श्रीमद् भगवद् गीता भाग ४० –
अध्याय ३ – कर्मयोग – श्लोक क्र. ३.३७ ते ३.४० | श्रीमद् भगवद् गीता भाग ४०.
मूळ श्लोक –
श्रीभगवानुवाच
काम एष क्रोध एष रजोगुणसमुद्भवः ।
महाशनो महापाप्मा विद्ध्येनमिह वैरिणम् ॥ ३-३७ ॥
संदर्भित अन्वयार्थ –
श्रीभगवान = भगवान श्रीकृष्ण, उवाच = म्हणाले, रजोगुणसमुद्भवः = रजोगुणापासून उत्पन्न झालेला, एषः = हा, कामः = कामच, क्रोधः = क्रोध आहे, एषः = हा, महाशनः = पुष्कळ खाणारा म्हणजे भोगांनी कधीही तृप्त न होणारा, (च) = तसेच, महापाप्मा = महापापी आहे, इह = या विषयात, एनम् वैरिणम् विद्धि = काम हाच खरोखर वैरी आहे असे तू जाण ॥ ३-३७ ॥
अर्थ –
हे अर्जुना, रजोगुणापासून उत्पन्न होणारा हा काम आणि क्रोध अग्नीप्रमाणे भोग भोगण्याने कधीही तृप्त न होणारे मोठे पापी आहेत. काम, क्रोध हे रागद्वेषाला पूरक आहेत. आता मी ज्याची चर्चा केली होती, या विषयात तू यांनाच शत्रू आहेत असे जाण. पुढे त्यांचा प्रभाव दाखवीत आहेत.
मूळ श्लोक –
धूमेनाव्रियते वह्निर्यथादर्शो मलेन च ।
यथोल्बेनावृतो गर्भस्तथा तेनेदमावृतम् ॥ ३-३८ ॥
संदर्भित अन्वयार्थ –
यथा = ज्या प्रकारे, धूमेन = धुराने, वह्निः = अग्नी, च = आणि, मलेन = धुळीने, आदर्शः = आरसा, आव्रियते = झाकला जातो, (तथा) = तसेच, यथा = ज्या प्रकारे, उल्बेन = वारेने, गर्भः = गर्भ, आवृतः = झाकलेला असतो, तथा = त्या प्रकारे, तेन = त्या कामाचे द्वारा, इदम् = हे ज्ञान, आवृतम् = झाकले जाते ॥ ३-३८ ॥
अर्थ –
ज्याप्रमाणे धुराने अग्नी व धुळीने आरसा झाकला जातो, अथवा ज्याप्रमाणे वारेने गर्भ वेष्टिला जातो, त्याप्रमाणे कामक्रोध विकारांनी हे ज्ञान झाकलेले आहे. ओले लाकूड जाळल्यानंतर जसा धूरच धूर होतो. अग्नी असूनसुद्धा लपेटण्याचे रूप घेऊ शकत नाही. धुळीने झाकलेल्या आरशावर ज्याप्रमाणे प्रतिबिंब स्पष्ट दिसत नाही, वारेमुळे गर्भ ज्याप्रमाणे झाकलेला असतो त्याप्रमाणे या विकारांमुळे परमात्म्याचे प्रत्यक्ष ज्ञान होत नाही.
मूळ श्लोक –
आवृतं ज्ञानमेतेन ज्ञानिनो नित्यवैरिणा ।
कामरूपेण कौन्तेय दुष्पूरेणानलेन च ॥ ३-३९ ॥
संदर्भित अन्वयार्थ –
च = आणि, कौन्तेय = हे कुंतीपुत्र अर्जुना, अनलेन = अग्नीप्रमाणे, दुष्पूरेण = कधीही पूर्ण न होणाऱ्या, (च) = आणि, एतेन = या, कामरूपेण = कामरूपी, ज्ञानिनः = ज्ञानी लोकांच्या, नित्यवैरिणा = नित्य शत्रूच्या द्वारा, ज्ञानम् = (मनुष्याचे) ज्ञान, आवृतम् = झाकून टाकलेले असते ॥ ३-३९ ॥
अर्थ –
हे कौन्तेया , अग्नीप्रमाणे भोगांनी तृप्त न होणारे, ज्ञानी लोकांचा कायमचा शत्रू, अशा या कामाने ज्ञान झाकलेले आहे. आताच श्रीकृष्णांनी काम आणि क्रोध हे दोन शत्रू सांगितले. प्रस्तुत एलोकात ते केवळ एकाच शत्रूचे-कामाचे नाव येथे घेतले आहे. वास्तविक कामात क्रोधाचा अंतर्भाव आहेच. कार्य पूर्ण झाल्यावरच क्रोध समाप्त होऊन जातो. परंतु कामना संपत नाही. कामना पूर्तीमध्ये व्यत्यय येताच क्रोध पुन्हा जागा होतो. म्हणजेच कामाच्या अंतरंगात क्रोध पण समाविष्ट आहे. या शत्रूचे घर कोठे आहे? याला शोधायचे कोठे? त्याचा वास कोठे असतो हे समजल्यावर त्याला समूळ नष्ट करण्याची सोय होईल. यावर श्रीकृष्ण म्हणतात-
मूळ श्लोक –
इन्द्रियाणि मनो बुद्धिरस्याधिष्ठानमुच्यते ।
एतैर्विमोहयत्येष ज्ञानमावृत्य देहिनम् ॥ ३-४० ॥
संदर्भित अन्वयार्थ –
इन्द्रियाणि = इंद्रिये, मनः = मन, (च) = आणि, बुद्धिः = बुद्धी (हे सर्व), अस्य = या कामाचे, अधिष्ठानम् = निवासस्थान, उच्यते = म्हटले जातात, एषः = हा काम, एतैः = या मन, बुद्धी व इंद्रिये यांच्या द्वारेच, ज्ञानम् = ज्ञानाला, आवृत्य = झाकून टाकून, देहिनम् = जीवात्म्याला, विमोहयति = मोहित करतो ॥ ३-४० ॥
अर्थ –
इंद्रिये, मन आणि बुद्धी ही कामाची निवासस्थाने म्हंटली जातात. हा काम मन, बुद्धी व इंद्रियांच्या द्वारेच ज्ञानाला झाकून जीवात्म्याला मोहात पाडतो.
क्रमशः
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.