्यांच्या अंतरंगात आत्म्याचाच अधिकार चालत असतो. सूर्य, चंद्र, पृथ्वी, जल, वायू, अग्नी, तारांगण, अन्तरिक्ष, आकाश एवढेच नव्हे तर प्रत्येक क्षण आत्म्याच्या अधिपत्याखाली आहे. हा तुमचा आत्मा अन्तर्यामी, अमृतमय आहे – अमर आहे. तो अक्षर आहे ब त्याच्याहून भिन्न असणारे सर्व नाशवंत आहे. या मृत्युलोकात राहणार्या कोणत्याही साधकाने या ‘ अक्षर’ आत्म्याला न जाणता हवन केले, तप केले, हजारो वर्षे यज्ञकर्म केले तरी ते सर्व कर्म व्यर्थ आहे. या अक्षरतत्त्वाला न जाणता जो कोणी मरतो तो दयनीय आहे. कृपण आहे. आणि जो या अक्षराचे ज्ञान प्राप्त करून घेऊन मग मरतो तो ब्राह्माण आहे. ( ब्ृहदारण्यकोपनिषद ३//४-५-७-८ )
येथे अर्जुन हा क्षत्रिय श्रेणीचा साधक आहे. श्रीकृष्ण म्हणतात, जो क्षत्रिय आहे त्याला युद्धाच्या व्यतिरिक्त दुसरा श्रेयस्कर, कल्याणकारी मार्गच नाही. पण क्षत्रिय म्हणजे काय? प्राय: जन्माने ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र असे समजले जाते. म्हणजे जातीनुसार हे वर्ग पाडले गेले आहेत. यालाच चार वर्ण असे म्हणतात. परंतु हे बरोबर नव्हे. शास्त्रकारांनी स्वत: क्षत्रिय म्हणजे काय? वर्ण म्हणजे काय? हे सांगितले आहे. त्या ठिकाणी त्यांनी ‘फक्त क्षत्रियांचे नाव घेतले आहे व मग अठराव्या अध्यायापर्यंत वर्ण म्हणजे नेमके काय याचे समाधानकारक उत्तर दिले आहे. या वर्णामध्ये कसे परिवर्तन झाले आहे हेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
श्रीकृष्णांनी सांगितले, ‘ चातुर्वर्ण्य मया सुष्टं- चारी वर्णांची सृष्टी मी निर्माण केली आहे. म्हणजे सर्व लोकांना या चार वर्णात विभागले असे समजायचे का? श्रीकृष्ण म्हणतात नाही, ‘ गुणकर्म विभागशः’ गुणांच्या माध्यमातून कर्माची चार भागात विभागणी केली, आता ज्या कर्माची विभागणी केली ते कर्म म्हणजे काय आहे ते पाहणे आवश्यक आहे. गुण परिवर्तनशील आहेत आणि उचित साधनेद्वारे तामस गुणातून राजस गुणात व राजसमधून सात्त्विक गुणात प्रवेश मिळत जातो व शेवटी साधक स्वभावाने-गुणाने ब्राह्मण बनतो. त्यावेळी ब्रह्मामध्ये प्रवेश मिळवून देणारी योग्यता त्या साधकामध्ये असते. वर्ण-संबंधी प्रश्नाला येथे आरंभ होतो आणि अठराव्या अध्यायात तो पूर्ण होतो.
श्रीकृष्णाचे म्हणणे-मत असे आहे-श्रेयान्स्वधर्मो विगुण:
परमधर्मात्स्वनुष्ठितात – स्वभावत: उत्पन्न झालेल्या या धर्मप्रवृत्तीची क्षमता ज्या स्तरावरील असेल, ती भले गुणरहित शूद्र श्रेणीची असली तरी ती परम कल्याणकारी असेल, कारण आपण क्रमश: तेथूनच आपल्या उत्थानाची सुरुवात करीत असतो; आपल्यापेक्षा वरच्या लोकांची नक्कल केल्याने साधक नष्ट होऊन जातो. येथे अर्जुन क्षत्रिय वर्गातील साधक आहे. म्हणून श्रीकृष्ण म्हणतात की, अर्जुना, अरे तुझा स्वभावधर्म व स्वभावानुरूप तुझी योग्यता, आणि युद्धामध्ये प्रवृत्त होणारी तुझी क्षमता पाहून असे वाटते की तू वृथा भय बाळगू नयेस. क्षत्रियाला याच्या इतका दुसरा कल्याणकारी मार्ग, श्रेयस्कर कर्म दुसरे कोणतेही नाही. याच विषयावर प्रकाश टाकीत योगेश्वर कृष्ण पुढे म्हणतात-
मूळ श्लोक –
यदृच्छया चोपपन्नं स्वर्गद्वारमपावृतम् ।
सुखिनः क्षत्रियाः पार्थ लभन्ते युद्धमीदृशम् ॥ २-३२ ॥
संदर्भित अन्वयार्थ –
पार्थ = हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), यदृच्छया = आपोआप, उपपन्नम् = प्राप्त झालेले, च = आणि, अपावृतम् स्वर्गद्वारम् = उघडलेले स्वर्गाचे द्वार असे, ईदृशम् = अशाप्रकारचे, युद्धम् = युद्ध, सुखिनः = भाग्यवान, क्षत्रियाः = क्षत्रिय लोकांनाच, लभन्ते = प्राप्त होते ॥ २-३२ ॥
अर्थ –
पार्थिव शरीराला रथ बनवून अचूक लक्ष्यवेध करणाऱ्या अर्जुना, दैवयोगे आपोआप उघडले गेलेले स्वर्गाचे द्वाररूपी हे युद्ध भाग्यवान क्षत्रियांनाच लाभत असते. क्षत्रिय श्रेणीतील साधकांमध्ये तिन्ही गुणांवर विजय मिळविण्याची क्षमता असते. त्यांच्यामध्ये देवी संपदा सामावलेली असल्याने त्यांच्यासाठी स्वर्गाचे-द्वार नेहमी उघडलेले असते. स्वर्गलोकात भ्रमण करण्याची शक्ती त्यांच्यामध्ये असते. क्षेत्र-क्षेत्रज्ञांचे हे युद्ध भाग्यवान क्षत्रियांनाच प्राप्त होत असते कारण त्यांच्यातच संघर्ष करण्याची शक्ती असते.
जगात अनेक लढाया होत असतात.ते सर्व संकुचित होऊन-अविवेकाने लढत राहतात. अनेक जाती लढतात. परंतु या सर्व युद्धात जिंकणाऱ्यालाही शाश्वत विजय मिळत नाही. हे कसले लढणे? हा तर सूड आहे. जो ज्याला जितका दाबण्याचा-चिरडण्याचा प्रयत्न करतो, कालान्तराने तो तितकाच दबला जातो. ही कसली लढाई? व हा कसला विजय? येथे स्वर्गप्राप्तीएवजी इंद्रियांना पीडा देणारा शोक, दुःख निर्माण होत असते. शेवटी शरीरही नष्ट होते. वास्तविक संघर्ष तर क्षेत्र व क्षेत्रज्ञामध्ये असतो व एकदा विजय मिळवल्यावर प्रकृतीचे कायमचे नियमन होते. म्हणजे उत्पत्तीच्या कारणाचा निरोध होतो व परम पुरुष परमेश्वराची प्राप्ती होते. हा असा विजय आहे की त्यानंतर पराभव नसतो.
क्रमश – श्रीमद् भगवद् गीता भाग २०.
लेखन/माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.