श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग २२

श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग २२

श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग २२ –

अध्याय २ – सांख्ययोग – श्लोक क्र.२.३७ ते २.४० | श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग २२.

मूळ श्लोक –

हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महीम्‌ ।
तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः ॥ २-३७ ॥

संदर्भित अन्वयार्थ –

वा = अथवा, (त्वम्‌) = तू, हतः = (युद्धात) मारला जाऊन, स्वर्गम्‌ = स्वर्ग, प्राप्स्यसि = प्राप्त करून घेशील, वा = अथवा, (युद्धे) = युद्धात, जित्वा = जिंकून, महीम्‌ = पृथ्वीचे राज्य, भोक्ष्यसे = तू भोगशील, तस्मात्‌ = म्हणून, कौन्तेय = हे कुंतीपुत्र अर्जुना, युद्धाय = युद्ध करण्याचा, कृतनिश्चयः = निश्चय करून, उत्तिष्ठ = उठून उभा राहा ॥ २-३७ ॥

अर्थ –

हे कुन्ती पुत्रा, तू युद्धात मेलास तर तुला स्वर्ग मिळेल. स्वर्गलोकात विहार करण्याची तुझ्यात क्षमता येईल. परमेश्वरमय होण्यास सहाय्यभूत होणारी दैवी संपदा तुझ्या हृदयात पूर्णत: प्रवाहित होईल किंबा विजयी झालास तर पृथ्वीचे राज्य भोगशील, महामहिम स्थिती तुला प्राप्त होईल. म्हणून अर्जुना, युद्धाचा निश्चय करुन ऊठ.

साधारणत: लोक या श्र्लोकाचा अर्थ असा समजतात की जर युद्धात तू मेलास तर तुला स्वर्गप्राप्ती होईल व जिंकलास तर या पृथ्वीतलावरील राज्य प्राप्त होईल.

परंतु यापूर्वी अर्जुनाने स्पष्ट सांगितले आहे- “’ भगवान, केवळ पृथ्वीचेच नव्हे तर त्रेलोक्याचे राज्य मला प्राप्त झाले किंवा देवतांचे स्वामीपद म्हणजे इंद्रपदाची जरी मला प्राप्ती झाली तरी माझ्या इंदियांचे शोषण करणारा हा शोक जर नष्ट होणार नसेल तर मला ते काहीही नको. अरे, एवढेच जर या युद्धाने मिळणार असेल तर गोविंदा, हे युद्ध कशाला करायचे? मी ते मुळीच करणार नाही” तरीही श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहेत की, अर्जुन, अरे तू लढ. तू जिंकलास तर तुला पृथ्वीवरचे राज्य मिळेल व मेलास तर स्वर्ग मिळेल.

म्हणजे येथे श्रीकृष्णांनी अर्जुनाला नवीन काय सांगितले व काय दिले? अर्जुन सत्य व श्रेयाची इच्छा करणारा शिष्य होता. त्याला सदगुरु श्रीकृष्णांनी सांगितले की, ह्या क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांमधील संघर्षात जर शरीराचे आयुष्य, त्याचा अस्तित्वकाळ जर संपलेला असेल आणि त्यापूर्वी तुम्ही तुमचे लक्ष्य प्राप्त करु शकला नाहीत तरी तुम्हाला स्वर्गाची प्राप्ती होईल. म्हणजेच स्वर्गात विहार करण्याची क्षमता तुम्हाला प्राप्त होईल, तुमच्यात दैवी सम्पदा समाविष्ट होईल आणि जर या संघर्षात तुम्ही यशस्वी व्हाल ( शरीरासह ) तर तुम्हाला ‘ महीम ‘- म्हणजे सर्वात महान ब्रह्माच्या महिम्याचा उपभोग घेऊ शकाल, म्हणजेच ‘ महामहिम ‘ स्थिती प्राप्त करु शकाल. म्हणजे जिंकलात तर सर्वस्व म्हणजे महामहिमत्व प्राप्त करु शकाल ब हरलात तर देवत्व प्राप्त करु शकाल- म्हणजे युद्ध केल्याने- संघर्षात भाग घेतल्याने दोन्ही हातात लाडू प्राप्त होणार आहेत. म्हणजे लाभातूनही लाभ आणि हानीतूनही लाभच मिळणार आहे यावरच भर देत श्रीकृष्णही पुढे म्हणत आहेत-

मूळ श्लोक –

सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ ।
ततो युद्धाय युज्यस्य नैवं पापमवाप्स्यसि ॥ २-३८ ॥

संदर्भित अन्वयार्थ –

जयाजयौ = जय व पराजय, लाभालाभौ = लाभ-हानि, (च) = आणि, सुखदुःखे = सुख व दुःख (यांना), समे = समान, कृत्वा = मानून, ततः = त्यानंतर, युद्धाय = युद्ध करण्यासाठी, युज्यस्व = तयार हो, एवम्‌ = अशाप्रकारे (युद्ध केल्यामुळे), पापम्‌ = पाप, न अवाप्स्यसि = तुला लागणार नाही ॥ २-३८ ॥

अर्थ –

अर्जुना, या प्रकारे सुख-दुःख, लाभ-हानि आणि जय-पराजय हे सारखेच समजून तू युद्धाला तयार हो. असे केल्याने तुला पाप लागणार नाही. म्हणजे येथे सुखामध्ये सर्वस्वप्राप्ती व दुःखात देवत्वाची प्राप्ती होणार आहे. लाभामध्ये महीमत्व आणि पराजयात दैवी संपदेवर अधिकार प्राप्त होईल. तेव्हा आपला लाभ व नुकसान यांचा साकल्याने विचार करुन तू लढायला तयार हो. लढण्याने दोन्ही प्रकारे तुझा फायदाच आहे व लढण्याने तुला पाप लागणार नाही व म्हणून तू युद्धाला तयार हो-

मूळ श्लोक –

एषा तेऽभिहिता साङ्ख्ये बुद्धिर्योगे त्विमां शृणु ।
बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्मबन्धं प्रहास्यसि ॥ २-३९ ॥

संदर्भित अन्वयार्थ –

पार्थ = हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), एषा = ही, बुद्धिः = बुद्धी, (मया) = मी, ते = तुझ्यासाठी, साङ्ख्ये = ज्ञानयोगाच्या बाबतीत, अभिहिता = सांगितली, तु = आणि (आता), योगे = कर्मयोगाच्या बाबतीतील, इमाम्‌ = ही (बुद्धी), शृणु = तु ऐक, यया = ज्या, बुद्ध्या = बुद्धीने, युक्तः = युक्त झालेला (असा तू), कर्मबन्धनम्‌ = कर्मांच्या बंधनाला, प्रहास्यसि = चांगल्या प्रकारे टाकशील म्हणजे तू कर्मबंधनाला पूर्णपणे नष्ट करून टाकशील ॥ २-३९ ॥

अर्थ –

हे अर्जुना, तुला येथपर्यंत सांख्यमार्गातले ज्ञान सांगितले. ज्ञानयोगातील बुद्धिविषयी सांगितले. तू म्हणशील कसली बुद्धी? कसले ज्ञान? तर युद्ध कर हेच ! ज्ञानयोग म्हणजे काय? तर आपल्या जीवनाकडे बघून, लाभहानीचा नीट विचार करावा की यात आपण जिंकलो तर महामहिम स्थिती प्राप्त होईल आणि हरलो तर देवत्त्व मिळेल. म्हणजे दोन्हीकडून लाभ मिळेल व युद्ध नाही केले तर सर्व लोक आपला उपहास करतील. आपण भयाने रणांगणातून पळून गेलो असे समजतील व मग आपली अपकीर्ती होईल. अशा प्रकारे आपले अस्तित्व समोर ठेवून विचार करणे व युद्ध करायला तयार होणे हाच ज्ञानयोग आहे.

साधारणत: लोकांचा असा गैरसमज असतो की ज्ञानमार्गात कर्म( युद्ध ) करावे लागत नाही. ते म्हणतात की ज्ञानयोगात कर्म असतच नाही. मी तर ‘शुद्ध आहे’, ‘मी बुद्ध आहे’, मी चैतन्य आहे” अहं ब्रह्मास्मि’ गुण गुणातच मिसळतात ‘ – असे समजून ते स्वस्थ बसून राहतात. योगे श्वर श्रीकृष्णाच्या मते हा ज्ञानयोग नाही. ज्ञानयोगातही तेच कर्म करावे लागते जे निष्काम कर्मयोगात केले जाते. दोन्ही मार्गामध्ये फक्त दृष्टिकोनाचा फरक आहे. ज्ञानमार्गी मनुष्य आपली स्थिती समजून आपल्या स्वतःच्या सामर्थ्यावर अवलंबून राहून कर्म करीत असतो. दोन्ही मार्गात कृती आहे. आणि ते कर्मही एकच आहे. आणि ते कर्म दोन्ही मार्गात करावेच लागते. केवळ कर्म करण्याचे दृष्टिकोन दोन आहेत.

अर्जुना, याच विचारांना कर्मयोगाच्या संदर्भात ऐक. ह्या ज्ञानाने कर्मबंधनाचा नाश होईल. इथे श्रीकृष्णाने कर्माचे नाव प्रथम घेतले आहे. परंतु येथे कर्म म्हणजे काय हे स्पष्ट केलेले नाही. कर्म म्हणजे काय सांगितलेले नसले तरी त्या कर्माची विशेषता, वैशिष्ट्ये यावर त्यांनी पुढे प्रकाश टाकला आहे.

मूळ श्लोक –

नेहाभिक्रमनाशोऽस्ति प्रत्यवायो न विद्यते ।
स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात्‌ ॥ २-४० ॥

संदर्भित अन्वयार्थ –

इह = या कर्मयोगामध्ये, अभिक्रमनाशः = आरंभाचा म्हणजे बीजाचा नाश, न अस्ति = होत नाही, (च) = (तसेच), प्रत्यवायः = विपर्यस्त फलरूपी दोष (सुद्धा), न विद्यते = असत नाहीत, अस्य = या कर्मयोगरूपी, धर्मस्य = धर्माचे, स्वल्पम्‌ = थोडे (साधन), अपि = सुद्धा, महतः = महान, भयात्‌ = (जन्ममृत्युरूपी) भयापासून, त्रायते = रक्षण करते ॥ २-४० ॥

अर्थ –

ह्या निष्काम कर्मयोगामध्ये आरंभिलेल्या कार्याचा अर्थात बीजाचा नाश होत नाही. यामध्ये निष्कामभावाने कर्म केलेले असल्याने मर्यादित कर्मफलाचा दोष येथे उत्पन्न होत नाही. तेव्हा या निष्काम कर्माचे म्हणजेच या कर्मयोगाचे, या धर्माचे अल्प आचरणही जन्म-मृत्यूरूपी महान भयापासून रक्षण करते. तुम्ही हा कर्मयोग समजून घ्या. याप्रमाणे थोडे तरी आचरण करा. बीज रुजवा.

अर्जुना हे बीज कधीच नष्ट पावत नाही. या जड प्रकृतीमध्ये या बीजरूपी सत्याला नष्ट करण्याची क्षमता नसते किंवा ते सत्य पुर्णपणे नष्ट करण्याचे कसले शस्त्रही तिच्याजवळ नसते. प्रकृती त्यावर आवरण घालू शकते किंवा थोडी अडवणूक करू शकते, परंतु आरंभिलेल्या कर्माला नष्ट करू शकत नाही. पुढे श्रीकृष्ण म्हणतात की अगदी महाभयंकर पापीसुद्धा या ज्ञानरूपी नौकेने निःसंदेह तरून जाऊ शकतो. नेमकी हीच गोष्ट येथे सांगितली आहे. ते म्हणतात हे अर्जुना, निष्काम कर्मयोगाचे बीजारोपण कर. या बीजाचा कधीही नाश होत नाही, किंबा यात कर्मयोगाने विपरीत फळरूपी दोषही प्राप्त होत नाही. स्वर्ग, क्रद्धी, सिद्धी तुम्हाला देऊन हा योग तुम्हाला मध्येच सोडून देत नाही व तुम्ही जरी हा योग मध्येच सोडून दिलात तरी तो तुमचा उद्धारच करतो. या धर्माचे, या निष्काम कर्मयोगाचे, अल्पसे आचरण जन्म- मृत्युरूपी महान भयापासून रक्षण करते. अनेक जन्म संसिद्धस्ततो याति परां गतिम्‌ । हा कर्मयोग अनेक जन्मानंतरही मनुष्याला परमगतीकडेच नेतो. याच संदर्भात श्रीकृष्ण पुढे म्हणतात-

क्रमशः श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग २२.

लेखन/माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

Leave a Comment