श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ४८

श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ४८

श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ४८ –

अध्याय ४ – ज्ञानकर्मसंन्यासयोग – श्लोक क्र. ४.२५ ते ४.२८ | श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ४८.

मूळ श्लोक

दैवमेवापरे यज्ञं योगिनः पर्युपासते ।

ब्रह्माग्नावपरे यज्ञं यज्ञेनैवोपजुह्वति ॥ ४-२५ ॥

संदर्भित अन्वयार्थ

अपरे = दुसरे, योगिनः = योगी लोक, दैवम्‌ = देवतांचे पूजनरूपी, यज्ञम्‌ एव = यज्ञाचेच, पर्युपासते = चांगल्याप्रकारे अनुष्ठान करीत राहतात, अपरे = दुसरे (योगी लोक), ब्रह्माग्नौ = परब्रह्म परमात्मरूप अग्नीमध्ये, यज्ञेन एव = (अभेद दर्शनरूपी) यज्ञाच्या द्वारेच, यज्ञम्‌ = आत्मरूप यज्ञाचे, उपजुह्वति = हवन करतात ॥ ४-२५ ॥

अर्थ

या आधीच्या श्लोकात योगेश्वर श्रीकृष्णाने परमात्म-स्थित महापुरुषाच्या यज्ञाचे निरूपण केले आहे. परंतु जे योगी अद्याप त्या परमस्थितीप्रत पोहचले नाहीत, ज्यांनी नुकताच हा मार्ग आक्रमण्यास सुरुवात केली आहे, त्यांनी कोठून आरंभ करावा? यावर श्रीकृष्ण म्हणतात की, दुसरे योगी देवयज्ञाची उपासना करतात म्हणजे देवी संपदांना हृदयात बलवान करण्याच्या हेतूने, म्हणजेच आत्मसुखाच्या हेतुने, यज्ञ करतात कारण ब्रह्मानेच सांगितलेले आहे की, या यज्ञाद्वारे तुम्ही देवतांची उन्नती करा. तुमच्या हृदयात जो जो दैवी संपदा निर्माण होईल, तो तो तुमची प्रगती होईल व मग क्रमश: परस्परांची उन्नती करीत परमश्रेय प्राप्त होईल. म्हणजे हृदयदेशात देवी संपदाना बलवान बनवणे हाच योगमार्गाला प्रारंभ करणाऱ्या योग्यांचा यज्ञ आहे.

या दैवी संपत्तीचे वर्णन श्रीकृष्णांनी ९६ व्या अध्यायातील पहिल्या तीन लोकांमध्ये केले आहे. त्या देवी सदगुणांना महत्त्वपूर्ण कर्तव्य समजून त्यांची उन्नती करीत त्यांचे योग्य आचरण करीत परमश्रेयाप्रत योगी जाऊ शकतो. येथे तीच गोष्ट अर्जुनाला सांगताना श्रीकृष्ण म्हणतात, तुला दैवी संपत्ती प्राप्त झालेली असल्याने तू वृथा शोक करू नकोस. कारण ही दैवी संपदा मनुष्याच्या परम कल्याणासाठीच असते व त्यामुळे या संपदेद्वारा तू माझ्यात निवास करून राहशील, माझे शाश्वत स्वरूप प्राप्त करशील व मग अधम योनीचे कारण असणाऱ्या आसुरी संपत्तीचे हवन होऊ लागेल. म्हणून हा यज्ञ आहे आणि येथूनच आरंभ होत असतो.

दुसरे योगी ‘ब्रह्माग्नौ ‘-परत्रह्म परमात्मारूप अग्नीमध्ये यज्ञाद्वारेच यज्ञाचे अनुष्ठान करतात. श्रीकृष्णांनी पुढे सांगितले की या शरीरात ‘ अधियज्ञ’ मी आहे. यज्ञ ज्यात विलय पावतात तो यज्ञाचा अधिष्ठाता पुरुष मी आहे.

श्रीकृष्ण एक योगी होते, ते सदगुरु होते. याप्रमाणे दुसरे योगी ब्रह्मरूपी अग्नीमध्ये यज्ञ म्हणजे यज्ञरूप सदगुरुला उद्देश बनवून यज्ञाचे अनुष्ठान करतात; सारांश सदगुरुच्या स्वरूपाचे ध्यान करतात.

मूळ श्लोक

श्रोत्रादीनीन्द्रियाण्यन्ये संयमाग्निषु जुह्वति ।

शब्दादीन्विषयानन्य इन्द्रियाग्निषु जुह्वति ॥ ४-२६ ॥

संदर्भित अन्वयार्थ

अन्ये = अन्य योगी जन, श्रोत्रादीनि = श्रोत्र इत्यादी, इन्द्रियाणि = सर्व इंद्रियांचे, संयमाग्निषु = संयमरूपी अग्नीमध्ये, जुह्वति = हवन करतात, (च) = आणि, अन्ये = दुसरे योगी लोक, शब्दादीन्‌ = शब्द इत्यादी, विषयान्‌ = विषयांचे, इन्द्रियाग्निषु = इंद्रियरूपी अग्नीमध्ये, जुह्वति = हवन करतात ॥ ४-२६ ॥

अर्थ

अन्य योगीजन श्रोत्रादि ( श्रोत, नेत्र, त्वचा, जिव्हा, नासिका ) इंद्रियांचे संयमरूपीचे अग्नीत हवन करतात. म्हणजेच इंद्रियांना त्यांच्या विषयांपासून आवरून त्यांचे नियमन करतात. ज्याप्रमाणे अग्नीमध्ये घातलेली प्रत्येक वस्तू जळून भस्मसात होते त्याप्रमाणे संयमरूपी अग्नीत कामक्रोधादि विकार दग्ध होतात. दुसरे योगी शब्दादि ( शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध ) विषयांचे इंद्रियरूपी अग्नीत हवन करतात. म्हणजेच त्यांना साधनामय बनवल.

साधकाला या संसारात राहूनच आराधना करावयाची असते. सांसारिक लोकांचे बरे वाईट शब्द त्याच्या कानावर आदळत असतात. परंतु विषयोत्तेजक शब्द कानावर पडताच साधक त्यांच्या आशयास वैराग्य सहाय्य व वैराग्य उत्तेजक अशा भावामध्ये बदलून इंद्रियरूपी अग्नीमध्ये त्यांची आहुती देतो. अर्जुनाचेच एक उदाहरण घ्या. एकदा तो आपल्या चिंतनात मग्न होता. एकदम त्याच्या कानावर संगीताचे मादक स्वर पडले. त्याने वर मान करून पाहिले, तो पुढे उर्वशी उभी होती. उर्वशी ही एक वेश्या होती. अत्यंत लावण्यावती होती. तिचे रूप बघून सर्व मुग्ध व्हायचे. परंतु अर्जुनाने आपल्या स्नेहाळ दृष्टीने तिच्यात मातृरूप पाहिले. म्हणजे त्या मादक सुरांनी निर्माण झालेले विकार असे विलीन पावले. इंद्रियांच्या अंतरंगातच समाविष्ट होऊन गेले.

इथे इंद्रिये हाच जणू एक अग्नी आहे व अग्नीमध्ये टाकलेली वस्तू जशी भस्मसात होऊन जाते, त्याप्रकारे आशय बदलून त्या इष्टानुरूप बनवल्याने विषयोत्तेजक-रूप, रस, गंध, स्पर्श आणि शब्दही भस्म होऊन जातात. ते साधकावर कोणताही दुष्परिणाम करू शकत नाहीत. साधक या शब्दादिकांमध्ये रस घेत नाही, त्यांना ग्रहण करीत नाही.

मूळ श्लोक

सर्वाणीन्द्रियकर्माणि प्राणकर्माणि चापरे ।

आत्मसंयमयोगाग्नौ जुह्वति ज्ञानदीपिते ॥ ४-२७ ॥

संदर्भित अन्वयार्थ

अपरे = दुसरे (योगीलोक), सर्वाणि इन्द्रियकर्माणि = इंद्रियांच्या संपूर्ण क्रिया, च = आणि, प्राणकर्माणि = प्राणांच्या संपूर्ण क्रिया, ज्ञानदीपिते = ज्ञानाने प्रकाशित झालेल्या, आत्मसंयमयोगाग्नौ = आत्मसंयमयोगरूपी अग्नीमध्ये, जुह्वति = हवन करतात ॥ ४-२७ ॥

अर्थ

आतापर्यंत योगेश्वर श्रीकृष्णांनी ज्या यज्ञाची चर्चा केली त्या यज्ञात प्रथम देवी संपत्ती प्राप्त केली जाते, इंद्रियांचा संयम केला जातो, विषयोत्तेजक शब्द कानावर आदळले तरी त्यांचा आशय बदलून त्या उत्तेजक शब्दांपासून बचाव केला जातो. यापेक्षा उन्नत अवस्था असणारे दुसरे योगी इंद्रियांची व प्राणांची सर्व कर्मे ज्ञानाने प्रदीप्त झालेल्या आत्मसंयमरूपी अग्नीत हवन करतात. जेव्हा संयम आत्म्याबरोबर तद्रूप होतो, तेव्हा प्राण व इंद्रियांची सर्व कर्मे शांत होतात. अशा वेळी विषयांना उद्दीप्त करणाऱ्या व परमात्म्याच्या ठिकाणी प्रवृत्ती देणाऱ्या दोन्ही गोष्टी आत्मसात केल्या जातात व ते परमात्म्याच्या स्थितीप्रत जातात. परमात्म्याशी ते तद्रूप होतात. हीच यज्ञाची ‘परमसीमा होय. ज्या परमतत्त्वाला प्राप्त करावयाचे होते ते प्राप्त झाल्यानंतर काही शिल्लक उरतच नाही. पुढील श्लोकात यज्ञाबद्दल अधिक विवेचन करताना म्हणतात-

मूळ श्लोक

द्रव्ययज्ञास्तपोयज्ञा योगयज्ञास्तथापरे ।

स्वाध्यायज्ञानयज्ञाश्च यतयः संशितव्रताः ॥ ४-२८ ॥

संदर्भित अन्वयार्थ

अपरे = काही मनुष्य, द्रव्ययज्ञाः = द्रव्यासंबंधी यज्ञ करणारे आहेत, तपोयज्ञाः = तपस्यारूपी यज्ञ करणारे आहेत, तथा = तसेच (दुसरे काही लोक), योगयज्ञाः = योगरूपी यज्ञ करणारे आहेत, च = आणि, संशितव्रताः = अहिंसा इत्यादी कडक व्रतांनी युक्त (असे), यतयः = प्रयत्‍नशील मनुष्य, स्वाध्यायज्ञानयज्ञाः = स्वाध्यायरूप ज्ञानयज्ञ करणारे आहेत ॥ ४-२८ ॥

अर्थ

काही द्रव्य-यज्ञ करतात, म्हणजे महापुरुषांच्या सेवेमध्ये पत्र-पुष्प अर्पण करतात. त्यांच्या सेवेमध्ये आपल्या जवळील संपत्तीचे विविध दानरूपाने यजन करतात. श्रीकृष्ण म्हणतात की भक्तिभावाने पत्र-पुष्प, जल, फल म्हणजे जे देतील ते मी सेवन करतो आणि त्या देणाऱ्याचे कल्याण करतो. हा एक प्रकारचा यज्ञच आहे. आपल्या दानाने इतरांची सेवा करून अनेक आत्म्यांना आनंद देणे आणि मार्ग चुकलेल्याला आत्मपथाच्या मार्गावर आणणे हाही द्रव्य-यज्ञच होय.

याच प्रकारे काही पुरुष ‘ तपोयज्ञ’ करतात. स्वधर्माचे पालन करीत असताना आपली अधिक उन्नती व्हावी या हेतूने अनेक प्रकारच्या तपोरूप क्रियांचे आचरण करणे म्हणजे तपोयज्ञ होय. मनुष्याच्या स्वभावजन्य क्षमतेनुसार इंद्रियांकडून नानाविध कडक व्रतांचे आचरण करवले जाते. या मार्गावर प्राथमिक श्रेणीचा साधक सेवेद्वारा, वैश्य देवी संपत्तीच्या संग्रहाद्वारा, क्षत्रिय काम-क्रोधादि विकारांचे उन्मूलनद्वारा आणि ब्राह्मण ब्रह्मामध्ये प्रवेश मिळवण्याच्या क्षमतेद्वारा इंद्रियांकडून आचरण करून घेतात; म्हणजेच तपोरूप क्रिया करून घेतात. कोणत्याही प्रकारचे तपाचरण केले तरी सर्वांना सारखेच परिश्रम पडतात. वास्तवात यज्ञ एकच असतो. साधकाची जशी स्थिती किंवा क्षमता त्याप्रमाणे उच्च-नीच श्रेणीमध्ये तो फिरत असतो.

पूज्य महाराजश्री म्हणत की, ‘ मनासहित इंद्रिये व शरीर यांच्याकडून लक्ष्याला अनुरूप असे तपाचरण करवून घेणे म्हणजेच तप होय. ते दूर जाण्याचा प्रयत्न करतील, पण त्यांचे नियमन करून त्यांच्याकडून तपाचरण करून घ्या. ”

तर काही साधक योग-यज्ञाचे आचरण करतात. आत्म्याला प्रकृतीपेक्षा श्रेष्ठ असणाऱ्या परमात्म्यामध्ये तद्रूप करणे, आत्म्याचे व परमात्म्याचे मिलन घडवून आणणे म्हणजे योगच होय. सहाव्या अध्यायात ( श्लो.२३ ) योगाला ‘दृष्टव्य ‘ असे म्हंटले आहे. साधारणत: दोन वस्तूंचे मिलन म्हणजे योग, मग कागदाला लेखणी मिळाली किंवा टेबलाला थाळी मिळाली म्हणजे योग झाला का? नाही, हे तर पंचमहाभूतांपासून निर्माण झालेले पदार्थ आहेत.

प्रकृतीमध्ये असणारा आत्मा आपले शाश्वत रूप जे परमात्मा त्यात प्रवेश मिळवतो तेव्हा प्रकृती पुरुषामध्ये विलीन होते. यालाच योग म्हणतात. अनेक साधक या योगाचे आचरण करताना शम, दम इत्यादी नियमांचे सहाय्य घेतात. त्यांच्या या आचरणाला योग- यज्ञ असे म्हणतात. योग- यज्ञ करणारे तसेच अहिंसादी तीक्ष्ण व्रते करणारा यत्नशील पुरुष ‘ स्वाध्याय ज्ञान-यज्ञाश्च ‘ स्वतःचे, स्वस्वरूपाचे अध्ययन करणारा ज्ञानयज्ञाचा कर्ता असतो. येथे योगाच्या अष्टांगाना ( यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान व समाधी ) अहिंसादी तीक्ष्ण व्रते म्हणून म्हंटले आहे. अनेक लोक स्वाध्याय करतात. पुस्तक वाचणे म्हणजे स्वाध्यायाची पहिली पायरी आहे. परंतु शुध्द स्वाध्याय म्हणजे स्वतःचे अध्ययन ज्यात स्वतःच्या स्वरूपाची प्राप्ती असते. त्यामुळे साक्षात्कार होतो व हेच खरे ज्ञान असते.

क्रमशः श्रीमद्‌ भगवद्‌ गीता भाग ४८.

लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.

Leave a comment