श्रीमद् भगवद् गीता भाग ४६ –
अध्याय ४ – ज्ञानकर्मसंन्यासयोग – श्लोक क्र. ४.१७ ते ४.२० | श्रीमद् भगवद् गीता भाग ४६.
मूळ श्लोक –
कर्मणो ह्यपि बोद्धव्यं बोद्धव्यं च विकर्मणः ।
अकर्मणश्च बोद्धव्यं गहना कर्मणो गतिः ॥ ४-१७ ॥
संदर्भित अन्वयार्थ –
कर्मणः अपि = कर्माचे स्वरूपसुद्धा, बोद्धव्यम् = जाणले पाहिजे, च = आणि, अकर्मणः = अकर्माचे स्वरूपसुद्धा, बोद्धव्यम् = जाणून घ्यावयास हवे, च = तसेच, विकर्मणः = विकर्माचे स्वरूपसुद्धा, बोद्धव्यम् = जाणले पाहिजे, हि = कारण, कर्मणः = कर्माची, गतिः = गती, गहना = गहन आहे ॥ ४-१७ ॥
अर्थ –
कर्म म्हणजे काय हे जाणले पाहिजे. अकर्माचे स्वरूपही समजून घेतले पाहिजे. तसेच विकर्म म्हणजे विकल्पशून्य विशेष कर्म जे आत्मपुरुषांद्वारे होते ते कर्मही जाणले पाहिजे. कारण कर्माचे तत्त्व समजण्यास फार गहन आहे. काही लोक विकर्माचा अर्थ ‘ निषिद्ध कर्म’, ‘ मन लावून केले गेलेले कर्म’ इत्यादी अर्थ करतात. वास्तविक येथे ‘ वि’ उपसर्ग विशिष्टतेचा द्योतक आहे. परमात्म्याच्या प्राप्तीनंतर महापुरुषांचे कर्म विकल्पशून्य होत असते.
आत्मस्थित, आत्मतृप्त, आत्मकाम महापुरुषांना कर्म करण्याने त्यांना ना काही लाभ होतो किंवा, कर्म करण्याचे सोडून दिले तर ना त्यांची काही हानी होते. तरीही मागाहून येणार्या लोकांच्या हितासाठी ते कर्म करीत असतात. असे कर्म विकल्पशून्य असते, विशुद्ध असते व याच कर्माला विकर्म असे म्हंटले जाते.
उदाहरणार्थ, गीतेमध्ये जेथे एखाद्या कार्यासाठी ‘ वि’ उपसर्ग लावला गेला तेथे तो विशषतेचा द्योतक आहे. निकृष्टतेचा नाही. जसे- ‘ योगयुक्तो विशुद्धात्मा जितेंद्रिय:’ ( ५/७ )- निष्काम कर्मयोगाने युक्त असणारा शुद्ध अंतःकरणाचा, अत्यंत आत्मसंयमी व ज्याने आपली इंद्रिये उत्तम प्रकारे जिंकली आहेत असा. याप्रकारे ‘ वि’ हा उपसर्ग विशेषतेचा द्योतक आहे. या प्रकारे गीतेत ‘ वि’ चा उपयोग केला गेला आहे जो पूर्णतेचा द्योतक आहे. या प्रकारे ‘ विकर्म’ म्हणजे विशेष कर्म असा घ्यावा. जे परमात्म्याच्या प्राप्तीनंतर महापुरुषांद्वारा केले जाते ते कर्म की, ज्यामुळे शुभाशुभ परिणाम होत नाही असे कर्म.
विकर्म म्हणजे अशा प्रकारे विशेष कर्म! कर्म व अकर्म ज्याचे स्पष्टीकरण पुढच्या श्र्लोकात केले आहे. जर तेथे कर्म ब अकर्माचा अर्थ समजला नाही तर मग तो कधीच समजला जाणार नाही.
मूळ श्लोक –
कर्मण्यकर्म यः पश्येदकर्मणि च कर्म यः ।
स बुद्धिमान्मनुष्येषु स युक्तः कृत्स्नकर्मकृत् ॥ ४-१८ ॥
संदर्भित अन्वयार्थ –
यः = जो माणूस, कर्मणि = कर्मामध्ये, अकर्म = अकर्म, पश्येत् = पाहतो, च = आणि, यः = जो, अकर्मणि = अकर्मात, कर्म = कर्म, पश्येत् = पाहतो, सः = तो, मनुष्येषु = मनुष्यांमध्ये, बुद्धिमान् = बुद्धिमान आहे, (च) = आणि, सः = तो, युक्तः = योगी, कृत्स्नकर्मकृत् = सर्व कर्मे करणारा आहे ॥ ४-१८ ॥
अर्थ –
कर्म म्हणजे आराधना. ही आराधना करीत असताना ती मी करत नसून माझ्या ठिकाणी असणारे गुणच ते करवून घेत आहेत. ‘ माझ्याकडून करविणारा तो परमदेव आहे’, हे जो जाणतो आणि कर्मामध्ये अकर्म पाहण्याची ज्याच्यामध्ये क्षमता येते व नंतर निरासक्त वृत्तीने सतत त्याच्याकडून कर्म केले जाते तेव्हा ते कर्म योग्य प्रकारे होत आहे असे समजावे. असे कर्म करणारा पुरुष सर्व मनुष्यात बुद्धिमान आहे, तोच योगी आहे. तो सर्व कर्मे करणारा व योगयुक्त असा महापुरुष आहे. त्याच्याकडून जे कर्म केले जाते त्यात लेशमात्र त्रुटी राहत नाही.
सारांश, आराधना म्हणजेच कर्म होय. ते कर्म करीत असताना त्यात अकर्म पाहणे म्हणजेच माझ्याकडून कर्म करवून घेणारा परमेश्वर आहे- मी एक यंत्रवत आहे. माझ्यात असणाऱ्या गुणांनुसार मी कर्म करीत असतो.
जेव्हा अशा प्रकारे साधकाला नैष्कर्म्य अवस्था प्राप्त होते व अशा प्रकारे अनासक्त होऊन, कृष्णभावनाभावित कर्म त्याच्याकडून होत राहते, तेव्हा परम कल्याणकारी असे कर्म घडते. पूज्य महाराज नेहमी म्हणत की ” जोपर्यंत ईश्वर आपला सारथी बनत नाही, जोपर्यंत तो आपल्याला आवरत नाही, रोकत नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थाने साधनेला प्रारंभच होत नाही.’ ‘ यापूर्वी जे काही केले जाते ते सर्व कर्ममार्गात प्रवेश करण्याचा एक फक्त प्रयत्न आहे; यापेक्षा अधिक काही नाही. नांगराचा सर्व भार बैलांच्या खांद्यावर असतो, परंतु तरीही शेत नांगरल्याचे श्रेय नांगरणार््याला दिले जाते. तशा प्रकारे साधनेचा सर्व भार साधकावर असतो; परंतु ती साधना-आराधना- कर्म तो करीत नसून त्याला मार्गदर्शन करणारा, त्याच्यामागे उभा असणारा ईश्वर करीत असतो. जोपर्यंत ईश्वर निर्णय देत नाही तोपर्यंत तुमच्याकडून कोणते कर्म घडले हे तुम्हाला समजूही शकणार नाही. तुम्ही प्रकृतीत भटकत आहात की परमात्म्यामध्ये हेही तुम्हाला समजणार नाही. या प्रकारे ईश्वराच्या आदेशानुसार जो साधक या आत्मपथावर मार्गक्रमण करतो, आपल्याला अकर्ता समजून विहित कर्मे करतो तोच साधक बुद्धिमान आहे, तोच योगी आहे असे समजावे. पण सतत कर्म करीतच राहावयाचे की त्यातूनही कधी मुक्ती मिळू शकतो? हा प्रश्न मनात निर्माण होणे स्वाभाविक आहे.
श्रीकृष्णांच्या मते जे आपल्याकडून सतत होत असते-घडत असते ते सर्व कर्म नसते. कर्म एक निर्धारित केली गेलेली क्रिया असते. अर्जुना- नियतं कुरु कर्म त्व तू नियत, निर्धारित कर्म कर. पण निर्धारित कर्म म्हणजे काय? तेव्हा श्रीकृष्ण म्हणतात ‘यज्ञार्थात्कर्मणो$न्यत्र लोको$यं
कर्मबन्थन:’ यज्ञाला कार्यरूप देणे म्हणजेच कर्म होय. या व्यतिरिक्त जे केले जाते ते मग कर्म नसते का? यावर श्रीकृष्ण म्हणतात, ‘ अन्यत्र लोको$यं कर्मबन्यन:’ या यज्ञाच्या प्रक्रियेशिवाय जे काही केले जाते, ते या लोकीचे बंधन असते. ते कर्म नव्हे तदर्थ कर्म’ तेव्हा अर्जुना, त्या यज्ञाच्या पूर्तीसाठी चांगल्या प्रकारे आचरण कर. यज्ञ म्हणजे आराधनेचा शुद्ध विधी; की ज्यामुळे साधक आराध्यदेवापर्यंत पोहचतो व त्यातच तद्रूप होतो.
या यज्ञामध्ये इंद्रियांचे दमन केले जाते, मनाचे शमन केले जाते, देवी संपदांची प्राप्ती होते. तर काही योगी प्राण व अपान यांच्या गतीचा निरोध करून प्राणायामात इतके तल्लीन होतात की, त्यावेळी ना आत कसला विचार- विकल्प मनात निर्माण होतो, ना बाहेरून काही आत शिरते. अशा स्थितीमध्ये चित्ताचा सर्वार्थाने निरोध केला जातो व मग ‘यान्ति ब्रह्म सनातन्’ साधकाला शाश्वत सनातन ब्राह्मी स्थिती प्राप्त होते. हाच तो यज्ञ की ज्याला कार्यरूप देणे म्हणजे कर्म करणे होय. तेव्हा कर्म म्हणजे ‘ आराधना’ कर्म म्हणजे ‘ भजन’. कर्म म्हणजे ‘ योग साधना ‘ आणि ते योग्य प्रकारे संपादन करणे आवश्यक असते. ते कसे संपादन करावे त्याचे विवेचन याच अध्यायात पुढे केले आहे. येथे फक्त कर्म व अकर्म यांचे विभाजन केले आहे की, ज्यामुळे कर्म करताना साधकाला योग्य दिशा मिळावी व साधकाला योग्य मार्गावर चालण्यासाठी मार्गदर्शन मिळावे.
मूळ श्लोक –
यस्य सर्वे समारम्भाः कामसङ्कल्पवर्जिताः ।
ज्ञानाग्निदग्धकर्माणं तमाहुः पण्डितं बुधाः ॥ ४-१९ ॥
संदर्भित अन्वयार्थ –
यस्य = ज्याची, सर्वे = सर्व, समारम्भाः = शास्त्रसंमत कर्मे, कामसङ्कल्पवर्जिताः = कामना व संकल्प यांच्या विना असतात, (तथा) = तसेच, ज्ञानाग्निदग्धकर्माणम् = ज्याची सर्व कर्मे ज्ञानरूपी अग्नीच्या द्वारे भस्म झालेली असतात, तम् = त्या महामनुष्याला, बुधाः = ज्ञानी, (अपि) = सुद्धा, पण्डितम् = पंडित, आहुः = म्हणतात ॥ ४-१९ ॥
अर्थ –
अर्जुन, ‘यस्य सर्वे समारम्मा: ‘ ज्या पुरुषाकडून आरंभिलेले संपूर्ण कर्म ( कर्मात अकर्मता पाहण्याची क्षमता असणाऱ्या पुरुषाची कर्मे संपूर्ण असतात. त्यात लेशमात्र त्रुटी नसते; हे मागील श्लोकात आपण पाहिले. /’कामसंकल्पवर्जिता: ‘ हळूहळू विकसित होऊन इतके सूक्ष्म होते कौ, मन भोगेच्छा ब संकल्पविरहित होते. ( भोगेच्छा व संकल्प यांचा निरोध होणे म्हणजेच मनावर विजय मिळवणे आहे. म्हणजे कर्म ही एक अशी वस्तू आहे की जी मनाला कामनारहित व संकल्प-विकल्परहित बनवते. ) अशा वेळी ‘ज्ञानग्निदग्धकर्माणं’ ज्याला आम्ही जाणत नाही; परंतु ज्याला जाणण्यासाठी आम्ही तळमळत असतो अशा परमात्म्याचा त्याला साक्षात्कार होतो. कर्मयोगाचे अशा प्रकारे आचरण करीत प्रत्यक्ष ईश्वराला प्राप्त करणे म्हणजेच ‘ज्ञान’ होय व या ज्ञानप्राप्तीबरोबरच दग्यकर्मार्ण: ‘ सर्व कर्मे कायमची दग्ध होतात. ज्याला प्राप्त करावयाचे होते त्याला प्राप्त केल्यानंतर आता त्यापुढे प्राप्त करण्यासारखे दुसरे काहीही नाही. तेव्हा कर्म करीत कोणाचा शोध घेणार? परमे श्वरप्राप्तीनंतर कर्माची आवश्यकताच संपत असते. अशी नेष्कर्म्य स्थिती प्राप्त झालेल्या बोधस्वरूप महापुरुषालाच ‘ज्ञानी ‘ म्हणतात, ‘ पंडित ‘ म्हणतात. असा महापुरुष काय करतो? कसा राहतो? याबाबत बोलताना श्रीकृष्ण म्हणतात
मूळ श्लोक –
त्यक्त्वा कर्मफलासङ्गं नित्यतृप्तो निराश्रयः ।
कर्मण्यभिप्रवृत्तोऽपि नैव किञ्चित्करोति सः ॥ ४-२० ॥
संदर्भित अन्वयार्थ
कर्मफलासङ्गम् = सर्व कर्मे आणि त्यांची फळे यातील आसक्ती, त्यक्त्वा = (संपूर्णपणे) सोडून देऊन, (यः) = जो मनुष्य, निराश्रयः = भौतिक आश्रयाने रहित झालेला आहे, (च) = आणि, नित्यतृप्तः = परमात्म्यामध्ये नित्यतृप्त आहे, सः = तो, कर्मणि = कर्मांमध्ये, अभिप्रवृत्तः अपि = व्यवस्थितपणे वावरत असतानाही (वस्तुतः), न एव किञ्चित् करोति = काहीही करत नाही ॥ ४-२० ॥
अर्थ –
अर्जुना, ज्या पुरुषाचा सांसारिक आश्रय संपलेला आहे म्हणजे जो निराश्रय झालेला असतो, जो परमेश्वराच्या ठिकाणी रत असल्याने नित्यतृप्त असतो, ज्याने कर्मफलाच्या आसक्तीचा त्याग केलेला असतो; तो कर्मास प्रवृत्त झाला तरी वस्तुतः काहीच करीत नसतो.
क्रमशः श्रीमद् भगवद् गीता भाग ४६.
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.