श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ४१

श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ४१

श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ४१ –

अध्याय ३ – कर्मयोग – श्लोक क्र. ३.४१ ते ३.४३ | श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ४१.

मूळ श्लोक –

तस्मात्त्वमिन्द्रियाण्यादौ नियम्य भरतर्षभ ।
पाप्मानं प्रजहि ह्येनं ज्ञानविज्ञाननाशनम्‌ ॥ ३-४१ ॥

संदर्भित अन्वयार्थ –

तस्मात्‌ = म्हणून, भरतर्षभ = हे अर्जुना, त्वम्‌ = तू, आदौ = प्रथम, इन्द्रियाणि = इंद्रियांना, नियम्य = वश करून घेऊन, ज्ञानविज्ञाननाशनम्‌ = ज्ञान आणि विज्ञान यांचा नाश करणाऱ्या, एनम्‌ = या, पाप्मानम्‌ = महान पापी अशा कामाला, हि = निश्चितपणे, प्रजहि = बळ वापरून मारून टाक ॥ ३-४१ ॥

अर्थ –

हे अर्जुना, तू प्रथम इंद्रियांचे नियमन करून संयम कर कारण की, शत्रू तर यांच्या अंतरंगात लपलेला आहे. तो तुमच्या शरीराच्या आत आहे. बाहेर शोधून तो कोठेही मिळणार नाही. ही हृदयरूपी देशातील अंतर्विश्चाची लढाई आहे. इंद्रियांना ताब्यात ठेवून ज्ञान व विज्ञानाचा नाश करणाऱ्या या पापी कामालाच तू मारून टाक. काम सरळ पकडता येत नाही. म्हणून विकारांच्या निवासस्थानालाच घेराव घाल. इंद्रियांनाच संयत कर. परंतु इंद्रियांना आणि मनाला आवरणे खूप कठीण आहे. काय हे काम आम्ही करू शकू? यावर श्रीकृष्ण आपले सामर्थ्य दाखवित प्रोत्साहन देत आहेत.

मूळ श्लोक –

इन्द्रियाणि पराण्याहुरिन्द्रियेभ्यः परं मनः ।
मनसस्तु परा बुद्धिर्यो बुद्धेः परतस्तु सः ॥ ३-४२ ॥

संदर्भित अन्वयार्थ –

इन्द्रियाणि = इंद्रिये ही (स्थूलशरीरापेक्षा), पराणि = पर म्हणजे श्रेष्ठ, बलवान आणि सूक्ष्म आहेत, आहुः = असे म्हणतात, इन्द्रियेभ्यः = इंद्रियांपेक्षा, मनः = मन हे, परम्‌ = पर आहे, मनसः तु = मनापेक्षा, बुद्धिः = बुद्धी ही, परा = पर आहे, तु = आणि, यः = जो, बुद्धेः = बुद्धीच्यासुद्धा, परतः = अत्यंत पर, सः = तो (आत्मा) आहे ॥ ३-४२ ॥

अर्थ –

हे अर्जुना, या शरीरापेक्षा तू इंद्रियांना मोठे म्हणजेच सूक्ष्म व बलवान जाण. इंद्रियांपेक्षा वर मन आहे. ते यांच्याहीपेक्षा बलवान आहे. मनाच्यापेक्षा वर बुद्धी आहे आणि या बुद्धीपेक्षाही अत्यंत वर व श्रेष्ठ असा तुमचा आत्मा आहे. तेच तर तुम्ही आहात आणि इंद्रिये, मन, बुध्दीचे नियमन करण्यास तुम्ही सक्षम आहात.

मूळ श्लोक –

एवं बुद्धेः परं बुद्ध्वा संस्तभ्यात्मानमात्मना ।
जहि शत्रुं महाबाहो कामरूपं दुरासदम्‌ ॥ ३-४३ ॥

संदर्भित अन्वयार्थ –

एवम्‌ = अशा प्रकारे, बुद्धेः = बुद्धीपेक्षा, परम्‌ = पर म्हणजे सूक्ष्म, बलवान आणि अत्यंत श्रेष्ठ अशा आत्म्याला, बुद्ध्वा = जाणून, (च) = आणि, आत्मना = बुद्धीच्या द्वारा, आत्मानम्‌ = मनाला, संस्तभ्य = वश करून घेऊन, महाबाहो = हे महाबाहो, कामरूपम्‌ = (या) कामरूपी, दुरासदम्‌ = दुर्जय, शत्रुम्‌ = शत्रूला, जहि = तू ठार कर ॥ ३-४३ ॥

अर्थ –

या प्रकारे बुद्धीच्या वर अर्थात सूक्ष्म व बलवान असा आपल्या आत्म्याला जाणून, आपल्या आत्मबलाला समजून, बुद्धीच्या द्वारे आपल्या मनाला वश करून या कामरूपी, जिंकण्यास कठीण अशा शत्रूला मार. काम एक दुर्जय शत्रू आहे. इंद्रियाद्वारे तो आत्म्याला मोहात पाडतो. तेव्हा आपले सामर्थ्य ओळखून, आत्म्याला बलवान समजून, कामरूपी शत्रूला ठार मार. अर्थात हा शत्रू अंतरंगातील आहे हे सांगायची काही आवश्यकता नाही.

निष्कर्ष –

अनेक गीताप्रेमी व्याख्यात्यांनी या अध्यायाला ‘ कर्मयोग’ असे नाव दिले आहे. परंतु हे सुसंगत नाही.दुसर्‍्या अध्यायात योगेश्वरांनी कर्माचा प्रथम उच्चार केला. त्यांनी कर्माचे महत्त्व प्रतिपादन करून त्यामध्ये कर्मजिज्ञासा जागृत केली. आणि- या अध्यायामध्ये त्यांनी कर्माला परिभाषित केले- व्याख्याबध्द केले की, यज्ञाची प्रक्रिया म्हणजेच कर्म होय. स्पष्टच आहे की यज्ञ ही एक निर्धारित दिशा आहे. त्याच्या व्यतिरिक्त जे काही केले जाते ते या लोकीचे बंधन आहे. श्रीकृष्ण ज्याला कर्म म्हणतात ते कर्म मोक्ष्यसेशुभात्‌’ संसारबंधनातून सुटका करविणारे कर्म आहे.

श्रीकृष्णांनी यज्ञाची उत्पत्ती येथे सांगितली तो काय देतो? त्याची वैशिष्ट्ये कोणती? यांचे येथे चित्रण केले आहे व यज्ञ करण्यावर भर दिला आहे. त्यांनी सांगितले या यज्ञाची प्रक्रिया म्हणजे कर्म आहे. जे हे कर्म करीत नाहीत ते पापी, आरामाचा हव्यास असणारे, असून ते व्यर्थ जगत असतात.

पूर्वी होऊन गेलेल्या महर्षींनी देखील हे कर्म करूनच परम नेष्कर्म्य सिद्धी प्राप्त करून घेतली होती. ते आत्मतृप्त आहेत. त्यांना कर्म करण्याची आवश्यकता नाही. तरीही मागावून येणाऱ्यांच्या मार्गदर्शनासाठी ते देखील आपले कर्म उत्तम प्रकारे करीत होते. त्या महापुरुषांबरोबर श्रीकृष्णाने आपली तुलना केली व म्हंटले की खरे म्हणजे मलाही आता कर्म करण्याची काही आवश्यकता नाही. परंतु मागून येणार्‍या लोकांच्या हितासाठीच मी कर्म करीत आहे. येथे श्रीकृष्णांनी आपला स्पष्ट परिचय देऊन सांगितले को, ते देखील एक योगी होते.

त्यांनी कर्मामध्ये प्रवृत्त झालेल्या साधकांनी विचलित होऊ नये, मन चंचल ठेवू नये असे सांगितले कारण कर्म करूनच साधकाला परमोच्च स्थिती प्राप्त करावयाची आहे. जर त्यांनी नियत कर्म केले नाही तर ते नष्ट॒ होतील. या कर्मासाठी ध्यानस्थ होऊन त्यांना युद्ध करावयाचे आहे. डोळे बंद आहेत, इंद्रियांना काबूत ठेवून चित्ताचा निरोध होत असेल तर युद्ध कसले? त्यावेळी काम-क्रोध, राग-द्वेष हे बाधा आणतात. या विजातीय प्रवृत्तीच्या पलीकडे पोहचणे हेच युद्ध होय. आसुरी संपत्तीला-कुरुक्षेत्र, विजातीय प्रवृत्तींना हळूहळू छाटून टाकत, ध्यानस्थ होत जाणे, हे युध्द आहे. खरे पाहता ध्यानातच युद्ध आहे. हाच या अध्यायाचा सारांश आहे. या अध्यायात ना कर्माविषयी सांगितले, ना यज्ञाविषयी. जर यज्ञाचे स्वरूप नीट समजेल तर कर्म चांगले समजले जाईल. अजूनपर्यंत त्यांनी कर्म म्हणजे काय हे समजावलेच नाही.

या अध्यायात फक्त स्थितप्रज्ञ महापुरुषाच्या प्रशिक्षणात्मक पैलूंवर भर दिला आहे. हा तर गुरुजनांसाठी निर्देश आहे. त्यांनी कर्म केले नाही तरी त्यांचे काहीही नुकसान होणार नाही किंवा कर्म केल्याने त्यांना काही लाभ आहे असेही नाही. परंतु ज्या साधकांना परमगती प्राप्त करावयाची आहे, त्यांच्यासाठी खास काही सांगितलेच नाही. तर मग हा ‘ कर्मयोग’ कसा? कर्माचे स्वरूप पण स्पष्ट नाही, की जे नीट करता येईल. कारण की यज्ञाची प्रक्रियाच कर्म आहे’. आत्तापर्यंत त्यांनी एवढेच सांगितले. यज्ञाविषयी तर काही सांगितलेच नाही. मग कर्माचे स्वरूप कुठे स्पष्ट झाले? मात्र गीतेमधील युद्धाचे यथार्थ चित्रण येथेच वाचायला मिळते.

संपूर्ण गीतेवर नजर फिरवली तर दुसऱया अध्यायात सांगितले की शरीर नाशवंत आहे म्हणून युद्ध कर. गीतेमध्ये युद्धाचे हेच एक ठोस कारण सांगितले आहे. पुढे ज्ञानयोगाच्या संदर्भात क्षत्रियासाठी युध्द हेच कल्याणाचे एकमात्र साधन दाखविले आहे आणि पुढे सांगितले की ही बुद्धी तुझ्यासाठी ज्ञानयोगाच्या विषयात सांगितली गेली. कोणती बुद्धी? तर युद्धातील हार किंवा जीत या दोन्हींमध्ये साधकाला लाभच मिळणार आहे, असे समजून युद्ध कर. नंतर अध्याय चौथ्यामध्ये सांगितले की योगामध्ये मग्न राहून हृदयात असलेल्या आपल्या संशयाला ज्ञानरूपी तलवारीने कापून टाक. ही तलवार योगस्थितीत आहे. मग अध्याय पाच ते दहापर्यंत युद्धाची चर्चासुध्दा केली नाही. अकाराव्या अध्यायात केवळ एवढेच सांगितले की, हे शत्रू माझ्याकडून पूर्वीच मारले गेले आहेत. तू फक्त निमित्तमात्र होऊन उभा रहा व यश प्राप्त कर. ते तुझ्याशिवाय मारले गेले आहेत. प्रेरक सर्व करवून घेईल. सध्या तू ह्या मेलेल्यानाच मार.

पंधराव्या अध्यायात हा संसार मूळ असणाऱ्या पिंपळाच्या वृक्षासारखा आहे असे सांगितले असंगतरूपी शस्त्राने कापून त्या परमपदाला शोधण्याचा निर्देश श्रीकृष्णांनी दिला. पुढील अध्यायात युद्धाचा उल्लेख नाही.हो! सोळाव्या अध्यायात असुरांचे चित्रण आहे, जे नरकाला नेणारे आहे. तिसऱया अध्यायात युद्धाचे पूर्ण चित्रण आहे. ए्लोक ३० ते ४३ पर्यंत युद्धाचे स्वरूप, त्याची अनिवार्यता, युद्ध न करणार्‍यांचा विनाश, युद्धात मारले जाणाऱ्या शत्रूंची नावे, त्यांना मारण्यासाठी आपल्या शक्तीला आव्हान व त्यांना कापून फेकण्यावर भर दिला आहे. या अध्यायात शत्रू व शत्रूचे आंतरिक स्वरूप स्पष्ट केले आहे. त्यांच्या विनाशासाठी प्रेरणा दिली आहे. म्हणून-

मूळ तिसऱ्या अध्यायाची समाप्ती –

ॐ तत्सदिति श्रीमद्‌भगवद्‌गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे कर्मयोगो नाम तृतीयोऽध्यायः ॥ ३ ॥

अर्थ –

ॐ हे परमसत्य आहे. याप्रमाणे श्रीमद्‌भगवद्‌गीतारूपी उपनिषद तथा ब्रह्मविद्या आणि योगशास्त्राविषयी श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादातील कर्मयोग नावाचा हा तिसरा अध्याय समाप्त झाला.

इति श्रीमत्परमहंस परमानंदस्य शिष्य स्वामी अडगड़ानन्दकृते श्रीमदभवदगीताया: ‘यथार्थ गीता’ भाष्ये ‘शत्रु विनाश प्रेरणा’ नाम ततीयोध्याय: ॥।३॥।

अशा प्रकारे श्रीमत्परमहंस परमानन्दजींचे शिष्य स्वामी अडगडानन्दकृत श्रीमदभगवदगीतेवरील भाष्य ‘ यथार्थ गीता ‘ यामधील ‘ शत्रू विनाश प्रेरणा ‘ नावाचा तिसरा अध्याय समाप्त झाला.

।। हरिः  तत्सत्‌ ।।

क्रमशः

लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

Leave a comment