श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ३२

श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ३२

श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ३२ –

अध्याय ३ – कर्मयोग – श्लोक क्र.३.५ ते ३.८ | श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ३२.

मूळ श्लोक –

न हि कश्चित्क्षणमपि जातु तिष्ठत्यकर्मकृत्‌ ।
कार्यते ह्यवशः कर्म सर्वः प्रकृतिर्जैगुणैः ॥ ३-५ ॥

संदर्भित अन्वयार्थ –

कश्चित्‌ = कोणीही मनुष्य, जातु = कोणत्याही वेळी, हि = निःसंदेहपणे, क्षणम्‌ अपि = क्षणमात्र सुद्धा, अकर्मकृत्‌ = कर्म न करता, न तिष्ठति = राहात नाही, हि = कारण, प्रकृतिजैः = प्रकृतीपासून उत्पन्न झालेल्या, गुणैः = गुणांनी, अवशः = परतंत्र झालेला, सर्वः = सर्व मनुष्यसमुदाय हा, कर्म कार्यते = कर्म करण्यास भाग पाडला जातो ॥ ३-५ ॥

अर्थ –

कोणतीही व्यक्ती कोणत्याही समयी काही तरी कर्म केल्याशिवाय क्षणभरहीं राहत नाही. कारण प्रत्येक व्यक्ती प्रकृतिजन्य गुणांच्या आधीन असल्याने ते गुण प्रत्येका कडून कर्म करवीतच असतात. प्रकृती आणि प्रकृतिजन्य गुण जोपर्यंत जिवंत आहेत, तोपर्यंत कोणीही व्यक्ती कर्म केल्याशिवाय राहत नाही.

चौथ्या अध्यायातल्या तेहतिसाव्या व अडतीसाव्या श्लोकांत श्रीकृष्ण म्हणतात की, यावन्मात्र कर्म ज्ञानातच समाप्त होत असते. ज्ञानरूपी अग्नी संपूर्ण कर्मांना भस्म करून टाकीत असतो. येथे ते म्हणतात की कर्म केल्याशिवाय कोणीही राहू शकत नाही. शेवटी ते महापुरूष काय सांगतात? त्यांच्या सांगण्याचा आशय असा को, यज्ञ करता करता तिन्ही गुणांच्या पलीकडे गेल्यावर मनाचा परमात्म्यात विलय आणि साक्षात्काराबरोबर यज्ञाचा परिणाम दिसून येतो. म्हणजेच कर्म नाहीसे होते. म्हणजे त्या निर्धारित क्रिया पूर्ण झाल्याशिवाय कर्म संपत नाही. प्रकृती पिंड सोडत नाही.

मूळ श्लोक –

कर्मेन्द्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरन्‌ ।
इन्द्रियार्थान्विमूढात्मा मिथ्याचारः स उच्यते ॥ ३-६ ॥

संदर्भित अन्वयार्थ –

विमूढात्मा = मूढ बुद्धीचा मनुष्य, कर्मेन्द्रियाणि = सर्व इंद्रियांना, संयम्य = जबरदस्तीने वरवर रोखून, यः = जो, मनसा = मनाने, इन्द्रियार्थान्‌ = त्या इंद्रियांच्या विषयांचे, स्मरन्‌ आस्ते = चिंतन करीत असतो, सः = तो, मिथ्याचारः = मिथ्याचारी म्हणजे दांभिक, उच्यते = म्हटला जातो ॥ ३-६ ॥

अर्थ –

असे असूनही काही मूर्ख लोक जे कर्मेन्द्रियांचा निरोध करून मनात इंद्रिय भोगांचे, विषयांचे, चिंतन करीत राहतात, असे मूर्ख लोक ज्ञानी नसून ते ढोंगी व पाखंडी आहेत. याचा अर्थ असा की श्रीकृष्णाच्या काळात देखील अशा रूढी होत्या. ज्या क्रिया करण्यास योग्य असतात त्या करण्याचे सोडून इंद्रियांचा हट्टाने निग्रह करून स्वत:ला ‘ मी ज्ञानी आहे’, ‘मी पूर्ण आहे’ असे समजत असत. परंतु श्रीकृष्ण म्हणतात की, असे लोक धूर्त आहेत. तात्पर्य ज्ञानमार्ग चांगला वाटो की निष्काम कर्मयोग, दोन्ही मार्गात कर्म तर करायलाच हवे.

मूळ श्लोक –

यस्त्विन्द्रियाणि मनसा नियम्यारभतेऽर्जुन ।
कर्मेन्द्रियैः कर्मयोगमसक्तः स विशिष्यते ॥ ३-७ ॥

संदर्भित अन्वयार्थ –

तु = परंतु, अर्जुन = हे अर्जुना, यः = जो मनुष्य, मनसा = मनाच्या योगे, इन्द्रियाणि = इंद्रियांना, नियम्य = वश करून घेऊन, असक्तः = अनासक्त होऊन, कर्मेन्द्रियैः = सर्व इंद्रियांच्या द्वारा, कर्मयोगम्‌ = कर्मयोगाचे, आरभते = आचरण करतो, सः = तो मनुष्य, विशिष्यते = श्रेष्ठ होय ॥ ३-७ ॥

अर्थ –

हे अर्जुना, जो पुरुष मनाने इंद्रियांना वश करून- इंद्रियांचे नियमन करून, मनात वासनांचे स्फुरण न होईल, असे सर्वथा अनासक्त झालेल्या कर्मेद्रियांनी कर्मयोगाचे आचरण करतो तो पुरुष श्रेष्ठ होय. ठीक आहे. आता समजले की, कर्माचे आचरण करायला पाहिजे; परंतु प्रश्न असा उभा राहतो की, कोणते काम करावे? यावर श्रीकृष्ण पुढे म्हणतात-

मूळ श्लोक –

नियतं कुरु कर्म त्वं कर्म ज्यायो ह्यकर्मणः ।
शरीरयात्रापि च ते न प्रसिद्ध्येदकर्मणः ॥ ३-८ ॥

संदर्भित अन्वयार्थ –

त्वम्‌ = तू, नियतम्‌ = शास्त्रविहित, कर्म = कर्तव्यकर्म, कुरु = कर, हि = कारण, अकर्मणः = कर्म न करण्याच्या अपेक्षेने, कर्म = कर्म करणे, ज्यायः = श्रेष्ठ आहे, च = तसेच, अकर्मणः = कर्म न केल्यास, ते = तुझा, शरीरयात्रा अपि = शरीरनिर्वाहसुद्धा, न प्रसिद्ध्येत्‌ = सिद्ध होणार नाही ॥ ३-८ ॥

अर्थ –

अर्जुना, तू निर्धारित विहित कर्म कर. अर्थात कर्मे तर अनेक प्रकारची असतात, पण त्यातून एक निवडले आहे ते नियत कर्म तू कर. कर्म न करण्यापेक्षा कर्म करणे चांगले कारण की, कर्म करीत थोडेसे अंतर पण कापलेत तर मागे सांगितल्याप्रमाणे ते कर्म मोठ्या जन्ममरणाच्या भयापासून मनुष्याला मुक्त करते. कर्म न केल्याने तुझी यात्रा सिद्ध होऊ शकणार नाही. या शरीरयात्रेचा अर्थ शरीर निर्वाह असे काही लोक लावतात. पण कसला शरीर निर्वाह? काय आपण स्वत: एक शरीर आहात? हा पुरुष जन्मांतरापासून, युगानुयुगे शरीराची यात्रा तर करीत आला आहे. ज्याप्रमाणे वस्त्र जीर्ण झाल्यानंतर दुसरे तिसरे धारण केले जाते, त्याप्रकारे किड्यामुंगीपासून मनुष्यापर्यंत, ब्रह्मापासून यावन्मात्र जगत हे परिवर्तनशील आहे. वरच्या-खालच्या योनीमधून हा जीव शरीराची जणू यात्राच करीत आहे. ‘कर्म’ ही अशी वस्तू आहे की जी या यात्रेला सफल-सिद्ध करविते- पूर्ण करून देते. समज एकच जन्म घ्यायला लागला तर ही यात्रा चालूच आहे. आता तर पथिक वाट चालतो आहे, तो दुसर्‍या शरीराची यात्रा करीत राहिला आहे. यात्रा पूर्ण होते तेव्हा इप्सित ठिकाण येते.

परमात्मस्थिती प्राप्त झाल्यानंतर आत्म्याला शरीराची यात्रा करावी लागत नाही, *मोक्ष्यसे अशुभात्‌ ‘ (४/६ ) अर्जुना, हे कर्म करून तू संसार बंधनातून सुटून जाशील. कर्म ही एकच अशी वस्तू आहे की, मनुष्याला संसारबंधनातून मुक्ती देवविते. आता प्रश्न उभा राहतो की ते निर्धारित कर्म काय आहे? यावर श्रीकृष्ण सांगतात-

क्रमशः श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ३२.

लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

Leave a comment