श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ४३

श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ४३

श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ४३ –

अध्याय ४ – ज्ञानकर्मसंन्यासयोग – श्लोक क्र. ४.५ ते ४.८ | श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ४३.

मूळ श्लोक –

श्रीभगवानुवाच
बहूनि मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन ।
तान्यहं वेद सर्वाणि न त्वं वेत्थ परन्तप ॥ ४-५ ॥

संदर्भित अन्वयार्थ –

श्रीभगवान = भगवान श्रीकृष्ण, उवाच = म्हणाले, परन्तप अर्जुन = हे परंतपा (अर्थात शत्रुतापना) अर्जुना, मे = माझे, च = आणि, तव = तुझे, बहूनि = पुष्कळ, जन्मानि = जन्म, व्यतीतानि = होऊन गेले आहेत, तानि = ते, सर्वाणि = सर्व, त्वम्‌ = तू, न वेत्थ = जाणत नाहीस, (किंतु) = परंतु, अहम्‌ = मी, वेद = जाणतो ॥ ४-५ ॥

अर्थ –

श्री भगवान म्हणाले, अर्जुना, तुझे व माझे पुष्कळ जन्म होऊन गेलेले आहित. हे शत्रुतापना, ते सर्व जन्म मी आठवू शकतो; पण तू आठवू शकत नाहीस. अरे साधकाला ते जन्म आठवत नाहीत किंवा तो ते जन्म जाणतही नाही. परंतु स्वरूपामध्ये स्थित असणारा महापुरुष ते जाणत असतो, अव्यक्त स्थितीत असणारा जाणत असतो. याचा अर्थ जसे सर्व जन्माला येतात तशा प्रकारे तुम्हीही जन्माला येता का? श्रीकृष्ण म्हणतात नाही. शरीरप्राप्तीपेक्षा स्वरूपप्राप्ती भिन्न आहे. माझा जन्म तुमच्या साध्या डोळ्यांना दिसू शकत नाही. मी अजन्मा, अव्यक्त व शाश्वत असूनही शरीराचा आधार घेणारा आहे.

“अवधू जीवत में कर आसा।
मुए मुक्ति गुरु कहे स्वार्थी, झूठा दे विश्वासा।। ”

शरीराच्या अस्तित्वासह परमतत्त्वात प्रवेश मिळवता येतो. मात्र त्यात लेशमात्र त्रुटी राहिली तरी पुन्हा जन्म घ्यावा लागतो. अद्यापपर्यंत अर्जुन श्रीकृष्णाला आपल्यासारखा देहधारी समजत होता, म्हणून त्याने प्रश्न विचारला – जसा सर्वांचा जन्म होतो तसा तुमचा जन्म झाला आहे का? तुम्हीही शरीरधारी आहात का? श्रीकृष्ण म्हणतात-

मूळ श्लोक –

अजोऽपि सन्नव्ययात्मा भूतानामीश्वरोऽपि सन्‌ ।
प्रकृतिं स्वामधिष्ठाय सम्भवाम्यात्ममायया ॥ ४-६ ॥

संदर्भित अन्वयार्थ –

(अहम्‌) = मी, अजः = जन्मरहित, (च) = आणि, अव्ययात्मा = अविनाशी स्वरूप असणारा, सन्‌ अपि = असून सुद्धा, (तथा) = तसेच, भूतानाम्‌ = सर्व प्राण्यांचा, ईश्वरः = ईश्वर, सन्‌ अपि = असूनही, स्वाम्‌ = स्वतःच्या, प्रकृतिम्‌ = प्रकृतीला, अधिष्ठाय = अधीन करून घेऊन, आत्ममायया = आपल्या योगमायेने, सम्भवामि = प्रकट होत असतो ॥ ४-६ ॥

अर्थ –

मी विनाशरहित, जन्मरहित आणि सर्व प्राणिमात्रांच्या ठिकाणी अधिष्ठित असूनही स्वकीय मायेला वश करून आत्म-मायेच्या योगाने जन्म घेतो. ‘एक माया म्हणजे अविद्या, जी प्रकृतीच्या ठिकाणी विश्वास ठेवते आणि नीच योनीचे कारण बनते; निमित्त बनते. दुसरी माया म्हणजे आत्ममाया! ती आत्म्यामध्ये प्रवेश मिळवून देते व स्वरूपाच्या – परमात्म्याच्या जन्माचे कारण बनते. हिलाच योगमायाही म्हणतात, पण आम्ही तिच्यापासून दूर आहोत. ही आत्ममाया शाश्वत स्वरूपाशी आमचे मिलन घडवून आणते. त्या आत्मिक प्रक्रियेच्या द्वारा मी त्रिगुणमयी प्रकृतीला बश करून प्रकट होतो.-जन्म घेतो.

साधारणत: लोक म्हणतात की परमेश्वराचा अवतार झाला तर त्याचे दर्शन घेऊ. श्रीकृष्ण म्हणतात दुसरे कोणी प्रत्यक्ष पाहू शकेल असा अवतार वगैरे काही नसतो. स्वरूपाचा जन्म पिंडाच्या ठिकाणी होत नाही. श्रीकृष्ण म्हणतात साधनेद्वारा, आत्ममाया द्वारा आपल्या त्रिगुणमयी प्रकृतीला वश करून मी प्रकट होत असतो. परंतु कोणत्या परिस्थितीत?

मूळ श्लोक –

यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत ।
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्‌ ॥ ४-७ ॥

संदर्भित अन्वयार्थ –

भारत = हे भारता(भरतवंशी अर्जुना), यदा यदा = जेव्हा जेव्हा, धर्मस्य = धर्माची, ग्लानिः = हानि, (च) = आणि, अधर्मस्य = अधर्माची, अभ्युत्थानम्‌ = वृद्धी, भवति = होते, तदा हि = तेव्हा तेव्हा, अहम्‌ = मी, आत्मानम्‌ = आपले रूप, सृजामि = रचतो म्हणजे साकाररूपाने लोकांच्या समोर प्रकट होतो ॥ ४-७ ॥

अर्थ –

हे भारता(भरतवंशी अर्जुना), जेव्हा जेव्हा परमधर्म परमात्म्यासाठी हृदय ग्लानीने भरून जाते, जेव्हा अधर्माच्या वृद्धीमुळे भाविक जन पैलतीर पोहचू शकत नाहीत; तेव्हा मी स्वरूपाची रचना करू लागतो. अशाच प्रकारची ग्लानी मनूला आली होती.

हदय बहुत दुख लाग, जनम गयउ हरि भगति बिनु।
( रामचरितमानस )

जेव्हा प्रेमस्वरूप अशा भक्ताचे हृदय प्रेमाने भरून येते, त्या शाश्वत धर्मासाठी ‘गदगद गिरा नयन बह नीरा’ अशी त्याची स्थिती होते व जेव्हा प्रयत्न करूनही भक्त अधर्मावर मात करू शकत नाही- अशी जेव्हा स्थिती होते म्हणजे धर्माला जेव्हा ग्लानी येते- तेव्हा मी माझ्या स्वरूपाची रचना करीत असतो. अर्थात भगवंताचे हे प्रकटीकरण फक्त त्याच्या प्रेमळ भक्तांसाठीच असते.

सो केवल भगतन हित लागी।
( रामचरितमानस १/१२/५)

आणि मग हा अवतार एखाद्या भाग्यवान साधकाच्या अंतरंगात होतो. ‘पण परमात्मा प्रकट होऊन काय करतो?

मूळ श्लोक –

परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम्‌ ।
धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ॥ ४-८ ॥

संदर्भित अन्वयार्थ –

साधूनाम्‌ = साधूंचा म्हणजे चांगल्या मनुष्यांचा, परित्राणाय = उद्धार करण्यासाठी, दुष्कृताम्‌ = पापकर्म करणाऱ्यांचा, विनाशाय = विनाश करण्यासाठी, च = आणि, धर्मसंस्थापनार्थाय = धर्माची चांगल्या प्रकारे स्थापना करण्यासाठी, युगे युगे = युगायुगात, सम्भवामि = मी प्रकट होतो ॥ ४-८ ॥

अर्थ –

हे अर्जुना, ‘साधूनां परित्राणाय’ साधकांचे परमसाध्य फक्त ‘परमात्म्याची प्राप्ती हेच असते व ते साध्य झाल्यावर त्यांना कोणतीही साधना करण्याचे शेष राहत नाही. ते साध्य प्राप्त होण्यासाठी आवश्यक असणारे विवेक, वैराग्य शम-दम इत्यादी दैवी संपदेचे गुण साधकांमध्ये निर्विघ्नपणे प्रवाहित करण्यासाठी तसेच ‘ दुष्कृताम्‌’ ज्यामुळे कार्य दूषित होते अशा काम-क्रोध, राग- द्वेषादि विजातीय प्रवृत्तींचा समूळ नाश करण्यासाठी तसेच धर्माची संस्थापना करण्यासाठी मी युगायुगाच्या ठिकाणी अवतार घेतो.

येथे युग म्हणजे सत्य युग, त्रेता, द्वापर युग असा अर्थ नाही. युगधर्मांचा चढ- उतार मनुष्य स्वभावावर अवलंबून आहे. युग-धर्माचे अस्तित्व सदैव असते.

नित जुग धर्म होहि सब केरे। हृदय राम माया के प्रेरे।
रामचरितमानस (७/१०/१)

युगधर्म सर्वांच्या हृदयात नित्य वसत असतात. त्यांचा वास तेथे अविद्येमुळे नसतो; परंतु विद्येमुळे, राममायेच्या प्रेरणेमुळे असतो. या श्लोकात जिला आत्ममाया म्हंटले आहे तीच राममाया होय. हृदयात रामस्थिती निर्माण करणारी, रामाकडून प्रेरित झालेली जी विद्या ती राममाया तीच आत्ममाया. पण कोणता युगधर्म सुरू आहे हे समजावे कसे? शुद्ध सत्व समता तिग्याना । कृत प्रभाव प्रसन्न मन जाना ।।’ ( मानस ७/१०३/२ ) जेव्हा हृदयात शुद्ध सात्त्विक गुण कार्यरत असेल तर राजसब तामस हे दोन गुण तेथे शांत असतात, विषमता नावालाही राहिलेली नसते, द्वेषभाव नष्ट झालेला असतो, जेथे विज्ञानाचे अस्तित्व असते म्हणजेच परमेश्वराकडून आदेश घेऊन त्याप्रमाणे आचरण करण्यास जे समर्थ असतात, तशी ज्यांच्यात क्षमता असते. तेव्हा त्या साधकाला सत्युगात प्रवेश मिळाला असे समजावे. त्यानंतर इतर दोन युगांचे त्यांनी विवरण केले व शेवटी

तामस बहुत रजोगुन थोरा।
कलि प्रभाव विरोध चहु ओरा।।

जेव्हा हृदयात तामस गुणांचे प्राबल्य असते, राजस गुण अगदी नाममात्र असतो, चोहो बाजूंनी वैर आणि विरोध अधिक असतो तेव्हा ती व्यक्ती कलीयुगीन समजावी. जेव्हा तामस अधिक प्रमाणात कार्यरत असतो तेव्हा त्या मनुष्यात आळस, निद्रा व प्रमादाचे प्राबल्य असते. त्यांचे कर्तव्य काय आहे हे माहीत असूनही ते कर्तव्य करायला प्रवृत्त होत नाहीत बव अमुक निषिद्ध कर्म आहे हे जाणत असूनही ते केल्यावाचून ते राहत नाहीत. अशा प्रकारे युगधर्माचा चढ-उतार मनुष्याच्या आंतरिक योग्यतेवर अवलंबून असतो. या योग्यतेला कोणी चार युग म्हणतात, तर कोणी यांना चार वर्णांचे नाव देतात, तर कोणी अति उत्तम, उत्तम, मध्यम आणि निकृष्ट असे चार श्रेणींचे साधक समजतात. प्रत्येक युगात भगवंताची साथ असते. उच्च श्रेणीत त्याची प्रतीती भरपूर येते तर निम्न श्रेणीत भगवंताचा सहयोग नाममात्र जाणवतो.

सारांश, श्रीकृष्ण म्हणतात साध्य वस्तू देणारे विवेक, वैराग्य इत्यादींना निर्विघ्नपणे प्रवाहित करण्यासाठी तसेच दूषणकारक काम-क्रोध, राग-द्वेष यांचा विनाश करण्यासाठी परमधर्म परमात्म्यामध्ये स्थिर होण्यासाठी मी युगा-युगात म्हणजेच प्रत्येक परिस्थितीत, प्रत्येक श्रेणीत मी प्रकट होत असतो. जोपर्यंत परमात्म्याचे सहाय्य नसते, तोपर्यंत विकार नष्ट झाले की थोडे बाकी आहेत हे तुम्हाला समजू शकत नाही. परमात्म्याची साथ असेल तर प्रत्येक श्रेणीत, प्रत्येक क्षमतेत तो तुम्हाला सहाय्य करतो. वत्सल भक्ताच्या हृदयात परमेश्वर प्रकट होतो. मग भगवान प्रकट झाल्यावर तर  सर्वजण त्याचे दर्शन घेऊ शकतील पण श्रीकृष्ण म्हणतात, नाही-

क्रमशः श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ४३.

लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

Leave a comment