श्रीमद् भगवद् गीता भाग २१ –
अध्याय २ – सांख्ययोग – श्लोक क्र.२.३३ ते २.३६ | श्रीमद् भगवद् गीता भाग २१.
मूळ श्लोक –
अथ चेत्त्वमिमं धर्म्यं सङ्ग्रामं न करिष्यसि ।
ततः स्वधर्मं कीर्तिं च हित्वा पापमवाप्स्यसि ॥ २-३३ ॥
संदर्भित अन्वयार्थ –
अथ = परंतु, चेत् = जर, त्वम् = तू, इमम् = हे, धर्म्यम् = धर्मयुक्त, सङ्ग्रामम् = युद्ध, न करिष्यसि = न करशील, ततः = तर मग, स्वधर्मम् = स्वतःचा धर्म, च = आणि, कीर्तिम् = कीर्ती (यांना), हित्वा = गमावून, पापम् = पाप, अवाप्स्यसि = तू प्राप्त करून घेशील ॥ २-३३ ॥
अर्थ –
तेव्हा असे हे ‘ धर्मयुद्ध ‘ की ज्यामुळे परमधर्म परमात्म्याची प्राप्ती होते; असा हा’ धर्मयुक्त संग्राम’ तू केला नाहीस तर स्वधर्म म्हणजे स्वभावजात संघर्षाची असणारी क्षमता तू गमावून बसशील व पापाचा धनी होऊन तुझी अपकोर्ती होईल. अपकीर्ती कशी होईल हे सांगताना श्रीकृष्ण म्हणतात-
मूळ श्लोक –
अकीर्तिं चापि भूतानि कथयिष्यन्ति तेऽव्ययाम् ।
सम्भावितस्य चाकीर्तिर्मरणादतिरिच्यते ॥ २-३४ ॥
संदर्भित अन्वयार्थ –
च = तसेच, भूतानि = सर्व लोक, अव्ययाम् = पुष्कळ काळ टिकणारी, ते = तुझी, अकीर्तिम् = अपकीर्ती, अपि = सुद्धा, कथयिष्यन्ति = सांगत सुटतील, च = आणि, सम्भावितस्य = माननीय पुरुषांसाठी, अकीर्तिः = अपकीर्ति (ही), मरणात् = मरणापेक्षा, अतिरिच्यते = अधिक दुःसह असते ॥ २-३४ ॥
अर्थ –
सर्व लोक सतत तुझी अपकीर्ती गात राहतील. आजही पदच्यूत झालेल्या महात्म्यांमध्ये विश्वामित्र, पाराशर, निमि, श्रृंगी यांची गणना होते. अनेक साधक साधना करीत असताना आपल्या धर्माच्या बाबत विचार करीत असतात. तेव्हा लोक आपल्याबद्दल काय म्हणतील याबाबतही ते विचार करतात कारण लोकांचे म्हणणेही साधनेला प्रेरणारुप ठरत असते आणि साधनेच्या एका विशिष्ट टप्प्यापर्यंत साधकांना लोकांचे मत प्रेरणारूप बनत असते, त्याला ते सहाय्यभूत ठरत असते. अरे जे पुरुष सन्माननीय आहेत, प्रतिष्ठित आहेत त्यांना अपकीर्ती मरणापेक्षाही अधिक दुःखदायक, क्लेशदायक वाटते.
मूळ श्लोक –
भयाद्रणादुपरतरं मंस्यन्ते त्वां महारथाः ।
येषां च त्वं बहुमतो भूत्वा यास्यसि लाघवम् ॥ २-३५ ॥
संदर्भित अन्वयार्थ –
च = आणि, येषाम् = ज्यांच्या (दृष्टीने), त्वम् = तू (पूर्वी), बहुमतः = अतिशय माननीय, भूत्वा = होऊन, (इदानीम्) = आता, लाघवम् = क्षुद्रतेप्रत, यास्यसि = जाशील, (ते) = ते, महारथाः = महारथी लोक, त्वाम् = तू, भयात् = भीतीमुळे, रणात् = युद्धातून, उपरतम् = मागे फिरलास, (इति) = असे, मंस्यन्ते = मानतील ॥ २-३५ ॥
अर्थ –
जे महारथी आजपर्यंत तुझ्या यशाची, पराक्रमाची वाखाणणी करीत होते, ज्यांच्या दृष्टीने तू महापराक्रमी होतास, ते सर्वजण तुझ्या या कृत्याने तुला तुच्छ लेखतील. तू केवळ भीतीमुळे रणांगण सोडून पळालास असे समजून तुला ते भित्रा समजतील. हे महारथी कोण? आत्मपथाच्या मार्गावर खडतर परिश्रम घेत पुढे जाणारे साधक जसे महारथी आहेत, त्याप्रमाणेच अविद्येकडे खेचणारे काम, क्रोध, लोभ व मोहादी हे विकारही महारथीच आहेत. श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात को, ते सर्व महारथी तुझी किंमत कमी समजू लागतील इतकेच नव्हे तर-
मूळ श्लोक –
अवाच्यवादांश्च बहून्वदिष्यन्ति तवाहिताः ।
निन्दन्तस्तव सामर्थ्यं ततो दुःखतरं नु किम् ॥ २-३६ ॥
संदर्भित अन्वयार्थ –
तव = तुझे, अहिताः = वैरी लोक, तव = तुझ्या, सामर्थ्यम् = सामर्थ्याची, निन्दन्तः = निंदा करीत, बहून् = पुष्कळ, अवाच्यवादान् = सांगण्यासारखी नसणारी वचने, च = सुद्धा, वदिष्यन्ति = बोलतील, ततः = त्यापेक्षा, दुःखतरम् = अधिक दुःखदायक, नु किम् = आणखी काय असेल (बरे) ॥ २-३६ ॥
अर्थ –
तुझे शत्रू तुझ्या सामर्थ्याची, पराक्रमाची निंदा करतील व जे बोलू नये असे पुष्कळ बोलतील. अरे, मनुष्यात एखादा दोष दिसला की चारी बाजूंनी निंदेचा ब अपशब्दांचा त्याच्यावर वर्षाव होतो व जे बोलू नये ते बोलून लोक उपहास करतात. अरे ह्यापेक्षा अधिक दु:खदायक काय असू शकेल?
क्रमशः श्रीमद् भगवद् गीता भाग २१.
लेखन/माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.