श्रीमद् भगवद् गीता भाग २६ –
अध्याय २ – सांख्ययोग – श्लोक क्र.२.५३ ते २.५६ | श्रीमद् भगवद् गीता भाग २६.
मूळ श्लोक –
श्रुतिविप्रतिपन्ना ते यदा स्थास्यति निश्चला ।
समाधावचला बुद्धिस्तदा योगमवाप्स्यसि ॥ २-५३ ॥
संदर्भित अन्वयार्थ –
श्रुतिविप्रतिपन्ना = तऱ्हेतऱ्हेची वचने ऐकल्यामुळे विचलित झालेली, ते = तुझी, बुद्धिः = बुद्धी, यदा = जेव्हा, समाधौ = परमात्म्याच्या ठिकाणी, निश्चला = अचल, (च) = व, अचला = स्थिर, स्थास्यति = राहील, तदा = तेव्हा, योगम् अवाप्स्यसि = योग तुला प्राप्त होईल म्हणजे परमात्म्याशी तुझा नित्य संयोग होईल ॥ २-५३ ॥
अर्थ –
अनेक प्रकारच्या वेदवाक्यांमुळे व वेदातील कर्मफलांच्या श्रवणामुळे विचलित झालेली, चंचल झालेली तुझी बुद्धी जेव्हा निश्चल होऊन परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी, समाधिसुखाच्या ठिकाणी स्थिर होईल तेव्हा तुला बुद्धियोगाची प्राप्ती होईल. ज्याला ‘ अनामय परमपद ‘ म्हणतात ती समत्व स्थिती तुला प्राप्त होईल. हीच योगातील परम स्थिती आहे आणि हीच अप्राप्याची प्राप्ती आहे. वेदांपासून ज्ञान तर प्राप्त होतेच;
परंतु श्रीकृष्ण म्हणतात ‘ श्रुतिविप्रतिपन्ना ‘ वेदांतील अनेक सिद्धांत, कर्मफले ऐकून बुद्धी विचलित होते. सिद्धांत तर अनेकजण ऐकतात, पण जे ऐकणे योग्य आहे ते मात्र लोक ऐकत नाहीत. अशी ही चंचल बुद्धी जेव्हा समाधिसुखाच्या ठिकाणी स्थिर होईल तेव्हा तुला योगातील सर्वोच्च असे अमृत पद प्राप्त होईल. श्रीकृष्णाच्या या बोलण्याने अर्जुनाची जिज्ञासा जागृत होणे स्वाभाविक होते. समाधिसुखाची प्राप्ती करुन घेणारे महापुरूष कसे असतात? त्यांची बुद्धी स्थिर असते म्हणजे कशी असते? स्थितप्रज्ञ कोणाला म्हणायचे? अर्जुनाच्या मनात अशी जिज्ञासा निर्माण झाली म्हणून त्याने प्रश्न केला-
मूळ श्लोक –
अर्जुन उवाच
स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव ।
स्थितधीः किं प्रभाषेत किमासीत व्रजेत किम् ॥ २-५४॥
संदर्भित अन्वयार्थ –
अर्जुन = अर्जुन, उवाच = म्हणाला, केशव = हे केशवा, समाधिस्थस्य स्थितप्रज्ञस्य = परमात्म्याला प्राप्त करून घेतलेल्या स्थिरबुद्धी अशा पुरुषाचे, भाषा = लक्षण, का = काय, स्थितधीः = तो स्थिरबुद्धी पुरुष, किम् = कसा, प्रभाषेत = बोलत असतो, किम् = कसा, आसीत = बसत असतो, (च) = आणि, किम् = कसा, व्रजेत = चालत असतो ॥ २-५४ ॥
अर्थ –
ज्या ठिकाणी चित्ताला निरंतर समाधान प्राप्त होते तो आत्मा म्हणजेच समाधी होय. अनादि तत्त्वामध्ये जो समत्व प्राप्त करतो, समत्त्व बुद्धिने वागतो त्याला स्थितप्रज्ञ म्हणतात. अर्जुन म्हणाला, हे केशवा , समाधिस्थितीत असणाऱ्या, स्थिर बुद्धी असणाऱया महापुरुषाची काय लक्षणे आहेत? स्थितप्रज्ञ पुरुष कसा बोलतो? तो कसा बसतो? तो कसा चालतो? अर्जुनाने हे चार प्रश्न विचारले त्यावर स्थितप्रज्ञाची लक्षणे सांगताना श्रीकृष्ण पुढे म्हणतात-
मूळ श्लोक –
श्रीभगवानुवाच
प्रजहाति यदा कामान्सर्वान्पार्थ मनोगतान् ।
आत्मन्येवात्मना तुष्टः स्थितप्रज्ञस्तदोच्यते ॥ २-५५ ॥
संदर्भित अन्वयार्थ –
श्रीभगवान = भगवान श्रीकृष्ण, उवाच = म्हणाले, पार्थ = हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), यदा = जेव्हा, (अयं पुरुषः) = हा पुरुष, मनोगतान् = मनातील, सर्वान् = संपूर्ण, कामान् = कामनांचा, प्रजहाति = पूर्णपणे त्याग करतो, (च) = आणि, आत्मना = आत्म्याने, आत्मनि एव = आत्म्यामध्येच, तुष्टः = संतुष्ट होऊन राहातो, तदा = तेव्हा, स्थितप्रज्ञः = तो पुरुष स्थितप्रज्ञ उच्यते = म्हटला जातो ॥ २-५५ ॥
अर्थ –
हे पार्था, मनुष्य जेव्हा मनामध्ये असलेल्या सर्व ईच्छांचा त्याग करुन तो आपल्या स्वस्वरूपाच्या ठिकणी संतुष्ट असतो, अशा व्यक्तीला स्थितप्रज्ञ असे म्हणतात. सर्व वासनांचा त्याग केल्यानंतरच आत्म्याचे दर्शन होते, अशा स्थिर बुद्धीच्या पुरुषाला स्थितप्रज्ञ असे म्हणतात. मनामध्ये असलेल्या इच्छांचा त्याग केल्यानंतरच आत्म्याचा साक्षात्कार होत असतो. अशा आत्माराम, आत्मतृप्त, महापरूषाला स्थितप्रज्ञ म्हणतात.
मूळ श्लोक –
दुःखेष्वनुद्विग्नमनाः सुखेषु विगतस्पृहः ।
वीतरागभयक्रोधः स्थितधीर्मुनिरुच्यते ॥ २-५६ ॥
संदर्भित अन्वयार्थ –
दुःखेषु = दुःखांची प्राप्ती झाली असताना, अनुद्विग्नमनाः = ज्याच्या मनात उद्वेग येत नाही, सुखेषु = सुखांच्या प्राप्तीच्या बाबतीत, विगतस्पृहः = जो सर्वथा निस्पृह आहे, (तथा) = तसेच, वीतरागभयक्रोधः = ज्याची आसक्ती, भय व क्रोध हे नष्ट होऊन गेले आहेत असा, मुनिः = मुनी, स्थितधीः = स्थिरबुद्धी, उच्यते = म्हटला जातो ॥ २-५६ ॥
अर्थ –
दैहिक, दैविक व भौतिक दुःखानी ज्याचे मन विषण्ण होत नाही, सुख प्राप्त झाली असता जो त्यांच्याविषयी निरिच्छ असतो व ज्यांचे मोह, भय, क्रोध हे नष्ट झालेले असतात, मानसिक तर्क करण्याचा टप्पा ज्याने ओलांडलेला असतो, अशा पुरुषाला स्थितप्रज्ञ मुनी म्हणावे. स्थितप्रज्ञाची अन्य लक्षणे सांगताना श्रीकृष्ण म्हणतात.
क्रमशः
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.