श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ४४

श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ४४

श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ४४ –

अध्याय ४ – ज्ञानकर्मसंन्यासयोग – श्लोक क्र. ४.९ ते ४.१२ | श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ४४.

मूळ श्लोक –

जन्म कर्म च मे दिव्यमेवं यो वेत्ति तत्त्वतः ।
त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन ॥ ४-९ ॥

संदर्भित अन्वयार्थ –

अर्जुन = हे अर्जुना, मे = माझा, जन्म = जन्म, च = आणि, कर्म = कर्म, दिव्यम्‌ = दिव्य अर्थात निर्मल व अलौकिक आहेत, एवम्‌ = अशाप्रकारे, यः = जो मनुष्य, तत्त्वतः = तत्त्वतः, वेत्ति = जाणून घेतो, सः = तो, देहम्‌ = शरीराचा, त्यक्त्वा = त्याग केल्यावर, पुनः जन्म = पुनर्जन्माला, न एति = येत नाही, (सः) = तो, माम्‌ = मलाच, एति = प्राप्त करून घेतो ॥ ४-९ ॥

अर्थ –

हे अर्जुना, अधर्माच्या वृद्धीमुळे दुःखाने ( ग्लानीने ) मन भरून आल्यावर मी माझ्या स्वरूपाची जी रचना करतो तो माझा जन्म व साधकांना विध्नरूप ठरणाऱ्या कामक्रोधादि दुष्कृतींचा नाश करणे व परमात्म्याचा प्राप्तीचे लक्ष्य ठेवून साधना करणाऱ्या साधकांच्यात त्या साध्यप्राप्तीची क्षमता संचारित करणे व धर्माची संस्थापना करणे, धर्मला स्थैर्य देणे, हे माझे कर्म होय. माझे हे कर्म व जन्म दोन्ही दिव्य व अलौकिक आहेत. ते लौकिक नाहीत. चर्मचक्षूंनी मनुष्य ते पाहू शकत नाही. मन-बुद्धीने त्याला मापता येत नाही.

मग परमात्म्याचे स्वरूप जर इतके गूढ आहे, तर त्याला कोण पाहू शकते? केवळ यो वेत्ति तत्त्वत: ‘ तत्त्वदर्शी लोकच माझे या प्रकारचे दिव्य जन्म व कर्म बरोबर जाणतो आणि माझा साक्षात्कार त्याला झाल्यानंतर तो पुन्हा जन्माला न येता मलाच येऊन मिळतो.

जर तत्त्वदर्शी लोकच जर परमेश्वराचा जन्म व कार्य पाहू शकतात तर लाखो लोक परमेश्वराच्या दर्शनासाठी का व्याकूळ होऊन उभे आहेत? ते काय तत्त्वदर्शी आहेत का? महात्म्याचे सोंग घेऊन-वेष करून स्वतः भगवंताचा अवतार आहोत असे लोकांना भासवीत फिरत असतात व त्यांचे भोंदू शिष्यरूपी दलाल त्यांचा प्रचार करीत भटकत असतात. आणि लोक तो अवतार पाहायला गर्दी करतात. पण श्रीकृष्ण म्हणतात की केवळ तत्त्वदर्शी माझे स्वरूप पाहू शकतात. मग तत्त्वदर्शी कोणाला म्हणतात?

दुसर्‍या अध्यायात सत्‌ व असत्‌ यांचे विवरण करताना योगेश्वर श्रीकृष्णांनी सांगितले होते की, असत्‌ वस्तूचे अस्तित्व नसते व सतूचा तिन्ही कालात अभाव नसतो. तर आपल्याला असे म्हणावयाचे आहे का? त्यांनी सांगितले- ” नाही, तत्त्वदर्शी लोकांनीच त्याला पाहिले ”. ना कोणत्या भाषाविशारदाने त्याचे स्वरूप पाहिले ना कोणत्या धनवबानाने पाहिले. ते पुनःपुन्हा सांगतात की फक्त तत्त्वदर्शी व्यक्तीने पाहिले. म्हणजे तत्वदर्शी हा एक प्रश्न आहे. पाच व पंचवीस तत्त्वे मोजल्याने किंवा त्यांचा अभ्यास केल्याने तत्त्वदर्शी होत नाही. श्रीकृष्ण म्हणतात आत्मा हेच परमतत्त्व आहे. आत्मा परममध्ये तद्रूप झाल्यावर तो परमात्मा होतो. आत्म-साक्षात्कार ज्यांना होतो तोच हा आविर्भाव समजू शकतात. जो परमेश्वराच्या विरहाने व्याकूळ होतो अशा उत्कट भक्ती असणाऱ्या भक्ताच्या ठिकाणीच परमेश्वर अवतार घेत असतात. त्या भक्ताला सुरुवातीला आपल्याला कोण संकेत देत आहे, कोण मार्गदर्शन करीत आहे, हे समजत नाही. परंतु परमतत्त्व परमात्म्याचे दर्शन झाल्यावर तो त्या दिव्यभव्य रूपाचे दर्शन घेऊ शकतो व त्याला समजू शकतो व त्यानंतर तो आपल्या शरीराचा त्याग करून त्या स्वरूपातच मिसळून जातो. त्याला मग पुनर्जन्म प्राप्त होत नाही.

श्रीकृष्णांनी सांगितले की माझा जन्म दिव्य आहे. माझे दर्शन करू शकरणारेच मला प्राप्त करू शकतात. तेव्हा लोकांनी त्यांची मूर्ती बनवली, तिची पूजा करू लागले, भगवंताचा निवास आकाशात आहे अशी कल्पना केली. परंतु हे सर्व व्यर्थ आहे. त्या महापुरुषाच्या सांगण्याचे तात्पर्य एवढेच होते की, जर तुम्ही निर्धारित कर्म कराल तर तुम्ही स्वतःच दिव्य आहात. म्हणजेच दिव्यत्व तुमच्यात आहे हे जाणाल व मग मी आपल्यासारखाच बनलो आहे. मी आपली संभावना आहे. मी आपले भविष्य आहे असा आपल्या अंतरंगात ज्या दिवशी पूर्णतेचा साक्षात्कार तुम्हाला होईल त्या दिवशी तुम्ही तसेच बनाल जसे श्रीकृष्ण आहेत. अवतार कोठे बाहेर होत नाही. जर तुमचे हृदय प्रेमाने ओतप्रोत असेल तर आपल्या अंतरंगातही अवताराचा अनुभव शक्‍य आहे. श्रीकृष्ण येथे तुम्हाला प्रोत्साहन देत सांगत आहेत की अनेक लोक या मार्गा वरूनच माझ्याप्रत येऊन मला त्यांनी प्राप्त करून घेतले आहे.

मूळ श्लोक –

वीतरागभयक्रोधा मन्मया मामुपाश्रिताः ।
बहवो ज्ञानतपसा पूता मद्भावमागताः ॥ ४-१० ॥

संदर्भित अन्वयार्थ –

वीतरागभयक्रोधाः = (पूर्वीसुद्धा) ज्यांचे राग, भय आणि क्रोध हे सर्व प्रकारे नष्ट झाले होते, (च) = आणि, मन्मयाः = जे माझ्या ठिकाणी अनन्य प्रेमाने स्थित राहिले होते (अशा), माम्‌ = माझ्या, उपाश्रिताः = आश्रयाने राहाणाऱ्या, बहवः = पुष्कळ भक्तांनी, ज्ञानतपसा = उपर्युक्त ज्ञानरूपी तपाने, पूताः = पवित्र होऊन, मद्भावम्‌ = माझे रूप, आगताः = प्राप्त करून घेतले होते ॥ ४-१० ॥

अर्थ –

राग ( आसक्ती व विराग अनासक्ती ) यातून मुक्त होऊन तसेच भय- अभय, क्रोध-अक्रोध यातून मुक्त होऊन अहंकाररहित होऊन म्हणजेच मत्परायण होऊन माझ्या आश्रयास आलेले अनेक लोक ज्ञानरूप तपाने ‘पावन होऊन, माझ्या स्वरूपाला येऊन मिळालेले आहेत. माझ्या स्वरूपाला ते प्राप्त झाले आहेत. कोणत्या प्रकारे? तर ज्यांचे ज्यांचे हृदय अधर्माच्या वृद्धीने परमात्म्यासाठी दुःखाने भरून येते, तशा अवस्थेत मी माझ्या स्वरूपाची रचना करीत असतो व तसे प्रेमळ भक्त माझ्या स्वरूपाला प्राप्त करून घेतात. ज्याला योगेश्वर कृष्णांनी तत्त्वदर्शन म्हंटले होते त्यालाच त्यांनी येथे ज्ञान म्हटले आहे. परमतत्त्व म्हणजेच परमात्मा. त्याचे दर्शन, प्रत्यक्ष दर्शन घेऊन त्याला जाणणे, ईश्वराचे ज्ञान करून घेणे होय. असे मला जाणणारे जे ज्ञानी आहेत, ते माझ्या स्वरूपात येतात. येथे हा प्रश्न पूर्ण झाला. आता पुढे श्रीकृष्णांनी त्यांना भजणाऱ्यांचे त्यांच्या योग्यतेच्या , क्षमतेच्या आधारावर श्रेणीमध्ये विभाजन केले आहे.

मूळ श्लोक –

ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम्‌ ।
मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः ॥ ४-११ ॥

संदर्भित अन्वयार्थ –

पार्थ = हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), ये = जे भक्त, माम्‌ = मला, यथा = ज्या प्रकाराने, प्रपद्यन्ते = भजतात, तथा एव = त्याचप्रकाराने, अहम्‌ = मी सुद्धा, तान्‌ = त्यांना, भजामि = भजतो (कारण), मनुष्याः = सर्व माणसे, सर्वशः = सर्व प्रकारांनी, मम = माझ्याच, वर्त्म = मार्गाचे, अनुवर्तन्ते = अनुसरण करतात ॥ ४-११ ॥

अर्थ –

हे पार्था, जे मला जितक्या उत्कटतेने भजतात मीही त्याच प्रमाणात त्यांना भजत असतो, म्हणजे तसे त्यांना फल देत असतो. त्याच प्रमाणात त्यांना सहकार देत असतो. साधकाची श्रध्दाच कृपा बनून त्याला प्राप्त होत असते. हे रहस्य जाणून ज्ञानी लोक अनन्य श्रद्धेने माझाच मार्ग अनुसरतात. मी जसे आचरण करतो, जे जे मला प्रिय आहे, ते ते सर्व ते करतात. माझ्या इच्छेप्रमाणे ते वागतात, त्याप्रमाणे सर्व गोष्टी करतात.

भगवान भक्ताला कसे भजतात? ते भक्ताच्या जीवनरथाचा सारथी बनतात व सतत भक्ताबरोबर राहतात. हे ईश्वराचे भक्ताला भजणे आहे. भक्ताला क्लेश देणाऱया ज्या ज्या दूषित-निंद्य गोष्टी आहेत त्यांचा ते विनाश करण्यास तत्पर असतात. सत्य स्वरूपात प्रवेश देणाऱ्या सदगुणांचे ते रक्षण करतात. जोपर्यंत ईश्वर अशा भक्तासाठी सारथी बनत नाही, प्रत्येक पावलागणिक भक्ताला साबध करण्यास तत्पर असत नाही, तोपर्यंत परमेश्वराच्या भजनादि आराधनेत मग्न असणारा कोणी कितीही मोठा भक्त असो, किंवा त्याने लाख वेळा डोळे बंद केले किंवा लाख प्रयत्न केले तरी तो या प्रकृतीच्या दृृंद्वापासून पार होऊ शकत नाही. परंतु आपण या मार्गात किती अंतर कापले आहे? अजून किती अंतर कापावयाचे बाकी आहे? हे साधकाला कसे समजणार? जेव्हा इष्टदेव आत्म्याशी तद्रूप होऊन उभे राहतात तेव्हा ते साधकाला सतत मार्गदर्शन करतात की तुम्ही आता येथे आहात, आता असे करा, असे वागा, असे चला. अशा प्रकारे दरी ओलांडत, हळूहळू पुढे जात भक्ताला ते स्वरूपात प्रवेश मिळवून देतात. भजन-आराधना तर साधकालाच करावी लागते; परंतु त्याच्याद्वारा जे अंतर कापले जाते ती’ इष्ट ‘ ची देणगी आहे असे जाणून सर्व लोक अत्यंत श्रद्धापूर्वक माझेच अनुसरण करतात. ते कशा प्रकारे वागतात?

मूळ श्लोक –

काङ्क्षन्तः कर्मणां सिद्धिं यजन्त इह देवताः ।
क्षिप्रं हि मानुषे लोके सिद्धिर्भवति कर्मजा ॥ ४-१२ ॥

संदर्भित अन्वयार्थ –

इह = या, मानुषे लोके = मनुष्यलोकात, कर्मणाम्‌ = कर्मांच्या, सिद्धिम्‌ = फळाची, काङ्क्षन्तः = इच्छा करणारे लोक, देवताः = देवतांचे, यजन्ते = पूजन करतात, हि = कारण (त्यांना), कर्मजा = कर्मांपासून उत्पन्न होणारी, सिद्धिः = सिद्धी, क्षिप्रम्‌ = शीघ्र, भवति = मिळून जाते ॥ ४-१२ ॥

अर्थ –

कर्मफळाची इच्छा करणारे ते लोक या लोकी देवतांची पूजा करतात. येथे कोणते कर्म अभिप्रेत आहे? श्रीकृष्णांनी अर्जुनाला ”तू नियत कर्म कर” असे सांगितले. हे नियत कर्म म्हणजे कसले कर्म? यज्ञाची प्रक्रिया म्हणजे कर्म. पण यज्ञ म्हणजे काय? यज्ञ म्हणजे साधनेचा विधी- ज्यामध्ये श्वास-उच्छवासाचे हवन केले जाते. याचा परिणाम असतो, परमात्म्याची प्राप्ती! म्हणजे कर्माचा खरा अर्थ आहे आराधना! तिचे स्वरूप याच अध्यायात पुढे पाहावयास मिळेल. या आराधनेचा परिणाम काय असतो? संसिद्धिम -परमसिद्ध परमात्म्याची प्राप्ती! ‘यान्ति न्रह्म सनातनम्‌’ शाश्वत ब्रह्मामध्ये प्रवेश. परम नेष्कर्म्याची स्थिती. श्रीकृष्ण म्हणतात- माझ्याप्रमाणे आचरण करणारे म्हणजे मला अनुसरणारे लोक या लोकात कर्मफल, जे नैष्कर्म्य सिद्धी, ती प्राप्त करण्यासाठी देवतांची पूजा करतात. अर्थात दैवी संपदा सामर्थ्यवान बनवतात.

तिसऱ्या अध्यायात श्रीकृष्णांनी सांगितले होते की, या यज्ञाच्या द्वारे तुम्ही देवतांची वृद्धी करा. देवी संपदा सामर्थ्यवान बनवा. हृदयरूपी देशात ही दैवी संपदा जो जो उन्नत होईल तो तो तुमचीही अन्नती होइल. या प्रकारे परस्परांशी उन्नती करत परमश्रेयाची प्राप्ती करून घ्या. शेवटपर्यंत उन्नती करीत राहण्याची ही अंत:क्रिया आहे. यावर भर देत श्रीकृष्ण म्हणतात की मला अनुसरून वागणारे लोक या मनुष्य शरीरात कर्मफलाची इच्छा करीत दैवी संपदेला बलवान बनवतात. नेष्कर्म्य सिद्धी शीब्रतेने प्राप्त होते. म्हणजे ते कर्मफल प्राप्त करून घेण्यांत त्यांना यश मिळते. शीघ्र म्हणजे काय? कर्म करताच लगेच परमसिद्धी प्राप्त होते का? नाही- नाही. तसे होत नाही.

‘परमात्म्याच्या प्राप्ती कडे जाण्याचा तो सोपान आहे. तो क्रमश: चढतच इच्छित प्राप्ती होत असते. एकदम वरच्या पायरीवर उडी मारण्याने भावातीत ध्यानासारखा चमत्कार होत नाही.

क्रमशः श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ४४.

लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

Leave a comment