श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ४२

श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ४२

श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ४२ –

अध्याय ४ – ज्ञानकर्मसंन्यासयोग – श्लोक क्र. ४.१ ते ४.४ | श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ४२.

श्री परमात्मने नमः
॥ अथ चतुर्थोडध्यायः ॥

तिसऱ्या अध्यायात योगेश्वर श्रीकृष्णाने असे आश्वासन दिले होते की, जो कोणी मानव दोषदृष्टिरहहित, अविकल्प होऊन श्रद्धायुक्त भावाने मी सांगितल्याप्रमाणे चालेल तो कर्मबंधनातून चांगल्या प्रकारे मुक्त होईल. कर्म-बंधनातून मुक्ती देण्याची क्षमता योगामध्ये ( ज्ञानयोग व कर्मयोग या दोन्हीत ) आहे. योगामध्येच युद्ध-संचार समाविष्ट आहे. प्रस्तुत अध्यायात या योगाचा प्रणेता कोण आहे? त्याचा क्रमश: विकास कसा होतो? हे योगेश्वर श्रीकृष्णाने सांगितले आहे.

मूळ चौथ्या अध्यायाचा प्रारंभ:

मूळ श्लोक –

श्रीभगवानुवाच
इमं विवस्वते योगं प्रोक्तवानहमव्ययम्‌ ।
विवस्वन्मनवे प्राह मनुरिक्ष्वाकवेऽब्रवीत्‌ ॥ ४-१ ॥

संदर्भित अन्वयार्थ –

श्रीभगवान = भगवान श्रीकृष्ण, उवाच = म्हणाले, इमम्‌ = हा, अव्ययम्‌ = अविनाशी, योगम्‌ = योग, अहम्‌ = मी, विवस्वते = सूर्याला, प्रोक्तवान्‌ = सांगितला होता, विवस्वान्‌ = सूर्याने (तो योग), मनवे = (आपला पुत्र वैवस्वत) मनू याला, प्राह = सांगितला, (च) = आणि, मनुः = मनूने, इक्ष्वाकवे = (आपला पुत्र) इक्ष्वाकू राजाला, अब्रवीत = सांगितला ॥ ४-१ ॥

अर्थ –

भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुना, हा अविनाशी योग कल्पाच्या पूर्वी मी विवस्वानाला ( सूर्याला ) सांगितला होता. विवस्वानाने तो मनूला सांगितला. मनूने इश्वाकू याला हा योग सांगितला. म्हणजे हा योग सर्वप्रथम श्रीकृष्णांनी सांगितला होता. कारण श्रीकृष्ण स्वतः एक महायोगी होते. तद्रूप असणाऱया महापुरुष श्रीकृष्णांनी कल्पाच्या आरंभी म्हणजे आराधनेच्या आरंभी विवस्वानाला विवश प्राणिमात्राला अविनाशी योग सांगितला.

सूर्य एक प्रतीक आहे. येथे सूर्य म्हणजे श्वास व त्या श्वासाच्या ठिकाणी या योगाचा संचार होतो. म्हणजेच सूर्याच्या ठिकाणी भगवान-परमात्म्याच्या प्रकाश स्वरूपात स्थित आहेत. परमात्मप्राप्तीचे ते एक दिव्य स्थळ आहे, कारण प्रकाशदाता सूर्य म्हणजेही परमात्माच होय.

‘हा योग अविनाशी आहे. श्रीकृष्णाने प्रारंभी सांगितले होते की या योगात आरंभाचा नाश होत नाही. म्हणून या योगविद्येच्या आचरणाचा प्रारंभ म्हणजे हा योग तुला पूर्णत्वाची प्राप्ती करून देईल. शरीराचा कल्प औषधांनी होतो, परंतु आत्म्याचा भजनाने होतो. भजनाचा आरंभ म्हणजे आत्मकल्पाचे मूळ आहे. हे साधन-भजन हेही कोण्या महापुरुषाचीच देणगी आहे. ज्यात भजनाचा काही संस्कार नाही अशा मोहनिद्रेमध्ये अचेत, आदिम मानव योगविद्येविषयी कधी विचारही करू शकत नाही. असा मनुष्य जेव्हा त्या महापुरुषाला पाहतो तेव्हा त्याच्या केवळ दर्शनाने, त्याच्या वाणीने, त्याच्या सात्निध्याने, त्याच्या थोड्यबहुत सेवेने योगाचा संस्कार त्या अचेत, अज्ञानी मनुष्यात संक्रमित होतो. गोस्वामी तुलसीदासजी याला म्हणतात- जे चितये प्रभु जिन्ह प्रभु हेरे’/ते सब भये परम पद जोगू’ । ( रामचरितमानस)

श्रीकृष्ण म्हणतात, हा योग आरंभी मी सूर्याला सांगितला.’चक्षोः सूर्यो अजायत’ । महापुरूषाच्या केवळ दृष्टिनिक्षेपाने योगविद्येचे संस्कार श्वासामध्ये प्रसारित होतात. स्वयंप्रकाशी, स्ववशी परमेश्वराचा निवास सर्वांच्या हृदयात असतो. श्वासाच्या निरोधानेच त्याची प्राप्ती होते. श्वासामध्ये संस्कारांचे सृजन म्हणजेच भगवंताचे सूर्याला सांगणे- उपदेश करणे होय. वेळ आली की हे संस्कार मनात स्फुरतात. हेच सूर्याचे मनूला सांगणे आहे. संस्कार मनात स्फुरले की महापुरुषाच्या उपदेशाची इच्छा जागृत होईल. जर मनात काही गोष्ट असेल तर ती प्राप्त करण्याची मनाला निश्चितपणे इच्छा होईल. हेच मनूचे इक्ष्वाकूला सांगणे आहे. आणि मग जे अविनाशी आहे, कर्मबंधनातून मुक्ती देणारे आहे ते नियत कर्म करण्याची लालसा मनात जागृत होईल व मग असे हे मोक्ष देणारे कर्म करावे असे वाटते ब मग आराधनेलाही गती येते. गती आली की हा योग कोठे पोहचतो यावर श्रीकृष्ण म्हणतात-

मूळ श्लोक –

एवं परम्पराप्राप्तमिमं राजर्षयो विदुः ।
स कालेनेह महता योगो नष्टः परन्तप ॥ ४-२ ॥

संदर्भित अन्वयार्थ –

परन्तप = हे परंतपा (अर्थात शत्रुतापना अर्जुना), एवम्‌ = अशाप्रकारे, परम्पराप्राप्तम्‌ = परंपरेने प्राप्त, इमम्‌ = हा योग, राजर्षयः = राजर्षींनी, विदुः = जाणला (परंतु त्यानंतर), सः = तो, योगः = योग, महता कालेन = काळाच्या मोठ्या ओघात, इह = या पृथ्वीलोकावर, नष्टः = जवळ जवळ नाहीसा झाला ॥ ४-२ ॥

अर्थ –

कालेनेहे या प्रकारे एखाद्या महापुरूषाकडून संस्काररहित पुरूषांच्या श्वासात, श्वासातून मनात, मनातून इच्छेमध्ये व इच्छा तीव्र झाली की, मग आचरणात येऊन हा योग क्रमश: राजर्षी श्रेणीपर्यंत पोहचतो. या अवस्थेत गेल्यानंतर तो तेथे ज्ञात होतो- सूचित होतो. या स्तरावरील साधकांच्यात क्रद्दिसिद्धींचा संचार होतो व मग या महत्त्वपूर्ण काळामध्ये हा योग शरीरातच लुप्त होतो. या सीमारेषेला कसे पार करता येईल? या सीमारेषेपर्यंत येऊन सर्व असेच नष्ट होतात का? श्रीकृष्ण म्हणतात-नाही जो माझा भक्त आहे, जो मला शरण आलेला आहे, जो माझा जिवलग मित्र आहे तो नष्ट होत नाही.

मूळ श्लोक –

स एवायं मया तेऽद्य योगः प्रोक्तः पुरातनः ।
भक्तोऽसि मे सखा चेति रहस्यं ह्येतदुत्तमम्‌ ॥ ४-३ ॥

संदर्भित अन्वयार्थ –

(त्वम्‌) = तू, मे = माझा, भक्तः = भक्त, च = आणि, सखा = प्रिय मित्र, असि = आहेस, इति = म्हणून, सः एव = तोच, अयम्‌ = हा, पुरातनः = पुरातन, योगः = योग, अद्य = आज, मया = मी, ते = तुला, प्रोक्तः = सांगितला आहे, हि = कारण, एतत्‌ = हे, उत्तमम्‌ = मोठेच उत्तम, रहस्यम्‌ = रहस्य आहे म्हणजे गुप्त ठेवण्यास योग्य असा विषय आहे ॥ ४-३ ॥

अर्थ –

तोच हा पुरातन योग मी आज तुला सांगत आहे. कारण तू माझा परम मित्र आहेस म्हणून. हा उत्तम व रहस्यपूर्ण योग तुला सांगत आहे. अर्जुन हा क्षत्रिय श्रेणीचा साधक होता व जेथे क्रद्धिसिद्धींच्या मोहात अडकल्याने साधक नष्ट होतो त्या राजर्षी अवस्थेमध्ये तो होता. या काळामध्येसुध्दा योग हा कल्याण स्वरूपातच असतो, परंतु साधारणतः साधकच या अवस्थेपर्यंत आले की विचलित होतात. अर्जुन याच म्हणजे नष्ट होण्याच्या अवस्थेत होता व म्हणूनच श्रीकृष्णाने त्याला त्या अवस्थेतून बाहेर काढण्यासाठी हा अविनाशी व रहस्यमय असा योग सांगितला. का सांगितला? कारण अर्जुना, तू माझा भक्त आहेस, अनन्य भावाने तू मला शरण आलेला आहिस व तू माझा प्रिय सखा आहेस.

अध्यायाच्या प्रारंभीच भगवंतानी सांगितले की हा अविनाशी योग कल्पाच्या प्रारंभीच मी सूर्याला सांगितला होता. सूर्याकडून मनुला हीच गीता मिळाली. मनुने ती आपल्या स्मृति ( स्मरणा ) मध्ये जपून ठेवली. मनुकडून हीच स्मृति इक्ष्वाकुला प्राप्त झाली आणि राजर्षिना तीचे ज्ञान झाले. परंतु ह्या महत्वपूर्ण काळापासून हा योग विस्मृतीत गेला. हेच प्राचीन स्पृतिज्ञान भगवंतांनी अर्जुनाला सांगितले. थोडक्यात सांगायचे तर मनुला ज्या ज्ञानाची प्राप्ति झाली होती, तेच ही गीता आहे. मनुला ते वारशाने ( परंपरेने ) मिळाले होते. या शिवाय आणखी कुठली स्मृति त्यांनी स्वीकारली असती! गीता ज्ञान ऐकल्यानंतर अठराव्या अध्यायाच्या अखेरीस अर्जुन म्हणाला, मला स्मृति प्राप्त झाली आहे, जशी मनुला झाली होती. असो, ही श्रीमदभगवतगीता हीच विशुद्ध मनुस्मृति आहे.

ज्या परमात्म्याच्या प्राप्तीची आम्हांला आस आहे, तो ( सदगुरू ) परमात्मा आत्म्यामध्ये तद्रूप होऊन जेव्हा दिशा दाखवू लागतो, मार्गदर्शन करू लागतो तेव्हाच वास्तविक भजनाला प्रारंभ होत असतो. येथे प्रेरक अवस्थेमध्ये परमात्मा व सद्गुरू एक दुसऱ्यांचे पर्याय असतात. ज्या स्थितीत आम्ही उभे आहोत त्या स्थरावर येऊन स्वयं प्रभू हृदयात येऊन बसतात, शांत करतात, समजवतात, विचलित होणार्‍्याला सावरतात तेव्हा मन काबूत येते. ‘मन बस होइ तबहि, जब प्रेरक प्रभु बरजे। ” जोपर्यंत परमात्मा सारथी होऊन, आत्म्याशी तद्रूप होऊन प्रेरक स्वरूपात उभे राहत नाहीत तोपर्यंत खर्‍या अर्थाने या भगवत पथावर प्रवेश मिळवता येत नाही.

“पूज्य गुरूदेव ‘ म्हणत- ” आम्ही कितीतरी वेळा नष्ट होता होता वाचलो आहोत. भगवंतानेच आम्हांला वाचवले आहे. भगवंताने आम्हांला त्यावेळी समजावले, उपदेश केला. ” यावर आम्ही विचारले, “’ महाराजश्री , परमेश्वर ही बोलतो का? आपल्याशी गप्पा मारतो का?” त्यावर ते म्हणाले, ‘ हो,

तुझ्याशी आता मी बोलत आहे तसा परमेश्वर माझ्याशी बोलतो. तासन तास आखंड बोलतो.’ हा अनुभव आम्हांला न आल्याने आम्हांला थोडे दुःख झाले, पण जास्त तर आश्चर्य बाटले. कारण ही अगदी नवलाची आश्चर्य करण्यासाठी गोष्ट होती. थोड्या वेळाने महाराज म्हणाले,

‘काय घाबरतोस तुला सांगतो सगळे. ‘ ‘ महाराजांचे म्हणणे अक्षरश: खरे होते आणि हाच सख्य भाव होय. एखाद्या मित्राप्रमाणे ते निराकरण करत गेले. सदगुरूच्या अशा कृपेनेच साधक अशा भ्रामक नष्टवत स्थितीतून पार होऊ शकतो.

इथपर्यंत श्रीकृष्णाने एखाद्या महापुरुषाद्वारा योगाचा आरंभ, त्यात येणाऱ्या अडचणी आणि त्या अडचणी पार करण्याचा रस्ता सांगितला. यावर अर्जुनाने प्रश्न केला-

मूळ श्लोक –

अर्जुन उवाच
अपरं भवतो जन्म परं जन्म विवस्वतः ।
कथमेतद्विजानीयां त्वमादौ प्रोक्तवानिति ॥ ४-४ ॥

संदर्भित अन्वयार्थ –

अर्जुन = अर्जुन, उवाच = म्हणाला, भवतः = तुमचा, जन्म = जन्म (तर), अपरम्‌ = अर्वाचीन म्हणजे अलीकडच्या काळातील आहे, (च) = आणि, विवस्वतः = सूर्याचा, जन्म = जन्म, परम्‌ = फार प्राचीन आहे म्हणजे कल्पाच्या आरंभी झालेला होता (तर मग), इति = ही गोष्ट, कथम्‌ = कशी, विजानीयाम्‌ = मी समजू की, त्वम्‌ = तुम्हीच, आदौ = कल्पाच्या आरंभी, (सूर्यम्‌) = सूर्याला, एतत्‌ = हा योग, प्रोक्तवान्‌ = सांगितलेला होता ॥ ४-४ ॥

अर्थ –

अर्जुन म्हणाला, भगवन्‌, आपला जन्म तर ‘ अपरम’ अलीकडचा आहे व माझ्या आतील श्वासाचा संचार तर अत्यंत प्राचीन आहे. तेव्हा हा योग तुम्हीच आराधनेच्या प्रारंभी सांगितला होता, यावर मी कसा विश्वास ठेवावा? यावर योगेश्वर श्रीकृष्ण म्हणाले-

क्रमशः श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ४२.

लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

Leave a comment