श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ३८

श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ३८

श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ३८ –

अध्याय ३ – कर्मयोग – श्लोक क्र. ३.२९ ते ३.३२ | श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ३८.

मूळ श्लोक –

प्रकृतेर्गुणसम्मूढाः सज्जन्ते गुणकर्मसु ।
तानकृत्स्नविदो मन्दान्कृत्स्नविन्न विचालयेत्‌ ॥ ३-२९ ॥

संदर्भित अन्वयार्थ –

प्रकृतेः = प्रकृतीच्या, गुणसम्मूढाः = गुणांनी अत्यंत मूढ झालेली माणसे, गुणकर्मसु = गुणांमध्ये आणि कर्मांमध्ये, सज्जन्ते = आसक्त होतात, अकृत्स्नविदः = पूर्णपणे न जाणणाऱ्या, मन्दान्‌ = मंदबुद्धी अज्ञानी अशा, तान्‌ = त्या माणसांना, कृत्स्नवित्‌ = संपूर्णपणे जाणणाऱ्या ज्ञानी मनुष्याने, न विचालयेत्‌ = विचलित करू नये ॥ ३-२९ ॥

अर्थ –

प्रकृतीच्या गुणांनी मोहित झालेले पुरुष गुण आणि कर्मांमध्ये क्रमश: निर्मल गुणांकडे उन्नती पाहून त्यात आसक्त होतात. त्या परमात्म्याला चांगल्याप्रकारे जाणणाऱ्या ज्ञानी पुरुषाने ‘मन्दान्‌’ शिथिल प्रयत्न करणाऱ्या साधकांना चंचल करू नये. त्यांना चाळवू नये. त्यांना निरूत्साही करू नये. उलट त्यांना प्रोत्साहन द्यावे कारण की, कर्म करत करतच त्यांना परम नैष्कर्म्य स्थिती प्राप्त करावयाची आहे. आपली स्थिती शक्तीचे आकलन करून कर्माला प्रवृत्त होणार्‍या ज्ञानमार्गी साधकांनी कर्माला गुणांची देणगी समजावे. स्वत:ला कर्ता समजून त्यांनी अभिमानी-अहंकारी बनू नये. निर्मल गुणांची प्राप्ती झाल्यानंतरसुद्धा त्यात त्यांनी आसक्त होऊ नये. परंतु निष्काम कर्मयोग्याला कर्म व गुणांच्या विश्लेषणासाठी वेळ देण्याची काही आवश्यकता नाही. त्याने तर फक्त समर्पणासह कर्म करीत रहायचे आहे. कोणते गुण येत आहेत व जात आहेत हे पाहणे दृष्टदेवाची जबाबदारी आहे.

गुणांचे परिवर्तन आणि क्रमाक्रमाने उत्थान ही इृष्टदेवाची देणगी आहे असे तो मानतो आणि हातून कर्म होणे हे ही इष्टदेवाचीच देणगी आहे असे तो समजतो. त्यामुळे कर्तेपणाचा अहंकार किंवा गुणांमध्ये आसक्त होण्याचा त्याला प्रश्नच येत नाही. कारण तो सतत चिंतनात मग्न असतो. यावर आणि युद्धाचे स्वरूप दाखवीत श्रीकृष्ण पुढे म्हणतात-

मूळ श्लोक –

मयि सर्वाणि कर्माणि संन्यस्याध्यात्मचेतसा ।
निराशीर्निर्ममो भूत्वा युध्यस्व विगतज्वरः ॥ ३-३० ॥

संदर्भित अन्वयार्थ –

अध्यात्मचेतसा = अंतर्यामी मज परमात्म्यामध्ये गुंतलेल्या चित्ताच्या द्वारे, सर्वाणि = सर्व, कर्माणि = कर्मे, मयि = मला, सन्यस्य = अर्पण करून, निराशीः = आशारहित, निर्ममः = ममतारहित, (च) = आणि, विगतज्वरः = संतापरहित, भूत्वा = होऊन, युध्यस्व = तू युद्ध कर ॥ ३-३० ॥

अर्थ –

हे अर्जुना, तू अध्यात्मचेतसा’ अंतरात्म्यात चित्ताचा निरोध- निग्रह करून, ध्यानस्थ होऊन, सर्व कर्म मला अर्पण करून निरिच्छ, ममतारहित व संतापरहित होऊन तू युद्ध कर. जेव्हा चित ध्यानामध्ये मग्न आहे, स्थित आहे, यत्किंचितही कसली अपेक्षा नाही, कर्मामध्ये ममत्व नाही, अपयशाबद्दल संताप अगर दुःख नाही, असा पुरुष कोणते युद्ध करेल? जेव्हा सर्व बाजूंनी चित्ताला आवरून त्याला हृदयरूपी देशात स्थित केले जाते तेव्हा असा पुरुष कशासाठी व कोणाबरोबर लढेल? कोण लढेल? प्रत्यक्षात जेव्हा आपण ध्यानात प्रवेश कराल, तेव्हाच युद्धाचे खरे स्वरूप पुढे उभे राहते. तेव्हा काम-क्रोध, राग-द्वेष, आशा-तृष्णा इत्यादी विकारांचा समूह, विजातीय प्रवृत्ती, ज्यांना ‘ कुरू’ म्हंटले जाते, त्या संसारात, प्रवृत्तीमध्ये उद्युक्त करतात. विघ्नरूप बनून साधकावर भयंकर आक्रमण करतात, बस्स! त्यांच्या पलीकडे जाणे म्हणजेच युद्ध होय. या सर्व विकारांच्या पलीकडे जाणे म्हणजेच युद्ध होय. त्यांना वश करीत अंतरात्म्याच्या ठिकाणी रोखून धरणे, संकुचित करणे व ध्यानस्थ होत जाणे म्हणजेच युद्ध होय. यावर भर देत ते पुन्हा म्हणतात-

मूळ श्लोक –

ये मे मतमिदं नित्यमनुतिष्ठन्ति मानवाः ।
श्रद्धावन्तोऽनसूयन्तो मुच्यन्ते तेऽपि कर्मभिः ॥ ३-३१ ॥

संदर्भित अन्वयार्थ –

ये = जे कोणी, मानवाः = मानव, अनसूयन्तः = दोषदृष्टीने रहित, (च) = आणि, श्रद्धावन्तः = श्रद्धायुक्त होऊन, मे = माझ्या, इदम्‌ = या, मतम्‌ = मताचे, नित्यम्‌ = नेहमी, अनुतिष्ठन्ति = अनुसरण करतात, ते अपि = तेसुद्धा, कर्मभिः = संपूर्ण कर्मांतून, मुच्यन्ते = सुटून जातात ॥ ३-३१ ॥

अर्थ –

जे लोक दूषित दृष्टी रहित होऊन आपली श्रद्धा भगवंताच्या ठिकाणी समर्पित करून, जे नेहमी माझे मत- म्हणजे युद्ध कर- हे मत अनुसरतात, ते पुरुष सर्व कर्मापासून मुक्त होतात. (योगोश्वरांचे हे आश्वासन केवळ कोणा हिंदु, मुसलमान किंवा ख्रिस्ती मनुष्यासाठी नाही तर ते अखिल मानवमात्रांसाठी आहे.) त्यांचे मत आहे की युद्ध कर. यावरून असे वाटते की, त्यांचा हा उपदेश युद्ध करणाऱ्यांसाठी होता. अर्जुनाच्यासमोर सौभाग्याने विश्वयुद्धाची व्यूहरचना होती. आपल्यासमोर तर कोणतेही युद्ध नाही. मग आपण गीतेच्या मागे का लागलो आहोत? कर्मातून सुटण्याचा उपाय तर युद्ध करणाऱ्यांसाठी आहे परंतु असे काही नाही. वास्तविक ही लढाई मानवाच्या अंतरदेशातील आहे. क्षेत्र व क्षेत्रज्ञाचा, विद्या आणि अविद्याचा, धर्मक्षेत्र व कुरूक्षेत्राचा हा संघर्ष आहे. आपण जो जो ध्यानामध्ये चित्ताचा निरोध कराल, तो तो विजातीय प्रवृत्ती विघ्नरूपाने प्रत्यक्ष येते व भयंकर आक्रमण करीत असते. त्यांचे शमन करीत चित्ताचा निग्रह करणे म्हणजे तर युद्ध आहे. जो दूषित दृष्टीने रहित होऊन, अत्यंत श्रद्धेने या युद्धात सहभागी होतो तो कर्मबंधनातून, पापी आचरणातून पूर्णत: मुक्त होतो. जो युद्धामध्ये प्रवृत्त होत नाही त्याची काय गती होते? यावर श्रीकृष्ण म्हणतात-

मूळ श्लोक –

ये त्वेतदभ्यसूयन्तो नानुतिष्ठन्ति मे मतम्‌ ।
सर्वज्ञानविमूढांस्तान्विद्धि नष्टानचेतसः ॥ ३-३२ ॥

संदर्भित अन्वयार्थ –

तु = परंतु, ये = जे मानव, अभ्यसूयन्तः = माझ्यावर दोषारोपण करीत, मे = माझ्या, एतत्‌ = या, मतम्‌ = मताला, न अनुतिष्ठन्ति = अनुसरून आचरण करीत नाहीत, सर्वज्ञानविमूढान्‌ = संपूर्ण ज्ञानाच्या बाबतीत मोहित झालेल्या अशा, तान्‌ = त्या, अचेतसः = मूर्खांना, नष्टान्‌ = नष्ट झालेले असेच, विद्धि = समज ॥ ३-३२ ॥

अर्थ –

जे दूषित दुष्टी असणारे ‘ अर्चतस: ‘ मोहनिद्रेमध्ये गढून गेलेले लोक माझ्या या मतानुसार आचरण करीत नाहीत, म्हणजेच ध्यानस्थ होऊन आशा, ममता, संतापरहित होऊन समर्पण वृत्तीने युध्द करीत नाहीत, ‘ सर्वज्ञान विमूढान ‘ ते ज्ञानपथावर संपूर्णपणे मोहपाशात अडकतात, त्या लोकांना तू कल्याणापासून भ्रष्ट झालेले जाण. जर हेच बरोबर आहे तर लोक त्याचे आचरण का करीत नाही? यावर श्रीकृष्ण म्हणतात-

क्रमशः

लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

Leave a comment