श्रीमद् भगवद् गीता भाग २८ –
अध्याय २ – सांख्ययोग – श्लोक क्र.२.६१ ते २.६४ | श्रीमद् भगवद् गीता भाग २८.
मूळ श्लोक –
तानि सर्वाणि संयम्य युक्त आसीत मत्परः ।
वशे हि यस्येन्द्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ॥ २-६१ ॥
संदर्भित अन्वयार्थ –
(अतः) = म्हणून, तानि सर्वाणि = ती सर्व इंद्रिये, संयम्य = वश करून घेऊन, (साधकः) = साधकाने, युक्तः = चित्त स्थिर करून, मत्परः = माझा आधार घेऊन, आसीत = ध्यानाला बसावे, हि = कारण, यस्य = ज्या पुरुषाची, इन्द्रियाणि = इंद्रिये (ही), वशे = त्याला वश असतात, तस्य = त्याची, प्रज्ञा = बुद्धी, प्रतिष्ठिता = स्थिर होऊन राहाते ॥ २-६१ ॥
अर्थ –
अर्जुना, इंद्रियांचे दमन करून, योगयुक्त होऊन, चित्त माझ्या ठिकाणी समपर्ण करून तू मला शरण ये, कारण ज्या पुरुषांची इंद्रिये त्याच्या स्वाधीन असतात त्याची बुद्धी स्थिर आहे असे समज. या ठिकाणी योगेश्वर कृष्ण योगसाधनेत अडसररूप ठरणाऱ्या इंद्रियांचा निषेध करीत साधनेच्या विधायक पैलूवर भर देत आहेत. केवळ संयम व निषेध करून इंद्रिये संपूर्ण स्वाधीन राहत नाहीत, ती संपूर्ण वश होत नाहीत व म्हणून समर्पणाबरोबर त्या परमेश्वराचे इष्ट-चिंतनसुद्धा अत्यंत अनिवार्य आहे. इष्ट चिंतन नसेल तर मनात विषयांचे चिंतन केले जाईल व त्याचे दुष्परिणाम काय होतात ते श्रीकृष्णांच्याच शब्दात पाहू.
मूळ श्लोक –
ध्यायतो विषयान्पुंसः सङ्गस्तेषूपजायते ।
सङ्गात्सञ्जायते कामः कामात्क्रोधोऽभिजायते॥ २-६२ ॥
संदर्भित अन्वयार्थ –
विषयान् = विषयांचे, ध्यायतः = चिंतन करणाऱ्या, पुंसः = पुरुषाची, तेषु = त्या विषयांमध्ये, सङ्गः = आसक्ती, उपजायते = उत्पन्न होते, सङ्गात् = त्या आसक्तीमुळे, कामः = (त्या विषयांची) कामना, सञ्जायते = निर्माण होते, (च) = आणि, कामात् = कामनेमध्ये विघ्न आल्यामुळे, क्रोधः = क्रोध, अभिजायते = उत्पन्न होतो ॥ २-६२ ॥
अर्थ –
विषयांचे चिंतन करणाऱया पुरुषाला विषयाविषयी आसक्ती निर्माण होते. आसक्तीमुळे काम निर्माण होतो. व कामपूर्ती मध्ये जर काही व्यवधान आले, अडचण निर्माण झाली तर क्रोध निर्माण होतो. आता हा क्रोध कोणाला जन्म देतो.
मूळ श्लोक –
क्रोधाद्भवति सम्मोहः सम्मोहात्स्मृतिविभ्रमः ।
स्मृतिभ्रंशाद् बुद्धिनाशो बुद्धिनाशात्प्रणश्यति ॥ २-६३ ॥
संदर्भित अन्वयार्थ –
क्रोद्धात् = क्रोधामुळे, सम्मोहः = अत्यंत मूढभाव, भवति = उत्पन्न होतो, सम्मोहात् = मूढभावामुळे, स्मृतिविभ्रमः = स्मृतीमध्ये भ्रम होतो, स्मृतिभ्रंशात् = स्मृतीमध्ये भ्रम निर्माण झाल्यामुळे, बुद्धिनाशः = बुद्धीचा नाश म्हणजे ज्ञानशक्तीचा नाश होतो, (च) = आणि, बुद्धिनाशात् = बुद्धीचा नाश झाल्यामुळे, (सः पुरुषः) = तो पुरुष, प्रणश्यति = आपल्या स्थितीपासून च्युत होतो ॥ २-६३ ॥
अर्थ –
क्रोधामुळे विवेकाची कास सुटून जाते. तेथे अविवेक निर्माण होतो. नित्य-अनित्य वस्तूचा विचार राहत नाही. कार्याविषयीचा विवेक राहत नाही. संमोह निर्माण होतो. या संमोहापासून-अविवेकापासून स्मृतिभ्रंश होतो. विस्मरण होते. ( जसे अर्जुनाला झाले ‘ भ्रमतीव च मे मन:। काय करू आणि काय नको याचा मी निर्णय घेऊ शकत नाही ) विस्मरणाने, स्मृती भ्रमिष्ट होण्याने ‘योग-परायण बुद्धी नष्ट होते आणि बुद्धिनाश झाल्याने त्या पुरुषाच्या सर्वस्वाचा नाश होतो.
येथे श्रीकृष्णांनी विषयांचे चिंतन करू नये यावर भर दिला आहे. साधकाने ईश्वराच्या नामरूपाचे, त्याच्या लीलांचे, ईश्वरधामाचे सतत चिंतन केले पाहिजे. आपले मन-बुद्धी त्याच्या ठिकाणीच समर्पित केली पाहिजे. जर ईश्वरसाधनेत टाळाटाळ केली, आळस केला तर चंचल मन पुन्हा विषयांकडे खेचले जाईल. या विषयांच्या चिंतनाने त्यांच्याविषयी पुन्हा आसक्ती निर्माण होईल. आसक्तीमुळे त्या विषयाची कामना साधकाच्या अंतर्मनात उत्पन्न होईल. या कामनापूर्तीमध्ये काही विध्न, काही अडचण, निर्माण झाली तर मग क्रोध निर्माण होईल. क्रोधापासून अविचार, अविचारापासून स्मृतिभ्रंश आणि स्मृतिभ्रंशापासून बुद्धी नष्ट होते. निष्काम कर्मयोगालाच बुद्धियोग असे म्हंटले जाते. कारण मनात अभिलाषा निर्माण होऊ नये, फलाची अपेक्षा ठेवू नये, अभिलाषा निर्माण झाल्यानेच बुद्धियोग नष्ट होतो; या सर्व गोष्टींचा विचार बुद्धीच्या पातळीवर करावयाचा असतो- ‘ साधन करिय विचारहीन मन शुद्ध होय नहि तैसे। ( विनयपत्रिका, पद संख्या ११५/३ )
म्हणून विवेक असणे अत्यंत आवश्यक आहे. कारण विचारहीन पुरुष श्रेय साधनापासून भ्रष्ट होतो, त्याच्या सर्वस्वाचा नाश होतो. विषयाभिमुख साधकाची अशी अवस्था होत असते, परंतु ज्याची इंद्रिये त्याच्या पुर्ण ताब्यात असतात त्यांना कोणती गती प्राप्त होते हे सांगताना श्रीकृष्ण म्हणतात-
मूळ श्लोक –
रागद्वेषवियुक्तैस्तु विषयानिन्द्रियैश्चरन् ।
आत्मवश्यैर्विधेयात्मा प्रसादमधिगच्छति ॥ २-६४ ॥
संदर्भित अन्वयार्थ –
तु = परंतु, विधेयात्मा = ज्याने अंतःकरण आपल्या स्वाधीन करून घेतले आहे असा साधक, आत्मवश्यैः = स्वतःला वश असणाऱ्या, रागद्वेषवियुक्तैः = राग व द्वेष यांनी रहित असणाऱ्या अशा, इन्द्रियैः = इंद्रियांच्या द्वारा, विषयान् = विषयांमध्ये, चरन् = वावर करीत, प्रसादम् = अंतःकरणाची आध्यात्मिक प्रसन्नता, अधिगच्छति = प्राप्त करून घेतो ॥ २-६४ ॥
अर्थ –
राग द्वेषरहित व पूर्णपणे स्वाधीन असलेल्या इंद्रियांनी विषयांचा उपभोग घेणारा व ज्याचे मन त्याच्या पुर्णपणे स्वाधीन आहे असा आत्मानंदात तल्लीन असणाऱ्या व शुद्ध आत्मस्वरुप होऊन राहणार्या पुरुषाला मनाची प्रसन्नता प्राप्त होते. अशा महापुरुषाला कशाचाच विधि-निषेध असत नाही. त्याच्यासाठी कोणतीच गोष्ट अशुभ असत नाही की, जिच्यापासून त्याने स्वतःचा बचाव करावा किंवा ज्या गोष्टीची त्याने अभिलाषा धरावी, अशी काही शुभ गोष्टही त्याच्यासाठी असत नाही.
क्रमश: श्रीमद् भगवद् गीता भाग २८.
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.