श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग २७

श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग २७

श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग २७ –

अध्याय २ – सांख्ययोग – श्लोक क्र.२.५७ ते २.६० | श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग २७.

मूळ श्लोक –

यः सर्वत्रानभिस्नेहस्तत्तत्प्राप्य शुभाशुभाम्‌ ।
नाभिनन्दति न द्वेष्टि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ॥ २-५७ ॥

संदर्भित अन्वयार्थ –

यः = जो पुरुष, सर्वत्र = सर्वत्र, अनभिस्नेहः = स्नेहरहित असून, तत्‌ तत्‌ = त्या त्या, शुभाशुभाम्‌ = शुभ किंवा अशुभ वस्तू, प्राप्य = प्राप्त झाल्यावर, न अभिनन्दति = प्रसन्न होत नाही, (तथा) = तसेच, न द्वेष्टि = द्वेष करीत नाही, तस्य = त्याची, प्रज्ञा = बुद्धी, प्रतिष्ठिता = स्थिर आहे ॥ २-५७ ॥

अर्थ –

जो पुरुष सर्वत्र स्नेहरहित झालेला असतो म्हणजे जो सर्व गोष्टींत अनासक्त असतो, शुभ किंवा अशुभ प्राप्त झाले असता ज्याला आनंद किंवा विषाद होत नाही त्याची बुद्धी स्थिर झाली असे समजावे. जे परमात्मस्वरूप आहे, जे मनाला परमात्म्याची आस लावते, ते शुभ! आणि जे जड प्रकृतीकडे नेते, मनाला आसक्त करते ते अशुभ आहे असे समजावे. परंतु स्थितप्रज्ञ पुरुष मात्र सानुकूल परिस्थितीने ना प्रसन्न होतो, ना प्रतिकूल परिस्थितीने तो विषण्ण बनतो. कारण प्राप्त होणार्‍या वस्तू त्याला स्वत:पेक्षा भिन्न वाटत नाहीत. कारण त्याविषयी तो संपूर्ण निरीच्छ झालेला असतो; तर पतित करणारे विकारही त्याला विचलित करु शकत नाहीत. म्हणजेच साधनेचे त्याला आता काही प्रयोजन उरलेले नसते. अशा व्यक्तीलाच स्थितप्रज्ञ म्हणतात.

मूळ श्लोक –

यदा संहरते चायं कूर्मोऽङ्गानीव सर्वशः ।
इन्द्रियाणीन्द्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ॥ २-५८ ॥

संदर्भित अन्वयार्थ –

च = आणि, कूर्मः = कासव, सर्वशः = सर्व बाजूंनी, अङ्गानि = (आपले) अवयव, इव = ज्याप्रमाणे (आत ओढून घेते, त्याप्रमाणे), यदा = जेव्हा, अयम्‌ = हा पुरुष, इन्द्रियार्थेभ्यः = इंद्रियांच्या विषयांपासून, इन्द्रियाणि = (आपली) इंद्रिये, (सर्वशः) = सर्व प्रकाराने, संहरते = आवरून घेतो, (तदा) = तेव्हा, तस्य = त्याची, प्रज्ञा = बुद्धी, प्रतिष्ठिता = स्थिर आहे (असे समजावे) ॥ २-५८ ॥

अर्थ –

ज्याप्रकारे कासव आपल्या अवयवांना आवरून घेवू शकते त्याप्रमाणे स्थितप्रज्ञ व्यक्ती स्थिर असल्यामुळे आपल्या चंचल इंद्रियांना सर्व बाजूंनी आवरून घेवू शकते. पुढे धोका दिसताच, संकट दिसताच कासव ज्याप्रमाणे आपले डोके व पाय आवरून घेते; त्या प्रकारे तो पुरुष विषयांमध्ये आसक्त होणाऱ्या आपल्या इंद्रियांना सर्व बाजूंनी आवरून घेऊन आपल्या हृदयरूपी देशात त्यांना बंदिस्त करून ठेवतो. त्यावेळी त्याची बुद्धी स्थिर असते. परंतु कासवाचे येथे फक्त उदाहरण आहे. कारण संकट टळताच कासव आपली इंद्रिये पुन्हा पसरून असते. मग स्थितप्रज्ञ महापुरुष पुन्हा विषयात आसक्त होतो का? यावर श्रीकृष्ण म्हणतात-

मूळ श्लोक –

विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः ।
रसवर्जं रसोऽप्यस्य परं दृष्ट्वा निवर्तते ॥ २-५९ ॥

संदर्भित अन्वयार्थ –

निराहारस्य = इंद्रियांच्या द्वारा विषयांचे ग्रहण न करणाऱ्या, देहिनः = पुरुषांच्या बाबतीत, विषयाः = (केवळ) विषयच, विनिवर्तन्ते = निवृत्त होतात, (किंतु) = परंतु, रसवर्जम्‌ = विषयातील आसक्ती निवृत्त होत नाही, अस्य = या स्थितप्रज्ञ पुरुषाची तर, रसः अपि = आसक्तीसुद्धा, परम्‌ = परमात्म्याचा, दृष्ट्वा = साक्षात्कार झाल्यामुळे, निवर्तते = संपूर्णपणे निवृत्त होऊन जाते ॥ २-५९ ॥

अर्थ –

विषयांपासून इंद्रियांचा निग्रह करणार्‍या पुरुषाचे विषय निवृत्त होतात. कारण त्या विषयांचे तो ग्रहण करीत नाहीत. परंतु त्याची विषयांबद्दल असणारी गोडी मात्र नाहीशी होत नाही. ती मनात चळवळत असते. पण विषयांपासून सर्व इंद्रियांना आवरून घेणाऱया निष्कामी पुरुषाला ‘ परंदृष्टवा ‘ परमतत्त्व परमात्म्याचा साक्षात्कार होताच ही त्याची गोडीही नाहीशी होते. महापुरुष कासवाप्रमाणे आपल्या इंद्रियांना आवरून पुन्हा पसरत नाहीत.

एकदा इंद्रियांना आवरून घेतले की त्याची प्रवृत्तीच तेथे संपते. संस्कार संपतात. पुन्हा ते उदभवत नाहीत. निष्काम कर्मयोगाच्या आचरणद्वारा परमात्म्याच्या परम साक्षात्कारा-बरोबरच त्या पुरुषाची विषयांबद्दल असणारी ओढ नष्ट होत असते. साधारणतः ध्यानमार्गावर मार्गस्थ असणारा साधक हठयोगाने इंद्रियांचा निग्रह करुन तो विषयांपासून निवृत्त होत असतो; परंतु त्याच्या मनामध्ये त्याचे चिंतन सुरू असते. ही त्याची विषयांबद्दलची आसक्ती “परं दृष्टवा’ परमेश्वराच्या साक्षात्कारानंतर नाहीशी होते. त्यापूवी ती नाहीशी होत नाही.

“पूज्य महाराज ‘ या संबंधीची स्वतःच्या जीवनात घडलेली एक गोष्ट सांगत असत. गृह-त्याग करण्यापूर्वी तीन वेळा आकाशवाणी झाली होती. आम्ही विचारले- ” महाराज, आपल्यासाठी आकाशवाणी का झाली? आमच्यासाठी कधी झाली नाही.” तेव्हा महाराज उत्तरले ‘हो! ई शका मोडूं के भई रही’ म्हणजे माझ्याही मनात ही शंका आली होती. मग मला प्रत्यंतर आल्यावर समजले की गेल्या सात जन्मांपासून मी साधूच आहे.

पहिल्या चार जन्मांत तर मी फक्त साधूचा वेष धारण केला होता. कपाळावर टिळा लावून, अंगाला विभूती फासून, हातात कमंडलू घेवून मी भ्रमण करीत असे. योगक्रियेची मला काहीच माहिती नव्हती. परंतु गेल्या तीन जन्मांपासून साधू जसा असायला हवा तसा मी साधू आहे. माझ्यात योगक्रिया जागृत होती. गेल्या जन्मापासून मन भवसागर पार होऊ लागले होते. विषयांबद्दलची आसक्ती नष्ट होऊ लागली होती. परंतु दोन इच्छा मनात जागृत होत्या स्त्री व गांजा यांचा उपभोग घेण्याची इच्छा अतृप्त राहिली होती. म्हणून मला जन्म घ्यायला लागला. जन्म घेतल्यानंतर थोड्या दिवसांनी देवाने माझ्या अतृप्त इच्छा पूर्ण करून मला निवृत केले. दोन-तीनदा इच्छित गोष्टींचा स्वाद चाखायला दिला आणि मग मला साधू बनवून टाकले.

हीच गोष्ट येथे श्रीकृष्ण सांगतात की, इंद्रियांच्याद्वारे विषयभोग ग्रहण न करणारे पुरुषसुद्धा विषयांपासून निवृत्त होतात; परंतु साधनेद्वारा परम पुरुष परमात्म्याचा साक्षात्कार करून घेतल्यानंतर विषयांबाबत मनात असणारी ओढ नाहीशी होते व म्हणून जोपर्यंत त्या परमेश्वराचा साक्षात्कार होत नाही तोपर्यंत ‘कर्म’ करावे लागते.

उर कछु प्रथम बासना रही ।
प्रभु पद प्रीति सरित सो बही ।।
( रामचरितमानस, ५/४८/६)
इंद्रियांना विषयांपासून परावृत करणे, आवरून घेणे कठीण आहे याबाबत श्रीकृष्ण म्हणतात-

मूळ श्लोक –

यततो ह्यपि कौन्तेय पुरुषस्य विपश्चितः ।
इन्द्रियाणि प्रमाथीनि हरन्ति प्रसभं मनः ॥ २-६० ॥

संदर्भित अन्वयार्थ –

कौन्तेय = हे कुंतीपुत्र अर्जुना, हि = आसक्तीचा नाश न झाल्यामुळे, प्रमाथीनि = विक्षुब्ध करण्याचा स्वभाव असणारी, इन्द्रियाणि = इंद्रिये (ही), यततः = प्रयत्‍न करणाऱ्या, विपश्चितः = बुद्धिमान, पुरुषस्य = पुरुषाचे, मनः अपि = मनसुद्धा, प्रसभम्‌ = जबरदस्तीने, हरन्ति = हरण करून घेतात ॥ २-६० ॥

अर्थ –

हे अर्जुना, बुद्धी स्थिर होण्यासाठी निग्रहाने प्रयत्न करीत असलेल्या विवेकी, ज्ञानी पुरषांच्या मनालाही ती उच्छंखल इंद्रिये जबरदस्तीने ओढून नेतात तेव्हा त्यासाठी-

क्रमशः

लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

Leave a comment