श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग २९

श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग २९

श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग २९ –

अध्याय २ – सांख्ययोग – श्लोक क्र.२.६५ ते २.६८ | श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग २९.

मूळ श्लोक –

प्रसादे सर्वदुःखानां हानिरस्योपजायते ।
प्रसन्नचेतसो ह्याशु बुद्धिः पर्यवतिष्ठते ॥ २-६५ ॥

संदर्भित अन्वयार्थ –

प्रसादे = अंतःकरणातील प्रसन्नता आल्यावर, अस्य = याच्या, सर्वदुःखानाम्‌ = संपूर्ण दुःखांचा, हानिः = अभाव, उपजायते = होऊन जातो, (च) = आणि, प्रसन्नचेतसः = प्रसन्नचित्त असणाऱ्या कर्मयोग्याची, बुद्धिः = बुद्धी, आशु हि = लौकरच (सर्व बाजूंनी निवृत्त होऊन एका परमात्म्यामध्येच), पर्यवतिष्ठते = उत्तम प्रकारे स्थिर होऊन जाते ॥ २-६५ ॥

अर्थ –

भगवतस्वरूप झालेल्या पुरुषाचे चित्त प्रसन्न झाले असता त्याच्या सर्व दुःखांचा नाश होतो. ‘ दुःखालयम अशाश्वतम ‘ त्याला संसार असार वाटतो-तुच्छा वाटतो आणि मग प्रसन्न चित्त पुरुषाची बुद्धी परमात्मस्वरुपी लवकर स्थिर होते. परंतु जो योगमुक्त असत नाही, त्याचे वर्णन करताना

श्रीकृष्ण म्हणतात-

मूळ श्लोक –

नास्ति बुद्धिर‍युक्तस्य न चायुक्तस्य भावना ।
न चाभावयतः शान्तिरशान्तस्य कुतः सुखम्‌ ॥ २-६६ ॥

संदर्भित अन्वयार्थ –

अयुक्तस्य = ज्यांनी मन व इंद्रिये जिंकलेली नाहीत, अशा पुरुषांच्या ठिकाणी, बुद्धिः = निश्चयात्मिका बुद्धी, न अस्ति = असत नाही, च = आणि, अयुक्तस्य = अशा अयुक्त मनुष्याच्या अंतःकरणात, भावना = भावनासुद्धा, न = असत नाही, च = तसेच, अभावयतः = भावनाहीन मनुष्याला, शान्तिः न = शांती मिळत नाही, (च) = आणि, अशान्तस्य = शांतिरहित मनुष्याला, सुखम्‌ = सुख, कुतः = कोठून, (भविष्यति) = प्राप्त होईल ॥ २-६६ ॥

अर्थ –

योग-साधनरहित पुरुषाच्या अंतःकरणात निष्काम कर्मयुक्त बुद्धी असत नाही. त्याच्या अंतःकरणात भाव असत नाही. म्हणजे त्याचे मन आत्मस्वरूपी स्थिर असत नाही. जो असा भावनारहित आहे अशा पुरुषाला शांती कोठून मिळणार? आणि जो अशांत आहे, शातिरहित आहे त्याला सुख कोठून प्राप्त होणार? योगसाधना केल्याने, काही प्रत्यंतर आल्यानंतरच स्थिर बुद्धिची इच्छा निर्माण होते. ‘जाने बिनु न होड परतीति’ भावनेशिवाय शांती मिळत नाही व शांतिरहित पुरुषाला सुखाची अर्थात शाश्वत सनातनची प्राप्ती होत नाही.

मूळ श्लोक –

इन्द्रियाणां हि चरतां यन्मनोऽनुविधीयते ।
तदस्य हरति प्रज्ञां वायुर्नावमिवाम्भसि ॥ २-६७ ॥

संदर्भित अन्वयार्थ –

हि = कारण, इव = ज्याप्रमाणे, अम्भसि = पाण्यात चालणाऱ्या, नावम्‌ = नावेला, वायुः = वायू हा, हरति = हरण करून नेतो (त्याप्रमाणे), चरताम्‌ = विषयांमध्ये वावरणाऱ्या, इंद्रियाणाम्‌ = इंद्रियांपैकी, मनः = मन, यत्‌ = ज्या (इंद्रियाच्या), अनु = बरोबर, विधीयते = राहते, तत्‌ = ते (एकच इंद्रिय), अस्य = या (अयुक्त) पुरुषाच्या, प्रज्ञाम्‌ = बुद्धीला, (हरति) = हरण करून घेते ॥ २-६७ ॥

अर्थ –

ज्याप्रमाणे सोसाट्याच्या वाऱ्याने पाण्यातील नाव भलतीकडेच ओढून नेली जाते, त्याप्रमाणेच विषयांच्या मागे धावणाऱ्या इंद्रियांपैकी ज्या इंद्रियाबरोबर मन राहते ते एक इंद्रिय जरी स्वतःची तृप्ती करण्यात गुंतले असले; तरी बुद्धीला हरण करते. म्हणून साधकाने योगाचे आचरण अवश्य करावे. आचरणावर भर देताना श्रीकृष्ण म्हणतात-

मूळ श्लोक –

तस्माद्यस्य महाबाहो निगृहीतानि सर्वशः ।
इन्द्रियाणीन्द्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ॥ २-६८ ॥

संदर्भित अन्वयार्थ –

तस्मात्‌ = म्हणून, महाबाहो = हे महाबाहो, यस्य = ज्या पुरुषाची, इन्द्रियाणि = इंद्रिये, इन्द्रियार्थेभ्यः = इंद्रियांच्या विषयांपासून, सर्वशः = सर्वप्रकारांनी, निगृहीतानि = निगृहीत केलेली असतात, तस्य = त्या पुरुषाची, प्रज्ञा = बुद्धी, प्रतिष्ठिता = स्थिर असते ॥ २-६८ ॥

अर्थ –

तेव्हा हे माहाबाहो अर्जुना, इंद्रियांच्या विषयांपासून ज्याची इंद्रिये सर्व बाजूंनी आवरून धरलेली असतात, त्याची बुद्धी स्थिर आहे असे समजावे. येथे ‘ बाहू! हे कार्यक्षेत्राचे-पराक्रमाचे प्रतीक आहे. परमेश्वराला ‘ महाबाहू ‘ तसेच ‘ अजानुबाहू’ असे म्हंटले आहे; पण ईश्वर हातापायांशिवाय सर्वत्र संचार करीत असतो. जो ईश्वरस्वरूप बनतो, त्यालाही महाबाहू असेच म्हंटले जाते. म्हणून येथे कृष्णाला व अर्जुनाला दोघांनाही महाबाहू म्हंटले आहे.

क्रमशःश्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग २९.

लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

Leave a comment