श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ३०

श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ३०

श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ३० –

अध्याय २ – सांख्ययोग – श्लोक क्र.२.६९ ते २.७२ | श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ३०.

मूळ श्लोक –

या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी ।
यस्यां जाग्रति भूतानि सा निशा पश्यतो मुनेः ॥ २-६९ ॥

संदर्भित अन्वयार्थ –

सर्वभूतानाम्‌ = संपूर्ण प्राण्यांच्या संदर्भात, या = जी, निशा = रात्रीप्रमाणे असते, तस्याम्‌ = अशा त्या नित्य ज्ञानस्वरूप परमानंदांच्या प्राप्तीचे ठिकाणी, संयमी = स्थितप्रज्ञ योगी, जागर्ति = जागा असतो, (च) = (आणि), यस्याम्‌ = ज्या नाशवंत सांसारिक सुखाच्या बाबतीत, भूतानि = सर्व प्राणी, जाग्रति = जागे असतात, सा = ती, पश्यतः = परमात्मतत्त्व जाणणाऱ्या, मुनेः = मुनीला, निशा = रात्रीप्रमाणे असते ॥ २-६९ ॥

अर्थ –

सर्व प्राणिमात्रांसाठी तो परमात्मा रात्रीप्रमाणे आहे. कारण तो दिसत नाही, तेथे विचार काम करीत नाही म्हणून तो रात्र-सदूश आहे. त्या निशारूप परमात्म्यामध्ये संयमी पुरुष चांगल्याप्रकारे चालू शकतो, पाहू शकतो, जगू शकतो कारण तेथे त्याची पकड असते. योगी पुरुष इंद्रियाचे नियमन करुन त्या संयमाद्वारे त्याच्या ठिकाणी प्रवेश मिळवतो. ज्या नश्वर सांसारिक सुखभोगासाठी सर्व प्राणी रात्रंदिवस परिश्रम करतात तीच योग्यांसाठी रात्र असते.

रमा विलासु राम अनुरागी ।
‘तजत बमन जिमि जन बडुभागी ।।
( रामचरितमानस, २./३२३/८ )

जो योगी परमार्थ मार्गात निरंतर दक्ष आणि भौतिक इच्छांमध्ये संपूर्णपणे नि:स्पृह असतो तोच परमेश्वरस्वरूप होऊ शकतो. तो या जगात राहत असला तरी येथील भौतिक पाश त्याला बद्ध करू शकत नाहीत. महापुरुषाच्या आचरणाचे वर्णन करताना श्रीकृष्ण पुढे म्हणतात-

मूळ श्लोक –

आपूर्यमाणमचलप्रतिष्ठं समुद्रमापः प्रविशन्ति यद्वत्‌ ।
तद्वत्कामा यं प्रविशन्ति सर्वे स शान्तिमाप्नोति न कामकामी ॥ २-७० ॥

संदर्भित अन्वयार्थ –

आपूर्यमाणम्‌ = सर्व बाजूंनी परिपूर्ण, अचलप्रतिष्ठम्‌ = अचल प्रतिष्ठा असणाऱ्या अशा, समुद्रम्‌ = समुद्रात, यद्वत्‌ = ज्याप्रमाणे, आपः = नाना नद्यांचे पाणी, प्रविशन्ति = त्याला विचलित न करता सामावून जाते, तद्वत्‌ = त्याप्रमाणे, सर्वे = सर्व, कामाः = भोग, यम्‌ = ज्या स्थितप्रज्ञ पुरुषाच्या ठिकाणी, प्रविशन्ति = (कोणताही प्रकारचा विकार त्याच्या ठिकाणी उत्पन्न न करता) सामावून जातात, सः = तोच स्थितप्रज्ञ पुरुष, शान्तिम्‌ = परम शांति, आप्नोति = प्राप्त करून घेतो (याउलट), न कामकामी = भोगांची इच्छा करणारा (शांति प्राप्त करून घेत) नाही ॥ २-७० ॥

अर्थ –

ज्याप्रमाणे पाण्याने परिपूर्ण असलेल्या समुद्रात नद्यांचे पाणी सर्व बाजूंनी वेगात प्रवेश करते; पण समुद्रावर परिणाम होत नाही, त्याच प्रकारे परमात्मस्वरूपी स्थिर असणाऱ्या स्थितप्रज्ञ पुरुषामध्ये सर्व विकार त्याची शांती विचलित न करता प्रवेश करतात. अशा पुरुषाला परमशांती प्राप्त होत असते. विषयभोगांची अभिलाषा राखणाऱ्याला अशा प्रकारची शांती प्राप्त होत नाही.

भयंकर वेगाने सुसाट वाहणाऱ्या नद्या शेते नष्ट करीत, अनेकांचा बळी घेत, गावे बुडवीत हाहाःकार माजवीत, अत्यंत वेगाने समुद्रात प्रवेश करतात, परंतु त्यामुळे समुद्राला भरती येत नाही किंवा तो क्षुब्ध होत नाही. तसेच उन्हाळयात नद्या आटून गेल्याने समुद्रात त्यांचे पाणी न येण्याने समुद्राला ओहटी लागत नाही. त्या प्रकारे स्थितप्रज्ञ मनुष्याचे मन विषयभोगांनी क्षुब्ध होत नाही, उलट ते भोग त्याच्या मनात सामावून जातात. ते त्याच्या मनात चांगला किंबा वाईट कोणत्याच भावना निर्माण करू शकत नाहीत. कारण योगयुक्त पुरुषाचे कर्म ‘ अशुक्ल ‘ आणि ‘ अकृष्ण’ असते. ज्या चित्तावर संस्कार होतात ते चित्तच परमात्मस्वरूप झालेले असते. मग आता संस्कारक्षम उरले काय? केवळ या एकाच श्लोकात श्रीकृष्णांनी अर्जुनाच्या अनेक प्रश्नांचे उत्तर दिले आहे. स्थितप्रज्ञ महापुरुषाचे लक्षण कोणते? तो कसा बोलतो? तो कसा चालतो? या सर्व गोष्टी अर्जुनाला जाणून घ्यायचा होत्या.

तेव्हा ह्या सर्व प्रश्नांचे उत्तर श्रीकृष्णांनी येथे एका शब्दात दिले आहे. स्थितप्रज्ञ महापुरुष समुद्रासारखा असतो. अशाप्रकारे बसावे किंवा अशा प्रकारेच चालावे असा कसलाच विधीनिषेध त्याला नसतो. समुद्रवत तो संयमी असल्याने ‘परमशान्ती त्याला प्राप्त होते. विषयभोगांची लालसा ठेवणार्‍याला अशा प्रकारची शांती प्राप्त होत नाही. यावर भर देत श्रीकृष्ण म्हणतात-

मूळ श्लोक –

विहाय कामान्यः सर्वान्पुमांश्चरति निःस्पृहः ।
निर्ममो निरहङ्कारः स शान्तिमधिगच्छति ॥ २-७१ ॥

संदर्भित अन्वयार्थ –

सर्वान्‌ = संपूर्ण, कामान्‌ = कामनांचा, विहाय = त्याग करून, यः = जो, पुमान्‌ = पुरुष, निर्ममः = ममतारहित, निरहङ्कारः = अहंकाररहित, (च) = आणि, निःस्पृहः = स्पृहारहित होऊन, चरति = वावरत असतो, सः = तोच (पुरुष), शान्तिम्‌ = शांतीप्रत, अधिगच्छति = प्राप्त होतो, म्हणजे शांती प्राप्त करून घेतो ॥ २-७१ ॥

अर्थ –

जो पुरुष सर्व इच्छांचा त्याग करून ममत्वशून्य, निराभिमानी व निरीच्छ होऊन आचरण करीत असतो, वागत असतो त्यालाच परमानंद देणारी ‘परमशांती प्राप्त होते. यानंतर त्याला काहीही प्राप्त करण्याचे बाकी राहत नाहीत.

मूळ श्लोक –

एषा ब्राह्मी स्थितिः पार्थ नैनां प्राप्य विमुह्यति ।
स्थित्वास्यामन्तकालेऽपि ब्रह्मनिर्वाणमृच्छति ॥ २-७२ ॥

संदर्भित अन्वयार्थ –

पार्थ = हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), एषा ब्राह्मी स्थितिः = ब्रह्माला प्राप्त करून घेतलेल्या पुरुषाची ही स्थिती आहे, एनाम्‌ = ही स्थिती, प्राप्य = प्राप्त झाल्यावर, (योगी) = योगी, (कदापि) = कधीही, न विमुह्यति = मोहित होत नाही, (च) = आणि, अन्तकाले अपि = अंतकाळी सुद्धा, अस्याम्‌ स्थित्वा = या ब्राह्मी स्थितीत स्थिर होऊन, (सः) = तो, ब्रह्मनिर्वाणम्‌ = ब्रह्मानंदाप्रत, ऋच्छति = जातो (म्हणजे ब्रह्मानंद प्राप्त करून घेतो) ॥ २-७२ ॥

अर्थ –

हे पार्था, ही उपरोक्त अवस्था म्हणजेच ब्राह्मी स्थिती आहे. समुद्रवत्‌ असणाऱ्या महापुरुषामध्ये विषय नदीप्रमाणे परमात्मदर्शी असतो. ‘ अहँ ब्रह्मास्मि’ असे नुसते म्हणण्याने ही स्थिती प्राप्त होत नाही. साधना करुनच ही स्थिती प्राप्त केली जाते. असा महापुरुष अंतकाळीदेखील या अवस्थेत स्थिर होऊन बह्मानंदाप्रत पोहचतो.

निष्कर्ष –

काही लोकांचे असे म्हणणे आहे की, साधारणतः दुसर्‍या अध्यायातच गीता पूर्ण होते. परंतु जर केवळ कर्माच्या उच्चारणाने जर कर्म पूर्ण होत असेल तर मग गीता इथे पूर्ण झाली म्हणता येईल. या अध्यायात योगेश्वर श्रीकृष्णाने सांगितले आहे की-अर्जुना निष्काम कर्मयोग म्हणजे काय ते ऐक, तो समजून घे. तो समजून घेतल्यावर तू संसार-बंधनातून मुक्त होशील. कर्म करण्याचा तुला अधिकार आहे, पण फल घेण्याचा अधिकार तुला मुळीच नाही. कर्मामध्ये तू अश्रद्ध असता कामा नये. ते करण्यास तू नेहमी तत्पर असला पाहिजेस. असे आचरण केलेस तर ‘ परं दृष्टवां’ परमपुरुषाचा तुला साक्षात्कार होईल व तू स्थितप्रज्ञ बनशील. परमशान्ती तुला प्राप्त होईल. परंतु या अध्यायात कर्म म्हणजे काय? हे मात्र सांगितलेले नाही. हा ‘सांख्ययोग’ नावाचा अध्याय नाही.

हे नाव म्हणजे शास्त्रकारांची नव्हे पण टीकाकारांची देणगी आहे. ते आपल्या बुद्धीला अनुसरून ग्रहण करीत असतात. मग आश्चर्य कसले? या अध्यायात कर्माचे श्रेष्ठत्व, ते कर्म करीत असताना घ्यावयाची दक्षता आणि स्थितप्रज्ञाची लक्षणे सांगून श्रीकृष्णांनी अर्जुनाच्या मनात कर्माबद्दल उत्कंठा जागृत केली आहे. व त्याला सांगितले आहे की आत्मा शाश्वत आहे, सनातन आहे. त्याला तू जाण व तत्त्वदर्शी बन. त्याच्या प्राप्तीची दोन साधने आहेत “ज्ञानयोग आणि निष्काम कर्मयोग ‘ आपली योग्यता समजून, हानी व लाभाचा स्वतः निर्णय घेऊन कर्मात प्रवृत्त होणे म्हणजे ज्ञानमार्ग आहे आणि परमेश्वरावर भार घालून स्वतःला त्याच्या ठायी समर्पित करुन तेच कर्म करण्यास प्रवृत्त होणे हाच निष्काम कर्म मार्ग किंवा भक्ति मार्ग आहे. गोस्वामी तुलसीदासांनी या दोन साधनांचे – योगांचे चित्रण पुढील प्रमाणे केले आहे.

मोरे प्रौढ तनय सम ग्यानी ।
बालक सुत सम दास अमानी ।।
जनहि मोर बल निजबल ताही ।
दुहु कहे काम क्रोध रिपु आही ।।
( रामचरितमानस, ३/४२/८-९)

माझे दोन प्रकारचे भक्त आहेत. एक ज्ञानमार्गी व दुसरा भक्तिमार्गी. निष्काम कर्मयोगी किंवा भक्तिमार्गी मला शरण येऊन माझा आश्रय घेतात तर ज्ञानयोगी आपल्या शक्तीचा अंदाज घेवून, आपल्या लाभहानीचा विचार करून ते आपल्या भरवशावर, आत्मविश्वासावर चालतात. दोघांचा शत्रू मात्र एकच असतो. ज्ञानमार्गी भक्ताला काम-क्रोधादि शत्रूंवर विजय मिळवावा लागतो आणि जो कर्मयोगी आहे त्यालाही या शत्रूशी सामना करावा लागतो. इच्छांचा त्याग दोघेही करतात आणि दोन्ही मार्गात केले जाणारे कर्मही एकच असते. या कर्माच्या आचरणामुळे परमशान्ती प्राप्त होते. तथापि श्रीकृष्णांनी कर्म म्हणजे काय हे अद्याप सांगितले नाही. आपल्या समोरही कर्म म्हणजे काय हा प्रश्न उभा आहे. अर्जुनाच्या मनातही कर्माबद्दल जिज्ञासा निर्माण झाली आहे. त्यामुळे तिसऱया अध्यायाच्या आरम्भीच त्याने कर्मविषयक प्रश्न विचारण्यास सुरुवात केली.

मूळ दुसऱ्या अध्याय समाप्ती –

ॐ तत्सदिति श्रीमद्‌भगवद्‌गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे साङ्ख्ययोगो नाम द्वितीयोऽध्यायः ॥ २ ॥

अर्थ –

ॐ हे परमसत्य आहे. याप्रमाणे श्रीमद्‌भगवद्‌गीतारूपी उपनिषद तथा ब्रह्मविद्या आणि योगशास्त्राविषयी श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील सांख्ययोग नावाचा हा दुसरा अध्याय समाप्त झाला. ॥ २ ॥

या प्रमाणे श्रीमद्धगवदगीतेमध्ये श्रीकृष्णांनी गायिलेल्या उपनिषदातील बह्मविद्यांतर्गत योगशास्त्रातील ‘ कर्म जिज्ञासा ‘ म्हणजेच ‘ सांख्य प्रकरण ‘ नावाचा दुसरा अध्याया समाप्त झाला!

इति श्रीमत्परमहंस परमानन्दस्य शिष्य स्वामी अडगड़ानन्दकृते श्रीमद्धगवद्गीताया: ‘ यथार्थगीता’ भाष्ये ‘ कर्मजिज्ञासा’ नाम ह्वितीयोध्याय:।॥२॥।

या प्रकारे श्रीमत्परमहंस परमानंद स्वामींचे शिष्य अडुगड़ानन्दकृत श्रीमद्धगवदगीतेवरील भाष्य ‘ यथार्थ गीते’ मधील ‘ कर्म जिज्ञासा ‘ नावाचा दुसरा अध्याय पुर्ण होत आहे.

॥। हरि: ॐ तत्सत्‌ ।।

क्रमशः

लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

Leave a comment