श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ४७

श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ४७

श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ४७ –

अध्याय ४ – ज्ञानकर्मसंन्यासयोग – श्लोक क्र. ४.२१ ते ४.२४ | श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ४७.

मूळ श्लोक –

निराशीर्यतचित्तात्मा त्यक्तसर्वपरिग्रहः
शारीरं केवलं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम्‌ ॥ ४-२१ ॥

संदर्भित अन्वयार्थ –

यतचित्तात्मा = ज्याने आपले अंतःकरण आणि इंद्रियांसहित शरीर जिंकले आहे, (च) = आणि, त्यक्तसर्वपरिग्रहः = सर्व भोगांच्या सामग्रीचा ज्याने परित्याग केला आहे असा, निराशीः = आशारहित असा सांख्ययोगी, केवलम्‌ = केवळ, शारीरम्‌ = शरीर-संबंधी, कर्म = कर्म, कुर्वन्‌ = करीत असताना, (अपि) = सुद्धा, किल्बिषम्‌ = त्याला पाप, न आप्नोति = लागत नाही ॥ ४-२१ ॥

अर्थ –

ज्याने हृदय व शरीरावर विजय मिळवला आहे, सर्व प्रकारच्या भोगेच्छाचा ज्याने त्याग केला आहे, अशा निरिच्छ पुरुषाने शरीरमात्रेकरून कर्म केले, तरी वस्तुतः तो काहीच करीत नसतो. त्यामुळे त्याला पाप लागत नाही. तो पूर्णत्वाप्रत पोहचलेला असल्याने त्याचे अध:पतन होत नाही.

मूळ श्लोक –

यदृच्छालाभसन्तुष्टो द्वन्द्वातीतो विमत्सरः ।
समः सिद्धावसिद्धौ च कृत्वापि न निबध्यते ॥ ४-२२ ॥

संदर्भित अन्वयार्थ –

(यः) = जो मनुष्य, यदृच्छालाभसन्तुष्टः = इच्छा नसताना आपोआप प्राप्त झालेल्या पदार्थांमध्ये संतुष्ट राहातो, विमत्सरः = ज्याच्या ठिकाणी ईर्ष्येचा संपूर्ण अभाव झालेला आहे, द्वन्द्वातीतः = जो हर्ष-शोक इत्यादी द्वंद्वांच्या पलीकडे संपूर्णपणे गेला आहे, सिद्धौ = सिद्धी, च = आणि, असिद्धौ = असिद्धी यांच्याबाबतीत, समः = समतोल राहाणारा कर्मयोगी, कृत्वा = कर्म करीत असताना, अपि = सुद्धा (त्या कर्मांनी), न निबध्यते = बद्ध होत नाही ॥ ४-२२ ॥

अर्थ –

सहजगत्या जे मिळेल त्यावर संतुष्ट असणारा, सुख-दुःख, राग-द्वेष आणि हर्ष-शोकादि द्वंद्ाच्या जो पलीकडे गेला आहे, विमत्सर:- जो मत्सररहित आहे, यशापयशाविषयी समभाव ठेवतो, अशा पुरुषाने कर्मे केली तरी देखील त्याला बद्धकारक नसतात. जी त्याला प्राप्त करावयाची होती, ती सिद्धी आता त्याच्यापासून भिन्न राहिली नाही ब ती आता त्याच्यापासून कधी अलगही होणार नाही. त्यामुळे त्याला असिद्धीचे भय उरलेले नाही. अशा प्रकारचा सिद्ध पुरुष कर्माच्या सिद्धी-असिद्धीविषयी म्हणजेच यशापयशाविषयी उदासीन असतो- दोहोंविषयी बद्ध होत नाही. त्याचे हे कर्म कशा प्रकारचे असते? तर ते नियत कर्म असते. हीच गोष्ट पुन्हा सांगताना श्रीकृष्ण म्हणतात-

मूळ श्लोक –

गतसङ्गस्य मुक्तस्य ज्ञानावस्थितचेतसः ।
यज्ञायाचरतः कर्म समग्रं प्रविलीयते ॥ ४-२३ ॥

संदर्भित अन्वयार्थ –

गतसङ्गस्य = ज्याची आसक्ती संपूर्णपणे नष्ट झाली आहे, मुक्तस्य = जो देहाभिमान आणि ममता यांनी रहित झाला आहे, ज्ञानावस्थितचेतसः = ज्याचे चित्त निरंतर परमात्म्याच्या ज्ञानामध्ये स्थित राहात आहे, यज्ञाय = (केवळ) यज्ञ संपादन करण्यासाठी, आचरतः = जो कर्म करीत आहे अशा माणसाचे, समग्रम्‌ = संपूर्ण, कर्म = कर्म, प्रविलीयते = पूर्णपणे विलीन होऊन जाते ॥ ४-२३ ॥

अर्थ –

हे अर्जुना, ‘यज्ञायाचरतः कर्म’ यज्ञाकरता केलेले आचरण म्हणजे कर्म आहे आणि ईश्वराचा साक्षात्कार म्हणजे ज्ञान होय. या यज्ञाचे आचरण करून ईश्वराचा साक्षात्कार प्राप्त करून घेणारा महापुरुष ज्ञानामध्ये, म्हणजेच परमात्म्याच्या ठिकाणी स्थित असतो, विषयवासना व कर्मफलाच्या आसक्तीपासून ते अलिप्त असतात, तो मुक्त झालेला असतो. त्याच्या या कर्मापासून काहीही फल किंवा परिणाम उत्पन्न होत नाही कारण, कर्माचे फल जो परमात्मा आता त्याच्यापासून भिन्न राहिलेला नसतो. पुरुषाला कर्म करण्याची काही आवश्यकताच नसते. तरीही लोकसंग्रहा साठी तो कर्म करीत असतो परंतु तरीही त्या कर्मापासून अलिप्तच असतो. कर्म करून त्यापासून तो अलिप्त कसा राहतो? यावर श्रीकृष्ण म्हणतात-

मूळ श्लोक –

ब्रह्मार्पणं ब्रह्म हविर्ब्रह्माग्नौ ब्रह्मणा हुतम्‌ ।
ब्रह्मैव तेन गन्तव्यं ब्रह्मकर्मसमाधिना ॥ ४-२४ ॥

संदर्भित अन्वयार्थ –

(यस्मिन्‌ यज्ञे) = ज्या यज्ञात, अर्पणम्‌ (अपि) = अर्पण म्हणजे स्रुवा इत्यादी सुद्धा, ब्रह्म = ब्रह्म आहेत, (च) = आणि, हविः (अपि) = हवन करण्यास योग्य असे द्रव्य (सुद्धा), ब्रह्म = ब्रह्म आहे, (तथा) = तसेच, ब्रह्मणा = ब्रह्मरूप अशा कर्त्याच्या द्वारे, ब्रह्माग्नौ = ब्रह्मरूप अग्नीमध्ये, हुतम्‌ = आहुति देणे (ही क्रिया सुद्धा ब्रह्म आहे), तेन = त्या, ब्रह्मकर्मसमाधिना = ब्रह्मकर्मामध्ये स्थित असणाऱ्या योग्याला, गन्तव्यम्‌ = प्राप्त करून घेण्यास योग्य (असे फळ सुद्धा), ब्रह्म एव = ब्रह्मच आहे ॥ ४-२४ ॥

अर्थ –

असा मुक्त पुरुष जे अर्पण करतो ते ब्रह्म असते, ज्याची तो आहुती देतो ते ब्रह्म. ज्या अग्नीत आहुती देतो तो अग्नीही ब्रह्मच असतो. तसेच स्वतः आहुती देणारा महापुरुषही ब्रह्मच आहे आणि तो ज्याप्रत जाणार तेही ब्रह्मच असते. कारण ‘ब्रह्मकर्म समाधिना’ ज्याचे कर्म ब्रह्मस्पर्श झाल्याने समाधिस्थ झाले आहे, ब्रह्मात विलीन झाले आहे, अशा महापुरुषाला जे प्राप्त करावयाच असते तेही ब्रह्मच असते. त्यामुळे तो जरी लोकसंग्रहासाठी कर्म करीत असला तरी तो त्या कर्माचा कर्ताधर्ता असत नाही.

ज्यांना ब्रह्मस्थिती प्राप्त झाली त्यांचे हे लक्षण झाले. परंतु कर्ममार्गात जे प्रवेश करतात त्यांना प्रथम मागील अध्यायात सांगितल्याप्रमाणे नियत- निर्धारित कर्म करावयास भगवंतानी सांगितले आहे. हे निर्धारित कर्म म्हणजे यज्ञाची प्रक्रिया. या व्यतिरिक्त जे कर्म केले जाते ते बंधनकाराक असते. तेव्हा त्या यज्ञाच्या पूर्तीसाठी वासना व कर्मफलाची आसक्तीविरहित होऊन कर्म करावे. पण हा यज्ञ म्हणजे काय? तो येतो कोठून? देतो काय? त्या सर्वाचे त्यांनी विवरण करून यज्ञाची विशेषता काय आहे ते सांगितले. परंतु अद्याप यज्ञ म्हणजे काय ते सांगितलेले नाही. आता येथून पुढे यज्ञ म्हणजे काय त्याचे स्पष्टीकरण केले आहे.

क्रमशः श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ४७.

लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

Leave a comment