श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ४५

श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ४५

श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ४५ –

अध्याय ४ – ज्ञानकर्मसंन्यासयोग – श्लोक क्र. ४.१३ ते ४.१६ | श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ४५.

मूळ श्लोक-

चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्मविभागशः ।
तस्य कर्तारमपि मां विद्ध्यकर्तारमव्ययम्‌ ॥ ४-१३ ॥

संदर्भित अन्वयार्थ –

चातुर्वर्ण्यं = ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र या चार वर्णांचा समूह, गुणकर्मविभागशः = गुण आणि कर्म यांच्या विभागानुसार, मया = माझ्याकडून, सृष्टम्‌ = रचला गेला आहे, तस्य = त्या सृष्टी-रचना इत्यादी कर्माचा, कर्तारम्‌ अपि = कर्ता असूनसुद्धा, अव्ययम्‌ = अविनाशी परमात्मा अशा, माम्‌ = मला, अकर्तारम्‌ = (खरे पाहता) अकर्ताच आहे, विद्धि = असे तू जाण ॥ ४-१३ ॥

अर्थ –

हे अर्जुना, चातुर्वर्ण्य मया सृष्टे’ चार वर्णाची रचना मी केली. याचा अर्थ मानवाची चार भागात विभागणी केली असा होतो का? श्रीकृष्ण म्हणतात- असा याचा अर्थ नाही, तर “गुण कर्म विभागशः’ मनुष्यामध्ये असणाऱ्या स्वभावजात गुणांच्या माध्यमातून कर्माची चार भागात विभागणी केली. गुण हा एक मापदंड आहे- प्रमाणे आहे. जर मनुष्यामध्ये तामसी गुणाचे प्राबल्य असेल तर आळस, निद्रा, प्रमाद, कर्म न करण्याची वृत्ती, निषीध्द कर्म माहीत असूनही त्याचा त्याग न करण्याची विवशता, हे गुण तेथे जास्त असतात. अशा अवस्थेत साधक साधनेला आरंभ कसा करू शकेल? तो दोन तास आराधनेला बसतो. तो कर्म करू इच्छितो; परंतु दहा मिनिटेही तो स्वतःच्या इच्छेप्रमाणे आराधना करू शकत नाही, कारण त्याचे चंचल मन! त्याचे शरीर दोन तास अबश्य बसले आहे; पण ज्या मनाला स्थिर बैठक घ्यायला पाहिजे ते मात्र हवेत उडत आहे. तर्क- वितर्कांचे जाळे ते विणत आहे.

नाना विचारांच्या तरंगाबरोबर ते विहार करीत आहे. मग त्या बसण्याचा अर्थ काय? कशासाठी वेळेचा अपव्यय करायचा? अशा वेळी ‘परिच्र्यात्मकं कर्म शूद्रस्यापि स्वभावजम्‌’ अव्यक्त स्थितीत असणाऱ्या व अविनाशी तत्त्वात स्थित असणाऱ्या या भगवतपथावर अग्रेसर असणाऱ्या आपल्यापेक्षा उच्च अशा लोकांची त्याने सेवा करावी. यामुळे मनातील दूषित संस्कारांचे शमन होईल व साधनेला उपयुक्त असणारे संस्कार दृढ होतील.

अशा सेवेमुळे तामसी गुणांचे प्राबल्य कमी होऊन राजसी गुणांची वाढ होते, सात्त्विक गुणांचाही थोडा संचार होतो व त्यामुळे साधकाची क्षमता वैश्य श्रेणीची बनते. अशा वेळी साधक स्वत: इंद्रिय संयमन व आत्मिक संपत्तीचा संग्रह करू लागतो. कर्म करता करता त्याचे तामसी गुण शांत होतील, राजसी गुण ही कमी होतील व त्याच्या ठिकाणी सात्त्विक गुणांचे प्राबल्य वाढेल. अशा वेळी साधक क्षत्रिय श्रेणीत प्रवेश मिळवेल व तेव्हा वीरता, कर्मात प्रवृत्त राहण्याची क्षमता, मागे न हटण्याची जिह, स्वामीत्ववृत्ती, प्रकृतीच्या तिन्ही गुणांना छाटण्याची क्षमता हे गुण त्याच्या ठिकाणी वाढीस लागतील. तेच कर्म अधिक सूक्ष्म झाल्यानंतर त्या साधकाच्या ठिकाणी फक्त सात्त्विक गुणांचेच प्राबल्य राहील व मग त्या साधकाच्या ठिकाणी मनाचे नियमन, इंद्रियांचे दमन, एकाग्रता, सरळता, ध्यान, समाधी, ईश्वरीय निर्देश, आस्तिकता इ. ब्रह्मामध्ये प्रवेश देऊ शकणारी क्षमता त्याला प्राप्त होते ब मग साधकाला ब्राह्मण श्रेणीचा समजले जाते.

ब्राह्मण श्रेणीच्या कर्माची ही सर्वात परम सीमा आहे. हाच साधक जेव्हा ब्रह्माच्या ठिकाणी स्थित होतो तेव्हा त्या अंतिम स्थितीत तो स्वत: ना ब्राह्मण राहत, ना क्षत्रिय, ना वैश्य, ना शुद्र. परंतु दुसर्‍यांच्या मार्गदर्शनासाठी तो ब्राह्मण आहे. कर्म एकच असते- नियत कर्म, आराधना! निरनिराळ्या स्वभावधर्मानुसार व गुणांनुसार या कर्माची चार भागांत वाटणी केली. योगेश्वर श्रीकृष्णांनी केली. अव्यक्त स्थितीत असणाऱया महापुरुषाने केली. म्हणून येथे श्रीकृष्ण सांगतात या कर्माचा जरी कर्ता असलो, तरी मी अविनाशी आहे व अकर्ता आहे असे तू जाण, असे का?

मूळ श्लोक –

न मां कर्माणि लिम्पन्ति न मे कर्मफले स्पृहा ।
इति मां योऽभिजानाति कर्मभिर्न स बध्यते ॥ ४-१४ ॥

संदर्भित अन्वयार्थ –

कर्मफले = कर्मांच्या फळांमध्ये, मे = माझी, स्पृहा = स्पृहा, न = नसते, (अतः) = म्हणून, माम्‌ = मला, कर्माणि = कर्मे, न लिम्पन्ति = लिप्त करीत नाहीत, इति = अशाप्रकारे, यः = जो, माम्‌ = मला, अभिजानाति = तत्त्वतः जाणून घेतो, सः = तोसुद्धा, कर्मभिः = कर्मांनी, न बध्यते = बांधला जात नाही ॥ ४-१४ ॥

अर्थ –

कारण कर्मफलाविषयी माझी आसक्ती नाही. पण कर्मफल म्हणजे काय? श्रीकृष्णांनी यापूर्वी सांगितले आहे की, यज्ञ ज्याने पूर्ण होतो त्या क्रियेला कर्म असे म्हणतात. आणि क्रिया समाप्त झाल्यावर यज्ञ ज्याची रचना करतो त्या ज्ञानामृताचे पान करणारा शाश्वत, सनातन ब्रह्मामध्ये प्रवेश मिळवतो. कर्माचा परिणाम म्हणजे परमात्मा! त्या परमात्म्याची आसही आता मला नाही. कारण तो माझ्याहून भिन्न नाही. मी अव्यक्त आहे. ‘परमात्म्याचीच स्थिती मला प्राप्त झालेली आहे. आता ज्यासाठी या कार्यात आसक्ती ठेवू, असे आता माझ्यासाठी काही उरलेले नाही. त्यामुळे कोणतेही कर्म मला बध्द करू शकत नाही. अशा प्रकारच्या ( म्हणजे मी अकर्ता, अव्यक्त, आत्मरूप आहे असा ) मला जो जाणतो म्हणजेच जो परमात्म्याला प्राप्त करून घेतो, तोहि कर्मबद्ध होत नाही. कर्मफल त्याला बद्ध करीत नाही.

मूळ श्लोक –

एवं ज्ञात्वा कृतं कर्म पूर्वैरपि मुमुक्षुभिः ।
कुरु कर्मैव तस्मात्त्वं पूर्वैः पूर्वतरं कृतम्‌ ॥ ४-१५ ॥

संदर्भित अन्वयार्थ –

एवम्‌ = अशाप्रकारे, ज्ञात्वा = जाणूनच, पूर्वैः = पूर्वकालीन, मुमुक्षुभिः अपि = मुमुक्षूंच्याकडूनही, कर्म = कर्म, कृतम्‌ = केले गेले आहे, तस्मात्‌ = म्हणून, पूर्वैः = पूर्वजांनी, पूर्वतरम्‌ कृतम्‌ = नेहमी केलेली, कर्म एव = कर्मेच, त्वम्‌ (अपि) = तू सुद्धा, कुरु = कर ॥ ४-१५ ॥

अर्थ –

हे अर्जुना, पूर्वी मोक्षाची इच्छा करणाऱया महापुरुषांनी अशा प्रकारच्या मला जाणून कर्म केले. काय जाणून? हेच की कर्माचा परिणाम म्हणजे परमात्म्याशी अभिन्नत्व. असे अभिन्नत्व प्राप्त झाल्यावर त्या परमात्म्याची स्पृहाही राहत नाही व त्यामुळे त्याला कर्म बद्ध करीत नाही. श्रीकृष्ण असे आहेत व म्हणून त्यांना कर्मे बद्ध करीत नाहीत व त्याच स्तरावरून जर आम्ही भगवंताला जाणले, तर ते कर्म आम्हालाही बद्ध करीत नाही. आता श्रीकृष्ण’ भगवान’, “महात्मा’, ‘ अव्यक्त ‘, योगेश्वर किंवा महायोगेश्वर कोणत्याही स्वरूपात असले तरी ते स्वरूप सर्वांसाठी आहे. हे जाणून पूर्वीच्या मुमुक्षू पुरुषांनी- मोक्षाची इच्छा करणाऱया पुरुषांनी कर्म केले व म्हणून हे अर्जुना, तू देखील पूर्वीच्या मुमुक्षूनी परंपरागत केलेले कर्म तू कर. हा कल्याणाचा एकमात्र मार्ग आहे.

आतापर्यंत योगेश्वर श्रीकृष्णांनी कर्म करण्यावर भर दिला; परंतु कर्म म्हणजे काय हे स्पष्ट केले नाही. दुसर्‍या अध्यायात त्यांनी कर्माचे फक्त नाव घेतले, नंतर त्या कर्माची विशेषता सांगितली की ते साधकाचे जन्म-मरणाच्या महान भयापासून रक्षण करते. नंतर कर्म करताना घ्यायच्या दक्षतेचे वर्णन केले; परंतु कर्म म्हणजे काय हे मात्र सांगितले नाही. तिसर्‍या अध्यायात त्यांनी सांगितले की, तुम्हाला ज्ञानमार्ग आवडो किंवा निष्काम कर्मयोग, कोणत्याही मार्गाचे आचरण केलेत तरी कर्म तर करावेच लागेल. कर्माचा त्याग केल्याने कोणी ज्ञानी होत नाही किंवा कर्माचा आरंभ केल्याने कोणी नेष्कर्मी होत नाही. जे नुसता हठयोग करून कर्मेन्द्रिये फक्त आवरतात, ते दांभिक आहेत. त्यासाठी तू मनाने इंद्रियांना वश करून कर्म कर. कोणते कर्म करावे? तर नियत कर्म करावे. आता हे निर्धारित कर्म कसे असते? तर त्यांनी सांगितले की, यज्ञाची प्रक्रिया म्हणजे नियत कर्म. पण यज्ञ म्हणजे काय की जो केल्याने कर्म होते? त्यावर त्यांनी यज्ञाची उत्पत्ती सांगितली.

यज्ञाची विशेषता सांगितली, पण यज्ञ म्हणजे काय ते सांगितले नाही. येथपर्यंत कर्म म्हणजे काय ते स्पष्ट झाले नाही. आता ते सांगत आहेत की, अर्जुना, कर्म कोणते व अकर्म कोणते याबाबतीत ज्ञानी लोकांनाही भ्रम पडतो. तेव्हा ते चांगल्या प्रकारे समजून घेतले पाहिजे.

मूळ श्लोक –

किं कर्म किमकर्मेति कवयोऽप्यत्र मोहिताः ।
तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ज्ञात्वा मोक्ष्यसेऽशुभात्‌ ॥ ४-१६ ॥

संदर्भित अन्वयार्थ –

कर्म किम्‌ = कर्म काय आहे, (च) = आणि, अकर्म = अकर्म, किम्‌ = काय आहे, इति = या बाबतीत, अत्र = निर्णय करण्यामध्ये, कवयः अपि = बुद्धिमान मनुष्यासुद्धा, मोहिताः = मोहित होऊन जातात, (अतः) = म्हणून, यत्‌ = जे, ज्ञात्वा = जाणल्यावर, अशुभात्‌ = अशुभापासून म्हणजे कर्मबंधनातून, मोक्ष्यसे = तू मोकळा होशील, तत्‌ = ते, (कर्म) = कर्मतत्त्व, ते = तुला, प्रवक्ष्यामि = नीटपणे समजावून सांगेन ॥ ४-१६ ॥

अर्थ –

कर्म कोणते व अकर्म कोणते याबाबतीत बुध्दिमान लोकदेखील मोहित झालेले आहेत. तेव्हा मी या कर्माविषयी तुला विस्तारपूर्वक सांगतो. म्हणजे ते जाणल्याने तू ‘ अशुभात माक्ष्यसे’ अशुभ अशा संसारापासून मुक्त होशील. कर्म ही एकच अशी वस्तू आहे की जी संसार-बंधनापासून मुक्ती देऊ शकते. हे कर्म चांगले जाणून घेण्यासाठी त्यावर पुन्हा भर देऊन श्रीकृष्ण म्हणतात-

क्रमशः श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ४५.

लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

Leave a comment