श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ३४

श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ३४

श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ३४ –

अध्याय३ – कर्मयोग – श्लोक क्र.३.१३ ते ३.१६ | श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ३४.

मूळ श्लोक –

यज्ञशिष्टाशिनः सन्तो मुच्यन्ते सर्वकिल्बिषैः ।
भुञ्जते ते त्वघं पापा ये पचन्त्यात्मकारणात्‌ ॥ ३-१३ ॥

संदर्भित अन्वयार्थ –

यज्ञशिष्टाशिनः = यज्ञ झाल्यावर शिल्लक राहिलेले अन्न खाणारे, सन्तः = श्रेष्ठ मनुष्य, सर्वकिल्बिषैः = सर्व पापांतून, मुच्यन्ते = मुक्त होऊन जातात (परंतु), ये पापाः = जे पापी लोक, आत्मकारणात्‌ = स्वतःच्या शरीर पोषणासाठीच (अन्न), पचन्ति = शिजवितात, ते तु = ते तर, अघम्‌ = पापच, भुञ्जते = खातात ॥ ३-१३ ॥

अर्थ –

यज्ञातून उरलेले म्हणजे यज्ञशेष भक्षण करणारे संत सर्व पापांपासून मुक्त होतात. दैवी संपदेची वृद्धी करता परिणामत: प्राप्तिकाल हाच पूर्तिकाल ठरतो. जेव्हा यज्ञ पूर्ण होतो तेव्हा शिल्लक राहिलेले म्हणजेच ब्रह्म होय. हीच गोष्ट श्रीकृष्णांनी दुसऱ्या शब्दांत सांगितली आहे- ‘

यज्ञशिष्टामृतभुजो यान्ति ब्रह्मसनातनम्‌’ – यज्ञ ज्याची सृष्टी करतो त्या अन्नाचे ग्रहण करणारा ब्रह्मात प्रविष्ट होऊन जातो. येथे ते म्हणतात, यज्ञशेष ( ब्रह्मपीयूष ) भक्षण करणारा सर्व पापांतून मुक्त होतो. परंतु पापी लोक पापच खातात. ते भजन करतात, आराधना करतात, स्वत:ची प्रगतीही करतात पण हे सर्व करताना, याच्या मोबदल्यात मनात एक मधुर इच्छा ठेवतात ( ‘आत्मकारणाम्‌’ ) की, शरीरासाठी म्हणजे शरीराला सुख होईल असे काही मिळावे. त्याला ते सुख प्राप्त तर होते परंतु तो भोग पूर्ण होताच तो पुन्हा पूर्वस्थितीला प्राप्त होईल; यापेक्षा अधिक नुकसान हानी आणखी काय असणार? जर शरीरच नश्वर आहे तर त्याचे सुखोपभोग त्याला कधी सहकार साथ देतील? ते भगवंताची आराधना तर करतात पण त्याच्या मोबदल्यात ते पाप खातात. “पलटि सुधा ते सठ विष लेही’ तो नष्ट तर होत नाही. परंतु पुढे प्रगतीही करू शकत नाही व म्हणूनच श्रीकृष्ण निष्काम भावाने कर्म( भजन ) करण्यावर भर देत आहेत. आत्तापर्यंत श्रीकृष्णांनी सांगितले की यज्ञ ‘ परमश्रेय ‘ देतो आणि त्याची रचना महापुरुषांद्वारे होते. परंतु ते महापुरुष प्रजेच्या निर्मितीला का प्रवृत्त होतात? यावर श्रीकृष्ण म्हणतात-

मूळ श्लोक –

अन्नाद्भवन्ति भूतानि पर्जन्यादन्नसम्भवः ।
यज्ञाद्भवति पर्जन्यो यज्ञः कर्मसमुद्भवः ॥ ३-१४ ॥
कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि ब्रह्माक्षरसमुद्भवम्‌ ।
तस्मात्सर्वगतं ब्रह्म नित्यं यज्ञे प्रतिष्ठितम्‌ ॥ ३-१५ ॥

संदर्भित अन्वयार्थ –

अन्नात्‌ = अन्नापासून, भूतानि = संपूर्ण प्राणी, भवन्ति = उत्पन्न होतात, पर्जन्यात्‌ = पर्जन्यवृष्टीपासून, अन्नसम्भवः = अन्नाची उत्पत्ती होते, यज्ञात्‌ = यज्ञापासून, पर्जन्यः = पर्जन्यवृष्टी, भवति = होते, यज्ञः = यज्ञ, कर्मसमुद्भवः = विहित कर्मांपासून उत्पन्न होणारा आहे, कर्म = कर्मसमुदाय हा, ब्रह्मोद्भवम्‌ = वेदांपासून उत्पन्न होणारा (आणि), ब्रह्म = वेद हे, अक्षरसमुद्भवम्‌ = अविनाशी परमात्म्यापासून उत्पन्न होणारे आहेत (असे), विद्धि = तू जाण, तस्मात्‌ = म्हणून (यावरून सिद्ध होते की), सर्वगतम्‌ = सर्वव्यापी, ब्रह्म = परम अक्षर परमात्मा, नित्यम्‌ = नेहमीच, यज्ञे = यज्ञामध्ये, प्रतिष्ठितम्‌ = प्रतिष्ठित आहे ॥ ३-१४, ३-१५ ॥

अर्थ –

अन्नापासून सर्व प्राणिमात्र उत्पन्न होतात व अन्नं ब्रह्म व्यजानात- अन्न म्हणजे परमात्मा, परब्रह्म होय. त्या ब्रह्मपीयूषाला आपला उद्देश बनवून मनुष्यप्राणी यज्ञाकडे पुढे चालू लागतो. अन्नाची उत्पत्ती पावसामुळे होते.

ढगातून होणार्‍या पावसामुळे नव्हे तर, कृपादृष्टीने होत असते. पूर्वसंचित यज्ञकर्मच कृपेच्या रूपाने बरसत असते. आजची आराधना उद्या कृपेच्या रूपाने प्राप्त होत असते. व म्हणून ही वृष्टी यज्ञाप्रमाणे असते. ‘ स्वाहा ‘ म्हणण्याने व तीळ-जव अग्नीत समर्पण करण्यानेच वृष्टी होत असेल तर अधिकांश मरूभूमी रेताड – नापिक का राहिली आहे.? ती सुपीक झाली असती. ही कृपावृष्टी यज्ञाचीच देणगी आहे. हा यज्ञ कर्मापासूनच उत्पन्न होणारा आहे. कर्मानेच यज्ञ पूर्ण होत असतो. ते कर्म वेदापासून निर्माण झाले आहे असे तू जाण. वेद म्हणजे ब्रह्मस्थित महापुरुषाची वाणी आहे. जे तत्त्व विदित नसते, माहित नसते; पण त्याची प्रत्यक्ष अनुभूती म्हणजे वेद होय. वेद म्हणजे श्लोकांचा संग्रह नव्हे. हे वेद अविनाशी परमात्म्यापासून उत्पन्न झालेले आहेत असे तू जाण. वेद सांगितले होते महापुरुषांनी; पण ते महापुरुष परमात्म्यात तद्रूप झाले आहेत. त्यांच्या माध्यमातून परमात्माच बोलतो आहे. म्हणून वेदांना अपौरुषेय म्हंटले जाते. पण महापुरुषांना वेद कसे प्राप्त झाले? वेद अविनाशी परमात्म्यापासून उत्पन्न झाले आहेत व महापुरुष त्याच्याशी तद्रूप झालेले आहेत. ते फक्त यंत्र आहेत. त्यांच्याद्वारे परमात्मा बोलत असतो कारण को, यज्ञाच्या द्वारेच मनाच्या एकाग्रतेमध्येच वेद समजले जातात. यापासून सर्वव्यापी परम अक्षर परमात्मा सर्वथा यज्ञातच प्रतिष्ठित आहे. यज्ञ हाच परमात्मप्राप्तीचा एकमात्र उपाय आहे. यावर भर देताना श्रीकृष्ण म्हणतात-

मूळ श्लोक –

एवं प्रवर्तितं चक्रं नानुवर्तयतीह यः ।
अघायुरिन्द्रियारामो मोघं पार्थ स जीवति ॥ ३-१६ ॥

संदर्भित अन्वयार्थ –

पार्थ = हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), इह = या जगामध्ये, एवम्‌ = अशा प्रकारे, प्रवर्तितम्‌ = परंपरेने प्रचलित असणाऱ्या, चक्रम्‌ = सृष्टिचक्राला अनुकूल, यः = जो मनुष्य, न अनुवर्तयति = असे वर्तन करीत नाही म्हणजे आपल्या कर्तव्याचे पालन करीत नाही, सः = तो मनुष्य, इन्द्रियारामः = इंद्रियांच्या द्वारे भोगांमध्ये रमणारा, अघायुः = पापी आयुष्याचा (असून), मोघम्‌ = व्यर्थच, जीवति = जिवंत राहातो ॥ ३-१६ ॥

अर्थ –

हे पार्था, जो पुरुष या लोकी मनुष्यशरीर धारण करून आलेला आहे, तो जर साधन चक्राप्रमाणे वागत नाही- म्हणजेच दैवी संपदेचा उत्कर्ष, देवतांची वृद्धी आणि परस्परांच्या वृद्धीद्वारे अक्षयधाम प्राप्त करणे- या क्रमाने जो आचरण करीत नाही, तो इंद्रियसुखाची इच्छा करणारा ‘ पापी पुरुष’ व्यर्थच जगत असतो.

बंधूनो, दुसऱया अध्यायात योगेश्वर श्रीकृष्णाने कर्माचा उच्चार केला आणि या अध्यायात त्यांनी सांगितले की, नियत कर्माचे आचरण कर. यज्ञाची प्रक्रिया म्हणजेच कर्म होय. या व्यतिरिक्त जे काही केले जाते ते या लोकीचे बंधन आहे. त्यासाठी संगदोषापासून दूर राहून त्या यज्ञाच्या पूर्तीसाठी कर्माचे आचरण कर. त्यांनी यज्ञाच्या वैशिष्ट्यांवर प्रकाश टाकला आणि सांगितले की यज्ञाची उत्पत्ती ब्रह्मदेवा पासून झाली आहे. अन्न प्राप्त करण्याचा हेतू समोर ठेवून प्रजा तो यज्ञ करण्यास प्रवृत्त होते. यज्ञ कर्मापासून व कर्म अपौरुषेय वेदापासून उत्पन्न झाले आहेत. या वेदमंत्रांचा द्रष्टा महापुरुषच होते. त्यांचा पुरुष तिरोहित’, निर्मोही होऊन गेला होता. प्राप्तीबरोबर अविनाशी परमात्मा बाकी राहिला होता. यासाठी वेद परमात्म्यापासून उत्पन्न झाले आहेत.

सर्वव्यापी परमात्मा यज्ञामध्ये नेहमी प्रतिष्ठित असतो. व या साधनचक्रानुसार जो वागत नाही तो पापी पुरुष इंद्रियांच्या केवळ सुखोपभोगासाठी हपापला आहे. त्याचे जीणे व्यर्थ आहे. यज्ञ हा असा विधी विशेष आहे की, ज्यात इंद्रियांना आराम नाही, परंतु अक्षय सुख प्राप्त होत असते. मात्र येथे इंद्रियांच्या संयमाबरोबर यात एकाग्र होणे आवश्‍यक असते. इंद्रियांचा आराम ज्यांना हवासा वाटतो ते पापी होत. अजूनपर्यंत श्रीकृष्णाने यज्ञ म्हणजे काय ते सांगितलेले नाही. परंतु सतत यज्ञ करीतच राहायचा की, याचा कधी शेवटही, अंतही आहे. यावर योगेश्वर म्हणतात-

क्रमशः श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ३४.

लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

Leave a comment