श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग २४

श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग २४

श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग २४ –

अध्याय २ – सांख्ययोग – श्लोक क्र.२.४५ ते २.४८ | श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग २४.

मूळ श्लोक –

त्रैगुण्यविषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन ।
निर्द्वन्द्वो नित्यसत्त्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान्‌ ॥ २-४५ ॥

संदर्भित अन्वयार्थ –

अर्जुन = हे अर्जुना, वेदाः = वेद (हे वरीलप्रकाराने), त्रैगुण्यविषयाः = तीन गुणांचे कार्यरूप असे भोग व त्यांची साधने यांचे प्रतिपादन करणारे आहेत, (अतः) = म्हणून, निस्त्रैगुण्यः = ते भोग व त्यांची साधने यांमध्ये आसक्तिरहित, निर्द्वन्द्वः = हर्ष-शोक इत्यादी द्वंद्वांनी रहित, नित्यसत्त्वस्थः = नित्यवस्तू अशा परमात्म्याचे ठिकाणी स्थित, निर्योगक्षेमः = योग आणि क्षेम यांची इच्छा न करणारा, (च) = आणि, आत्मवान्‌ = अंतःकरण ज्याचे स्वाधीन आहे असा, भव = तू हो ॥ २-४५ ॥

अर्थ –

हे अर्जुना, ‘त्रैगुण्यविषया वेदा ‘ म्हणजे त्रिगुणांनी युक्त असणारे वेद प्रकृतीच्या तीन गुणांबाबतीतच प्रतिपादन करतात. त्यांच्या पुढचे त्यांनाही माहीत नसते. तेव्हा निस्बरैगुण्योभवार्जुन तू त्रिगुणातीत हो. त्रिगुणांच्या अनुभवापलीकडे जा. पण कशा प्रकारे? यावर श्रीकृष्ण म्हणतात ‘ निन्द्वः ‘ सुखदुःखादी दृृंद्रापासून अलिप्त, सतत सात्त्विक गुणांनी संपन्न व योगक्षेमादि स्वार्थात न पडता म्हणजेच त्या संबंधीच्या काळजीतून मुक्त हो आणि आत्म्यात स्थिर हो, आत्मनिष्ठ हो. श्रीकृष्ण म्हणतात, जो अशा प्रकारे त्रिगुणांच्या पलीकडे जाऊन आत्मनिष्ठ बनतो तो, ब्रह्म म्हणजे काय ते जाणू शकतो व ब्रह्माला जाणतो, तोच विप्र होय.

मूळ श्लोक –

यावानर्थे उदपाने सर्वतः सम्प्लुतोदके ।
तावान्सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः ॥ २-४६ ॥

संदर्भित अन्वयार्थ –

सर्वतः = सर्व बाजूंनी, सम्प्लुतोदके = परिपूर्ण असा जलाशय, (प्राप्ते सति) = प्राप्त झाला असताना, उदपाने = लहानशा जलाशयात (माणसाचे), यावान्‌ = जितके, अर्थः = प्रयोजन, (अस्ति) = असते, विजानतः = ब्रह्माला तत्त्वतः जाणणाऱ्या, ब्राह्मणस्य = ब्रह्मज्ञान्याचे, सर्वेषु = समस्त, वेदेषु = वेदांमध्ये, तावान्‌ = तितकेच, (अर्थः) = प्रयोजन, (अस्ति) = असते ॥ २-४६ ॥

अर्थ –

चोहोकडून परिपूर्ण भरलेले जलाशय प्राप्त झालेल्या मनुष्याला लहान जलाशयाची जेवढी उपयुक्तता, जेवढे प्रयोजन असेल तेवढेच ब्रह्म जाणणाऱ्या ज्ञानसंपन्न ब्राह्मणाला वेदांचे प्रयोजन असते. तात्पर्य हेच की जो वेदार्थाचा विचार करुन त्यातील इष्ट तेवढेच ग्रहण करतो, म्हणजेच जो वेदांच्या पलीकडे जातो व जो ब्रह्माला जाणतो तोच ब्राह्मण होय. तेव्हा हे अर्जुना तू सुद्धा असा सात्त्विक गुणांनी संपन्न होऊन वेदांच्या पलीकडे जा व ब्राह्मण बन. अर्जुन जन्माने क्षत्रिय होता आणि येथे श्रीकृष्ण म्हणतात ब्राह्मण बन.

हे कसे काय? ब्राह्मण-क्षत्रिय इत्यादी वर्ण म्हणजे मनुष्य स्वभावातील क्षमतेचे, सामर्थ्याचे नाव आहे. हे वर्ण कर्मप्रधान आहेत. ते जन्माने रूढ होणारी रूढी नव्हे. ज्याला गंगेत डुबण्याची संधी मिळाली त्याला क्षुदध जलाशयाचे काय प्रयोजन? त्या प्रकारे ज्याने ब्रह्माला साक्षात जाणले आहे त्या आत्मसाक्षात्कारी महापुरुषाला, त्या ब्रह्माणाला, वेदांचे तेवढेच महत्त्व असते, तेवढेच त्याचे त्यांना प्रयोजन असते. मात्र त्यांची गरज तर असतेच.

कारण मागून येणाऱ्यांना त्यांची गरज असते. आता येथून कर्मयोगाच्या चर्चेला आरंभ होईल म्हणजे कर्म करताना कोणती दक्षता घेतली पाहिजे, याचे यापुढे श्रीकृष्णांनी प्रतिपादन केले आहे.

मूळ श्लोक –

कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन ।
मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि ॥ २-४७ ॥

संदर्भित अन्वयार्थ –

कर्मणि एव = कर्म करण्याविषयीच, ते = तुला, अधिकारः = अधिकार (आहे), फलेषु = (त्यांच्या) फळांवर, कदाचन = कधीही, मा = नाही (म्हणून), कर्मफलहेतुः = कर्मांच्या फळांचा हेतू, मा भूः = तू होऊ नकोस (तसेच), अकर्मणि = कर्म न करण्याबाबत, (ते) = तुझी, सङ्गः = आसक्ती, मा अस्तु = नको असू देऊस ॥ २-४७ ॥

अर्थ –

हे अर्जुना, तुझा अधिकार फक्त कर्म करणे एवढाच आहे. कर्मफलाचा तुला अधिकार नाही. अरे, तू असे समज की तू केलेल्या कर्मापासून फळ मिळणारच नाही. म्हणून तू कर्मफळाला हेतूभूत होऊ नकोस, म्हणजेच माझ्या कर्माचे अमुक फळ मला मिळाले असा हेतू तू मनात ठेवू नकोस आणि कर्म न करण्याविषयी मनाचा कल होऊ देऊ नकोस.

म्हणजेच कर्माबद्दल अश्रच््ध बनू नकोस. योगश्वर श्रीकृष्णांनी एकोणचाळीसाव्या श्लोकात प्रथम कर्माचा उच्चार केला. परंतु तेथे हे कर्म म्हणजे काय व ते कसे करावे हे सांगितले नाही. त्या कर्माच्या वैशिष्ट्यांवर या एलोकात विवरण केले आहे.

(१) हे अर्जुना, अशा प्रकारच्या कर्मामुळे तू सर्व प्रकारच्या बंधनातून मुक्त होशील.

(२) अर्जुना, या कर्मात बीजाचा नाश होत नाही. कर्माचा आरंभ केल्यानंतर त्या कर्माला नष्ट करण्याची शक्ती प्रकृतीजवळ नाही.

(३ ) अर्जुना, स्वर्ग, क्रद्धी, सिद्धी प्राप्त करून देणारे मर्यादित फलरूपी दोषही या कर्मामध्ये नाहीत.

(४) या कर्माच्या अल्प आचरणाने मनुष्याचा जन्म-मृत्यु सारख्या भयावह संकटातून बचाव होतो. त्याचा उद्धार होतो. परंतु श्रीकृष्णांनी ते कर्म आहे कसे हे अद्याप सांगितलेले नाही. ते याच अध्यायातील एक्केचाळीसाव्या श्लोकात त्यांनी सांगितले आहे.

(५ ) अर्जुना, यात निश्चयात्मक बुद्धी एकच असते, कृतीही एकच असते. ज्यांची बुद्धी अनंत भेदांनी युक्त असते, त्यांच्या क्रीयाही अनेक असतात. असे लोक भगवंताचे भजन करू शकत नाहीत का? यावर श्रीकृष्ण म्हणतात की अनंत भेदांनी युक्त असणाऱया लोकांच्या बुद्धीला अनेक शाखा फुटलेल्या असतात व हे लोक वेदांच्या पुष्पक-रोचक वाणीत त्या क्रीयांचे प्रतिपादन करत असतात. या त्यांच्या वाणीचा प्रभाव ज्यांच्यावर पडतो त्यांची बुद्धी नष्ट होते. म्हणून निश्चयात्मक क्रिया एकच असते, परंतु येथे ती क्रिया कोणती ते मात्र सांगितले नाही.

सत्तेचाळीसाव्या श्लोकात श्रीकृष्ण म्हणतात कर्म करण्यातच तुझा अधिकार आहे, पण त्याचे फळ भोगण्याचा किंवा फळाची अपेक्षा करण्याचा तुझा अधिकार नाही. तेव्हा तू फळाची आसक्ती धरू नकोस व कर्म करण्यास अश्रद्ध बनू नकोस. निरन्तर आत्म्याच्या ठिकाणी रत राहा. परंतु कर्म म्हणजे काय हे येथे सांगितलेले नाही. साधारणत: लोक हा श्‍लोक उधृत करतात व म्हणतात काहीही करा पण त्याच्या फळाची अपेक्षा करू नका. बस्स! झाला निष्काम कर्म योग! पण श्रीकृष्णांनी अद्याप कोणते कर्म करावे हे सांगितलेले नाही. येथे फक्त कर्म काय देते व ते करताना कोणती दक्षता घ्यावी यावर श्रीकृष्णांनी येथे फक्त प्रकाश टाकला आहे. मूळ प्रश्न कर्म म्हणजे काय? तो अजून तसाच आहे. त्याचे विवरण श्रीकृष्णांनी अध्याय तीन व चारमध्ये केले आहे.

मूळ श्लोक –

योगस्थः कुरु कर्माणि सङ्गं त्यक्त्वा धनञ्जय ।
सिद्ध्यसिद्ध्योः समो भूत्वा समत्वं योग उच्यते ॥ २-४८ ॥

संदर्भित अन्वयार्थ –

धनञ्जय = हे धनंजय अर्जुना, सङ्गम्‌ = आसक्ति, त्यक्त्वा = सोडून देऊन, (च) = तसेच, सिद्ध्यसिद्ध्योः = सिद्धी आणि असिद्धी यांचे बाबतीत, समः भूत्वा = समान बुद्धी बाळगून, योगस्थः = योगामध्ये स्थित होऊन, कर्माणि = कर्तव्य कर्मे, कुरु = तू कर, समत्वम्‌ = समत्वालाच, योगः = योग (असे), उच्यते = म्हटले जाते ॥ २-४८ ॥

अर्थ –

हे धनंजया कर्मफलाची आसक्ती सोडून, अभिलाषा सोडून, यशापयशाविषयी समतोल बुद्धी ठेवून तू कर्म कर. कोणते कर्म? तर निष्काम कर्म कर..’समत्वं योग उच्यते’ – म्हणजे मनाच्या या समतोलपणालाच योग असे म्हणतात. ज्या कर्माविषयी मनात विषम भावना नाही त्याला समबुद्धी असे म्हणतात. क्रद्धी, सिद्धी किंवा कर्माविषयीची आसक्ती मनाचा समतोलपणा बिघडवत असतात. फळाची इच्छा-फळाची अभिलाषा मनात विषमता निर्माण करत असतात. त्यासाठी अर्जुना, फलाची अभिलाषा धरू नकोस, पण कर्म करण्यात अश्रद्धही होऊ नकोस. समोर दिसलेल्या किंवा न दिसणाऱ्या सर्व वस्तुविषयीच्या आसक्तीचा त्याग करून, कर्मापासून होणारी प्राप्ती-अप्राप्ती यांचा विचार न करता फक्त योगयुक्त होऊन, तू कर्म कर. योगामुळे चित्त विचलित होत नाही.

योग ही एक परम स्थिती आहे आणि ती प्रारम्भिक स्थितीही आहे. प्रारंभी आपली दृष्टी लक्ष्यावर असायला हवी. म्हणून योगावर दृष्टी ठेवून कर्माचे आचरण केले पाहिजे. समत्वभाव म्हणजे पूर्ण किंवा अपूर्ण कर्माबद्दल समभाव ठेवणे. यालाच योग म्हणतात. कर्माच्या यशापयशाने ज्यांची बुद्धी विचलित बनत नाही, ज्यांच्या मनात हर्ष-खेद म्हणजेच विषम भाव निर्माण होत नाही त्या समबुद्धीलाच योग असे म्हणतात. विषमस्थितीत मनाचा समतोल बिघडत नाही म्हणून याला समत्व योग असे म्हणतात. सर्व अभिलाषांचा येथे त्याग आहे, म्हणून याला निष्काम कर्मयोग असे म्हटले गेले आहे. कर्म करावयाचे आहे म्हणून त्याला कर्मयोग म्हटले जाते.

येथे कर्म करताना कृष्णार्पण वृती ठेवावी लागते. ही कृष्णार्पण वृती म्हणजे समर्पणाची वृती. यामुळे या प्रक्रीयेला योग असे म्हणतात. या कर्मयोगात बौद्धिक पातळीवर अत्यंत दक्ष राहावे लागते, कारण यशापयशा विषयी मनाचा समतोल ठेवणे, कर्माविषयी आसक्ती न ठेवणे, कर्मफलाची अभिलाषा न राखणे, महत्वाचे असते व यालाच निष्काम कर्मयोग किंवा बुद्धियोग असे म्हणतात.

क्रमशः श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग २४.

लेखन/माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

Leave a comment