श्रीमद् भगवद् गीता भाग ४९ –
अध्याय ४ – ज्ञानकर्मसंन्यासयोग – श्लोक क्र. ४.२९ ते ४.३२ | श्रीमद् भगवद् गीता भाग ४९.
मूळ श्लोक –
अपाने जुह्वति प्राणं प्राणेऽपानं तथापरे ।
प्राणापानगती रुद्ध्वा प्राणायामपरायणाः ॥ ४-२९ ॥
संदर्भित अन्वयार्थ –
अपरे = दुसरे कितीतरी योगीजन, अपाने = अपान वायूमध्ये, प्राणम् = प्राण वायूचे, जुह्वति = हवन करतात, तथा = त्याचप्रमाणे (इतर योगीलोक), प्राणे = प्राण वायूमध्ये, अपानम् = अपान वायूचे, (जुह्वति) = हवन करतात, अपरे = अन्य कित्येक, नियताहाराः = नियमित आहार करणारे, प्राणायामपरायणाः = प्राणायाम-परायण मनुष्य, प्राणापानगती = प्राण व अपान यांच्या गतीचा, रुद्ध्वा = रोध करून, प्राणान् = प्राणांचे, ॥ ४-२९॥
अर्थ
अनेक योगी अपानवायूच्या ठिकाणी प्राणवायूचे हवन करतात ( म्हणजे पूरक नावाचा प्राणायाम करतात ) व प्राणवायूच्या ठिकाणी अपानवायूचे यजन करतात ( म्हणजे रेचक नावाचा प्राणायाम करतात ). यामुळे सूक्ष्म अवस्था प्राप्त होते. ती प्राप्त झाल्यावर योगीजन प्राण ब अपान दोन्ही वायूंचा निरोध करून प्राणायामात ते तल्लीन होतात.
श्रीकृष्ण ज्याला प्राण-अपान म्हणतात त्यालाच महात्मा बुध्द’ अनापान’ म्हणतात. यालाच त्यांनी श्वास-प्रश्नास असेही म्हंटले आहे. ज्याला आत ओढले जाते त्याला प्राणवायू म्हणतात व ज्याला बाहेर सोडले जाते त्याला अपानवायू म्हणतात. योग्यांच्या अनुभूतीनुसार श्वास घेताना वातावरणातील संस्कारही त्याच्याबरोबर आत जातात आणि प्रश्नासाबरोबर आतील बरे- बाईट विचार बाहेर टाकले जातात. परंतु वातावरणातील संस्कार ग्रहण न करणे म्हणजेच प्राणांचे हवन करणे होय व आतल्या विचारांचे स्फुरण होऊ न देणे म्हणजे अपानवायूचे हवन करणे होय. जेव्हा अशा प्रकारे प्राण- अपानाचे योगी हवन करतो तेव्हा प्राण व अपान यांची गती सम होते व प्राणांचा याम म्हणजेच निरोध केला जातो. यालाच प्राणायाम असे म्हणतात. हीच मनाची विजितावस्था आहे. प्राणांचे थांबणे व मनाचे थांबणे एकच गोष्ट आहे.
प्रत्येक महापुरुषाने यावर विचार केलेला आहे. वेदांमध्येही याचा उल्लेख आहे. “चत्वारि वाक् पारमिता पदानि’ ( क्र्ग्वेद १/१९६४/”४५ अथर्ववेद ९/१०/२७) पूज्य महाराजश्री म्हणत, ‘* एकाच नामाचा वैखरी, मध्यमा, पश्यंती व परा अशा चतुर्विध वाणीमध्ये जप केला जातो. जी व्यक्त होते तिला वैखरी असे म्हणतात. यामध्ये भगवंताच्या नामाचा जप उच्चारण अशा प्रकारे केले जाते की ते आपणही ऐकू शकू आणि बाहेरचाही ऐकू शकेल. मध्यमा म्हणजे मध्यम स्वरात केलेला जप, जो जप फक्त आपण ऐकू शकतो, बाजूला बसलेली व्यक्तीही तो ऐकू शकत नाही. हा उच्चार- हा जप कंठामधून होत असतो. हळूहळू या नामजपाची एक लय बनते व मग ती लय सुरूच राहते. साधना आणखी सूक्ष्म झाल्यावर पश्यंती म्हणजे नाम पाहण्याची अवस्था प्राप्त होते, मग नाम जपले जात नाही ते श्वासातच तद्रूप होते- एकजीव बनून श्वासात मिसळून जाते. मग मनाला द्रष्टा बनवून उभे करा व बघत रहा की श्वास म्हणतो काय? श्वास येतो केंव्हा? तो बाहेर पडतो केंव्हा? महापुरुषांचे असे म्हणणे आहे की, हा श्वास ईश्वरनामाशिवाय दुसरे काही सांगत नाही. साधक ईश्वरनामाचा जप करीत नाही तर त्या जपातून नामजपाची धून ऐकत राहतो, श्वासाकडे नुसता पाहत राहतो म्हणून नामजपाच्या या श्रेणीला पश्यंती असे म्हणतात.
‘पश्यंतीमध्ये मनाला द्रष्टयाच्या रूपात उभे करावे लागते, परंतु साधना अधिक उन्नत-सूक्ष्म झाल्यावर ऐकण्याचे प्रयासही करावे लागत नाहीत. शरीराच्या अणुरेणूमध्ये-रंध्रारंध्रामध्ये ईश्वरनाम भरले गेले की, ते आपोआप ऐकायला येईल. “जपै न जपावै, अपने से आवै’ स्वत: जपू नका, मनाला ऐकण्याचे प्रयास देऊ नका. जप अविरत सुरूच राहील- यालाच अजपा असे म्हणतात. जपाला प्रारंभ न करणे म्हणजे अजपा नव्हे. जर जप करायला प्रारंभच केला नाही तर जप नावाची कोणती वस्तूच त्याच्याजवळ राहणार नाही. अजपा म्हणजे आम्ही त्याचा जप केला नाही तरी जप आमची साथ सोडत नाही. तो अविरत सुरूच असतो. शरीराच्या रोमारोमांत नामजप अखंड सुरू असतो- प्रवाहासारखा निरंतर-सतत! या स्वाभाविक जपालाच अजपा म्हणतात व हाच ‘ परावाणीचा जप ‘ होय. या जपामुळे साधकाला प्रकृतीमधून परम तत्त्व परमात्माकडे प्रवेश मिळत असतो. अशी ही परमात्म्यात प्रवेश मिळवून देणारी वाणी आहे. तिच्यानंतर वाणीमध्ये कोणतेही परिवर्तन होत नाही. कारण परमात्म्याचे दर्शन घडवून त्या परमतत्त्वातच ती विलीन होते व म्हणूनच तिला ‘ परा ‘ असे म्हंटले आहे.
प्रस्तुत श्लोकात योगे श्वर श्रीकृष्णांनी केवळ श्वासावर ध्यान केंद्रित करायला सांगितले असले तरी पुढे ते स्वतः ओ$मच्या जपावर भर देतात. गौतम बुद्धानेही अनापान सतीमध्ये श्वास- प्रश्नासाची चर्चा केली आहे. शेवटी या महापुरुषांना काय सांगावयाचे आहे? वस्तुत: सुरुवातीला वैखरी, नंतर मध्यमा आणि नंतर त्याचा विकास होत होत पश्यन्ती अवस्थेमध्ये श्वास काबूत येतो. त्यावेळी जप श्वासात मिसळून जातो- विलीन होतो; मग जपणार काय? नंतर तर केवळ श्वासाकडे पाहण्याचेच असते. म्हणून प्राण-
अपान म्हंटले आहे. ‘ नाम जपा’ असे म्हंटले नाही, कारण सांगण्याची आवश्यकताच नाही. जर तसे सांगितले तर साधकाची दिशाभूल होऊन साधक पुन्हा खालच्या श्रेणीवर येईल. महात्मा बुद्ध, ‘ गुरुदेव भगवान ‘ तसेच प्रत्येक महापुरुष- जे या मार्गाने गेले आहेत- ते सर्व एकच गोष्ट सांगतात की वैखरी आणि मध्यमा हे नामजपाचे केवळ प्रवेशद्वार आहे. पश्यन्तीमधूनच नामात प्रवेश मिळतो आणि परामुळे ते नाम शरीरात प्रवाहाप्रमाणे अविरत चालू राहते. या अवस्थेत नामजप साधकाची साथ सोडत नाही.
मन श्वासाबरोबर जोडलेले असते. जेव्हा श्वासावरच केवळ दृष्टी असते, श्वासामध्ये नाम तद्रूप होते तेव्हा आतून ना कसल्या विचार-विकल्यांचे स्फुरण होते; ना बाह्य वातावरणातील संस्कार आत प्रवेश करतो. हीच मनाची विजितावस्था आहे. हेच मनावर विजय प्राप्त करणे होय. आणि ही अवस्था प्राप्त झाल्यावरच यज्ञाचा परिणाम दिसून येतो.
मूळ श्लोक –
अपरे नियताहाराः प्राणान्प्राणेषु जुह्वति ।
सर्वेऽप्येते यज्ञविदो यज्ञक्षपितकल्मषाः ॥ ४-३० ॥
संदर्भित अन्वयार्थ –
प्राणेषु = प्राणांमध्येच, जुह्वति = हवन करतात, एते = हे, सर्वे अपि = सर्व साधकही, यज्ञक्षपितकल्मषाः = यज्ञांच्या द्वारे पापांचा नाश करणारे, (च) = आणि, यज्ञविदः = यज्ञ जाणणारे असतात ॥ ४-३० ॥
अर्थ –
दुसरे नियमित आहार घेणारे योगीजन प्राणांचे प्राणाच्या ठिकाणी हवन करतात. म्हणजे प्राणांनीच प्राणाचा लय करतात. ‘ पूज्य महाराजश्री ‘ म्हणत असत की, ”योग्याचा आहार, आसन व निद्रा ही दृढ असली पाहिजे, म्हणजेच नियमित असली पाहिजे. त्या योग्याच्या ताब्यात असल्या पाहिजेत, योग्याचे त्यांवर नियंत्रण असले पाहिजे. ” आहार-विहारावर अशा प्रकारचे नियंत्रण असणे खूप आवश्यक असते. असेच योगी प्राणांचे प्राणाच्या ठिकाणी हवन करतात. म्हणजे श्वास घेण्यावरच लक्ष केंद्रित करतात; ते प्रश्चनासावर ध्यान केंद्रित करीत नाहीत. प्रत्येक श्वासागणिक ते ओम शिवाय- ओंकार ध्वनिशिवाय दुसरे काही ऐकतच नाहीत. अशाप्रकारे यज्ञाच्या द्वारा ज्यांचे पाप नष्ट झाले आहे ते सर्व साधक यज्ञ जाणणारे असतात. यज्ञाच्या निर्दिष्ट विधीपैकी कोठूनही ते विधी करू शकतात कारण ते सर्व यज्ञ जाणणारे आहेत.
मूळ श्लोक –
यज्ञशिष्टामृतभुजो यान्ति ब्रह्म सनातनम् ।
नायं लोकोऽस्त्ययज्ञस्य कुतोऽन्यः कुरुसत्तम ॥ ४-३१ ॥
संदर्भित अन्वयार्थ –
कुरुसत्तम = हे कुरुश्रेष्ठ अर्जुना, यज्ञशिष्टामृतभुजः = यज्ञ झाल्यावर शिल्लक राहिलेल्या अमृताचा अनुभव घेणारे योगी लोक, सनातनम् = सनातन, ब्रह्म = परब्रह्म परमात्म्याप्रत, यान्ति = जातात, (च) = आणि, अयज्ञस्य = यज्ञ न करणाऱ्या मनुष्यासाठी तर, अयम् = हा, लोकः = मनुष्यलोक सुद्धा (सुखदायक), न अस्ति = राहात नाही (तर मग), अन्यः = परलोक, कुतः = कसा बरे (सुखदायक होऊ शकेल) ॥ ४-३१ ॥
अर्थ –
कुरुश्रेष्ठ अर्जुना, ‘यज्ञशिष्टामृतभुज’ यज्ञ करून जे शेष राहते तेच अमृत असते व ते जाणून घेणे म्हणजेच ज्ञान होय. ते ज्ञानामृत सेवन करणारे योगीजन यान्ति ब्रह्म सनातनम्’ शाश्वत, सनातन ब्रह्माप्रत पावतात. यज्ञ ही एक अशी वस्तू आहे की, जी पूर्ण होताच सनातन ब्रह्मामध्ये प्रवेश देते. समजा यज्ञ केला नाही तर काय होईल? श्रीकृष्ण म्हणतात की यज्ञ न करणाऱ्याला मनुष्यलोकसुद्धा सुलभतेने प्राप्त होत नाही. मग ‘परलोकप्राप्ती कोठून होणार? अशा मनुष्याला तिर्यक योनीच बरोबर आहे. तेव्हा ज्ञानामृत व परमपदाच्या प्राप्तीसाठी प्रत्येक मनुष्यमात्राला यज्ञ करणे अत्यंत आवश्यक आहे.
मूळ श्लोक –
एवं बहुविधा यज्ञा वितता ब्रह्मणो मुखे ।
कर्मजान्विद्धि तान्सर्वानेवं ज्ञात्वा विमोक्ष्यसे ॥ ४-३२ ॥
संदर्भित अन्वयार्थ –
एवम् = अशाप्रकारे, बहुविधाः = आणखीसुद्धा नानाप्रकारचे, यज्ञाः = यज्ञ, ब्रह्मणः = वेदाच्या, मुखे = वाणीमध्ये, वितताः = विस्ताराने सांगितले गेले आहेत, तान् = ते, सर्वान् = सर्व, कर्मजान् = मन, इंद्रिय व शरीर यांच्या क्रियांद्वारे संपन्न होणारे आहेत, विद्धि = (असे) तू जाण, एवम् = अशाप्रकारे, ज्ञात्वा = तत्त्वतः जाणून (त्यांच्या अनुष्ठानाद्वारे संपूर्ण कर्मबंधनातून), विमोक्ष्यसे = तू मुक्त होशील ॥ ४-३२ ॥
अर्थ –
असे पुष्कळ प्रकारचे यज्ञ वेदवाणीतून सांगितले गेले आहेत व ब्रह्ममुखातून त्यांचा विस्तार झालेला आहे. परब्रह्माच्या प्राप्तीनंतर महापुरुषांचे शरीराला स्वत: परब्रह्म धारण करत असते. अशा प्रकारे ब्रह्माशी एकरूप झालेल्या त्या महापुरुषांची बुध्दी यंत्रवत बनत असते. त्यांच्याद्वारे ब्रह्मच बोलत असते. त्यांच्या वाणीमधूनच यज्ञाचा विस्तार झालेला आहे.
हे सर्व कर्म तू ‘ कर्मजान् विद्धि’- कर्मापासून उत्पन्न झालेले आहेत हे जाणून घे. यापूर्वीही श्रीकृष्णांनी सांगितले आहे की ‘यज्ञ: कर्मसमुद्धव:’ ( ३/१४) यज्ञ अशा प्रकारे कर्मानेच संपादन झालेले आहेत हे तू जाणून घेतल्यानंतर ( या आधीच्या एलोकात सांगितले होते की यज्ञाने ज्यांचे पाप नष्ट झाले आहे तेच यज्ञाला यथार्थपणे जाणत असतात) हे अर्जुना तू विमोक्ष्यसे’ या संसारबंधनापासून मुक्त होशील. येथे योगे श्वर श्रीकृष्णांनी कर्म म्हणजे काय ते स्पष्ट केले आहे की यज्ञाची पूर्ती ज्या विधींनी, कृतीनी, क्रियांनी होते ती कृती-क्रिया म्हणजे कर्म होय.
दैवी संपत्तीची प्राप्ती, सदगुरुचे ध्यान, इंद्रियांचा संयम, श्वासात प्रश्नासाचे हवन, प्रश्नासाचे श्वासात हवन, या गोष्टी प्राण-अपान यांचा निरोध केल्यानेच साधत असतात. नोकरी, व्यापार किंवा राजनीतीत रस घेण्याने हे साधत नाही. यज्ञ ही अशी क्रिया आहे की पूर्ण होताच तत्क्षणी परब्रह्मामध्ये प्रवेश देते. कोणत्याही बाह्य कार्यापासून तत्क्षणी ब्रह्मामध्ये प्रवेश मिळत नाही. जर तसा प्रवेश मिळत असेल तर तुम्ही अवश्य तशी बाह्य कर्मे करा.
वास्तविक या सर्व क्रिया म्हणजे यज्ञचिंतनाच्या अंत:क्रिया आहेत, ज्यामुळे आराध्य देवतेचे दर्शन होते; त्या आराधनेचे ते चित्रण आहे. यज्ञ म्हणजे आराध्य देवतेपर्यंत पोहचण्याची निर्धारित प्रक्रिया आहे. श्वास- प्रश्नास, प्राणायाम इत्यादी अंत:क्रियानी यज्ञ केला जातो. ती कार्य-प्रणाली म्हणजेच कर्म होय. व कर्माचा शुध्द अर्थ आहे आराधना, चिंतन.
साधारणतः: लोकांना असे वाटत असते की आपण जे जे करतो ते सर्व कर्म असते आणि फलेच्छारहित कोणतेही काम करणे म्हणजे कर्मयोग होय. अधिक फायद्यासाठी विदेशी वस्त्रांची विक्री करणे म्हणजे कोणाला ते सकाम कर्म वाटते; पण देशसेवेसाठी जर स्वदेशी वस्त्रांची विक्री केली तर त्यांना ते निष्काम कर्म वाटते. किंवा निष्ठापूर्वक नोकरी करणे, लाभ- हानीचा विचार न करता व्यापार करणे म्हणजे कोणाला निष्काम कर्म केल्यासारखे वाटते. त्यांना हा निष्काम कर्मयोग वाटतो. जय-पराजयाच्या भावनेतून मुक्त होऊन युद्ध करणे किंवा निवडणूक लढणे म्हणजे निष्काम कर्म करून आपण निष्काम कर्मयोगी झालो आहोत असे अनेकजण समजतात वास्तविक असे काहीही नाही. याला निष्काम कर्म म्हणत नाहीत.
योगेश्वर श्रीकृष्णांनी स्पष्ट शब्दात सांगितले आहे की निर्धारित क्रिया-कृती म्हणजे कर्म- ‘व्यवसायात्मिका बुद्धिरेकेह कुरुनन्दन’। त्यांनी अर्जुनाला सांगितले की, अर्जुना, तू निर्धारित कर्म कर यज्ञासाठी केलेली जी प्रक्रिया जी कृती ते कर्म आहे; आणि यज्ञ म्हणजे काय ते स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की, श्वास-प्रश्नासाचे हवन, इंद्रियांचा संयम, यज्ञस्वरूप महापुरुषाचे ध्यान, प्राणायाम-प्राणांचा निरोध करून त्या परमात्म्याच्या ठिकाणी विलीन होणे म्हणजे यज्ञ! मनाचा विस्तार, म्हणजेच जग होय. श्रीकृष्णांच्याच शब्दांत सांगावयाचे तर ‘इहैव तैर्जितः सर्गो येषां साम्ये स्थित मन:’ (५/१९ ) समदृष्टीमध्ये जयांचे मन स्थिर झाले आहे, त्यांनी या लोकीच संसाराला जिंकले आहे. पण मनाचे समत्व आणि जगाचा काय संबंध आहे? जगाला जर त्याने जिंकले असेल तर त्याने कशासाठी थांबावे? याचे स्पष्टीकरण करताना श्रीकृष्ण म्हणतात ते ब्रह्म निर्दोष ब समत्वस्थितीचे आहे. इकडे मनही निर्दोष व समत्व स्थितीचे झाले म्हणजेच ते ब्रह्मात स्थित झाले असे समजावे.
तात्पर्य म्हणजे मनाचा विस्तार म्हणजेच जग होय. चराचर जगत ही हवन सामग्री आहे. मनाचा सर्वार्थाने निरोध करणे म्हणजेच जगाचा निरोध करणे होय. मनाच्या निरोधा बरोबरच यज्ञाची पूर्ती होते व यज्ञपूर्ती होताच शेष राहिलेला प्रसाद ज्ञानामृत समजून भक्षण करणारा पुरुष सनातन ब्रह्म प्रविष्ट होतो. हे सर्व यज्ञ ब्रह्मस्थित महापुरुषांच्या वाणीद्वारा सांगितले गेले आहेत. सर्व संप्रदयातील साधकांचे यज्ञ अलग अलग नसतात, त्यांचा यज्ञ एकच असतो. फक्त साधकांच्या क्षमतेनुसार त्यांच्या अवस्था उच्च-नीच असतात. हा यज्ञ जे करतात त्यांची कृती किंवा त्यांची ती क्रिया म्हणजे कर्म होय. संपूर्ण गीतेत एकाही इलोकात सांसारिक कार्य-व्यापाराचे समर्थन केलेले नाही. साधारणत: यज्ञ म्हटले की एक होमकुंड तयार करून त्यात तीळ, जव, तूप इ. सामग्री घेऊन ‘ स्वाहा ‘ म्हणून अर्पण केली जाते. पण हा खरा यज्ञ नव्हे. हे तर साधकासाठी उलट संकट आहे. श्रीकृष्णांनी अनेकदा सांगितलेला द्रव्य-यज्ञ वेगळा आहे. पशुबली, वस्तुदाह इत्यादी गोष्टींशी त्या द्रव्य यज्ञाचा काही संबंध नाही.
क्रमशः श्रीमद् भगवद् गीता भाग ४९.
लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.