श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ३१

श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ३१

श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ३१ –

अध्याय तिसरा | श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ३१ –

कर्मयोग-

अध्याय ३ – कर्मयोग – श्लोक क्र.३.१ ते ३.४ | श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ३१.

श्री परमात्मने नमः
।। अथ तृतीयोडध्यायः ।।

दुसर्‍या अध्यायात भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितले की, ही बुद्धी तुझ्यासाठी ज्ञानमार्गाच्या बाबतीत सांगितली गेली.कोणती बुद्धी? हीच की युद्ध कर. जिंकलास तर सर्वश्रेष्ठ परमात्म्याची स्थिती प्राप्त होईल व हरलास तरी देवत्व प्राप्त होईल. म्हणजे विजयात सर्वस्व आहे विजय आहे आणि हरण्यात पण देवत्व आहे. म्हणजे युद्ध करण्याने काही ना काही प्राप्ती तर होणारच आहे. या दृष्टीने लाभ आणि हानी दोन्हीमध्ये काही ना काही मिळतेच. किंचितही नुकसान किंवा क्षती नाही. नंतर ते म्हणाले आता तू कर्मबंधनातून चांगल्या प्रकारे सुटून जाशील. त्यानंतर त्याच्या वेष्टियावर प्रकाश टाकला. कर्म करताना आवश्यक ती दक्षता घ्यायला हवी. यावर भर दिला की, फळाची वासना ठेवणारे कर्म नको. कामनांपासून रहित होऊन कर्मामध्ये प्रवृत्त हो पण अश्रद्ध होऊन कर्म करू नकोस, यामुळे तू कर्मबंधनातून मुक्त होशील. मुक्त तर होशील परंतु मार्गात आत्मपरीक्षण होणार नाही.

म्हणून अर्जुनाला निष्काम कर्मयोगापेक्षा ज्ञानमार्ग सरळ व प्राप्त होण्याजोगा वाटला. त्याने प्रश्न केला, हे जनार्दना, निष्काम कर्मापेक्षा ज्ञानमार्ग आपल्या दृष्टीने श्रेष्ठ आहे. तर मग मला भयंकर कर्मामध्ये रत होण्यास का आग्रह करता? प्रश्न तर स्वाभाविकच होता. समजा एक विवक्षित ठिकाणी जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. आपल्याला खरोखर जायचे असेल; तर आपण आवश्य प्रश्न विचाराल की, या दोनपैकी सोपा रस्ता कोणता? जर असा प्रश्न विचारला नाहीत तर आपण वाटसरूच नाही. नेमका याच प्रकारे अर्जुनाने प्रश्न विचारला-

मूळ तिसऱ्या अध्यायाचा प्रारंभ –

मूळ श्लोक –

अर्जुन उवाच
ज्यायसी चेत्कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन ।
तत्किं कर्मणि घोरे मां नियोजयसि केशव ॥ ३-१ ॥

संदर्भित अन्वयार्थ –

अर्जुन= अर्जुन, उवाच = म्हणाला, जनार्दन = हे जनार्दन श्रीकृष्णा, चेत्‌ = जर, कर्मणः = कर्माच्या अपेक्षेने, बुद्धिः = ज्ञान, ज्यायसी = श्रेष्ठ (आहे), ते मता = असे तुम्हाला मान्य असेल, तत्‌ = तर मग, केशव = हे केशवा (श्रीकृष्णा), माम्‌ = माझी, घोरे = भयंकर, कर्मणि = कर्म करण्यात, किम्‌ = का बरे, नियोजयसि = तुम्ही योजना करीत आहात ॥ ३-१ ॥

अर्थ –

लोकांवर दया करणाऱ्या जनार्दना, जर निष्काम कर्मयोगापेक्षा आपल्याला ज्ञानयोग श्रेष्ठ वाटतो तर मग हे केशवा, मला तुम्ही भयंकर कर्मयोग का करायला लावत आहात? निष्काम कर्मयोग अर्जुनाला भयंकर- भयानक वाटत आहे कारण की, यात कर्म करण्याचाच अधिकार आहे. फळाचा अधिकार मुळीच नाही. कर्म करताना ते श्रद्धापूर्वक करावे आणि निरंतर योगावर दृष्टी ठेवून समर्पणासह कर्म करण्यास प्रवृत्त झाले पाहिजे. जर ज्ञानमार्गात हरलास तर देवत्त्व आहे. विजय प्राप्त केल्यास महान परमात्म स्थितीची प्राप्ती आहे. आपला लाभ-हानी स्वतः बघत पुढे जायचे आहे. या प्रकारे अर्जुनाला निष्काम कर्मयोगापेक्षा ज्ञानमार्ग सरळ आहे- सुलभ आहे असे वाटले. व म्हणून त्याने निवेदन केले-

मूळ श्लोक –

व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिं मोहयसीव मे ।
तदेकं वद निश्चित्य येन श्रेयोऽहमाप्नुयाम्‌ ॥ ३-२ ॥

संदर्भित अन्वयार्थ –

व्यामिश्रेण इव = जणू मिश्रित अशा, वाक्येन = वाक्यांनी, मे = माझ्या, बुद्धिम्‌ = बुद्धीला, मोहयसि इव = तुम्ही जणू मोहित करीत आहात, (अतः) = म्हणून, येन = ज्यामुळे, अहम्‌ = मी, श्रेयः = कल्याण, आप्नुयाम्‌ = प्राप्त करून घेईन, तत्‌ एकम्‌ = अशी ती एक गोष्ट, निश्चित्य = निश्चित करून, वद = सांगा ॥ ३-२ ॥

अर्थ –

आपण या संमिश्र वचनांनी माझ्या बुद्धीला मोह पाडीत आहात. आपण तर माझ्या बुद्धीचा मोह दूर करण्यास प्रवृत्त झालेले आहात. म्हणून यातील जे श्रेय आहे, परम कल्याणकारी, मोक्ष प्राप्त करून देणारे आहे, असे एक निश्चित करून सांगा. यावर श्रीकृष्ण म्हणाले-

मूळ श्लोक –

श्रीभगवानुवाच
लोकेऽस्मिन्द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मयानघ ।
ज्ञानयोगेन साङ्ख्यानां कर्मयोगेन योगिनाम्‌ ॥ ३-३ ॥

संदर्भित अन्वयार्थ –

श्रीभगवान = भगवान श्रीकृष्ण, उवाच = म्हणाले, अनघ = हे निष्पापा, अस्मिन्‌ लोके = या जगात, मया = मी, द्विविधा = दोन प्रकारची, निष्ठा = निष्ठा, पुरा = पूर्वी, प्रोक्ता = सांगितली आहे, साङ्ख्यानाम्‌ = सांख्ययोग्यांची, (निष्ठा) = निष्ठा, ज्ञानयोगेन = ज्ञानयोगाद्वारे (होते), (च) = आणि, योगिनाम्‌ = योग्यांची, (निष्ठा) = निष्ठा, कर्मयोगेन = कर्मयोगाद्वारे होते ॥ ३-३ ॥

अर्थ –

हे निष्पाप अर्जुना, या संसारात सत्यशोधाचे दोन प्रवाह माझ्याकडून पूर्वीच सांगितले गेले आहेत. पूर्वी म्हणजे कधी सत्ययुगात किंवा त्रेतायुगात नाही; परंतु ते दुसऱ्या अध्यायात सांगितले आहे. ज्ञानी लोकांसाठी ज्ञानमार्ग व योग्यांसाठी कर्मयोग मी सांगितला आहे. दोन्ही मार्गाप्रमाणे कर्म तर करायलाच लागते. ‘ कर्म’ अनिवार्य आहे.

मूळ श्लोक –

न कर्मणामनारम्भान्नैष्कर्म्यं पुरुषोऽश्नुते ।
न च संन्यसनादेव सिद्धिं समधिगच्छति ॥ ३-४ ॥

संदर्भित अन्वयार्थ –

कर्मणाम्‌ = कर्मांचे, अनारम्भात्‌ = आचरण केल्याशिवाय, पुरुषः = मनुष्य, नैष्कर्म्यम्‌ = निष्कर्मता म्हणजे योगनिष्ठा, न अश्नुते = प्राप्त करून घेत नाही, च = तसेच, संन्यसनात्‌ एव = कर्मांचा केवळ त्याग केल्यामुळे, सिद्धिम्‌ = सिद्धी म्हणजे सांख्यनिष्ठा, न समधिगच्छति = प्राप्त करून घेत नाही ॥ ३-४ ॥

अर्थ –

हे अर्जुना, कर्माचा आरंभ न करता मनुष्याला नेष्कर्म्य प्राप्त होत नाही. तसेच आरंभ केलेल्या कार्याचा ( क्रियेचा ) त्याग केल्याने भगवत्ग्राप्तिरूपी परमसिद्धी प्राप्त करता येत नाही. मग तुला ज्ञानमार्ग चांगला वाटो की निष्काम कर्म मार्ग, दोन्हींमध्ये तुला कर्म तर करावेच लागेल. साधारण: लोक भगवत्पथाचा संक्षिप्त मार्ग व समर्थनासाठी विधाने शोधत बसतात, तेव्हा कर्माचा आरंभ केलाच नाही म्हणजे झाला निष्कर्मी, अशा प्रकारचा लोकांना भ्रम होऊ नये म्हणून श्रीकृष्ण भारपूर्वक सांगत आहेत, ” कर्माचा आरंभ न केल्याने कोणालाही नेष्कर्म्य प्राप्त होत नाही”.

शुभाशुभ कर्मांचा जेथे अंत असतो- शेवट असतो ती परम निष्कर्मतेची- नैष्कर्म्याची परम स्थिती होय व ती कर्म करीतच प्राप्त करता येते. अशा प्रकारे पुष्कळसे लोक म्हणत असतात, ” आम्ही तर ज्ञानमार्गी आहोत. ज्ञानमार्गात कर्मच नसते.” असे समजून कर्माचा त्याग करणारे ज्ञानी होत नाहीत. ज्या क्रियेचा आरंभ केला आहे, तिचा त्याग केल्याने काही भगवंताची साक्षात्काररूपी परमसिद्धी प्राप्त होत नाही.

क्रमशः श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ३१.

लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

Leave a comment